परंपरेला आधुनिकतेची जोड हवीच...

परंपरेला आधुनिकतेची जोड हवीच...

Sunday February 21, 2016,

3 min Read

मेक इन इंडियामुळे काय झालं हा प्रश्न वादाचा आहे. इथं लोकांची गर्दी आली. अनेक मोठ्या कंपन्यांनी आपआपले स्टॉल लावले. आपण नक्की काय करतोय याचं साजेसं प्रेजेन्टेशन दिलं. अगदी फुड प्रोसेसिंगपासून कंस्ट्रक्शन आणि संरक्षण खात्यानं आपल्या वस्तूंचं प्रदर्शन मांडलं. पण इथं आलेली गर्दी हा मेक इन इंडिया यशस्वी होण्याचे संकेत आहेत का? तय याचं उत्तर नाही असंच आहे. मोठमोठ्या कंपन्याचं सोडा पण इथ जो सर्वसामान्य स्टॉलधारक होता त्याला या प्रचंड मोठ्या प्रदर्शनाचा काय फायदा झाला. तर त्याचं उत्तर हे काहीच नाही असं देता येईल. 

image


२७ क्रमांकाच्या पंडालमध्ये संगीत नाटक अकादमीच्या अगदी शेवटच्या टोकावर दुलाल कानजी यांचा स्टॉल होता. सतारीपासून, सूरसिंगारपर्यंत सर्वप्रकारची वाद्य बनवणारे दुलाल कानजी. पश्चिम बंगालच्या २४ परगना या भागातून इथं आलेले. संगीत नाटक अकादमीचे सर्वात आवडते तंतूवाद्य बनवणारे. अमजद अलीखाँ साहेबांच्या सरोजपासून अल्लाहउद्दीन खाँ यांच्या सुरशिंगारपर्यंत सर्वप्रकारची वाद्य बनवणारे दुलाल कानजी यांना विचारलं की मेक इन इंडियानं त्यांना काय मिळालं तर त्याचं उत्तर हे अनुभवातून आलेलं होतं हे स्पष्ट झालं. ते म्हणाले,” संगीत नाटक अकादमीनं आम्हाला इथं आणलं. आम्ही काय करतो हे सांगण्याची आम्हाला संधी मिळवून दिली. याचं जास्त समाधान आहे. यातून काय मिळेलंच असं नाही वाटत.” 

image


ही वाद्य बनवणं दुलाली कानजी यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. खुद्द दुलाली आणि त्याचे भाऊ अशोक कानजी हे दुसऱ्या पिढीतले. त्यांच्या अगोदर त्याचे वडील ही वाद्य बनवत. पश्चिम बंगलाच्या कमलपूर या गावात आता १०० वर्षांहून हा परिवार ही वाद्य बनवतोय. पण अजूनही त्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिंळालेला नाही. कानजी सांगतात “ आम्ही लहान होतो, आमचे बाबा हे काम करायचे, मग आम्हीही ते करु लागलो. पुढे आम्ही आमच्या मुलांनाही तेच शिकवलं. कारण याशिवाय आम्हाला काहीही करता येत नाही. पण नवीन पिढी आता यात नवीन काही तरी करण्याच्या प्रयत्नात आहे. आम्हाला याचा अभिमान वाटतो पण ही परंपरा कुठे मागे पडता कामा नये असं आम्हाला वाटतं”

कानजी यांनी या व्यवसायातलं अर्थशास्त्र सांगितलं, “ आम्ही घरातले सहाजण ही वाद्य तयार करतो. महिनाभर मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे चार वाद्य बनवू शकतो. एका वाद्याची किंमत वीस हजार रुपये असते. अनेकदा आमची चारही वाद्य विकली जातात. तर कधीकधी काहीही विकलं जात नाही. अशावेळी रिकामं बसून राहिल्याशिवाय पर्याय नसतो. आता दुकानात ही वाद्य मिळतात. त्यामुळे आमच्या पेक्षा जास्त फायदा हे दुकानदारांना मिळतो. त्यात काहीही गैर नाही. तो त्यांचा व्यवसाय आहे. आम्ही याकडे फक्त कला म्हणून पाहतो. इतकी अपेक्षा आहे की या कलेचा अंत व्हायला नको.” 

image


कानजी यांच्याबरोबर आलेले त्याचे चार मुलं इथं आलेल्या लोकांना सरोद आणि इतर वाद्य कशी बनतात याची प्रात्यक्षिकं दाखवत होते. भाषेची समस्या होती. बंगाली दुसरी भाषा येत नाही. हिंदीचा संबंध नाही एखाद दोन शब्दातून ते लोकांना आपली कला नक्की काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. लोकांना किती समजलं यावर प्रश्न चिन्ह आहे, पण त्यातूनच त्यांचा पुढे जायचा प्रयत्न असतो. 

image


दहा जणांचा हे कुटुंब याच कलेवर पोसलं जातंय. आता हा व्यवसाय तिसऱ्या पिढीकडे आलाय. झपाट्यानं बदलत चाललेल्या जगाचा वेग यांच्याकडे नाही. याचे हात अजूनही सरोद किंवा अन्य वाद्यांवरची नक्षी अधिक उठावदार कशी करता येईल याकडे लक्ष देण्यात ते व्यस्त आहेत. “ जग पुढे जातंय ना जाऊ दे. आम्हाला त्याचं काय पडलेलं? कोण तरी अमजद अली खाँ किंवा अल्लाहउद्दीन खाँ सारखा मोठा कलाकार आमच्या या वाद्यातून सूर काढून हजारो-लाखो लोकांच्या मनाला शांती देतोय. हेच आमचं समाधान आणि हीच आमची खरी कमाई.” 

image


संगीत नाटक अकादमी अशा या कलेच्या सच्च्या व्यावसायिकांना व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.  

आणखी काही कला-सौदर्य विषयक कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा :

रांगोळीचे माहेरघर जुचंद्र गावच्या रांगोळीची कहाणी...

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा श्री गणेशा करणारी पहिली महिला शहनाईवादक 'नम्रता गायकवाड'

'दास्तानगोई'तून 'सून भई साधो ': अंकित चढ्ढा …’