भारताची खाद्यसंस्कृती एका क्लिकवर उपलब्ध करुन देणारे 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी'

भारताची खाद्यसंस्कृती एका क्लिकवर उपलब्ध करुन देणारे 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी'

Thursday May 05, 2016,

4 min Read

संस्कृती, लोकपरंपरा आणि भाषांनी समृद्ध असलेल्या भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यपरंपरादेखील विविधतेने नटलेली आहे. आग्र्याचा पेठा असो, कालिकत स्पेशल फणसाचे चिप्स वा सिंधुदूर्गातील झांट्ये काजू... भारताची ही समृद्ध खाद्यपरंपरा एकाच क्लिकवर उपलब्ध करुन देणारा स्टार्टअप म्हणजे 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी'. प्रीथ पद्मनाभन आणि स्मिथा नायर यांच्या कल्पनेतून जन्माला आलेल्या या स्टार्टअपने मोठमोठ्या राज्यांपासून ते एखाद्या पदार्थाकरिता प्रसिद्ध असलेल्या गल्लीबोळातील दुकानांमधील पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करुन दिले. प्रत्येक ठिकाणाचा काही स्पेशल असा खाद्यपदार्थ असतो, जो पदार्थ त्या ठिकाणाची एक वेगळी ओळख निर्माण करत असतो, त्या पदार्थाची चव कायम तुमच्या जीभेवर रेंगाळते तसेच दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी तुम्हाला त्या पदार्थाची तीच चव चाखायला मिळत नाही. फिरायला जाणाऱ्या आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना अनेकदा आपण त्या परिसरातील प्रसिद्ध पदार्थ घेऊन यायला सांगतो. खवय्येगिरीची आवड असलेल्या प्रीथ पद्मनाभन यांनी ग्राहकांची ही नस बरोबर ओळखली आणि आपल्या सहकारी स्मिथा नायर यांच्यासोबत 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी' स्टार्टअपची सुरुवात केली.

image


प्रीथ आणि त्यांच्या सहकारी स्मिथा, यांनी २००४ साली पुण्यात 'क्युरोस सॉफ्टवेयर सर्व्हिस प्रा. लि.' नामक एक आयटी कंपनी सुरू केली. ती कंपनी यशस्वीरित्या सुरू असताना, प्रीथ आणि स्मिथा यांच्या मनात एक वेगळा व्यवसाय सुरू करण्याचा विचार येत होता. प्रीथ सांगतात की, 'सुट्टीवर जाणाऱ्या माझ्या अनेक मित्रांना मी तिथला स्पेशल पदार्थ आणायला सांगायचो. खरं सांगायचं तर, सुट्टीला किंवा फिरायला जाणारी व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने परतली नाही. यातूनच आम्हाला 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी'ची कल्पना सुचली.' प्रीथ सांगतात की, 'आमची मूळ संकल्पना अशी होती की, एखाद्या शहरातील प्रसिद्ध पदार्थ ग्राहकांना माफक दरात आणि घरपोच उपलब्ध करुन द्यायचा.' प्रीथ आणि स्मिथा हे दोघेही मूळचे केरळचे आहेत. तेथील चवीची त्यांना पुरेपुर माहिती असल्याने त्यांनी पहिल्यांदा आपल्या पोर्टलवर केरळचे पदार्थ उपलब्ध करुन दिले आणि कालांतराने त्यांनी त्यात विविध राज्याचे, प्रांताचे प्रसिद्ध पदार्थ उपलब्ध करुन दिले. ''फ्लेवर्स ऑफ सिटी' हे एक ऑनलाईन पोर्टल असून, एखाद्या शहराचा किंवा प्रांताचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ ते तुम्हाला घरपोच उपलब्ध करुन देतात. या स्टार्टअपद्वारे भारताच्या कोणत्याही राज्यातील व्यक्ती इतर राज्यातील, शहरातील पदार्थ मागवू शकतात. त्यामुळे तुम्हाला आता कोलकाताचे रसगुल्ले खायचे असतील, तर त्याकरिता एवढा प्रवास करुन कोलकाताला जाण्याची गरज नाही. फक्त एक क्लिक आणि कोलकाताचे रसगुल्ले तुम्हाला घरपोच उपलब्ध होतील़. प्रत्येक विभागाचा एक प्रसिद्ध पदार्थ असून, तो शोधण्यासाठी आमची एक रिसर्च टीम आहे. जी विविध प्रकारचे रिसर्च करुन प्रसिद्ध पदार्थांची आणि ते मिळत असलेल्या ठिकाणांची यादी तयार करत असतात. याशिवाय आम्हाला 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी'चे ग्राहकदेखील सल्ले देत असतात', असे प्रीथ सांगतात. ते सांगतात की, 'आमचे अनेक ग्राहक आम्हाला विविध ठिकाणांच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांची माहिती देत असतात. अनेकदा आमच्या नजरेतून जे पदार्थ चुकलेले असतात किंवा आम्हाला जे प्रसिद्ध पदार्थ माहित नसतात, त्यांची माहिती आम्हाला आमचे ग्राहक देतात. हा स्टार्टअप सुरू झाल्यापासून आम्हाला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.'

ज्या उत्पादनांची शेल्फ लाईफ जास्त असते जसे की, मसाले, चहा पावडर, जॅम, सिरप हे आणि असे अनेक पदार्थ 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी' आपल्या पुण्यातील गोदामात साठा करते. जेव्हा एखाद्या पदार्थाची त्यांनी ऑर्डर मिळते, तेव्हा ते त्यांच्या मागणीनुसार उत्पादनांची पॅकिंग करुन ते त्या उत्पादनांची रवानगी करतात. तर ज्या उत्पादनांची शेल्फ लाईफ कमी असते, जसे की संदेश, जॅम रोल किंवा प्रसिद्ध मिठाई यांसारख्या पदार्थांची रवानगी ते थेट त्या दुकानातूनच करतात. प्रीथ सांगतात की, 'आम्ही विविध राज्यातील अनेक दुकांनांशी टायअप केले आहे. त्यांच्याकडील पदार्थांची जर कोणी ऑर्डर केली तर आम्ही थेट ती त्यांच्या दुकानातून पाठवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी उत्पादनाची पॅकिंग केल्यानंतर आमची कंपनी त्या उत्पादनांची घरपोच वितरण करण्याची जबाबदारी पार पाडते. गेल्यावर्षी त्यांनी फेसबूकवर आपले पेज तयार केले असून, त्यांच्या या पेजला आजवर एक लाख लाईक्स मिळाले आहेत. प्रीथ सांगतात की, 'अनेकदा ग्राहक त्यांना ओळखीचे असलेल्या पदार्थांची ऑर्डर करतात. सहसा ग्राहक सुरुवातीला कमी ऑर्डर देतात. जेव्हा त्यांचा आमच्यावर विश्वास बसतो, तेव्हा ते मोठ्या प्रमाणात पदार्थांची ऑर्डर देतात तसेच विविध अनोळखी पदार्थांची चव चाखण्यासदेखील तयार होतात.' गेल्या महिन्यात विशू म्हणजेच मल्याळम नववर्षानिमित्त केळा वेफर्स आणि फणसाच्या चिप्सची मागणी सर्वाधिक होती, असे प्रीथ सांगतात. प्रीथ आणि स्मिथा यांना भविष्यात त्यांच्या या पोर्टलवर भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती उपलब्ध करुन द्यायची आहे. तसे परदेशात जिथे भारतीय लोकांचे वास्तव्य आहे, अशा ठिकाणीदेखील त्यांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे. तसेच अधिकाधिक ग्राहकांना आपल्या पोर्टलशी जोडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

'फ्लेवर्स ऑफ माय सिटी' या पोर्टलवर पदार्थांच्या निवडीकरिता विविध पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. आपण विशिष्ट शहरातील पदार्थ, तिखट किंवा गोड पदार्थ, नव्याने समाविष्ट करण्यात आलेले पदार्थ असे पदार्थांचे वर्गीकरण केले असून, त्याद्वारे ग्राहकांना पदार्थांची निवड करणे सुकर होते. तसेच त्यांनी ग्राहकांना 'ट्रॅक माय ऑर्डर' नामक एक पर्याय उपलब्ध करुन दिला असून, त्याद्वारे ग्राहक आपल्या ऑर्डरची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो. 'फ्लेवर्स ऑफ माय सिटी'ने आजवर २५ हजार ग्राहकांना आपली सेवा पुरवली असून, ग्राहकांनादेखील त्यांच्या स्टार्टअपबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. या स्टार्टअपबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही https://www.flavorsofmycity.com/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. 


आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्नॅकीबलः एक पाऊल निरोगी जगण्याच्या दिशेने

'द ग्रीन स्नॅक्स': आरोग्याशी नाही तडजोड, स्वादालाही नाही तोड

जोधाने अकबरासाठी तयार केलेल्या मेजवानीची खरी सूत्रधार : फूड स्टायलिश शुभांगी धैमाडे