पिक्काबॉक्स – जगप्रवासादरम्यान पायाभरणी एका आगळ्यावेगळ्या व्यवसायाची

पिक्काबॉक्स – जगप्रवासादरम्यान पायाभरणी एका आगळ्यावेगळ्या व्यवसायाची

Tuesday January 12, 2016,

8 min Read

काही महिन्यांपूर्वी ब्राझिलियन उद्योजक गुस्तावो तनाका यांनी मिडीयमवर एक अतिशय लोकप्रिय पोस्ट शेअर केली होती. ज्याचे शीर्षक होते ‘ जगात सध्या काहीतरी विलक्षण घडत आहे,’ आज जग हे चांगल्या अर्थाने बदलत आहे यावर आपला विश्वास असण्यामागील आठ कारणांची सविस्तर चर्चा त्यांनी याद्वारे केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, “ आपण आता अशा वळणापर्यंत आलो आहोत, जेथे मोठमोठ्या कंपन्यांबरोबर काम करणारेही त्यांची नोकरी आता सहन करु शकत नाही आहेत. त्यामागे कोणत्याही उद्देशाचा अभाव असल्याची भावना अशा प्रकारे दस्तक देत आहे, जणू काही तो तुमच्या अंतर्मनातील निराशेचा हंबरडाच आहे. यातून लोकांना बाहेर पडायचे आहे. सर्व काही सोडण्याची त्यांची इच्छा आहे. उद्योजक बनण्याचा धोका पत्करणारे लोक, मोठ्या रजेवर जाणारे लोक, कामामुळे नैराश्य आलेले लोक अशांची वाढती संख्या एका नजरेतच लक्षात येण्या इतपत मोठी आहे.”

ग्रेग काप्लान आणि सॅम पेसिन या तरुण उद्योजकांनी आपल्या रिमोट ईयर (Remote Year) या सामाजिक प्रकल्पातून तनाका यांच्या या म्हणण्यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. त्यांच्या वेबसाईटवर या प्रकल्पाचे वर्णन आहे ते असे, “ जगभरातील ७५ व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांना वर्षभराच्या काळात जगातील बारा शहरांमध्ये काम, प्रवास आणि या शहरांच्या अंतरंगांचा शोध घेण्याची संधी रिमोट इयर देऊ करते. या प्रत्येक शहरांत घालविलेला एक महिन्याचा हा काळ या समूदायाची ओळख तेथील संस्कृती आणि व्यावसायिक वातावरणाशी तर करुन देतोच पण त्याचबरोबर भौगोलिक सीमांच्या पलीकडे जात आयुष्यभरासाठी एक वैयक्तिक आणि व्यावसायिक नातेही निर्माण करण्यात मदत करतो.” २०१५ मध्ये स्थापना झालेल्या रिमोट इयरचे लोकांनी पहिल्याच वर्षात जंगी स्वागत केले आणि उपलब्ध ७५ जागांसाठी त्यांच्याकडे विक्रमी ७५,००० एवढे अर्ज आले.

सुवर्णसंधी

अनुजा जोशी आणि गौरभ मथुरे या नवरा बायकोचे न्यूयॉर्कमधील आयुष्य अगदी मस्त मजेत सुरु होते. दोघेही अतिशय उत्तम डीजायनर्स.... जगभरात भटकंती करण्याची ही संधी येण्यापूर्वी त्यांचे आपल्या क्षेत्रात अतिशय चांगल्याप्रकारे काम सुरु होते. गौरभ हे क्रिएटीव्ह डिरेक्टर म्हणून काम करत होते तर अनुजा या मॅनहटनमध्ये डिजाईन स्ट्रॅटेजिस्ट होत्या.

image


न्यूयॉर्कसारख्या शहरामध्ये चांगली कारकिर्द सुरु असताना आणि नुकताच नविन घरात प्रवेश केला असताना, हे सगळे सोडून प्रवासाला जाणे ही खरे म्हणजे अगदी चमत्कारीक गोष्ट होती, हे मान्यच करावे लागेल. त्यावर अनुजा म्हणतात, “ पण जर मग आत्ता नाही, तर मग कधी?” त्या पुढे सांगतात, “ गौरभला आणि मला, आम्हाला दोघांनाही प्रवासाची खूप आवड आहे. पण मर्यादीत सुट्टया आणि ९ ते ५ अशी नोकरी, त्यामुळे सहाजिकच आमच्या प्रवासावर मर्यादा येतात. एक गोष्ट मात्र कबूल करावीच लागेल की, एक वर्षभर सर्वकाही सोडून अशा प्रकारची भटकी जीवनशैली स्वीकारावी, असा मात्र त्यावेळी माझा कोणताच विचार नव्हता.” रिमोट इयर कार्यक्रमाची माहिती खरे म्हणजे गौरभलाच पहिल्यांदा मिळाली आणि त्याकरीता अर्ज करण्यासाठी त्यांनीच अनुजाचे मन वळविले. त्याप्रमाणे त्यांनी अर्ज केलाही आणि नंतर त्याबाबत विसरुनही गेले.

काही महिन्यांनी जेंव्हा ते त्यांच्या नव्या घरासाठी फर्निचरची खरेदी करत होते, तेंव्हाच त्यांना एक फोन आला आणि अर्जदारांपैकी निवडण्यात आलेल्या इच्छुकांमध्ये त्यांचाही समावेश असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मग काय, त्यांनी आपली खरेदी तात्पुरती थांबवली आणि मालकीच्या वस्तू सुरक्षित गोदामात ठेवून दिल्या आणि प्राग येथून जून २०१५ मध्ये प्रवासाला सुरुवात केली.

image


रिमोट इयर च्या या कार्यक्रमासाठी अर्जदाराला एकरकमी २७,००० डॉलर्स भरावे लागतात, वर्षभरातील त्यांच्या भटकंतीसाठी होणारा विमानप्रवासाचा खर्च आणि त्यांचा रहाण्याचा खर्च यातून भागवला जातो. पण या काळात ‘रिमोटस्’ ना त्यांना शक्य होईल अशा प्रकारचे कामही करावे लागते. अनुजा सांगतात, “आमची बहुतेक कमाई ही फ्रीलान्स वर्क अर्थात स्वतंत्रपणे केलेल्या कामातूनच होते. अर्थात न्यूयॉर्कच्या पगाराशी याची तुलनाच होऊ शकत नाही, पण आमच्या बचतीला हात न लावताही आमच्या या सहलीचा खर्च भागविण्यासाठी आम्हाला मिळत असलेले हे पैसे निश्चितच पुरेसे आहेत.”

प्रवास करत असतानाच व्यवसायाची पायाभरणी

आयुष्यात एका मोठ्या साहसी प्रवासात असताना आणि आर्थिक स्थिती फारशी मजबूत नसताना नवी कंपनी सुरु करणे हे अनेकांना टोकाचे अव्यवहार्य किंवा चुकीचे वाटू शकते. पण पिक्का बॉक्सची संकल्पनाच अशी आहे, की प्रवास करत असतानाच याची सुरुवात होणे गरजेचे असल्याचे अनुजा ठामपणे सांगतात. त्या सांगतात, “ याची सुरुवात खरे तर अगदी साध्या विचारातून झाली. एक दिवस गौरभ म्हणाला, ‘ आपण प्रवास करत असलेल्या प्रत्येक शहरातून आपल्याला आवडलेली स्मृतीचिन्हे किंवा स्थानिक उत्पादने किंवा गोष्टींचा एक बॉक्स अर्थात पेटी आपल्या कुटुंबाला पाठविले तर? मस्त ना? ’ मग आम्ही हा विचार आमच्या मित्रांपुढे मांडला आणि त्यांनासुद्धा असे काहीतरी हवेच होते. त्यानंतर मग आम्ही हा विचार प्रत्यक्षात आणण्याचे आणि एक व्यवसाय म्हणून याला सुरुवात करण्याचे ठरविले.”

पिक्काबॉक्स

जून २०१५ मध्ये जन्माला आलेले पिक्काबॉक्स हा एक असा प्रकल्प होता, ज्यामध्ये त्यांच्या आवडीचेच रुपांतर व्यवसायात झाले. याबाबत विस्ताराने बोलताना गौरभ सांगतात, “ प्रवासाचा निर्णय पक्का झाल्यानंतरच आम्ही ठरविले होते, की याकाळात आर्थिकदृष्ट्या सक्षम रहाण्यासाठी काम मिळत रहायलाच हवे. एक सर्वसाधारण जीवनशैली जगतानाच आपल्या आवडीच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करता यावा, हा देखील यामागचा हेतू होता. सुरुवात करण्यापूर्वी आमचा हा विचार केवळ सैद्धांतिक पातळीवर होता, मात्र सहा महिन्यांच्या प्रवासानंतर हे शक्य असल्याचे आम्हाला जाणवले. त्याचबरोबर दर दोन महिन्यांनी आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चाचा आढावाही घेत असतोच आणि प्रत्येक देशातील पिक्काबॉक्सवर केलेल्या खर्चाचा दरमहा हिशोबही ठेवतो.”

image


हा एक असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये ते दोघेही बऱ्याच काळापासून आहाेत. अनुजा सांगतात, “ आमच्या प्रवासाच्या या वर्षभराच्या काळात याची चाचणी घेण्याचा विचार आम्ही केला आणि परतल्यानंतर याची मुळं भक्कम करण्याचे ठरविले आहे.”

गौरभ सांगतात, “ डिजायनर्स असल्यामुळे कोणत्याही वस्तूचा अनुभव घेताना ‘ कसे आणि का’ हे प्रश्न आमच्यासाठी नेहमीच महत्वाचे असतात. जेंव्हा आमचे ग्राहक आमच्याकडे स्थानिक वस्तूंनी भरलेल्या बॉक्सची मागणी नोंदवितात, तेंव्हा आम्हाला आमच्या उत्पादनाच्या माध्यमातून खरे म्हणजे त्या संस्कृतीची गोष्ट आणि तिचे अंतरंग ग्राहकांपर्यंत पोहचवायचे असतात. लोकांचे नविन जागेविषयी कुतुहल वाढावे, त्यांना त्याबाबत नविन काहीतरी शिकता यावे आणि नविन आचारपद्धतींचा अवलंब करता यावा, अशी आमची इच्छा आहे. बाजारात आज असे अनेक मिस्टरी बॉक्सेस उपलब्ध आहेत, पण या श्रेणीत येऊ शकेल, असा एकही आम्हाला सापडू शकला नाही.”

image


त्यांच्या स्टार्टअपच्या नावाची कथाही अशीच रंजक आहे. अनुजा सांगतात, “हिचहॅकर्स गाईड टू गॅलेक्सी या पुस्तकांच्या सिरिजमधील मोस्टली हार्मलेसमध्ये पिक्का बर्ड हे एक काल्पनिक पात्र आहे. लॅम्युएला या ग्रहावरील पिक्का बर्ड हा रोजच्या आयुष्यातील अगदी साध्या गोष्टी बघूनही हर्षभरीत किंवा आश्चर्यचकीत होतो, उदाहरणार्थ सूर्योदय पाहून किंवा अचानकपणे एखादे पान गळून शांतपणे दगडावर विसावल्याचे पाहूनही त्याला आश्चर्य वाटते, पण एलियनचे आंतरिक्ष यान उतरल्याच्या घटनेचा मात्र त्याच्यावर कसलाच परिणाम होत नाही. पिक्काबॉक्सकडे आमचे स्वतःचे पिक्का आहेत. आमच्या या पिक्कांनाही रोजच्या आयुष्यातील गोष्टींमध्ये सौंदर्य आणि उत्सुकता शोधायला आवडते – जसे की स्थानिक चॉकलेट किंवा त्या देशाचे टपाल तिकिट ते अगदी तेथील स्थानिक हस्तकला. पिक्का ज्या गोष्टींनी उत्तेजित होतो, अशा गोष्टींपासून आम्ही हा मिस्टरी बॉक्स तयार करतो, जो त्या देशाचे सर्वोत्तमप्रकारे प्रतिनिधित्व करु शकेल.”

बिझनेस मॉडेल

त्यांच्या सध्याच्या जीवनशैलीत समाविष्ट करता येईल या दृष्टीने हे बिझनेस मॉडेल साधे आणि संक्षिप्त असणे गरजे होते. अनुजा सांगतात, “ प्रत्येक महिन्यात आम्ही नविन ठिकाणी जातो. जो एक महिना आम्ही त्या शहरात घालवतो, त्या काळात आम्ही तेथील संस्कृतीशी संबंधित, त्या देशातील आचारपद्धतीविषयी माहिती देणाऱ्या आणि त्या शहराचे आणि देशाचे ओझरते दर्शन घडवू शकतील, अशा सहा ते आठ वस्तू एकत्र करुन हा बॉक्स तयार करतो. दरमहा आम्ही केवळ मर्यादीत बॉक्सेसच तयार करतो आणि ते आमच्या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवतो. जो कोणी त्याची खरेदी करतो, त्यांना आम्ही तो पोस्टाने पाठवितो. महिना अखेरीस आम्ही सर्व बॉक्सेस रवाना करतो.”

image


पण साधे म्हणजे सोपे निश्चितच नाही. ही कल्पना सर्वोत्तम प्रकारे साकारण्यासाठी या जोडगोळीने काही धोरण निश्चित केले आहे. अनुजा सविस्तरपणे सांगतात, “ स्थानिक उत्पादनांचा शोध आणि त्यांना एकत्र बांधणे आणि त्यांची खरी कथा पोहचविणे, हे काम आम्ही सर्वोत्तमप्रकारे करु शकतो. ज्या कोणत्या शहरांत आम्ही प्रवास करतो, तेथे आम्ही खरेदी करणार असलेल्या वस्तूंच्या उत्पादकांबरोबर आम्ही भागीदारी करतो. सध्या आमच्याकडे ग्राहकांच्या दोन श्रेणी आहेत १. असे लोक ज्यांना ते भेट देऊ इच्छित असलेल्या जागांविषयी उत्सुकता आहे आणि त्याबद्दल नवीन काही जाणून घ्यायचे आहे. २. चांगला प्रवास केलेले असे लोक ज्यांना त्यांच्या मित्रमंडळींना आणि कुटुंबाला काही खास भेटवस्तू पाठवायच्या आहेत.”

गौरभ सांगतात, “ पिक्का बॉक्स हा सबस्क्रीप्शन बॉक्सपेक्षा वेगळा आहे. दरमहा आम्ही केवळ मर्यादीत बॉक्सेसच बनवितो आणि ते ऑनलाईन विक्रीसाठी ठेवतो. त्यांची विक्री होण्याचे प्रमाण हे त्या देशाच्या लोकप्रियतेवरही अवलंबून असते. उदाहरणार्थ तुर्कस्तान हा स्लोवेनियापेक्षा कितीतरी अधिक लोकप्रिय देश आहे.”

“ पिक्काबॉक्स हा अशा ब्रॅंडस् साठीही तयार केला जाऊ शकतो, जे त्यांच्या उत्पादनांच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकांना सांस्कृतिक कथा सांगू इच्छितात. सध्या हॉस्पिटॅलिटी आणि एअरलाईन उद्योगावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे कारण तेथून आम्हाला काही विचारणा झाल्या आहेत,” अनुजा सांगतात.

भविष्यातील योजना

“ पिक्काबॉक्सबाबत सर्वात विलक्षण बाब ही आहे की आम्ही प्रवास करत असतानाच या व्यवसायाची उभारणीही करत आहोत. सध्या आम्ही या व्यवसायाची पायाभरणी करत आहोत, भागीदारी उभारत आहोत आणि ब्रॅंड तयार करत आहोत. भविष्यात आम्ही आमची स्वतःची उत्पादने तयार करु, कदाचित आम्ही स्वतः किंवा यापूर्वी आम्ही ज्यांच्याकडून उत्पादने घेतली आहेत, अशा उत्पादकांबरोबर भागीदारी करुन. आम्हाला स्वतःला बनवायला आवडतील अशा काही उत्पादनांचा आम्ही विचारही केला आहे,” अनुजा सांगतात.

image


प्रवास

ते वर्षभराच्या प्रवासाच्या मधल्या टप्प्यावर पोहचले असून नवीन वर्षात ते जपानमध्ये आहेत. तर शेवटच्या चार महिन्यांत ते दक्षिण अमेरिकेतील विविध शहरांमध्ये जाणार आहेत.

image


मात्र हे जादुई वर्ष संपल्यानंतर पुन्हा एकदा ९ ते ५ नोकरीकडे वळणे हे निश्चितच कठीण असेल, याची कोणीही कल्पना करु शकते. तेंव्हा काय? या प्रश्नावर गौरभ सांगतात, “ आयुष्यात काही वेळा नियोजन महत्वाचे असले तरी अतिनियोजन हे आमच्या आयुष्याचे तत्वज्ञान कधीच राहिलेले नाही. मला माझे काम आवडते आणि मला ते पूर्णपणे सोडयचेही नाही. या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वीही मला अशीच जीवनशैली हवी होती, ज्यामध्ये मी आठ महिने काम करेन तर वैयक्तिक वाढीसाठी (प्रवास, नवीन कौशल्ये आत्मसात करणे, इत्यादी) चार महिने स्वतःला देईन. वर्षभराच्या या अनुभवाने आम्हाला हे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे आणि आम्ही भविष्यातही नक्कीच याचा समावेश आमच्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न करु.”

लेखक – राखी चक्रवर्ती

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन