दिल्ली मध्ये अशी बँक जिथे रुपये-पैसे नाही, ‘रोटी’ केली जाते जमा, गरजूंना दिले जाते भोजन!

दिल्ली मध्ये अशी बँक जिथे रुपये-पैसे नाही, ‘रोटी’ केली जाते जमा, गरजूंना दिले जाते  भोजन!

Wednesday November 18, 2015,

3 min Read

दिल्लीच्या आझादपूर मंडईला भलेही आशियातील सर्वात मोठी समजले जात असेल, पण इथेच आता एका नव्या प्रकारच्या अभियानाचा जोर दिसतो आहे. येथे चपात्या गोळा करण्याची अनोखी बँक चालवली जाते. जेथे चपात्या जमा केल्या जातात आणि नंतर गरजूंना वाटल्या जातात.


image


‘रोटी बँक सुरु केली आहे या मंडईतील फळव्यापारी राजकुमार भाटिया यांनी जे दिल्लीच्या आदर्शनगर भागात राहतात, त्यांच्यामते एक दिवस त्यांच्याकडे गरीब माणूस आला आणि त्याने त्यांना काही काम मागितले. त्यावेळी त्यांनी त्यांना सांगितले की काम तर काहीच नाही पण त्याची अवस्था पाहून त्याला काही पैसे देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितले की, ‘पैशाने पोट भरत नाही. त्यासाठी अन्न लागते आणि ते काम केल्यावर मिळते.’ त्याचे ते शब्द भाटिया यांच्या मनाला भिडले. त्यानंतर त्यांनी त्या गरीबाला ‘रोटी’ खायला दिली, पण जाताना त्याने त्यांना विचारप्रवृत्त केले. या घटनेनंतर त्यांनी सहका-यांशी चर्चा केली तर लोकांकडून त्यांना सारख्याच प्रतिक्रिया मिळाल्या. काही लोक म्हणाले की रोज तर कुणाला खायला घातले जाऊ शकत नाही. तेंव्हा राजकुमार यांनी त्यांना समजावले की, जर घरच्यांसाठी चपात्या बनत असतील तर त्यासोबत दोन-चार जास्त केल्या पाहिजेत, त्यासोबतच डाळ-भाजी किंवा लोणचे जे काही बनत असेल ते वेगळे काढले पाहिजे.


image


सुमारे तीन महिन्यांपूर्वी जेंव्हा त्यांनी हे काम सुरू केले तेंव्हा पहिल्यादिवशी केवळ सात पाकिटे आली. त्यानंतर त्यांना वाटू लागले की, अशाने या कामाचा उद्देश सफल होणार नाही. त्यावेळी त्यांच्यासोबत काम करणा-या काहीजणांचा भरोसा देखील उडून जाऊ लागला होता. मग लोकांना आवाहन करण्यासाठी त्यांनी पोस्टर लावले, समूह संपर्क माध्यमातून लोकांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर फेसबुकवर ‘रोटी बँक’चे पेज देण्यात आले. त्याचा परिणाम चांगला झाला.


image


आज ‘रोटी बँके’च्या चार केंद्रातून दिल्लीच्या आझादपूर भागातील काम चालते. राजकुमार भाटीयांच्या मते, “यासाठी आम्ही कुणाकडून पैसे मागत नाही,खरेतर पैसा देण्याचा प्रयत्न अनेकजण करतात, त्यामुळे त्यांच्या नावाने रोटी वाटली जावी. मात्र भारतीय संस्कृतीनुसार कुणाही गरीबाला अन्न घरच्या साहित्यातूनच दिले गेले पाहिजे. असे केल्याने संस्कृतीचे रक्षण तर होतेच त्यासोबतच ज्यांच्याकडे थोडा जास्त पैसा आहे ते गरीबांना मदत करण्यात सहकार्य करु शकतात.”

‘रोटी बँक’ची खास गोष्ट ही आहे की, त्यांच्या केंद्रात कोणीही भुकेलेला, गरीब येऊन जेवू शकतो. इतकेच नाही हे लोकदेखील जागोजागी जाऊन भुकेलेल्यांना अन्नदान करतात. राजकुमार भाटिया म्हणतात की, ते अनेकदा दिल्लीच्या अशा वस्त्यांमध्ये गेले जेथे वयोवृध्द राहतात, ज्यांची देखभाल करणारे त्यांचे आपले कोणीही नसते. त्याचा परिणाम असा झाला की, त्या वयोवृध्दांच्या आजूबाजूला राहणा-यांना वाटू लागले की जे काम राजकुमार भाटिया करत आहेत ते काम खरेतर त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्या वरिष्ठ नागरिकांची जबाबदारी त्यांनी स्वत: घेण्यात पुढाकार घेतला.


image


राजकुमार भाटिया म्हणतात, की त्यांचा प्रयत्न लहान मुले आणि वयोवृध्दांना प्राधान्याने भोजन देण्याचा असतो. झोपड्यांतील मुले विशेषत: उपाशीच असतात. त्यांच्यामते घेणारे आणि देणारे यांच्यात कोणताही फरक नसतो. ‘रोटी बँक’चे मुख्य केंद्र आझादपूर मंडईतील शेड क्रमांक पंधरा हे आहे, तर इतर केंद्र टेंट मार्केट इंदिरा नगर,नंदामार्ग आदर्श नगर, आणि पंचवटी कॉलनी या ठिकाणी आहे. राजकुमार भाटिया म्हणतात की, भुकलेल्यांना एक पाकिट दिले जाते. त्यात तीन चपात्या आणि लोणचे असते. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या या कार्यात समाजाच्या सर्वच वर्गांचे लोक सहभागी होत आहेत, आठ जणांची त्यांची एक तगडी ‘टिम’ आहे. ते या कामावर बारकाईने लक्ष देतात. राजकुमार भाटिया म्हणतात की, ‘रोटी बँक’च्या चार केंद्राशिवाय ते स्वत:ही अनेक जागी जाऊन लोकांना भोजनाचे पाकीट देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ते अशा लोकांना अजिबात पाकीट देत नाहीत जे नशा करतात. ‘रोटी बँके’त कोणीही भोजनाचे पाकीट सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत जाऊन देऊ शकतो. लवकरच इतर भागातही हे काम सुरू करण्याची भाटिया यांची योजना आहे.



लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे

    Share on
    close