कोट्यवधी रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडून उद्योजक बनणारे 'हॅलोकरी'चे राजू भूपती

कोट्यवधी रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडून उद्योजक बनणारे 'हॅलोकरी'चे राजू भूपती

Thursday May 12, 2016,

17 min Read


कोट्यवधी रुपयांची नोकरी सोडलेले राजू भूपती बनले यशस्वी उद्योजक....... पहिला पगार होता अवघे एक हजार रुपये प्रतिमहिना.... पंधरा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विविध पदांवर नोकरी..... तीन कोटी रुपयांच्या वार्षिक वेतन असलेली नोकरी सोडून सुरू केली 'हॅलोकरी'..... 'हॅलोकरी' ही इंडियन फास्टफूड घरपोच वितरीत करणारी जगातील पहिली साखळी कंपनी आहे.... 'हॅलोकरी'ला त्यांना बनवायचे आहे 'मॅकडॉनल्ड'सारखा जागतिक ब्रॅण्ड.

त्यांच्या आयुष्यात एवढे चढ-उतार आहेत की, ज्यांचा आपण विचारदेखील करू शकत नाही. अनेक लहान मोठी अपयशेदेखील आहेत. मोठी अपयशे तर अशी आहेत की, ज्यांमुळे अनेक सोनेरी स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र अपयशातून बरेच काही शिकतादेखील येते. एक मोठी शिकवण मिळाली, ती म्हणजे, अपयशाचा अर्थ फक्त प्रयत्न अयशस्वी झाले असा नाही. तर त्याचा अजून एक अर्थ आहे, तो म्हणजे, प्रयत्न अजून यशस्वी झाले नाहीत. अपयशाने अनेकदा त्यांच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला, अनेकदा त्यांच्या जीवनात प्रवेश केला देखील. मात्र संघर्ष आणि कधी न हरण्याची जिद्द मनात अशा प्रकारे भिनली गेली होती की, प्रयत्न कायम सुरूच राहिले. सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे अपयशाला त्यांच्यासमोर पराभव स्विकारावा लागला. संघर्षाला यश मिळाले आणि मेहनत सफल झाली. चढ-उतार, यश-अपयश, सुख-दुःख या सर्वांनी भरलेले त्यांचे जीवन एक अनोखी गोष्टच बनून गेले. ही गोष्ट ज्या व्यक्तिची आहे, त्यांचे नाव आहे राजू भूपती, ज्यांना डॉक्टर व्हायचे होते.. कदाचित बनलेदेखील असते. जर बनले असते तर फूड इंडस्ट्रीला एक नवा आणि महत्वाकांक्षी उद्योजक मिळाला नसता. राजू भूपती यांच्या जीवनात जेवढे यश आहे, तेवढेच चकित करणारे क्षणदेखील आहेत. आव्हानांचे क्षण त्यांची कठीण परीक्षा घेतात आणि त्यांना विचारतात की, तुम्ही या परिक्षेत यशस्वी व्हाल का? आणि ते काही असा निर्णय घेतात, ज्यामुळे यश त्यांच्या पायाशी लोळण घालते.

image


अॅपलॅबसारख्या बड्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये उप-उपाध्यक्ष आणि सीएससी कंपनीत आयटीएस डिलिव्हरी सर्विसेसच्या प्रमुख पदी काम करणाऱ्या राजू भूपती यांनी आपल्या आयुष्याची खरी सुरुवात एक हजार रुपयांच्या नोकरीपासून केली होती. त्यावेळी त्यांना पुसटशी कल्पनादेखील नव्हती की, एके दिवशी त्यांचे वार्षिक वेतन ३ कोटी रुपये होणार आहे. लॅब असिस्टंट पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कर्मचाऱ्यांच्या अव्वल स्थानापर्यंत पोहोचला. जमिनीपासून आभाळापर्यंत पोहोचण्याच्या या प्रवासात कलाटणी देणारा क्षण म्हणजे राजू भूपती यांनी कोट्यवधी रुपयांची नोकरी सोडून दिली. कारण त्यांना उद्योजक होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. १५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांची नोकरीवरील इच्छा उडाली आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज ते देशाविदेशात 'हॅलोकरी'चे संस्थापक म्हणून ओळखले जातात.

राजू भूपती यांचा आजवरचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना संघर्ष आणि निराशेच्या एका मोठ्या पर्वातून जावे लागले. त्यांची गोष्ट सुरू होते ती, आंध्रप्रदेशमधील अमलापुरम येथून. त्यांचे पिता नरसिम्हा राजू हे होमियोपॅथी डॉक्टर होते. त्यापेक्षाही अधिक ते समाजसेवक आणि आध्यात्मिक वृत्तीचे होते. ते लोकांचे मोफत उपचार करत असत. त्या वातावरण वाढत असलेले राजू भूपती यांच्या मनातदेखील वडिलांप्रमाणे डॉक्टर बनण्याचा विचार आला.

image


राजू भूपती त्या दिवसांच्या आठवणी सांगताना म्हणाले की, 'माझे वडिल प्रसिद्ध डॉक्टर होते. उपचारांकरिता ते लोकांकडून पैसे घेत नसत. हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केलेत. माझ्या घरी नेहमी जत्रेप्रमाणे वातावरण असायचे. नेहमी माझ्या वडिलांच्या आसपास एवढी गर्दी असायची की, मला त्यांच्यापर्य़ंत पोहोचणेदेखील अशक्य असायचे. ते नेहमी विविध उपक्रमांमध्ये गुंतलेले असायचे. मला त्यांच्यासारखे बनावे, त्यांचा वारसा आपण घ्यायला हवा, असे वाटायचे. असे असले तरी, मी त्यांच्याप्रमाणे आध्यात्मिक विचार स्वतःमध्ये रुजवण्यात कधीच यशस्वी झालो नाही. मात्र माझ्या डोक्यात त्या साऱ्या गोष्टी होत्या. मी डॉक्टर बनण्याचे निश्चित केले आणि इंटरमध्ये (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रासायनिकशास्त्र)चा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आतापर्यंत माझी गोष्ट व्यवस्थित सुरू होती. मात्र विज्ञानाचे शिक्षण घेताना, मला कठीण जात होते. मी शिकू शकत नव्हतो किंवा एकाग्रही होऊ शकत नव्हतो. मी काय करू शकतो, याचा अंदाज मला स्वतःला नव्हता.'

विशेष म्हणजे वडिलांनादेखील राजू भूपती यांना डॉक्टर बनवायचे होते. भूपती यांनी वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा 'एमसेट'ही दिली होती. मात्र त्यात त्यांना चांगला क्रमांक न मिळाल्याने एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला नाही. याला आपले पहिले अपयश म्हणताना राजू भूपती सांगतात की, 'जेव्हा बीपीएस अभ्यासक्रमासाठी माझा प्रवेश घेण्यात आला, तेव्हा मला समजले की, अभ्यासक्रम अवघड आहे. मी काही वाचू-लिहू शकत नव्हतो तसेच कोणत्याही विषयात मन एकाग्र करू शकत नव्हतो. सातवीपर्यंत तर मी अभ्यासात व्यवस्थित होतो. चांगल्या गुणांनी उत्तीर्णदेखील होत होतो. मात्र त्यानंतर काय बदल होत गेले, हे मला समजलेच नाही. माझे मन अस्थिर झाले होते. हो-ना करता करता मी कशीतरी प्रवेश परीक्षा दिली. माझा क्रमांक पाच अंकी होता. वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी दोन अंकी क्रमांक आवश्यक होता.' वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रवेश परिक्षेत भूपती यांच्या अपयशामुळे संपूर्ण परिवार निराश झाला होता. सर्वजण निराश आणि त्रस्त झाले होते. एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळणे, अशक्य होते. मात्र डेंटल आणि होमियोपॅथीचे पर्याय खुले होते. त्यांचे वडिल होमियोपॅथी डॉक्टर असल्याने कुटुंबियांनी आणि शुभचिंतकांनी राजू भूपती यांना होमियोपॅथी डॉक्टर बनवण्यावर जोर दिला. राजू भूपती यांच्याकरिता चांगले महाविद्यालय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. 

लांबलचक शोधमोहिम राबवल्यानंतर कुटुंबियांना वाटले की, भूपती यांच्याकरिता कर्नाटकमधील हुबळी येथील होमियोपॅथी महाविद्यालय सर्वात चांगले असेल. हुबळी महाविद्यालयात राजू भूपती यांचा प्रवेश नक्की झाला. प्रवेश घेण्यासाठी भूपती महाविद्यालयात पोहोचले, तेव्हा एक अविश्वसनीय घटना घडली. या घटनेबाबत बोलताना राजू भूपती सांगतात की, 'हुबळीमध्ये सर्वकाही चांगले होते. मला वाटले की, मी एका नव्या दुनियेच्या सफरीला सुरुवात करणार आहे. मी सुंदर स्वप्ने पाहू लागलो की, कशाप्रकारे मी तेथे मुलींसोबत फिरेन, मौज-मस्ती करेन, कशाप्रकारे नवीन मित्र बनवेन, माझी स्वतःची वेगळी खोली असेल, घरातल्यांपासून लांब असल्याने मला पूर्णतः स्वातंत्र्य असेल.' ते पुढे सांगतात की, 'मी माझ्या काकांसोबत महाविद्यालयाची फी भरण्यासाठी हुबळीला गेलो होतो. फी भरल्यानंतर गोव्याला जायची आमची योजना होती, मात्र असे झाले नाही. माझ्या काकांच्या मनात काय विचार सुरू होता, माहित नाही. महाविद्यालयाच्या गेटसमोर एक पीसीओ एसटीडी बूथ होता. काकांनी मला सांगितले की, तू फी भरण्याच्या कक्षाकडे रांगेत उभा रहा. मी फोन करुन येतो. मी काही वेगळ्याच दुनियेत होतो, माझ्या स्वप्नांमध्ये रमलो होतो. काही वेळाने ते परत आले आणि गंभीर चेहरा करुन मला सांगितले की, आपल्याला परत जायला हवे. तुझे वडिल काही वेगळ्या पर्य़ायांवर विचार करत आहेत. त्यांनी सांगितले आहे की, तेथे स्थानिक महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. तेव्हा मी माझ्या काकांना सांगितले की, मी येथून परत जाणार नाही. जेव्हा त्यांनी मला सांगितले की, मला परत जावे लागणार आहे, तेव्हा माझी सर्व स्वप्ने मातीत मिळाली. एका क्षणात माझी स्वप्नातली सुंदर दुनिया संपली होती. मी सहा वर्षांकरिता जो स्क्रिन प्ले बनवला होता, तो क्षणार्धात हवेत विरुन गेला. मी खूप दुःखी झालो.' राजू भूपती यांना हुबळीमधील या घटनेचा जबर धक्का बसला. त्यांच्या शब्दात सांगायचे तर, 'कितीतरी वेळ रांगेत उभा असलेला मी कक्षाजवळ पोहोचलो होतो. काही क्षणात मी फी जमा करणार होतो. माझ्या काकांनी येऊन मला फी जमा न करण्याचे आणि परतण्याचे सांगितले, तेव्हा मला गरगरल्यासारखे झाले. मला असे वाटले की, मी एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारच होतो की, कोणतरी मला धक्का दिला आणि सरळ येऊन जमिनीवर पडलो.'

अशा अनेक घटना, नवीन अनपेक्षित कलाटणी घेण्यासाठी राजू भूपती यांची वाट पाहत होत्या. अडचणी आणि विपरीत परिस्थितींपासून त्यांची लगेचच सुटका होणार नव्हती. हुबळीहून हताश आणि निराश परतल्यानंतर त्यांना समजले की, गुडीवाडा वैद्यकिय महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळू शकतो. राजू भूपती एनसीसी कॅडेट होते. त्यांना सांगितले गेले की, मेडिसिनमध्ये त्यांना एनसीसी कोट्यामध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तेथे प्रतिक्षा यादीत त्यांचा पहिला क्रमांक होता. राजू यांच्या मनात नव्या आशा जागण्यास सुरुवात झाली. ते नवी स्वप्ने पाहू लागले. मात्र योगायोग पहा, ज्या दिवशी त्यांची मुलाखत होती, त्याच दिवशी सरकारने एक आदेश जारी करुन एनसीसी कोटा कमी केला होता. त्यामुळे तोही दरवाजा बंद झाला होता. एकाएकी सर्व काही संपले होते.... स्वप्ने, आकांक्षा आणि संभावना. भूपती राजू यांना पुन्हा जुन्या महाविद्यालयात जाऊन तेथील मित्रांना आपला चेहरा दाखवायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही. त्यांनी पुन्हा 'एमसेट' परीक्षा दिली. त्याकरिता त्यांनी दुसऱ्या शहरात जाऊन प्रशिक्षण घेतले. मात्र यावेळेस त्यांचा क्रमांक पाच अंकी न येता सहा अंकी आला. पुन्हा एकदा निराशा.... प्रवेश परिक्षेतील वाढलेल्या अंकांप्रमाणे त्यांच्या निराशेतदेखील वाढ झाली होती.

image


प्रवेश परिक्षेत सलग दुसऱ्यांदा अपयशी झाल्याने त्यांनी पुन्हा आपल्या शहरात परत न जाण्याचा विचार केला. डॉक्टर बनण्याची त्यांची स्वप्ने चकनाचूर झाली होती. राजू भूपती यांनी बीपीसी विषय निवडले असल्याने डॉक्टर बनण्याची संभावना संपल्याने त्यांच्यासमोर जास्त पर्याय नव्हते. बीएससी करणे, हा त्यांच्यासमोर उपलब्ध असलेला सर्वात चांगला पर्याय होता. त्यांनी आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथील एका स्नातक महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या आठवणींना उजाळा देताना राजू सांगतात की, 'मी डॉक्टर असतो तर कसा असतो, हे मी आज सांगू शकत नाही. मात्र मला वाटते की, मी मनानेच डॉक्टर नाही. जर डॉक्टर बनलोदेखील असतो, तरी एक विध्वंसक डॉक्टर बनलो असतो. मला कायम वाटायचे की, मी काही वेगळ्याच गोष्टींकरिता बनलो आहे. लहानपणापासूनच मी चंचल होतो. माझी प्रकृती आणि प्रवृत्ती वेगवेगळी होती. कदाचित माझ्यात एक उद्योजक लपून राहिला असेल, जो मलाच माहित नव्हता.'

असे म्हणतात कधी कधी आय़ुष्याला त्याच्या मार्गावर सोडून द्यायला हवे. राजू भूपती यांनीदेखील असेच केले. त्यांनी पदवीनंतर ऑर्गेनिक केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी त्यांना माहित होते की, पदवीपर्यंतच्या तीन वर्षात त्यांना केमिस्ट्री या विषयात ३५ गूण मिळत होते. परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी ३५ गुणांची आवश्यकता होती. ३५ पेक्षा एकही गूण कमी मिळणे म्हणजे अनुत्तीर्ण होणे. असे असूनही राजू यांनी पदव्युत्तर पदवीकरिता आपला मुख्य विषय़ ऑर्गेनिक केमिस्ट्री हा बनविला. भोपाळमधील एका महाविद्यालयातून राजू यांनी एमएससीची पदवी मिळवली.

त्यानंतर राजू यांच्या आय़ुष्याने एक नवा मार्ग स्विकारला. राजू सांगतात की, 'अनेकदा परिस्थिती जेथे घेऊन जात असते, तेथे जायला हवे. माझे मोठे भाऊ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होते. त्यांच्या सल्ल्याने मी एका महिन्याचे माहिती तंत्रज्ञान विषयाचे प्रशिक्षण घेतले होते. तो विषय माझ्या आवाक्यातील नव्हता. मात्र मी प्रोग्रामिंग शिकून घेतले होते. त्याच कालावधीत अमेरिकेतून आलेल्या माझ्या एका शेजाऱ्याने कंपनी सुरू केली होती. त्यांनी मला एके दिवशी त्यांच्या कंपनीत काम करण्याबाबत विचारणा केली. माझ्यासमोर नोकरीकरिताचा हा पहिला प्रस्ताव होता. मी हा विचारदेखील केला नव्हता की, कोणी अशापद्धतीने मला समोरुन नोकरी देऊ करेल.'

image


राजू यांनी सांगितले की, भावाच्या सल्ल्याने त्यांनी नोकरीचा प्रस्ताव मान्य केला. त्यांना वाटले की, नोकरीच्या निमित्ताने का होईना पण माझ्या आयुष्यात सुखाचे क्षण परत येतील, पगार मिळेल, ज्यामुळे कुटुंबियांनादेखील समाधान वाटेल. मात्र त्यांना पुन्हा एकदा झटका लागणार होता. यावेळेसदेखील ते याकरिता तयार नव्हते. भूपती राजू यांनी सांगितले की, 'शेजाऱ्याने मला त्याच्या कंपनीत लॅब सहाय्यक म्हणून नियुक्त केले. कंपनीच्या मालकाने मला माझा पगार अवघा एक हजार रुपये असेल, असे सांगितले. त्या दिवसात मी माझ्या दुचाकीकरिता पाच हजार रुपयांचे पेट्रोल खर्च करत होतो. मला पुन्हा धक्का बसला. मला माहित होते की, एका मजूरालादेखील यापेक्षा अधिक पैसे मिळतात. मी विचार केला की, मी एवढा अयोग्य आहे का? मात्र माझ्यासमोर कोणता पर्य़ाय नव्हता आणि मी ती नोकरी निमूटपणे पत्करली. मी लज्जेस्तव माझ्या आई-वडिलांनादेखील ही गोष्ट कळू दिली नव्हती. मात्र पहिल्याच महिन्यात मला आश्चर्य़ वाटले, माझ्या मालकाने मला दीड हजार रुपये देत सांगितले की, तू आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले आहेस. त्यामुळे मी तुला नियोजित रकमेपेक्षा अधिक पगार देत आहे.'

भावूक होऊन राजू भूपती सांगतात की, 'माझ्याकरिता ती पहिला व्यक्ती होती, जिने माझ्या कामाची दखल घेतली होती. माझ्यात विश्वास निर्माण झाला की, मी काहीही करू शकतो. माझ्याकरिता तो दिवस अविस्मरणीय आहे.'

पहिल्या महिन्यातच झालेल्या कौतुकामुळे राजू यांचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यांनी सहा महिने खूप मन लावून काम केले. या दरम्यान त्यांच्यासमोर अनेक नवे लोक कंपनीत आले. या नव्या कर्मचाऱ्यांना ९ ते १० हजार पगारावर नियुक्त करण्यात आले होते. राजू यांना तेव्हाही दीड हजार रुपये मिळत होते. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण असूनही त्यांना दीड हजार आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा हजार वेतन का देण्यात येत आहे?, या गोष्टीचे त्यांना आश्चर्य़ वाटत होते. शिवाय ते कर्मचारी फक्त पदवीधर होते.

image


राजू विचार करत असत ती त्या युवकांकडे काय आहे? फक्त एवढेच की त्यांच्याकडे बीटेकची पदवी आहे, ही पदवी काय एवढी महत्वाची आहे? भारत हा काय असा देश आहे, जिथे फक्त डॉक्टर आणि अभियंते यांनाच चांगली नोकरी मिळू शकते? या दरम्यान जे आहेत त्यांचं काय होणार? त्यांच्याकरिता बॅंक आणि सरकारी कार्य़ालयात कारकून एवढ्याच नोकऱ्या आहेत का?

भूपती राजू यांना हे मान्य नव्हते. त्यांनी निर्णय घेतला की, ते एका वर्षात त्यांच्या बरोबरीचे होतील. त्यांनी हे एका आव्हानाप्रमाणे स्विकारले आणि एका वर्षात या मोहिमेत ते यशस्वीदेखील झाले. भूपती राजू या नव्या कर्मचाऱ्यांपेक्षा पुढे निघुन गेले होते. त्यांच्यातील उद्योजकतेची ती पहिली भावना होती, जी त्यांच्या मनात जागृत झाली होती. मेहनतीला फळ मिळाले होते आणि आत्मविश्वास दुणावला होता.

भूपती राजू सांगतात की, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडच्या लोकांना नेहमी कमी मानले जाते. आयआयटी आणि आयआयएममधून आलेले लोक सर्वोत्तम काम करू शकतात, असा समज आहे. ते काय काम करू शकतील, याचा विचार केल्याशिवायच त्यांना चांगल्या पदावर नियुक्त करण्यात येते. त्याकरिता पात्र असलेल्या दुसऱ्या बॅकग्राऊंडच्या लोकांना त्या नजरेने पाहिले जात नाही.

भूपती राजू २००१ साली अॅपलॅबसारख्या कंपनीत नियुक्त झाले होते. योग्यता आणि मेहनतीच्या जोरावर ते यशाच्या पायऱ्या चढत गेले. दहा वर्षात त्यांनी व्यवस्थापकापासून ते मुख्य सल्लागार आणि उप-उपाध्यक्षापर्यंतचा प्रवास पार केला होता. एक दिवस ते अॅपलॅबच्याच सीएससी कंपनीचे उपाध्यक्ष बनले. या प्रवासातील प्रत्येक क्षण त्यांची परीक्षा पाहणारा होता. विशेषकरुन अशा दोन घटना, ज्या ते कधीच विसरू शकत नाहीत. एकदा त्यांना अमेरिकेत राहायचे नव्हते, त्यामुळे ते परत आले आणि दुसरी घटना, जेव्हा त्यांना अमेरिकेत राहायचे होते मात्र त्यांना भारतात परतावे लागले. राजू सांगतात की, 'सहा-सात वर्षे काम केल्यानंतर मी कंपनीकडून अमेरिकेला गेलो. तेथे पोहोचल्यानंतर मला असे वाटले की, ही जागा माझ्याकरिता नाही. मी परत जाण्याचे ठरविले. मात्र कंपनीच्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सांगितले की, जर तुम्हाला अमेरिकेतून परत जायचे आहे, तर तुमच्याकरिता कंपनीत जागा नाही. मी अमेरिकेत होतो. माझी पत्नी गर्भवती होती. माझ्याकडे जास्त पैसेदेखील नव्हते. मी कोणत्याही परिस्थितीत भारतात परतण्याचे निश्चित केले होते. भावनात्मक पातळीवर माझा निर्णय झाला होता. दुसऱ्या दिवशी मी कंपनी सोडण्याकरिता गेलो, तेव्हा माझ्या अधिकाऱ्याने मला सांगितले की, तुमची पत्नी गर्भवती आहे. तुमच्याकडे एवढे आर्थिक बळदेखील नाही की, अशा परिस्थितीत तुम्ही जुळवून घेऊ शकाल. दोन महिने काम करा आणि त्यानंतर परत जा. ती माझ्याकरिता हिंमत आणि प्रेरणा देणारी गोष्ट होती. माझ्याकरिता एक मोठी मदत होती. कंपनीने नव्या पद्धतीने माझी मदत केली आणि कंपनीकरिता काही करण्याची माझीही जबाबदारी होती. मी ती कंपनी सोडली नाही. येथे परतल्यानंतरही मी काम सुरू ठेवले. पाच-सहा वर्षानंतर मी पुन्हा अमेरिकेला गेलो. यावेळी परिस्थिती अशी होती की, मला तेथे कायमचे राहायचे होते. आईच्या निधनानंतर जेव्हा मी हैद्राबादला आलो होतो, तेव्हा माझे सर्व नातेवाईक अमेरिकेत स्थायिक झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. तर मी का अमेरिकेला स्थायिक होऊ नये. मलाही अमेरिकेत स्थायिक व्हायला हवे. यूके, कॅनडा येथे मी गेलेलो मात्र तेथे स्थायिक होण्याचा विचार माझ्या मनात आला नाही. अमेरिकेत मी ५०० कर्मचारी हाताळत होतो. अमेरिकेत मी एका सरोवरासमोर नवा बंगलादेखील घेतला होता. तो बंगला राहण्यासाठी सुयोग्य बनवण्याचे कामदेखील पूर्ण झाले होते. सोफा आणि सामान व्यवस्थित लावून झाल्यावर मी घरातील टीव्ही व्यवस्थित सुरू आहे का, हे पाहण्यासाठी रिमोटचे बटण दाबणार एवढ्यात मला माझ्या सीईओचा फोन आला. ते मला पुन्हा भारतात बोलवत होते. मी त्यांना अमेरिकेत स्थायिक होण्याबद्दलची वार्ता केली. मात्र त्यांनी जी ऑफर मला देऊ केली, ती मी नाकारू शकत नव्हतो. ती जागतिक स्थानाची ऑफर होती. जिथे मी ५०० लोकांना हाताळत होतो, तेथे मी आता पाच हजार कर्मचाऱ्यांचा प्रमुख बनणार होतो. १५ दिवसांत सर्वकाही आटोपून मी भारतात परतलो.'

राजू भूपती यांनी त्या १२ वर्षात १४ वेळा घरे बदलली होती, मात्र यावेळेस एका मोठ्या उपलब्धीसहित. सप्ततारांकित नोकरी होती ती. कधीकाळी मागच्या बाकावर बसणाऱ्या मुलाशी बोलण्याकरिता आता असंख्य लोक होते. एक मोठे पद होते, ज्यावर सर्वांना अभिमान असतो. मात्र त्यावेळेस त्यांच्या मनात एक नवा विचार घोळू लागला होता. हे सर्वकाही माझ्याकरिता योग्य आहे का? यानंतर काय होणार? यापुढेदेखील काही आहे का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या ठिकाणी मी आता आहे, त्यापुढे काहीच नाही. मी विचार केला की, या क्षेत्रात मी जे काही करू शकत होतो, ते मी केले आहे. खूप झाले, आता मला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राहायचे नाही. मी नोकरी सोडली आणि माझा संगीताचा छंद पूर्ण करण्यास सुरुवात केली. माझा एक एल्बम काढला. मात्र चित्रपटात जशी कथा असते, तसेच माझ्यासोबत घडले. कोट्यवधींची नोकरी सोडल्यामुळे मी पुन्हा रस्त्यावर आलो होतो.

त्याकाळी मनाची होणारी चलबिचल व्यक्त करताना राजू सांगतात की, '१५ वर्षांपर्यंत मी खूप चांगले काम केले होते. मात्र मी कोण आहे, हे मला समजले नव्हते. एवढी मोठी नोकरी सोडणे, सोपे नव्हते. मात्र आता मला रोखणारे कोणी नव्हते. माझी पत्नी मला प्रत्येक परिस्थितीत समजून घेत होती. नोकरी सोडल्याचा मला अजिबात पश्चाताप नव्हता. काय करायचे आहे, हेदेखील मला माहित नव्हते. मी माझे वडिल नरसिम्हा राजू यांच्यावर पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. दोन महिन्यात ते काम पूर्ण झाले. मी फार कमी वेळ त्यांच्यासोबत व्यतित केला होता. मात्र जिवंतपणी मी त्यांना जेवढं समजू शकलो नव्हतो, त्याहूनही अधिक मी त्यांना मरणानंतर समजू शकलो होतो. ते एक लाखाहून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले होते. त्यांनी लिहिलेली पुस्तके मी वाचली, त्यांना नव्या पद्धतीने समजून घेतले. खरोखऱचं त्यांचे व्यक्तिमत्व जादुई होते. ते आध्यात्मिक नेते होते आणि एक महान व्यक्तिमत्व.'

राजू भूपती यांनी त्यानंतर कोणत्याही कंपनीत नोकरी करण्याचा विचार केला नाही. मात्र एका शुभचिंतकाच्या विनंतीमुळे त्यांनी कंसल्टेन्सी स्विकारली होती. यानंतर राजू यांनी आपल्या जवळचे मित्र संदीप यांच्यासोबत फूड व्यवसायात पाऊल ठेवले. त्यांच्या मते, सुरुवातीला हा व्यवसाय त्यांना सोपा वाटला होता. इडली बनविण्यासाठीचा खर्च हा पाच रुपये असतो आणि तिची विक्री किंमत ५० रुपये एवढी असते. म्हणजे सरळ ४५ रुपये नफा. अशाप्रकारे नफा कमाविण्यासाठी आम्ही फूड व्यवसाय सुरू केला. त्यातही काही अभिनव करण्यासाठी आम्ही टेकअवे साखळी सुरू केली. त्यानंतर घरपोच वितरण करण्याच्या क्षेत्रात व्यवसाय उभा केला. भारतीय फास्टफूड घरपोच वितरीत करणारी ही जगातील पहिली साखळी असल्याचा दावा ते करतात. या 'स्टार्टअप'च्या सुरुवातीच्या काळात काही महिन्यातच महसूल उत्पादनास सुरुवात झाली आणि व्यवसाय वाढू लागला. आता त्यांना जगभर आपली उपस्थिती दाखवून ग्लोबल व्हायचे आहे.

त्यांना स्वतःला जेवण बनविण्यास येते का? असे विचारले असता राजू सांगतात की, 'मला आम्लेटही बनवता येत नसे. मात्र मी मोठे निर्णय घेतले. यासोबतच मी प्रतिष्ठित नोकरीवर पाणी सोडले होते. एका छोट्या गॅरेजमध्ये व्यवसायाला सुरुवात केली. शून्यातून सुरू झालेली ही कंपनी अवघ्या काही दिवसांतच हैद्राबाद आणि दक्षिण भारतातील अव्वल कंपनी झाली. सध्या आम्ही जागतिक स्तरावरील कंपनी बनण्याच्या दिशेने प्रवास करत आहोत. भारतीय ब्रॅण्डला ग्लोबल बनविण्याच्या हेतूने ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. भरपूर प्रवास अजून बाकी आहे. हा चित्रपट नाही, व्यवसाय आहे. काही वेळ लागेल. एक-दोन दिवसांतच अब्जावधी रुपये कमावयाचे नाहीत.' व्यवसायातील आव्हानांबद्दल बोलताना ते सांगतात की, येथे प्रत्येक क्षण आव्हान आहे. ८००० आणि ९००० पगार मिळत असलेल्या वितरण करणाऱ्या व्यक्तिचे काम कसे असेल, याचा अंदाज लावता येऊ शकतो. ते कधीही तुमची साथ सोडू शकतात. ग्राहकांचे बोलायचे झाल्यास, ते कधी कोणत्या खाद्यपदार्थाचे कौतुक करतील आणि कोणत्या खाद्यपदार्थाला नावे ठेवतील, याची काही कल्पना नसते. पर्वतही आहेत आणि सपाट भूमीदेखील. त्यामुळे व्यवसायाला योग्य दिशेने नेण्याकरिता तसेच ग्राहकांची मानसिकता समजण्याकरिता तांत्रिक कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले. अनेक दुसऱ्या कंपन्यांना सामावून घेण्यात आले.

राजू भूपती यांच्या मते, नोकरी करणे सर्वात सोपे काम आहे. कंपनीबद्दल कोणतीही काळजी नसते. कर्मचाऱ्यांकरितादेखील बऱ्याच गोष्टी पहिल्यापासून निश्चित केलेल्या असतात. काम करण्याचा कालावधी, सुट्टीचे दिवस, पगार होण्याचा दिवस. कर्मचारीदेखील या निर्धारीत गोष्टींच्यानुसार आपल्या जीवनाची योजना आखतात. जे काही होणार आहे, ते पहिल्यापासून त्यांना महित असते. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, विविध लोकांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. काही लोकांना नोकरीतच सुख वाटते तर काहींना उद्योजकतेत. काहींना दुसऱ्यांच्या कंपनीत काम करायला आवडते तर काहींना स्वतःच्या कंपनीत. काही लोक असेही असतात, ज्यांना काही अनोखे करायचे असते.

स्वतःची विचारसरणी, लक्ष्य आणि भविष्यातील आव्हानांबद्दल विचारले असता राजू भूपती सांगतात की, 'हॅलोकरीला परदेशात घेऊन जाण्याचा माझा विचार आहे. काही वर्षांमध्ये अपयशाचा सामनादेखील झाला आहे. बंगळूरूमध्ये आम्ही मोठ्या उत्साहात सहा आऊटलेट सुरू केले होते. त्यापैकी चार अयशस्वी झाले. कोणतीही लाज न बाळगता आम्ही काही दुकाने बंद केली. आम्ही का अयशस्वी झालो, याचे कारण समजले. मला वाटले की, आपल्या पूर्ण योग्यतेचा वापर करायला हवा तसेच योग्यतेची अचूक ओळखदेखील व्हायला हवी. जर आपण दोन किलोमीटर चालू शकत नाही, तर मॅरेथॉनमध्ये जाऊ नये. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही पुन्हा शून्यावर आलो होतो. अनेक कंपन्या गडगडत होत्या. ऑर्डर तर मिळत होत्या. मात्र खरोखरचा व्यवसाय होत नव्हता. परिस्थितीनुसार सुधारणा होऊ लागल्या आणि आम्ही पुन्हा चांगल्या परिस्थितीत आलो.'

राजू भूपती आपल्या यशाच्या रहस्याबाबत एक विशेष शब्द सांगतात.... फोकस... ते सांगतात की, लक्ष्य गाठायचे असेल, तर आपल्याला प्रत्येक काम एकाग्र होऊन करण्याची आवश्यकता असते. एक-दोन महिने काम करुन अपयश स्विकारायला नको. पूर्ण विश्वासाने पुढे जाण्याची आवश्यकता असते. राजू एका घटनेचा उल्लेख करताना सांगतात की, 'मी तेलुगू माध्यमातून शिकलो. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात मी लोकांशी इंग्रजीत संभाषण करू शकत नव्हतो. त्याच दरम्यान दोन अमेरिकन आले होते. त्यांना मला आमच्या कंपनीबाबत सांगायचे होते. मात्र भरपूर प्रयत्न करुनही मी त्यांना समजवू शकलो नव्हतो. मला फार लाज वाटली. त्यांना माझे संभाषण समजू शकले नव्हते. मला माझ्यातली उणीव जाणवली. त्यावेळेस मी इंग्रजीत संभाषण करण्याची कोणतीही तयारी केली नव्हती. त्यानंतर मी सहा महिने अथक परिश्रम घेऊन, स्वतःला त्या योग्य बनविले आणि कंपनीत माझी योग्यता सिद्ध केली. कालांतराने मी तीन हजारहून अधिक लोकांसमोर इंग्रजीमध्ये भाषण दिले होते. तेव्हा माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.'

आयुष्यात आपल्याला मिळालेली शिकवण इतरांना सांगण्यात राजू भूपती अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. ते सांगतात की, आयुष्याच्या प्रवासात निर्णय घेणे योग्य आहे, मग ते चूकीचे निर्णय असो वा बरोबर. निर्णय घेणे आणि त्यानुसार काम केल्यानंतर येणाऱ्या परिणामांकरिता तयार रहायला हवे. राजू भूपती पुढे सांगतात की, आयुष्यात फक्त त्यांना 'भीती' या शब्दाची भीती वाटते. ते सांगतात की, जे काही करायचे आहे, ते कोणतीही भीती न बाळगता करा. अपयश आल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करता येऊ शकते. तरुणांना ते सल्ला देतात की, वेळ वाया घालवू नका. पस्तीशीपूर्वीच जोखीम पत्करा, जे काही करायचे आहे ते करा. त्यानंतर अनुभव कामास येतो. फक्त पैसा कमाविण्याची योजना नसावी तर काही केल्याचे समाधान वाटण्याची भावना असायला हवी, असे ते सांगतात. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एकेकाळचा रेती, विटा, सिमेंट वाहक मजूर आज आहे वीस कंपन्यांचा मालक

लोकहित आणि पर्यावरण संरक्षणासाठी बहुमोल योगदान देणारे पुरुषोत्तम रेड्डी 

भारतीय महिला क्रिकेटचा चमकता तारा : मिताली राज!

    Share on
    close