बालपणी पुस्तकांना वंचित राहिलेल्या, आज 'रिड इंडियां'च्या संचालिका! गीता मल्होत्रांचा अनोखा जीवनप्रवास!

बालपणी पुस्तकांना वंचित राहिलेल्या, आज 'रिड इंडियां'च्या संचालिका! गीता मल्होत्रांचा अनोखा जीवनप्रवास!

Friday November 27, 2015,

5 min Read

हसरा चेहरा आणि लहान मुलांसारखी निरागसता पाहून आपणास यत्किंचीतही शंका येणार नाही की, या महिलेला तिच्या आयुष्यात खूप संघर्षांवर मात केल्यावर समाजात आपली स्वत:ची वेगळी ओळख मिळाली आहे. होय, गीता मल्होत्रांबद्दलच आपण बोलत आहोत, ज्यांची ओळख सांगण्यासाठी जितकी विशेषणे देवू तितके कमीच आहे. पहिल्याच भेटीत आपल्या सशक्त विचारांची छाप एखाद्या्च्या मनात सोडण्यात त्यांचा हातखंडा आहे.


image


गीता मल्होत्रा, जगातील नामांकित संस्था ‘रिड इंडिया’ च्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. ‘रिड इंडिया’ खरेतर ‘रिड ग्लोबल’ची भारतीय आवृत्ती आहे. ‘रिड ग्लोबल’ बिल गेटस् आणि मिलींडा गेटस् यांच्या फाऊंडेशनचा मुख्य भाग आहे. सन २००७ मध्ये ग्रामीण भारतात राहणा-या महिला आणि वंचितांना आत्मनिर्भर आणि शिक्षित बनविण्याच्या उद्देशाने ‘रिड’ची भारतात सुरुवात झाली होती. गीता मल्होत्रा यांची गोष्ट आम्हाला केवळ प्रेरितच करत नाहीतर त्यांच्या कहाणीत आम्हाला जीवनाचे सारेच रंग दिसतात. ही एक अश्या महिलेची कहाणी आहे जिचे स्वप्न लाखो दुबळ्या आणि शोषितांना आपल्या पायावर उभे करण्याचे आहे. परंतू तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांचे स्वत:चे जीवन अत्यंत साधारण आणि आभावग्रस्तच राहिले आहे. एका मध्यमवर्गीय परिवारात गीता सर्वात लहान कन्या म्हणून जन्मल्या. त्यांच्या तीन मोठ्या बहिणी आहेत, सत्तरच्या दशकात महिलांना शिकून शिक्षिका बनणे सुरक्षित आणि सन्मानाचे समजले जात होते. गीता यांच्या तीन बहिणींनी त्यानुसारच केले. मोठ्या बहिणी शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्यातरी गीता यांना मात्र यापेक्षा वेगळ्या मार्गाचा शोध घ्यायचा होता. तरुण गीता यांच्यासाठी शिक्षणकार्याची वेगळीच संकल्पना आणि संदर्भ होते. त्यांच्यामते शिक्षणकार्य म्हणजे कठोरपणाचा मार्ग होता आणि त्यांच्यामते समाजात दया आणि प्रेमाचा संदेश देणे आवश्यक होते. शिक्षणात गीता कधीही चांगल्या विद्यार्थीनी नव्हत्या, पण त्यांना स्वत:वर पूर्ण भरोसा असायचा. त्याच बरोबर त्या स्वत:ला जागृत विद्यार्थ्याच्या श्रेणीत ठेवत असत. घरची आर्थिकस्थिती चांगली नसल्याने त्यांच्या महाविद्यालयाची शुल्कं देणेही वडिलांना अशक्य झाले होते. पण गीता यांना या संकटासमोर हरायचे नव्हते. त्यावेळच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात की, “ मी दिल्ली विद्यापीठाच्या वेंकटेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटून सरळ सांगून टाकले की मला पुढे शिकायचे आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. मी आपणास खात्रीने सांगते की, आपण जर मला संधी दिली तर मी आपणास निराश करणार नाही” गीता यांच्या या बेधडक स्पष्टतेने प्राचार्यांना प्रभावित केले. त्यांनी गीता यांना सहमती दिली. वेंकटेश्वर महाविद्यालयात पदवी पूर्ण केल्यावर गीता यांनी तेथूनच सेक्रेटरिएटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ऊषा इंटरनँशनल मध्ये कार्यालय संचालकाच्या सचिव म्हणून नोकरी सुरू केली.


image


कारकिर्दीच्या चांगल्या सुरुवातीनंतर त्या १९७८मध्ये दांपत्यजीवनात बध्द झाल्या. पतीच्या मैत्रीपूर्ण सहचर्याने त्यांच्या जीवनात सुख राहिले आणि हेच कारण होते की, लग्नानंतरही त्यांचा शिक्षणाचा प्रवास सुरूच राहिला. त्यांनी समाजशास्त्रात मास्टरची पदवी मिळवली. त्यानंतर लोकसंख्या अभ्यासात देखील त्यांनी मास्टरची पदवी मिळवली, आणि डॉक्टरेटसाठी अर्ज केला. गीता आपल्या जीवनाचा मुख्य क्षण तो असल्याचे सांगतात की ज्यावेळी त्यांनी १९७०मध्ये स्थापन केलेल्या लोकसंख्या नियंत्रण संस्थेत कार्य सुरू केले. कुटूंबनियोजन सामाजिकदृष्ट्या बांधिलकी असलेल्या जेआरडी टाटा आणि डॉ. भारत राम यांच्याद्वारे चालविला जाणा-या समूहांपैकी एक होता. जे.आर.डी टाटा आणि होमी भाभा यांच्यासारख्या दिग्गजांच्या सोबत काम करण्यास मिळाल्याने गीता यांच्या जीवनात काहीतरी नवे करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली, आणि मग त्यांनी आपल्या जीवनाच्या नव्या उद्देशांना जन्म दिला. थोड्याच दिवसात त्यांनी वन वर्ल्डसाऊथ एशिया मध्ये वरिष्ठ प्रोग्रामर म्हणून कार्य सुरु केले. तेथे आंतरराष्ट्रीय विकास विभाग(डिएफआयडी) मध्ये काम करताना पूर्ण आशियात फिरता आले. ‘बिल्डींग कम्यूनिकेशन ऑपॉर्चूनीटिज्’ सारख्या जागतिक समूहाच्या सदस्या म्हणून गीता यांचे प्रमुख काम ग्रामीण आशियात तंत्राज्ञानाचा प्रसार करणे हे होते. अष्टपैलूत्व असणा-या गीता रेडिओ कार्यक्रमाच्या निमित्ताने लवकरच उदघोषिका म्हणून ग्रामीण भारतात ‘कम्युनिटी रेडिओ’ला चालना देण्यासाठी काम करु लागल्या. तज्ज्ञांच्या एका चमूसोबत त्यांनी आकाशवाणीवरून तरूणांसाठी कार्यक्रम तयार केले, जे त्यांच्यासाठी उपयोगाचे आणि ज्ञानात भर घालणारे सिध्द झाले.


image


सुरूवातीपासून महिलांसाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करताना गीता यांनी रेडिओच्या माध्यमातून आपले मुद्दे कसे मांडावे याबाबत महिलांना शिक्षण दिले आणि तेथूनच त्यांच्यातील नेतृत्वगुणांनाही संधी मिळत गेली. गीता यांच्या बदलत्या जीवनाला नवे वळण त्यावेळी मिळाले जेंव्हा त्यांना ‘रिड इंडिया’त देशाच्या संचालिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ‘रिड इंडिया’ला भारतात आठ वर्षे झाली आहेत आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी या संस्थेची देशात सतरा केंद्र सुरू आहेत. गीता आजच्या काळातील महिलांची भूमिका महत्वाची मानतात. त्या समजतात की जगात तेच आपली ओळख स्थापन करण्यात यशस्वी होतात ज्यांना स्वत:वर विश्वास असतो. निसर्ग सा-यांनाच सारखी संधी देत असतो आणि त्यात कोणताही भेद केला जात नाही. ज्यांच्यात आत्मविश्वास आणि दृढनिश्चय भरलेला असतो त्यांच्यासाठी संधी चालून येत असतात.

जर आपणास वाटत असेल की, गीता यांच्या यशामुळे त्यांनी आपल्या घरच्यांना वेळ दिला नाही, तर आपण चुकीचा विचार करत आहात. गीता मल्होत्रा सांगतात की, ज्या व्यक्ती जीवनाच्या सा-या क्षेत्रात पूर्ण निष्ठेने काम करतात त्या घर आणि घराच्या बाहेर समानपणाने त्याच निष्ठेने काम करु शकतात. त्या आपले पती आणि मुलांसाठीही तितक्याच समर्पित राहतात की, जितक्या समाजाप्रति असतात. त्या मानतात की, एका महिलेसाठी लोकांना नाही सांगण्याची सवय असली पाहिजे. विशेषत: त्यावेळी जेंव्हा त्यांच्या मूल्यांच्या तडजोडीचा प्रश्न असतो. आपल्या खाजगीपणाशी कुणालाही खेळ करू देण्याचा अधिकार देता कामा नये, मग ती व्यक्ती कितीही जवळची का असेना? एका महिलेसाठी तिचा आत्मसन्मानच सर्वात मोठा दागिना असतो. त्या आठवण करून सांगतात की, जेंव्हा ढासळत्या लैंगिक टक्केवारीसारख्या संवेदनशील विषयावर त्यांचा सामना नेत्यांशी झाला. त्यावेळी गीता यांनी भविष्यातील परिणांमाची चिंता न करता कर्तव्य पूर्ण केले होते.

काळ संपत जातो तसा लोकांचा काम करण्याचा उत्साह आणि कार्यक्षमता देखील कमी होत जाते मात्र गीता मल्होत्रा त्याला अपवाद आहेत. त्यांचे म्हणणे असते की, जर तुमच्यात कामासाठी निष्ठा आणि उत्साह असेल तर वयासोबत त्यातही वाढ होत जाते, आणि मग तुमच्या मनाला या कामातूनच समाधानही मिळू लागते. गीता साधारणत: प्रत्येक महिन्यात भारताच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात जातात आणि त्यावेळी त्या पंचतारांकीत सुविधांपासून स्वत:ला दूर ठेवतात. त्यांच्यामते त्यावर खर्च करण्यात येणारा पैसाही गरींबाच्या विकासाला लावला गेला पाहिजे, आणि इतरांकडून त्या हीच अपेक्षा करतात. त्या मानतात की, भारतात अशी लोकं खूप आहेत की, ज्यांच्याकडे मुलभूत सुविधा जसे की चांगले शिक्षण आणि जीवनशैली यांचा अभाव आहे. गीता यांना अशाच लोकांसाठी शेवटपर्यंत कार्य करायचे आहे आणि त्यांना सक्षम तसेच शिक्षित करणेच आपले जीवितकार्य असल्याचे त्या मानतात. गीता सांगतात की, “ एक काळ होता जेंव्हा पैसे नसल्याने मला शिकायला पुस्तकेही मिळत नव्हती, आणि म्हणूनच आज मी ग्रामीण भागात सामूहिक ग्रंथालयांची स्थापना करत आहे. मी मानते की, महिला सक्षमीकरण कोणतीही पदवी किंवा अधिकार नाही तर महिलांना सन्मानाने आणि त्यांच्या गौरवाशी जोडणे आहे”.

त्यांची ही कहाणी कोणत्याही महिलेला प्रेरित करणारी आहे. महिलांचे आत्मबळ आणि त्यांची जिंकण्याची आकांक्षाच गीता मल्होत्रा यांची ही गोष्ट दाखवते आहे. अडचणीतून बाहेर पडण्याची धडपड करणे आणि मार्ग काढणे हाच त्यांचा जीवनाच्या यशाचा मुलमंत्र ठरला आहे. संघर्षांना तोंड देत गीता मल्होत्रा यांनी आपल्या जीवनाला तावून सुलाखून निघालेल्या सोन्याची झळाळी दिली आहे. इतकेच काय आपल्या सुवर्णतेजाने सा-या महिलांच्या तेजस्वितेचा परिचय दिला आहे.

लेखक : रिनी निगम

अनुवाद: किशोर आपटे.