अक्षरश: हजारो महिला उद्योजिकांच्या ‘दिपस्तंभ’ ठरल्या आहेत ‘आम्ही उद्योगिनी’च्या ‘मीनलताई मोहाडीकर’!

अक्षरश: हजारो महिला उद्योजिकांच्या ‘दिपस्तंभ’ ठरल्या आहेत ‘आम्ही उद्योगिनी’च्या ‘मीनलताई मोहाडीकर’!

Sunday January 17, 2016,

8 min Read

‘उद्योगात वसते लक्ष्मी’ असे वचन आहे आणि जेंव्हा एखाद्या घराची गृहलक्ष्मीच उद्योगांचा ध्यास घेते आणि व्रत म्हणून पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ हा वसा चालवते तेंव्हा अर्थातच त्यांच्या या कार्याचे वर्णन ‘तयाचा वेलू गेला गगनावरी’ असेच करता येईल. एका मध्यमवर्गीय मराठी कुटूंबातील एक मुलगी आपल्या आईच्या उद्यमशिलतेचे गुण आत्मसात करून वारसा पुढे सुरु ठेवते. घरातील आंबे विकण्याच्या उद्योगापासून सुरुवात करते. आज त्या मुंबई महाराष्ट्र असे मर्यादित क्षेत्रात न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर कन्स्युमर शॉपी (consumers shoppee) या नावाने दुबई-शारजा सारख्या ठिकाणी जाऊन भारतीय महिलांच्या उद्यमशिलतेचा ध्वज फडकावित, महिला व लघु उद्योजकांसाठी मोठे उद्योजकता प्रदर्शन आयोजित करून यशस्वी करून दाखवते तेंव्हा त्यांच्या या कार्याला सँल्यूटच करावा लागतो. आजही कुठल्याही परिस्थितीत, संकटात न डगमगता अष्टोप्रहर केवळ ‘आम्ही उद्योगिनी’च्या माध्यमातून अक्षरश: अगणित महिलांना त्यांनी उद्यमशील करून जीवनात उद्योगाच्या माध्यमातून सक्षम करीत आहेत. महिला सक्षमीकरणाचा हा महायज्ञ प्रत्यक्षात घडवूनही नम्रतेने आणि आपल्या मधूर स्वभावाने ‘मीनल मोहाडीकर’ यांच्यासारख्या ‘उद्योग तपस्विनी’ महिला उद्योजिकांना दिपस्तंभासारख्या मार्ग देत आहेत.


image


‘आम्ही उद्योगिनी’च्या संस्थापिका, अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी आयोजित केलेल्या भव्य ग्राहक पेठेत महिला उद्योजकांच्या प्रदर्शनात भेट घेऊन ‘युवर स्टोरी’ने त्यांच्या या प्रेरणादायक उद्यमशिलतेचा प्रवास कसा झाला ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या उद्यमशिल वाटचालीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “१९९७ च्या सुमारास आम्ही उद्योगिनीच्या कामाला सुरुवात केली तीच मुळी ८ मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून! त्यावेळी रजनीताई दांडेकर (कॅमलिन) व लोकसत्ताचे संपादक कै माधवराव गडकरी यांचे आशीर्वाद लाभले. तेंव्हापासून आजही मार्च महिन्यात पहिल्या शनिवारी आम्ही उद्योगिनीच्या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतातून हजारो यशस्वी उद्योगिनी सहभागी होतात आणि या कार्याचा वसा आणखी समविचारी मैत्रिणींना देतात.” महिला दिनानिम्मित पुरस्कार देऊन उद्योगीनींना प्रोत्साहित केले जाते. त्यात तरूण महिला उद्योजिकांपासून अगदी आजीबाई देखील सहभागी असतात. मु्ख्य म्हणजे पैसा मिळवणे हे आम्ही उद्योगिनीचे ध्येय कधीही नव्हते, असे मीनलताई आवर्जून सांगतात. त्यात सर्वच क्षेत्रातील काम करणा-या महिला असतात, जात-पात भेदाभेद न मानता महिला उद्योजिकांना प्रेरणा देणारी चळवळ म्हणजे आम्ही उद्योगिनी. यातून आज अक्षरश: हजारो महिला सक्षमीकरणाच्या मार्गाने गेल्या आणि आज एखाद्या उद्योजक पुरुषाइतक्याच समर्थपणाने कर्तृत्वाच्या शिखरांना साद घालत आहेत.


image


भव्य ग्राहक पेठेत महिला उद्योजकांच्या प्रदर्शनाद्वारे विविध गृहाेपयोगी वस्तूंची विक्री व त्याद्वारे उद्योजकांना लाभलेली फिरती बाजारपेठ ही संकल्पना सातत्याने गेली २५ वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आता दुबई, शारजा येथे कन्झ्युमर्स शॉपी व फेस्टिवल शॉपी या माध्यमातून राबविणाऱ्या त्या पहिल्या स्त्री उद्योगिनी आहे. या सर्व ठिकाणच्या प्रदर्शनाचे आराखडे तयार करून ‘स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग’ चे महत्व अधोरेखित करणाऱ्या मीनलताई मुंबईत दादर, विलेपार्ले, ठाणे, बोरीवली येथे एकाच वेळी चार ठिकाणी प्रदर्शन आयोजित करून ती सुनियोजितपणे पार पाडतात.


image


उद्योजकता विकास क्षेत्रात महत्वपूर्ण योगदानासाठी इचलकरंजी येतील फाय फाऊंडेशन चा मानाचा पुरस्कार रुपये ५००००/- रोख २००१ मध्ये प्राप्त झाल्यावर त्यात स्वत:कडील तितकीच रक्कम भरून “आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान” ही महिला लघु तसेच तरुण उद्योजकांसाठी चळवळ उभी करणाऱ्या मीनलताई “आम्ही उद्योगिनी” या उद्यमशील मुखपत्राच्या संपादिका आहे. ‘आम्ही उद्योगिनी’चे वर्षभरातून चार विशेषांकही प्रकाशित होतात, त्यात अशा उद्योगिनींचा परिचय करून दिला जातो ज्यांनी त्यांच्या जीवनातील वाटचाल स्वबळावर करताना स्वत:च्या अंगभूत कला आणि मेहनतीने उद्योगात पाय रोवले आहेत.

या संस्थेची संपूर्ण महाराष्ट्रात दहा केंद्र आहेत. राज्याच्या सहाही विभागात त्यांचे काम सुरू आहे. दादर येथे मध्यवर्ती कार्यालय आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बोरीवली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, गोरेगाव येथेही संस्थेच्या शाखा सुरु करून ज्योत से ज्योत जलाओ हा संदेश आचरणात आणत आहे. प्रत्येक महिन्यात एका विभागाची बैठक असते त्यात मीनलताईं व इतर क्षेत्रातील मान्यवर विनामूल्य मार्गदर्शन करतात.


image


कार्याची सुरवात

कुठल्याही डेरेदार वृक्षाचे मूळ हे एका छोट्या बीजामध्ये असते. मीनलताईंच्या व्यवसायाची सुरवातही अगदी साधेपणाने व लहान प्रमाणात झाली. आपल्या या कार्याची सुरूवात कशी झाली ते सांगताना मीनलताई म्हणाल्या की, “डीएमएलटी हा लॅबोरेटरी टेक्नशियनचा कोर्स करून लग्नानंतर लासलगावला १९८१ च्या सुमारास लँब सुरू केली होती. परंतु सर्वच स्त्रियांच्या आयुष्यात येणारे, संसार, बालसंगोपन इ जबाबदाऱ्या पार पडताना त्यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, साधारणपणे १९८८ चा सुमार असावा. ‘देसाईबंधू आंबेवाले’ या नावाने मामांकडून सुरू असलेल्या व्यवसायात त्यांनी पदार्पण केले आणि दादरच्या वनिता समाज मार्फत पहिल्यांदा प्रदर्शनात देसाई बंधू आंबेवाल्यांची उत्पादने विकण्यास प्रारंभ केला त्यावेळी ही संकल्पना तशी नाविन्याची होती," मीनलताई सांगतात. दरम्यान इनस्टंट फूडने नुकता कुठे भारतीय बाजारपेठांमध्ये शिरकाव केला होता. त्यावेळी त्या उत्पादनांची उपयुक्तता हेरून मीनलताईंनी हिंदू कॉलनीतील एका दुकानाबाहेर इन्स्टंट पुलाव, छोले, बिर्याणीची पॅकेटस् विकण्याचा स्टाॅल लावला अन हातोहात खपवून दाखविला.

उद्योगाच्या ह्या छोटेखानी प्रयोगानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही ९ में ते १३ में १९९० रोजी दादर येथील सावरकर स्मारक येथे पहिल्या प्रदर्शनाचे उदघाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षा कमलताई विचारे यांच्या हस्ते केले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आनंद ट्रेड डेव्हलपमेंटचा जन्म झाला आणि घरगुती वस्तूंपासून मोठमोठ्या इलेक्ट्राॅनिक गॅसपर्यंतच्या खरेदीचे मुक्तद्वार अवघ्या महाराष्ट्राला मीनलताईंनी उघडून दिले. त्यांचा उत्साह पाहून मग माहेरच्या-सासरच्या मंडळीनी पाठिंबाही दिला आणि मग या उद्योगिनीच्या वाटचालीने वेग घेतला. त्यातही कौटूंबिक अडी-अडचणी होत्याच. मात्र थांबायचे नाही या मंत्राने वाट मिळत गेली आणि ‘कारवॉं’ बढता ही गया! या सर्व प्रदर्शनात अपना बाजारचे सुरेश तावडे व अपना परिवार तसेच लोकप्रभाचे संपादक प्रदीप वर्मा व त्यांची टीम यांचा पाठींबा मिळाला.

मग एकामागोमाग एक यश प्राप्त होत गेले. आपल्याला सर्वांनी साथ दिली पण इतर महिलांना अशी हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने महिला लघु उद्योजक उत्पादनांची प्रदर्शने भरवण्यास सुरवात केली आणि त्यांना विनामूल्य मार्गदर्शन सुरू झाले. ‘आनंद बाजार’ नावाच्या या मेळ्यांना गावोगावी भरवण्याचा उद्योग करताना समविचारी मैत्रिणींच्या सहकार्याची एक साखळी आपोआप तयार होत गेली आणि ‘आम्ही उद्योगिनी’चे काम देशात –विदेशात जाऊन पोहोचले. महिला उद्योगीनींना वस्तूंची कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी या हेतूने दादर येथे देसाई बंधू आंबेवाले दालन महिला उद्योजकांना उपलब्ध करून दिले.


image


‘मराठी माणसाने आपली नोकरी करावी’ या पराभूत मानसिकतेमधून जगणा-या समाजात कोणत्याही पाठबळाशिवाय उभ्या राहिलेल्या या जिजाऊ, राणी लक्ष्मी, सावित्रीबाईच्या लेकींनी सन२०१३मध्ये शारजात केवळ उदघाटन करून कुठलेही प्रदर्शन न भरवलेल्या इंडियन एग्झिबीशन सेंटर शारजा येथे प्रदर्शन केंद्रात , २०१४ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे यशस्वी उद्योजकांची बाजारपेठ प्रदर्शनाद्वारे नुसतीच आयोजित करुन दाखवली नाहीतर यशस्वी करून दाखवली. ज्या अरब देशात तेथील महिलांना देखील सार्वजनिक जीवनात असे कार्य करण्याची मुभा नाही तेथे जाऊन एका मराठी महिलेने हा नेत्रदीपक उद्यम यशस्वी केला. ही सर्वांनाच झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाइतकी भव्य-दिव्य वाटणारी गोष्ट होती. तसेच ह्या आयोजित प्रदर्शनात भाग घेतलेल्या महिलांना शासकीय योजनेच्या माध्यमातून अर्धी रक्कम परत देण्यात आली. या प्रदर्शनाच्या वेळी दुबईत स्थायिक झालेल्या महाराष्ट्र मंडळ दुबई, GMBF व आरती अशोक कोरगावकर यांची साथ मिळाली.

राज्याच्या उद्योगविभागाच्या मार्फत दिल्लीत आयोजित होणा-या प्रदर्शनांपासून महाराष्ट्र मंडळांच्या आयोजनापर्यंत सा-या ठिकाणी ‘आम्ही उद्योगिनी’ पोहोचली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात तर इंटरनॅशनल इंडिया ट्रेड फेयर (IITF) येथे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून (MSSIDC) मोफत स्टॉल्स देण्यात आले. महिला उद्योजिकांना चांगला अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. आनंद ट्रेडचा भव्य प्रदर्शन आयोजनाबाबतचा अनुभव सांगताना मीनलताई म्हणाल्या की, “ अनेकदा अशा आयोजनात खूप मेहनत केल्यानंतरही अनेक अडचणी आल्या, कधी नैसर्गिक आपत्तीने तर कधी कौटूंबिक समस्यांनी. क्षणभर असेही वाटले की, आता काय होणार? पण स्वामी स्वरुपानंदावरच्या श्रध्देने तारले”.


image


नरेंद्र मोदी सरकारच्या उद्योजकतेला चालना देण्याच्या कार्याबाबत त्यांनी सांगितले की, मुद्रा या योजनेचे भांडवल उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा लाभ महिला उद्योजकांना चांगला होतो आहे. याशिवाय स्टार्टअप इंडियाच्या कामाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.

आम्ही उद्योगिनी नेहमीच वेगळ्या विषयांच्या आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या शोधात राहिल्या, त्यामुळे माफक चार रात्री पाच दिवसांच्या दुबई विदेशवारी पासून वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून उदयोजकतेला चालना देणा-या प्रकाशनांपर्यंतच्या प्रयोगांना त्यांनी यशस्वी करून दाखवले. त्या म्हणाल्या की, १९९० च्या सुमारास पुष्पा त्रिलोकेकर या पत्रकार मैत्रिणीच्या मदतीने ‘तर काय कराल. . .’ ही डिरेक्टरी पुस्तिका प्रकाशित केली आणि अगदी तीन दिवसांत त्याच्या दहा हजार प्रती कोणताही अनुभव गाठीशी नसताना संपल्या सुध्दा! तसाच एक प्रयत्न होता ‘द्रौपदीची थाळी’ या पुस्तकाचा किंवा ‘निर्धास्त गोष्टी’ या संकल्पनेवर आधारित पुस्तकाचा. एकट्या-दुकट्या महिलांना उद्योगाच्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी आज महिला बचतगटांसारख्या संकल्पना राबविल्या जातात मात्र त्याकाळात जेंव्हा फारश्या महिला उद्योगात येण्याची शक्यता फार कमी होती, अश्या काळात स्वत:च्या उदाहरणातून शेकडो महिलांना ‘उद्यमी व्हा’ असे कृतीतून सांगणा-या मीनलताईंच्या या पंचवीस वर्षांच्या वाटचालीत त्यांच्या उद्योजकतेच्या कार्याची दखल अनेक प्रकारच्या पुरस्कार आणि सन्मानातून घेण्यात आली. माध्यमांतूनही त्यांच्या आणि त्यांच्या सहउद्योगिनींच्या कार्याला सातत्याने प्रसिध्दी दिली जाते. महाराष्ट्र चेंबर्सच्या ८० वर्षाच्या इतिहासातील पहिल्या महिला अध्य़क्षा होण्याचा मान मिळवणा-या व आता महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष असणाऱ्या मीनलताईंचा हा प्रवास सुरूच राहिला आहे त्याला अल्पविराम, स्वल्पविरामसुध्दा देण्याची कल्पनासुध्दा त्यांना मान्य नाही. ‘व्यापार श्रीमती’चा पहिला वहिला पुरस्कार मिळवून पुरुषांच्या या क्षेत्रातील मक्तेदारीला संपुष्टात आणताना त्यांनी महिला उद्योजिकाही पुरुषांइतक्याच सक्षमपणाने कार्य करू शकतात याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. त्या म्हणतात की, सचोटी आणि मेहनत यानीच तुमचा विकास होईल यावर माझा विश्वास आहे. आपल्या चांगल्या वर्तनातून नवा आदर्श घालून देताना त्या म्हणतात की, “एक स्त्री म्हणून काही वाईट अनुभव आले नाहीत कारण आपण कसे वागतो, आपल्या मनावर आपले किती नियंत्रण आहे यावर लोक आपले मुल्यांकन करतात”.

उद्योगिनींसाठी सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सवलती योजना यांचे महत्व जाणून घेत त्याचा सामान्य उद्योजकांना कसा फायदा होऊ शकतो. याचे ज्ञान प्रसार आकाशवाणी, दूरचित्रवाणी यांवर वेळोवेळी चर्चा, भाषणे मुलाखती व अग्रगण्य वृत्तपत्रामधून उद्योग विषयावर स्तंभलेखनही मीनलताई करतात.

या क्षेत्रातील महत्वाचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. व्यापार श्रीमती पुरस्कार, फाय फाऊंडेशन पुरस्कार, आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार, दूरदर्शनचा हिरकणी पुरस्कार, उद्योगरत्न पुरस्कार हे असे विविध मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांच्या उद्योग जगतातील सार्थ परिश्रमाचे द्योतक आहेत. स्वतः स्वावलंबी होऊन इतर महिलांना स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून त्यावर कसं मार्गक्रमण करावं याबद्दल साथ देणाऱ्या मीनलताई हे व्यक्तिमत्व सर्व महिला व तरुण उद्योजकांसाठी स्फूर्तीदायकच आहे.

आयुष्याच्या या वाटचालीकडे मागे वळून पाहताना त्या कृतज्ञता व्यक्त करतात आपल्या सासुबाईंबद्दल! ‘आईच्या मायेच्या स्मृतींना उद्योजकतेतून आदरांजली देण्यासाठी सुरु केलेल्या या प्रवासात सासूबाईंच्या भक्कम पाठिंब्याचे सदभाग्य लाभले’ असे त्या आवर्जून सांगतात. आपला हा वसा लेकीच्या माध्यमातून पुढेही सुरू राहील असा त्यांना विश्वास आहे. भविष्याच्या वाटचालीबाबत अश्वस्त करत त्या म्हणतात की, “या तरुण उद्योजिकाच हे कार्य आता पुढे घेऊन जाणार आहेत. त्यांना माझे एकच सांगणे आहे, संघर्षाला घाबरू नका सातत्याने प्रयत्न करत राहा, त्यातून नवा मार्ग नक्कीच मिळत जाईल, तरुणांनी नोकरीच्या मानसिकता सोडून उद्योगात या, तुमच्यातील कौशल्याचा विकास करत सफल जीवनाचा आनंद घ्या’ असेच त्यांचे सतत सांगणे असते.

हे सर्व टीमवर्क आहे आणि ते आम्ही उद्योगिनी संस्थेतील उद्योगिनी व कर्मचारी वर्गामुळे सध्या होऊ शकले आहे. जिद्द तुमची साथ आमची... आम्ही उद्योगिनी...