पतीच्या आकस्मात मृत्यूनंतरही आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवणा-या ‘संध्या चेरियन’

पतीच्या आकस्मात मृत्यूनंतरही
आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घडवणा-या ‘संध्या चेरियन’

Friday October 16, 2015,

7 min Read

स्वत:ला दु:खाच्या गर्तेतून बाहेर काढत संध्या चेरियन या आज महिला शक्तीच्या एक प्रतिक बनल्या आहेत. सध्या त्या ‘फ्रंटियर मेडिवेल’च्या उपाध्यक्ष आहेत. याबरोबर त्य़ा 'फ्रंटियर लाईफलाईन रुग्णालय' आणि 'डॉ. के.एम. चॅरिटेबल हार्ट फाऊंडेशन'च्या संचालिका सुद्धा आहेत. त्या त्यांच्या कामात आणि त्यांच्या मुलीमध्ये सतत व्यस्त असतात आणि याचे त्यांना विशेष समाधान आहे.

चार वर्षांपूर्वी संध्या यांच्या पतींना झोपेत असताना ह्रदय विकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे अकाली जाणे त्यांच्या कुटुंबासाठी केवळ मोठे नुकसानच होते असे नव्हे, तर तो अनपेक्षितपणे घडलेला एक आघात देखील होता. “ हे सत्य स्वीकारण्यासाठी आणि आमचे सामान्य जीवन जगण्यासाठी तयार होण्यात आम्हाला थोडा वेळ लागला. भारतात राहणा-या माझ्या कुटुंबांमधील इतर सदस्यांसोबत वेळ घालवणे हे माझ्या मुलांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे याची जाणीव मला झाली आणि त्यानंतर मग मी पूर्व अमेरिका सोडून चेन्नईला परत येण्याचा निर्णय घेतला.”

image


त्याचे वडिल 'ह्रदय सुपर स्पेशॅलिटी सेंटर' असलेल्या 'फ्रंटियर लाईफलाईन हॉस्पीटल' आणि बायो-विज्ञान पार्क म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'फ्रंटियर मेडिवेल' चालवतात. सध्या संध्या त्यांच्या वडिलांच्या प्रशासकीय कामकाजात मदत करत आहेत. त्या म्हणतात, “ भारतात राहणा-या लोकांना महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च परवडत नाही, कारण रोपण करण्याची उपकरणे, औषधे आणि डिस्पोझेबल वस्तूंच्या किंमती खूपच जास्त असतात. हे प्रत्येकाला परवडेलच असे नाही. आम्ही या समस्येकडे आव्हानाच्या रूपात पाहिले आणि स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकतील अशी रोपण करण्याजोगी उपकरणे कशी बनवता येतील या दिशेने संशोधन करणे सुरू केले. अशा प्रकारे फ्रंटियर लाईफलाईन रूग्णालयाचा पाया रचला गेला. हाच 'फ्रंटियर मेडिवेव'ची सुरूवात करण्यामागचा मुख्य विचार आहे.”

भारतात एका तरूण विधवा महिलेसमोर कोणती आव्हाने येतात आणि त्यांच्या जीवनातले कटू वास्तव काय आहे याची जाणीव त्यांना अमेरिकेहून भारतात परत आल्यानंतर झाली. जे लोक आत्तापर्यंत त्याच्यासोबत मित्रासारखा व्यवहार करत आले होते त्यांची वागण्याची त-हा बदलली होती. विवाह किंवा अशा कार्यक्रमांमध्ये त्यांना आवर्जून आमंत्रण दिले जायचे, पण आता त्यांना टाळले जात होते. एक प्रकारच्या सामाजिक बहिष्कारचाच त्यांना सामना करावा लागत होता. जेव्हा समाजातील सुशिक्षित लोक त्यांना “ तुम्ही तर दिसायला विधवा सुद्धा वाटत नाही.” असे बोलत असत, तेव्हाचा क्षण त्यांना अतिशय़ वाईट आणि दु:खदायक वाटायचा.

संध्या सांगतात, “ हे म्हणजे असे होते की लोकांच्या दृष्टीने मी विधवा झाल्याबरोबर जणू मी सामान्य माणूस नसून माझे रूपांतर एका जुन्या हडळीत झाले आहे. परंतु माझ्या अडचणी इथेच संपलेल्या नाहीत. मला वाटते आम्ही आज सुद्धा एका अशा युगात जगतो आहोत ज्या युगात विधवा स्त्रियांना अपशकूनी मानले जाते. सुरूवातीला तर मला या गोष्टींचे खूप दु:ख व्हायचे, परंतु आता मला काही फरक पडत नाही. अशा घटनांमुळे मला माझे शुभचिंतक कोण आहेत, मित्र कोण आहेत हे ओळखण्यास मदत होते. निश्चितच या अनुभवांनी मला बदलले आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळा आकार दिला. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मी पूर्वीपेक्षा अधिक दृढ निश्चयी बनण्यात यशस्वी झाले आहे. मी इतर विधवा महिलांना देखील त्यांनी कोणत्याही परिस्थितीत खंबीर बनावे असा संदेश देऊ इच्छिते. काळ हा मोठ्यात मोठा घाव देखील भरून टाकतो आणि आपले कठिण बनलेले आणि विस्कळीत झालेले सामाजिक जीवन पुन्हा रूळावर येते.

संध्या याचे आई-वडिल दोघेही ओरोग्य सेवेच्या क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांनी आपला अधिक काळ रुग्णालयात घालवला होता. आजही त्या आपल्या समोर आलेल्या आव्हानांबरोबर दोन हात करण्यात आनंद मानतात. त्यांचे वडिल एक ह्रदरोग तज्ञ होते आणि संध्या 'शास्त्र' या विषयाच्या एक चांगल्या विद्यार्थीनी होत्या. अशा पार्श्वभूमीवर आपण आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यात यशस्वी होऊ याची त्यांना पूर्णपणे खात्री होती.

परंतु दुर्दैवाने आपल्या मुलीने चिकित्सा व्यवसायात यावे असे त्यांच्या वडिलांना वाटत नव्हते. कारण महिलांना एकाचवेळी व्यावसायिक जीवन आणि आपले कौटुंबिक जीवन यांचा ताळमेळ साधावा लागतो आणि यामध्ये त्यांना आपल्या व्यवसायाला योग्य न्याय देता येत नाही असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते. संध्या म्हणतात, “ याच कारणामुळे मी माझ्या आवडीच्या व्यवसायाशी संबंधित शिक्षण घेऊ शकले नाही. आजकालची मुले ज्या प्रमाणे आपल्या मर्जीनुसार आपले जीवन जगतात, त्या प्रकारे त्या काळात वडिलांच्या निर्णयाला विरोध करण्याइतपत माझ्यात मुळीच हिम्मत नव्हती. त्यामुळे मला जे काही करायला सांगितले गेले त्याला मी निमूटपणे होकार देत गेले.”

जे काही त्यांच्यासमोर पर्याय उपबल्ध होते त्यांपैकी बायोमेडिकल इंजिनिरिंग त्यांच्या सर्वात आवडीचा पर्याय होता. याच विषयात प्रगती करायची असा निर्णय त्यांनी घेऊन टाकला.

ऑस्ट्रेलियाला जाणा-या सुरूवातीच्या प्रवाशांमध्ये त्यांच्या वडिलांचा समावेश होता. तिथून मग ते न्यूझीलंडला गेले. अशा प्रकारे संध्या यांनी देखील आपली सुरूवातीची वर्षे या दोन देशांमध्ये घालवली. तिथून परतल्यानंतर त्यांचे कुटुंब चेन्नईत स्थिरस्थावर झाले. त्यानंतर त्यांनी गिंडीच्या अन्ना विद्यापीठातून आपली इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी टेक्सास विद्यापीठातून बायोमेडिकल इंजिनियरिंगमध्ये मास्टर्स ही पदवी मिळवली. यासोबतच त्यांनी हॉस्पीटल अॅॅडमिनीस्ट्रेशन, क्लिनिकल रिसर्च आणि फार्मार्कोव्हिजिलन्समध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे.

१९९५ मध्ये आपले मास्टर्स करत असतानाच त्या विवाहाच्या बंधनात बांधल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी काही वर्षांसाठी द मद्रास मेडिकल मिशनसोबत काम केले. यानंतर त्या आपल्या पतींसोबत बहरीनला गेल्या आणि सन २००४ पर्यंत त्या तिथे राहिल्या. पुढे तिथून त्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेला रवाना झाल्या.

image


संध्या यांना जरी आपला आवडता व्यवसाय निवडण्याची संधी मिळाली नसली, तरी आपल्या मुलांना हवा तो व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे हे त्यांनी आपल्या मनाशी पक्के ठरवले. या व्यतिरिक्त इलावूरमध्ये आपल्या वडिलांच्या नावाने सुरू झालेल्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या आपल्य़ा मुलांबरोबरच स्थानिक मुलींना शिकवण्याचे काम सुद्धा करत आहेत.

चेन्नईपासून ४० किलोमिटरवर असलेल्या तिरूवल्लूर जिल्ह्यात इलावूर नावाच्या गावात ३६० एकर जागेत फ्रंटियर मेडिवेल पसरलेले आहे. आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि कंत्राटी संशोधन आऊटसोर्सिंग उपक्रमाच्या कामांना एकाच ठिकाणी संचलित करणा-या संस्थेच्या रुपात फ्रंटियर मेडिवेलला विकसित करण्यात आले आहे.

एका मुलीला शिकवणे म्हणजे एका कुटुंबाला शिकवण्यासारखे आहे. आज सक्षम झालेली मुलगी भविष्यात एका संपूर्ण कुटुंबाला सशक्त करेल आणि पर्यायाने संपूर्ण देशालाच सशक्त बनवेल. याच विचाराने प्रेरित होऊन फ्रंटियर मेडिवेल आपल्या सीएसआर ( कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सीबिलीटी) चा एक भाग म्हणून ग्रामीण भागात राहणा-या लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी त्यांना ज्ञान आणि प्रशिक्षण देते. ग्रामीण महिलांना शिकवण्या व्यतिरिक्त आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे फ्रंटियर मेडिवेल त्यांना रोजगाराच्या संधी देखील मिळवून देण्याचे काम करते

त्याच्या इलावूरच्या एज्युकेशन ट्रस्टने २००७ नंतर आत्तापर्यंत, वडिलांचे छत्र हरवलेल्या आणि केवळ आईवर आपल्या पालनपोषणाची जबाबदारी असलेल्या वंचित वर्गातील २१ मुलींना मोफत शिक्षण देण्याचे काम केले आहे. अगदी नर्सरी पासून ते माध्यमिक स्तरापर्यंत त्यांची ट्यूशन फी, प्रवास, पुस्तके, गणवेश आणि इतर सर्व शैक्षणिक गरजा भागवण्याचे काम या ट्रस्टने केले आहे. संध्या सांगतात, “ आमच्या या कार्याला आता चांगले फळ येत आहे. या सर्व मुली आपल्या आईला सक्षम बनवण्यात मदत करत आहेत.”

या मुलींमध्ये झालेल्या सकारात्मक बदलाबाबत संध्या मोठ्या उत्साहाने बोलतात. फ्रंटियर मेडिवेलमध्ये अतिशय गरीब कुटुंबातील ६ मुलींची निवड करण्यात आली. गावात राहत असतानाच या मुली आपल्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांना बायोटेक्नॉलॉजी, टिश्श्यू इंजिनियरिंग आणि नॅनो कोटींग तंत्राचे प्रशिक्षण दिले गेले. निवड झालेल्या मुलींना मोफत भोजन आणि राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच मासिक शिष्यवृत्ती देण्याची देखील व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर या मुलींना 'फ्रंटियर मेडिवेल'मध्ये कायम स्वरूपाच्या नोक-या देखील देण्यात आल्या. आज या मुली स्वतंत्र आहेत. आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या या मुली आता इतर मुलींसाठी आदर्श ठरल्या आहेत. संध्या सांगतात, “ जेव्हा गावातील इतर मुली या मुलींना स्कुटी चालवत कामावर जाताना पाहतात, तेव्हा त्याही त्यांच्याप्रमाणे काही तरी करुन दाखवण्याच्या विचारांनी प्रेरित आणि प्रोत्साहित होतात.”

संध्या पुढे सांगतात, “ माझ्या समोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे मी एकटीने माझ्या मुलांचे पालन पोषण करणे हे आहे. कितीतरी वेळा घर आणि कामात ताळमेळ बसवणे आणि त्याचवेळी दोन मुलांचा सांभाळ करणे ही अगदी तारेवरची कसरत होऊन जाते.”

कामाच्या व्यापामुळे अनेकदा संध्या खूप थकून जातात. आणि अशा अवस्थेत इतर कामांसाठी मग त्यांच्याकडे खूपच कमी क्षमता उरते आणि वेळही पुरत नाही.

त्या म्हणतात, “ ब-याचदा मी विचार करते, की माझ्या समोर माझ्या दोन मुलींना शिक्षण देण्यासोबतच त्यांना स्वतंत्र जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे आणि नंतर त्यांचे विवाह लावून देणे हे एक अतिशय आव्हानात्मक काम आहे. परंतु हे आव्हान मी यशस्वीपणे पेलू शकते असा विचार करून पुन्हा मी स्वत:ला समजावते आणि आपल्या कामात व्यस्त होते. माझ्या मुलींना खंबीर आणि संसाधनांनी परिपूर्ण होण्याचे शिकवणे हेच माझे ध्येय आहे. मी माझ्या मुलींसाठी सर्वात उत्कृष्ट काम हेच करू शकते.”

संध्याचे वडिल हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहेत. त्या सांगतात, “ मी त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्वात वाईट काळात देखील पाहिले आहे. आपल्या ६० वर्षांच्या वयात त्यांनी स्वत:ला पुनर्जीवित केले आणि यशाची नवी शिखरे गाठली.” एका बाजूला वडिल, तर दुस-या बाजूला संध्या यांची मुले सुद्धा त्यांना प्रेरित करण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्या म्हणतात, “ माझी मुले माझे जग आहे आणि तीच मला एक चांगले माणूस बनण्याची प्रेरणा देतात.”