पिल्लं उडून गेलेल्या घरट्यातील एकट्या पाखराला हेमंत सावंत यांचा मायेचा आधार

पिल्लं उडून गेलेल्या घरट्यातील एकट्या पाखराला हेमंत सावंत यांचा मायेचा आधार

Tuesday January 19, 2016,

7 min Read

आजकाल नोकरीसाठी परदेशात जायचे प्रमाण वाढल्यामुळे पंख पसरुन झेप घेतलेल्या पाखरांच्या वृद्ध पालकांना मात्र आपल्या घरट्यात एकटेच रहावे लागते. त्यांना पैशांची कमतरता भासू नये याची काळजी मुलं घेत असली तरी आपल्या माणसांची, त्यांच्या आपुलकीची कमतरता त्यांना नेहमीच भासत असते. दिवसाढवळ्या आसपासची मंडळी अधूनमधून विचारपूस करुन जातात. तर कधी गरज भासल्यास ही म्हातारा-म्हातारी शेजारच्यांना मदतीला बोलावतात. मात्र कधीतरी रात्री अपरात्री एखादी एमर्जन्सी येते आणि मग हे दोघे हतबल होऊन जातात. मुंबईत विलेपार्लेमधील ज्येष्ठ नागरिकांना मात्र हेमंत सावंत यांच्या रुपात मायेचा आधार सापडला आहे.

image


१ ऑक्टोबर म्हणजे ज्येष्ठ नागरिक दिन आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या हेमंत सावंत यांचा जन्मदिवसही. हा एक आश्चर्यकारक योगायोग म्हणावा लागेल. हेमंत पार्ल्यातच लहानाचे मोठे झाले. १९८३ पासून पार्ल्यात रिक्षा चालवू लागले. मात्र हेमंत यांना आज पार्लेकर ओळखतात ते वेळीअवेळी, कधीही गरज पडेल तेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावणाऱ्या एका आधारवडाच्या रुपात.

हेमंत यांच्या मालकीच्या दोन रिक्षा आहेत. सकाळच्या वेळी एका बिल्डरकडे कमाला जायचं, संध्याकाळी साडे सात ते रात्री दहा वाजेपर्यंत रिक्षा चालवायची, दहा ते साडे अकरा - पावणे बारा पर्यंत स्वामी समर्थांच्या मठात जाऊन सेवा करायची. त्यानंतर मठातील वृद्धांना घरापर्यंत सोडण्यासाठी रिक्षा सुरु करायची आणि पुढे रात्रभर रिक्षा चालवायची असे २००८ सालापर्यंत हेमंत यांचे दिवसरात्रीचे वेळापत्रक ठरलेले होते. मात्र त्यावर्षीच्या पावसाळी रात्री हेमंत यांच्याबरोबर घडलेल्या एका घटनेनंतर या वेळापत्रकात रात्री १२ ते सकाळी सहा पर्यंत घरात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सेवा समाविष्ट झाली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी दिवसरात्र एक करणे ही सेवाभावी वृत्ती हेमंत यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली.

“त्या रात्री मी नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन रस्त्यावरुन जात होतो. मुसळधार पाऊस पडत होता. रात्रीचे जवळपास दोन वाजले होते. पावसामुळे समोरचं काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. अशातच माझ्या रिक्षाच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक आजोबा छत्री घेऊन उभे असलेले दिसले. ते रिक्षाला हात दाखवत होते. मी रिक्षा थांबवली आणि त्यांना विचारलं की आजोबा एवढ्या रात्री कुठे जाताय? काय झालं? ते म्हणाले की माझ्या बायकोची तब्येत अचानक खराब झाली. डॉक्टरने औषधं लिहून दिली आहेत. आत्ताच्या आता आणणं गरजेचं आहे. मी त्यांना रिक्षात बसवलं आणि शास्त्री मेडिकलमध्ये घेऊन गेलो. तेव्हा इथे ते एकच मेडिकल होतं. तिथे त्यांना पाहिजे असलेल्या तीन औषधांपैकी दोन औषधं मिळाली. एक औषध अजून घ्यायचं होतं. मी त्यांना म्हटलं पश्चिमेला जाऊया तिथे एक डे ऍण्ड नाईट मेडिकल आहे. तर ते नको नको म्हणायला लागले. मला त्यांची समस्या काय असावी हे लक्षात आलं आणि मी रिक्षा पश्चिमेच्या दिशेने वळवली. तसे ते घाबरेघुबरे होऊन म्हणाले की अहो तुमचं भाडं द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. खूप हेलावणारा होता तो क्षण. मी त्यांना पैशाची काळजी करु नका म्हटलं आणि जबरदस्ती पश्चिमेला घेऊन गेलो. तिथेही औषध मिळालं नाही. मग नानावटीला घेऊन गेलो. तिथे अखेर औषध मिळालं. मी आजोबांना घरी आणून सोडलं. रिक्षाचं भाडं घेतलं नाही. औषधं घेतल्यावर त्या आजोबांकडे जेमतेम १०-२० रुपये उरले होते आणि माझं भाडं त्याच्या पाच पट झालं होतं. त्यादिवशी मी भाड्याचे पैसे सोडले पण खूप मोठा आनंद कमावला. ज्याची तुलना त्या पैशाशी होऊ शकत नाही. आजोबांच्या चेहऱ्यावर औषधं मिळाल्याचा आनंद होता. माझे आभार मानून ते आपल्या घराच्या दिशेने गेले,” हेमंत सांगतात.

image


त्या रात्रीनंतर हेमंत यांनी घरामध्ये एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या कामी येऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा वसाच घेतला. त्यांनी अशा ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन सुरु केली. 9867771103 हा हेमंत यांचा मोबाईल क्रमांक म्हणजेच हेमंत यांचा हेल्पलाईन नंबर. या हेल्पलाईनवर कॉल करुन ज्येष्ठ नागरिक विविध प्रकारच्या समस्या हेमंत यांच्याकडे मांडत असतात आणि हेमंत आनंदाने त्यांची मदत करतात. ते सांगतात, “एकदा रात्री एका आजी-आजोबांचा फोन आला. ते दोघंही खूप घाबरलेले होते. कारण त्यांच्याकडे अचानक लाईट गेली होती. मी त्यांना म्हटलं मी दहा मिनिटात तिथे पोहचतो. तिथे जाऊन पाहिलं तर माझ्या अपेक्षेप्रमाणेच तिथे फ्यूज उडाल्यामुळे लाईट गेली होती. खरं तर समस्या खूप छोटी होती. पण वयोमानानुसार त्यांची ती प्रतिक्रिया होती. मी फ्यूज सुरु केला आणि त्यांची लाईट आली. लाईट आल्यावर त्या आजी-आजोबांना एवढा आनंद झाला. अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते खूष झाले. आपली एवढीशी मदत त्यांना एवढा आनंद देऊ शकते याची मला कल्पनाही नव्हती.”

हेमंत यांची हेल्पलाईन पार्ल्यापुरती मर्यादित असली तरी हळूहळू त्यांच्याबद्दल समजलेले पार्ल्याबाहेरचे लोकही त्यांना मदतीसाठी कॉल करतात. या लोकांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष जाणे त्यांना शक्य नसले तरी ते फोनवरुन त्या व्यक्तींना आवश्यक ती सर्व माहिती पुरवितात आणि शक्य ती सर्व मदत करतात. “वृद्धांना आरोग्याशी संबंधित आणि इतर कुठल्या कुठल्या समस्या येऊ शकतात याचा विचार करुन आवश्यक गोष्टींसंदर्भातील माहिती मी माझ्याकडे संकलित करुन ठेवलेली आहे. त्यामुळे कुणी पार्ल्याबाहेरुन कॉल केला असेल तर कुठल्या गोष्टीवर कुठला उपाय करायचा, कुठे जायचं, एखादी ट्रीटमेंट कुठे फ्री मिळेल इत्यादी गोष्टींचं मार्गदर्शन मी त्यांना करतो. त्यांना सर्व माहिती पुरवतो आणि त्यांचं काम होईपर्यंत फोनवरुन त्यांच्या संपर्कात असतो. अनेक ट्रस्टी माझ्या ओळखीचे आहेत. माझं काम पाहून ते सुद्धा रात्री अपरात्री माझ्या मदतीला उभे राहतात,” हेमंत सांगतात.

हेमंत यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हेल्पलाईन सुरु केली असली तरी त्यांच्याबरोबरीने इतर लोकही आपल्या समस्यांबद्दल त्यांना कॉल करत असतात. “घरातील दारुड्या व्यक्तीपासून होणाऱ्या त्रासाची तक्रार करण्यासाठी खूप कॉल येतात. अशा व्यक्तींना खोपोलीच्या ‘सनराईज फाऊंडेशन’ या व्यसनमुक्ती केंद्रात भर्ती करण्याचा मी सल्ला देतो. तिथे गेलेली व्यक्ती निश्चितपणे व्यसनमुक्त होते. २०१० मध्ये दारुमुळे पूर्णपणे लयाला गेलेल्या एका मुलाला मी तिथे घेऊन गेलो. तो दोन वर्ष तिथे होता. आता तो व्यसनमुक्त होऊन तिथे दारुच्या दुष्परिणामांवर लेक्चर देतो. नुकताच मी पाचवा पेशंट तिथे नेला आहे. या केंद्राचे संचालक भरत सालियन आणि इथले सेवेकरी प्रत्येक केस काळजीपूर्वक आणि आपुलकीने हाताळतात,” असं हेमंत सांगतात.

image


हेमंत स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेनेच त्यांच्या कार्याची ओळख पार्लेकरांना झाली अशी त्यांची श्रद्धा आहे. “एकदा मठामध्ये सुरु असलेल्या एका कार्यक्रमाला माझे नववी-दहावीतील क्लासचे शिक्षक संजय पालकर आले होते. मी नेहमीप्रमाणे कार्यक्रम संपल्यावर तिथल्या वृद्धांना सोडायला निघत होतो. सरांना ते समजलं आणि त्यांनी माझी अधिक विचारपूस केली. तेव्हा मी त्यांना माझं काम सांगितलं. त्यांनी कौतुक केलं आणि माझं नाव पार्ले कट्टाच्या संचालिका रत्नप्रभा महाजन यांना सुचवलं. रत्नप्रभा महाजन म्हणजे पहिली ते चौथी ज्यांनी मला घडवलं त्या महाजन बाई. या दोघांनी माझ्या कार्याची दखल घेतली आणि थोड्याच दिवसात पार्ले कट्टावर माझा सत्कार करण्यात आला. पार्ले कट्टा हे असं व्यासपीठ आहे जिथे चांगलं काम करणाऱ्या पार्ल्यातल्या मोठमोठ्या लोकांचा सत्कार करण्यात येतो. तिथे माझा सत्कार होणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. या पाठोपाठ ‘सोबती’, ‘दिलासा’ आणि ‘मराठी मित्र मंडळ’ या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थांनीही माझी आपुलकीने दखल घेऊन माझा सत्कार केला,” असं हेमंत सांगतात.

‘मराठी मित्र मंडळा’च्या सत्कार समारंभाप्रसंगी काही मंडळींनी त्यांना डोनेशन देऊ केले. हे डोनेशन घेताना हेमंत यांनी त्या व्यक्तींचा फोन नंबर पाकिटावर लिहून घेतला. आलेल्या डोनेशनच्या पैशातून दोन गरजू महिलांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केले आणि डोनेशन दिलेल्या व्यक्तींना त्यांच्या प्रत्येक पैशाचा हिशेब दिला. ज्या व्यक्तीवर उपचार केले त्याचा फोटोही त्यांना पाठवला. त्यांच्या या कृतीचे देणगीदारांनी कौतुक केले. हेमंत सांगतात, “देणगीदारांना त्यांच्या पैशाचा हिशेब देणं हा माझा मोठेपणा नाही तर ते माझं कर्तव्य आहे. देणगी स्वीकारणाऱ्या प्रत्येक संस्थेने असा हिशेब देणगीदाराला द्यायला पाहिजे.”

image


हेमंत यांच्यावरील या संस्कारांचं श्रेय ते आपले आई-वडिल आणि टिळक मंदीर व पार्ले टिळक या आपल्या शाळांना, त्यातील शिक्षकांना देतात. हेमंत यांच्या या कामात त्यांच्या कुटुंबियांचीही त्यांना साथ लाभली आहे. पार्ले टिळकमध्ये नवव्या इयत्तेत शिकणारा त्यांचा मुलगा हर्ष वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढे जात आहे. तो आपला अभ्यास सांभाळून पार्ल्यातील ज्येष्ठ नागरिकांना नवं तंत्रज्ञान शिकायला मदत करतो. “अनेक आजी आजोबांना त्यांच्या मुलांनी स्मार्ट फोन घेऊन दिलेले असतात. पण त्यांना ते वापरता येत नाहीत. हर्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना ते वापरायला शिकवतो. तो एक उत्तम नर्तकही आहे,” हेमंत अभिमानाने सांगतात.

ते पुढे सांगतात, “रात्री-अपरात्री येणाऱ्या एमर्जन्सीमध्ये वृद्धांना रिक्षातून डॉक्टरकडे घेऊन जाणं अनेकदा कठीण जातं. अशावेळी अनेकदा ऍम्ब्युलन्सही सहजासहजी मिळत नाही. म्हणूनच आता स्वतःच्या मालकीची ऍम्ब्युलन्स घ्यायची आहे.” भविष्यात पुण्यातील अथश्रीच्या धर्तीवर, मात्र त्याहूनही सरस असा प्रोजेक्ट मुंबईतील मढ आयलंड भागात उभारण्याची त्यांची योजना आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येतील. यासाठी एका सद्गृहस्थांनी त्यांना आपली १०-१५ एकर जमीन मोफत देण्याची तयारी दर्शविली आहे.

image


जाता जाता एका आजीबाईंची गोष्ट हेमंत आवर्जून सांगतात, “आमच्या मठाच्या बाजूला नारळ सुपारी विकायला बसणारी एक आजी आहे. गेली कित्येक वर्ष ती तिथे बसते. मी लहानपणापासून तिला ओळखतो. रोज येता जाता तिला हाक मारतो. त्या दिवशी ती डोक्याला हात लावून बसली होती. मी विचारपूस करायला गेलो तर ती रडायला लागली. म्हणून तिला आपुलकीने जवळ घेतलं, तिचे केस व्यवस्थित केले आणि म्हटलं सांग मला काय झालं? तर ती अजून ढसाढसा रडायला लागली. खूप रडली. नंतर तिने मला तिच्या चिंतेचं कारण सांगितलं. पण ते तिच्या रडण्याचं कारण नव्हतं. ती मला म्हणाली बाबू मला कधी कोणी एवढ्या प्रेमाने जवळ घेतलं नाही, माझी विचारपूस केली नाही. ते तू केलंस आणि मला वाटलं की माझं पण या जगात कुणीतरी आहे आणि म्हणून मला रडू आलं. आजीचं बोलणं ऐकून माझेही डोळे पाणावले. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या वृद्ध माणसांनी आयुष्यभर खूप खस्ता खाल्लेल्या असतात. त्यांना आता फक्त आपल्या दोन प्रेमळ शब्दांची गरज असते. बाकी त्यांची काहीही अपेक्षा नसते. त्यांच्याबद्दल प्रेम दाखवणारी आपली एक छोटीशी कृती त्यांना खूप मोठा आनंद देते. तुमच्या व्यस्त दिनक्रमामध्ये त्यांना थोडा वेळ द्या.”

    Share on
    close