कर्नाटक किनारपट्टीवरील छोट्या शहरांची मोठी भरारी

कर्नाटक किनारपट्टीवरील छोट्या शहरांची मोठी भरारी

Tuesday February 02, 2016,

6 min Read

कर्नाटक राज्याचा किनारपट्टीचा प्रदेश हा प्रामुख्याने ओळखला जातो तो तिथल्या नितांत सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि चविष्ट सीफुडसाठी... जरी हा भाग राजधानी बंगळुरु एवढा विकसित झाला नसला, तरी कर्नाटकच्या किनारपट्टीनजीक वसलेल्या येथील अनेक छोट्या शहरांची गेल्या काही दशकांमध्ये हळूहळू पण निश्चितपणे वाढ होताना दिसत आहे. या नकाशावरील मंगळुरु आणि उडुपी ही दोन अशी ठिकाणे आहेत जी अनेक कारणांसाठी लक्षणीय ठरतात.

image


मंगळुरु

राजाधानी बंगळुरुपासून ३७१ किलोमीटर अंतरावर असलेले मंगळुरु हे कर्नाटकमधील प्रमुख बंदर आहे. १९७४ मध्ये स्थापना झालेल्या न्यू मंगलोर पोर्ट ट्रस्ट (एनएमपीटी) कडे राऊंड द क्लॉक पायलटेज, जमीन आणि सागरी सुरक्षा व्यवस्था असून ते रासायनिक द्रव्ये, धोकादायक कार्गोज, अवजड लिफ्टस् आणि मशीनरी हाताळण्यासाठी सक्षम आहे.

तर पब्लिक सेक्टर एंटरप्राईज (पीएसई) अर्थात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा विचार करता, येथे मंगलोर रिफायनरी ऍन्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (एमआरपीएल) ही आॅईल ऍन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) ची उपकंपनी आहे. दरवर्षी १५ मिलियन मेट्रीक टनवर प्रक्रिया करण्याची या रिफायनरीची क्षमता असून, त्यामध्ये प्रिमियम डिजेलचे उत्पादन करणारे दोन हायड्रोक्रॅकर्स (hydrocrackers) आणि हाय ऑक्टेन अनलिडेड पेट्रोलचे उत्पादन करणारे दोन कॅटॅलिस्ट रिजनरेटर्स आहेत. कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या कामगारांसाठी रोजगार निर्मिती करुन एमआरपीएलने आसपासच्या प्रदेशातील अर्थव्यवस्थेला निश्तितच चालना दिली आहे. मंगलोर केमिकल्स आणि फर्टीलायझर लिमिटेड (एमसीएफ) - झुआरी फर्टीलायझर्स आणि केमिकल्स लिमिटेडची उपकंपनी – ही कर्नाटकातील रासायनिक खतांची सर्वात मोठी उत्पादक कंपनी असून कंपनीची उलाढाल तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दक्षिण भारतातील शेतकऱ्यांसाठी अतिशय हितावह ठरलेली अशी ग्रॅन्युलेटड फर्टीलायझर्स अर्थात दाणेदार खते, मायक्रोन्युट्रीयंट, सोईल कंडीशनर्स आणि विशेष खते ही कंपनीच्या उत्पादनांपैकी काही महत्वाची उत्पादने आहेत.

दक्षिण कन्नडा आणि खास करुन मंगळुरु हे नेहमीच सर्वाधिक महत्वाचे असे शैक्षणिक केंद्र मानले गेले आहे, जेथे दर्जेदार उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दक्षिण कन्नडा जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या शाळा, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्था त्याचबरोबर आरोग्य, व्यवस्थापन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगातील संस्था आहेत. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरथकाल (पूर्वीचे केआरईसी), हे देशातील अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालय मंगळुरुपासून अवघ्या दहा किलोमीटरवर आहे. त्याशिवाय एन.एम.ए.एम इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सेंट जोसेफस् आणि कॅनरा इंजिनियरींग कॉलेज या इतर काही विशेष उल्लेखनीय संस्थाही येथे आहेत.

तर वैद्यकीय संस्थांचा विचार करता, मंगळुरुमध्ये कस्तुरबा मेडीकल कॉलेज (केएमसी), ए जे इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स, फादर म्युलर मेडीकल कॉलेज, केएस हेगडे मेडीकल ऍकॅडमी आणि आरोग्यसेवा क्षेत्राबाबत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था असून भविष्यातील डॉक्टर्सना शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन, त्यांना घडविण्याचे काम येथे केले जाते.

जीआयआरईएम ने २०१३ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार व्यवसायांसाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत मंगळुरु हे देशात तेराव्या स्थानावर तर कर्नाटकात दुसऱ्या (बंगळुरु पहिल्या स्थानावर होते) स्थानावर होते. जरी मंगळुरु हे पारंपारीक उद्योग-व्यवसायांसाठी एक चांगले ठिकाण असले तरी नव्या युगातील टेक व्यवसायाचा विचार करता सध्या ते काहीसे मागे पडलेले दिसते. मात्र शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचे उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आंत्रप्रुनरशीप सेल्स सुरु केलेलेही दिसून येत आहेत.

मात्र टेक स्टार्टअप्स संख्येने कमी असण्यामागील कारण हे गुणवत्तेचा अभाव हे मात्र निश्चितच नाही. आयटी क्षेत्रात जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचा मंगळुरुमध्ये मोठा पसारा आहे आणि त्यांना आवश्यक ती गुणवत्ताही याठिकाणी सहजपणे मिळू शकली आहे. मार्गदर्शकांचा, आदर्शांचा आणि त्याचबरोबर एंजल गुंतवणूकदांकांकडून दाखविण्यात येणाऱ्या स्वारस्याचा अभाव, ही या शहरामध्ये स्टार्टअप संस्कृती अजूनही न रुजण्यामागची मोठी कारणे आहेत. तुलनेने कमी रहादारी, रिअल इस्टेट क्षेत्रातील वाजवी किंमती आणि कर्नाटकातील इतर भागांशी (आणि जगाशीही) रस्ता, समुद्र आणि हवेच्या मार्गाने (आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे) चांगला संपर्क असल्यामुळे मंगळुरुकडे आणखी वाढण्याची मोठी क्षमता आहे, हे मात्र निश्चित...

उडुपी

बंगळुरुच्या वायव्येला ४२२ किलोमीटरवर तर मंगळुरुपासून उत्तरेकडे ६० किलोमीटर अंतरावर वसलेले उडुपी हे प्रसिद्ध आहे ते तेथील कृष्ण मंदीरासाठी... वैष्णव हिंदुइझिममधील द्वैत (पंथ) आणि उडुपी कृष्ण मठाचे संस्थापक श्री माधवाचार्य यांचे हे मूळ स्थान असल्याने इस्कॉन भक्तांसाठी ते विशेष महत्वाचे आहे.

त्याशिवाय उडुपी हे खास करुन प्रसिद्ध आहे ते येथील स्थानिक खाद्यपदार्थांसाठी आणि आज देशभरातच नव्हे तर जगभरात उडुपी खाद्यपदार्थ देऊ करणारी अनेक रेस्टॉरंटस् आहेत. लोकप्रिय अशा मसाला डोशाचे उगमस्थानही उडुपीच असल्याचे मानले जाते. सुंदरे मंदिरे, सागरकिनारा आणि स्थानिक खाद्यपदार्थांमुळे उडुपी हे नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे आणि त्यामुळे सहाजिकच कर्नाटकमधील पर्यटन व्यवसायास चालना मिळण्याच्या दृष्टीनेही ते अतिशय महत्वाचे आहे.

उडुपीमध्ये कोणतेही मोठे उद्योग नसल्याने शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने अवंलंबून आहे ती शेती, मासेमारी आणि शैक्षणिक संस्थांवर... दुध सहकारी संस्था, काजू उद्योग, खाद्यपदार्थ आणि हॉटेल व्यवसायांचेदेखील येथील अर्थव्यवस्थेत योगदान असून त्याद्वारेही रोजगारनिर्मिती होत आहे.

त्याशिवाय तंत्रज्ञानही आता येथे मुख्यप्रवाह बनत आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि माल्पे बीच विकास समितीने ही घोषणा केली की माल्पे बीचवर येणाऱ्या पर्यटकांना फोर जी च्या स्पीडने मोफत वाय-फाय सुविधा (प्रति उपकरण तीस मिनिटे) उपलब्ध करुन देण्यात येईल. याशिवायही पर्यावरणाला चालना देण्याच्या दृष्टीने विविध योजना विचाराधीन आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन उडुपीच्या दिशेने जात असताना, सांथेकट्टेरुन पुढे जाताना, रॉबसॉफ्ट टेक्नॉलॉजीज चे बहुमजली कॉर्पोरेट मुख्यालय तुमचे नक्कीच लक्ष वेधून घेते. रोहीत भट्ट यांनी १९९६ साली स्थापन केलेली ही कंपनी ऍप्पलच्या आयओएस डिव्हायसेससाठी सॉफ्टवेअर उत्पादने आणि मोबाईल ऍप्स विकसित करते. कॉर्पोरेटचे मुख्यालय एखाद्या महत्वाच्या महानगरातच ठेवण्याच्या पारंपारिक शहाणपणाकडे पाठ फिरवित, रॉबसॉफ्टने उडुपी येथे हे मुख्यालय उभारले तर आहेच पण त्याचबरोबर या लहान शहरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देऊ करत आणि जवळपासच्या शैक्षणिक संस्थांमधून स्थानिक गुणवत्तेलाच संधी देत, भरभराटही साधली आहे.

उडुपीपासून केवळ काही किलोमीटरवर वसले आहे ते विद्यापीठाचे शहर मणिपाल... एकेकाळी केवळ काही झाडेझुडपे असलेली ओसाड टेकडी असलेल्या मणिपालमध्ये आज अमूलाग्र बदल झाला असून अवघ्या काही वर्षांतच बावीसहून अधिक संस्थांसह ते विद्यापीठ शहर बनले आहे. डॉ. टी.एम.ए. पै हे या बदलाचे जनक आहेत. त्यांनी १९५३ मध्ये मणिपाल येथे भारतातील पहिल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची - कस्तुरबा मेडीकल कॉलेज- स्थापना केली आणि त्यानंतर पाच वर्षांनी मणिपाल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उभारली.

विविध विषयांचे वीस हजाराहून अधिक विद्यार्थी येथे असून, त्यांना एकत्र काम करण्याची आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी संधी मणिपाल देऊ करते. ही गोष्ट अधिक सुकर करण्यासाठी मणिपाल विद्यापीठाने बिझनेस इनक्युबेटर – एमयुटीबीआयची रचना केली आहे. यामाध्यमातून स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना आवश्यक पायाभूत सुविधा, आर्थिक सहाय्य आणि इतर साधनसंपत्ती पुरविली जाते.

दोन वर्षांपूर्वी हे शहर प्रकाशझोतात आले, जेंव्हा सत्या नाडेला आणि राजीव सुरी या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांची अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट आणि नोकीया या मोठ्या कंपनींचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. यशाच्या शिखरावर पोहचलेले मणिपालचे आणखी एक माजी विद्यार्थी म्हणजे मिशलिन स्टार्ड भारतीय शेफ, रेस्टॉरंटर आणि जुनुनचे संस्थापक विकास खन्ना... मणिपालच्या वेलकमग्रुप ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल एडमिनिस्ट्रेशनचे ते माजी विद्यार्थी आहेत.

निष्कर्ष

कर्नाटकने आपल्या स्वतःच्या उदहारणातून हे दाखवून दिले आहे की टीयर टू आणि टीयर थ्री शहरांकडूनही जागतिक पातळीवर यश मिळू शकते. त्यांच्याकडे कदाचित सर्वोत्तम पायाभूत सुविधा नसतील पण इतर प्रकारची त्यांची स्वतःची गुणवत्ता असते. हे यश सामान्यांचा आत्मविश्वास वाढविणारे असले, तरी पुरेशी मदत पुरविणे हे देखील महत्वाचे आहे, जेणेकरुन भारतातील छोट्या शहरांमधून यशाच्या आणखी कथा पुढे येतील.

लेखक – हर्षित माल्या

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

    Share on
    close