आबीद सुरती.....पाणी वाचवणारे बाबा

आबीद सुरती.....पाणी वाचवणारे बाबा

Wednesday March 16, 2016,

3 min Read

पाण्याच्या एका थेंबाची किंमत काय असते, दुष्काळी भागात राहणाऱ्यांना विचारा. त्या एका थेंबासाठी किती घाम गाळावा लागतो हे तेच सांगू शकतील, पण शहरात मात्र चित्र वेगळंच दिसतं. आपल्याकडे पाणी वापरण्याची शिस्तच नाही. लाखो लिटर पाणी बरबाद होते गळणाऱ्या नळातून. हेच थेंब थेब पानी वाचलं तर पाण्याच्या समस्येवर उपाय करता होईल. यासाठीच ८० वर्षाचे आबीद सुरती प्रयत्न करतायत. त्यांनी ‘द ड्राप डेड फाउंडेशन’ सुरु केलीय. याद्वारे घराघरात जाऊन गळणारे नळ दुरुस्त करण्याचं काम ते करतायत. यासाठी हे वय आड येत नाही. थेंब-थेब वाचवून पाण्याचा समुद्र तयार करण्याचं व्रत त्यांनी घेतलंय.

दर रविवारी, गळती दुरुस्तीसाठी लागणारं साहित्य घेऊन आबीद सुरती मुंबईच्या रस्त्यावर बाहेर पडतात. ज्या इमारतीत असा गळका नळ दिसेल तिथं ते दुरुस्त करतात. आतापर्यंत त्यांनी करोडो लिटर पाणी वाचवलंय. पाण्याची बचत म्हणजे जीवनदान असं आबीद सांगतात. आबीद एक लेखक, व्यंगचित्रकार तसंच चित्रकार आहेत. हातात पाना घेऊन गळक्या नळाचे आटे फिट करण्यात त्यांना वयाचा अडसर वाटत नाही. “प्रत्येक थेंबाबरोबर आयुष्य कमी होतंय. पाऊसाचा लहरी कारभार आपल्याला माहितेय. मग ३० ते ४० टक्के पाणी कपात. अशी परिस्थिती आता कायमची राहणार त्यामुळे आता एक थेंबही वाचवला तर पृथ्वीवरच पिण्याच्या पाण्याची समस्या काही अंशीतरी कमी होईल” आबीद सुरती सांगत होते.

image


२००७ ला द ड्राप डेड फाउंडेशनची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मिरारोड भागातले १६६६ घरांचे दरवाजी ठकठकवले. त्यांच्या घरात गळका नळ असेल तो दुरुस्त केला. हळूहळू लोकांना माझ्या या कामाबद्दल समजायला लागलं तसं लोकच फोन करायला लागले. मला हे काम करायला बरं वाटतं त्या १६६६ घरांमध्ये ४१४नळ होते. ते दुरुस्त झाले. सुमारे साडे चार लाख लिटर पाणी वाचलं. अगोदर हे मी स्वत: जाऊन करायचो आता आमचे कार्यकर्ते जातात. मी ही जातो. अगोदर इमारतींचे सचिव किंवा अध्यक्ष यांच्याशी आम्ही बोलून ठेवतो. कुठल्या घरात नक्की कुठला नळ दुरुस्त करायचा आहे. याची यादी आम्हाला मिळते आणि सहाजिकच सर्व काही मोफत होत असल्यानं लोकही चांगला प्रतिसाद देतात. आम्ही पोस्टर लावतो ड्रॉप डेड असं लिहिलेली. त्यामुळे लोकांच्या लक्षात येतं. त्यावर लिहिलेल्या क्रमांकवर लोक फोन करतात. दर रविवारी आमचे कार्यकर्ते तिथं जाऊन नळ दुरुस्त करतात.”

image


आबीद सुरती यांच्या या कामाबद्दल ‘सेविंग द प्लानेट वन ड्रॉप एट ए टाईम’ नावाचा ब्लॉग त्यांच्या मुलानं सुरु केला. पीयरसन एज्युकेशन संस्थेनं त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. “मी एक लेखक आहे जे मनात येतं ते लिहितो. ते ओढून ताणून आलेलं नसतं. ती माझ्या मनातून झालेली उत्पत्ती असते. ड्रॉपडेडबद्दलचा विचार ही असाच अचानकच मनात आलेला. आता करोडो लिटर पाणी वाचलं याचं मला जास्त समाधान आहे.”

लोकांनी या कामाला पुढे न्यावं असं आबीद सुरती यांचं म्हणणं आहे. आबीद सुरती यांनी हे काम फार मनानं सुरु केलंय. मुंबईतले लोक त्याला चांगला प्रतिसाद देतायत. पण हे फक्त मुंबईत मर्यादीत न राहता जगात जिथं गळका नळ आहे. तिथं ही मोहिम पोहोचली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. “ अनेकजण म्हणतात तुम्ही प्लंबर्सचा एखादा ग्रुप का नाही बनवत. ते हे काम करतील, तुम्हाला या वयात इमारतीमध्ये जायला नको. पण मला वाटतं हे कार्य मोठं आहे. मी याकडे दुर्लक्ष केलं, दुसऱ्यावर टाकलं ते अर्धवट राहिल. तेव्हा मी फक्त माझ्या कार्यकत्यांवर अवलंबून राहत नाही. तर आलेल्या तक्रारींची शहानिशा स्वत: जाऊन करतो.” 

image


सत्तर साल का बच्चा नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या या कामाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केलाय. ते म्हणतात. “वयाच्या सत्तरीतही आयुष्याला नवीन सुरुवात होऊ शकते. तुम्ही त्यासाठी तयार असलं पाहिजे.” त्यांना आलेले अनुभव खरंच अनेक गोष्टी शिकवणारे आहेत. त्यामुळे ७० वर्षात पाणी वाचवण्याचं व्रत घेणारा हा बाबा नव्हे आजोबा जगासाठी एक मोठं उदाहरण बनून राहिले आहेत. 

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

दुष्काळी भागात हरितक्रांती घडवणारा महापुरुष : सिमोन उराव

छतीसगढच्या ६५ वर्षीय विश्वनाथ पाणीग्रहींनी गावागावात राबविली स्वच्छता ग्राम अभियान मोहीम 

दशरथ मांझी...पहाडाला हरवणारा माणूस !

    Share on
    close