स्वखर्चाने जनकल्याणाच्या-पर्यावरण रक्षण,पक्षी संवर्धनाचा ध्यास घेणारी कल्याणची ‘ईकोड्राइव्ह फाऊंडेशन’ची तरूण मंडळी!

 स्वखर्चाने जनकल्याणाच्या-पर्यावरण रक्षण,पक्षी संवर्धनाचा ध्यास घेणारी कल्याणची ‘ईकोड्राइव्ह फाऊंडेशन’ची तरूण मंडळी!

Thursday January 28, 2016,

4 min Read

आज जगभरातील सा-याच देशांना एक सामाईक समस्या भेडसावते आहे ,ती म्हणजे जागतिक हवामान बदलाची समस्या. यासाठी आता जागतिक व्यासपीठावरूनही काहीतरी जागृती असावी अशी चर्चा सुरू झाली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत या विषयाची जाणिव मात्र सा-यांनाच आहे असे नाही. त्यामुळे काही नवतरूणांनी यासाठी दक्ष नागरीक म्हणून लोकांना जागे करण्याचे आणि आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करण्याचा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून पदराला खार लावून हाती घेतला आहे ही निश्चितच दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. ‘आधी केले मग सांगितले’ अश्या या उपक्रमाबाबत ‘युअर स्टोरी’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

image


‘इकोड्राईव्ह यंगस्टर्स फाऊंडेशन’ या नावाने मुंबई जवळच्या कल्याण परिसरातल्या आधारवाडी भागात राहणा-या तरूणांनी स्वत:च्या खर्चातून आणि समविचारी लोकांच्या मदत तसेच सहकार्यातून हा उपक्रम केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून गेल्या काही वर्षांपासून हाती घेतला आहे. आज ५०-१०० तरूण –तरूणींचा हा गट शाळा-महाविद्यालयापासून, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच धार्मिक उत्सव आणि मेळ्यांच्या ठिकाणी जाऊन लोकांना पर्यावरण रक्षणाच्या उपाय योजनांची माहिती देतो आहे. या गटाचे सचिव म्हणून काम पहाणारे महेश बनकर यांनी ‘युअर स्टोरी’ला सांगितले की, पर्यावरणाच्या जाणिव जागृतीच्या या कामाची सुरूवात चिमण्या वाचवा या कार्यक्रमापासून झाली.

बनकर म्हणाले की, “आधारवाडी भागात लहानपणापासून राहताना घराजवळ एक मोठे झाड होते. त्यावर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे पक्षी पहायला मिळायचे त्यातूनच जिज्ञासा वाढली आणि त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्याची सुरुवात झाली. जगप्रसिध्द पक्षीतज्ञ सलिम अली यांच्या कार्याबाबत माहिती मिळाली आणि या पक्षांच्या दुनियेतील रंजक माहिती घेण्याचा नाद लागला.”

image


पुढे मात्र घराजवळचे ते झाड पडले. बनकर म्हणाले की, “त्यानंतर तेथे येणा-या पक्षांचे दर्शन दुर्लभ झाले आणि या पक्षांच्या रक्षणाची गरज असल्याचे लक्षात आले.” त्याचवेळी रेडिअेशनच्या कारणाने शहरी भागातील चिमण्या कमी होत असल्याचे वाचनात आले आणि या चिमण्या वाचविल्या पाहिजेत ही जाणिव झाली. मग मित्रांशी चर्चा करून सार्वजनिक जागांवर फलक झळकावून चिमण्या वाचवा असा संदेश देण्याची मोहीम हाती घेण्याचे ठरले आणि मग हा उपक्रम उत्त्तरोत्तर वाढत गेला,बनकर सांगतात.

हे काम सोपे नाही याची जाणिव झाली कारण त्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी फारसे कुणी तयार नाही हे लक्षात आले. मात्र पर्यावरणाच्या रक्षणाची त्यासाठी लोकांच्या जाणिव-जागृतीची गरज आहे हे मनातून ध्यास असल्याने पटले होते. मग या समविचारी मित्रांनी स्वत:च काही वर्गणी गोळा करून आपले काम नेटाने पुढे सुरू ठेवले. ‘मुक्या पक्षांना जीवदान द्या, आणि पर्यावरणाचे संवर्धन करा’ हा संदेश सामान्य लोकांना देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असल्याचे काही वर्षात आजूबाजूच्या ज्या लोकांना जाणवले त्यांनी यथाशक्ति मदत करण्यास सुरूवात केली आणि या तरूणांचा उत्साह वाढला. स्थानिक वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांनी देखील त्यांच्या या मौलिक कार्याची दखल घेतली.

केवळ पर्यावरणाचे रक्षणच नाहीतर गोरगरिबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांच्या घरातील टाकाऊ कपड्यांची वर्गणी गोळा करून ते कपडे गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी देखील हे तरूण काम करत आहेत.

image


जखमी झालेल्या पक्षांना औषधोपचार करणे, त्यांना घरटी मिळावीत म्हणून लोकांना आवाहन करणे, त्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करणे या कामी डॉ. रायबोले यांच्यासारख्या मार्गदर्शकांची मोलाची मदत होत असल्याचे बनकर सांगतात. निवृत्तीच्या वयात असलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांनी देखील या तरुणांच्या धडपडीला हातभार लावण्यासाठी मदत आणि पुढाकार घेतला. त्यामुळे काही शाळा-संस्था चालकांच्या मदतीने शाळांमधून या संदेशाची जागृती मोहीम राबविण्यास सुरूवात झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चे महत्व देखील या तरूणांनी सामान्य लोकांना सांगण्यास सुरुवात केली, त्यातून त्यांचा आत्मविश्वास आणि लोकांचा विश्वास वाढत गेला असे ते सांगतात. या सा-या कार्याने प्रभावित झालेल्या काही दानशूर व्यक्ती भेटतात त्यावेळी त्यांनी आर्थिक मदत करण्यासाठी विचारणा देखील केली मात्र त्यासाठी एखादी संस्था स्थापन केली पाहिजे ही जाण झाली आणि ‘इकोड्राइव्ह’ या नावाची संस्था अस्तित्वात आली.

image


पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण, सार्वजनिक स्वच्छता, अशा वेगवेगळ्या कार्यात ही तरूण मुले गुंतली आहेत. महेश बनकर यांचा छोटेखानी व्यवसाय आहे, घरच्यांच्या मदतीने आपल्या पर्यावरणाच्या या कामात ते सदैव नवनवीन विषयांच्या शोधात असतात. आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे भान कसे ठेवायचे, कोणत्या गोष्टी पर्यावरणाला हानीकारक आहेत आणि त्या कशा टाळता येतील याची माहिती ही तरुणमंडळी सामान्य जनतेला स्वत:च्या खर्चाने देत आहेत. लोकांना शहाणे करण्याच्या या उपक्रमासाठी त्यानी काही व्यावसायिक प्रशिक्षण घेतले नाही. मात्र सामान्यांच्या हिताचा हा विषय आहे आणि त्याच्या संवर्धनातूनच उद्याच्या पिढीपर्यंत ही माहिती जाणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणामुळेच मानवाला उद्याच्या जीवनात सहजपणाने जगता येणार आहे या गोष्टींचे महत्व त्यांना समजले आहे आणि इतरांनाही ते समजावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. या कार्याला भविष्यात आणखी व्यापक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या या स्वयंस्फूर्तीच्या कार्याला युअर स्टोरीच्या शुभेच्छा!