गरजूंचे पोट भरणारा सामाजिक उपक्रम ʻफिड युअर नेबरʼ

गरजूंचे पोट भरणारा सामाजिक उपक्रम ʻफिड युअर नेबरʼ

Friday January 01, 2016,

5 min Read

मध्यरात्री लागलेल्या भुकेमुळे झालेली जाणीव, सुचलेली कल्पना किंवा सुरू झालेली एक चळवळ. महिता फर्नांडिस यांच्या ʻफिड युअर नेबरʼ या फेसबुकवरील चळवळीमुळे जवळपास एक लाख २२ हजार ९३७ जणांना जेवण्यास अन्न मिळाले आहे. ही आकडेवारी फक्त दसऱ्यापर्यंतची आहे. उद्योजिका असलेल्या महिता बंगळूरू येथे गेल्या पाच वर्षांपासून लहान मुलांकरिता काही उपक्रम राबवितात. पुर्वाश्रमीत त्या कॉर्पोरेट जगतात कम्युनिकेशन प्रोफेशनल म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी आजवर इन्फोसिस, केविनकेर आणि हेंकेल इंडिया यांसारख्या बड्या कंपन्यासोबत काम केले आहे. त्या सांगतात, ʻसप्टेंबर महिन्याच्या अखेरीचा दिवस होता. भुकेने व्याकुळ झाल्याने मला झोप येत नव्हती. तेव्हा मी या परिस्थितीबद्दल मनोमनी तक्रार करू लागले. काही क्षणानंतर मला वाटले की, मी किती स्वार्थी आहे, जी स्वतः पुरता विचार करतेय. मला झोपण्यासाठी मऊ गादी आहे, माझ्या डोक्यावर छत आहे, माझे फ्रिज खाद्यपदार्थांनी भरलेले आहे. मात्र असे अनेक लोक आता रस्त्यावर असतील, जे गेली कित्येक रात्री उपाशीपोटी झोपले असतील. त्यावेळीच मी या लोकांकरिता काहीतरी करण्याचे ठरवले. मी जवळपास एक-दीड तास या गोष्टीवर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच फेसबूकवर ते जाहीर केलं .ʼ त्यानंतरचे पाऊल होते ते ʻफिड युअर नेबरʼ (एफवायएन) मोहिमेकरिता एका फिरत्या समुदायाची स्थापना करणे. पण ते कसे शक्य होते. महिता सांगतात की, ʻमी जे काही केले होते ते सोशल मिडियाचा वापर करुन. माझ्या मते माझे लक्ष हे होते की, जर कोणा एका व्यक्तीला चांगला बदल घडवायचा असेल, तर त्याकरिता जास्त त्यागशीलतेची गरज नाही. उलट जर अनेकांनी मिळून त्या बदलाला अंमलात आणले तसेच त्याचा प्रसार केला तर बऱ्याच गरजूंना त्याची मदत होऊ शकते.ʼ त्यांच्या या मोहिमेत इतर लोकांना सामील करुन घेण्यासाठी त्यांना अधिक मेहनत करावी लागली नाही. त्या सांगतात, ʻमाझ्या मते अल्प योगदानामुळे कशाप्रकारे मोठा बदल घडू शकतो, हे पाहण्यासाठी लोक आतुरलेले असतात. त्यामुळे जेव्हा काही लोकांना एफवायएन मोहिमेबद्दल कळले, तेव्हा त्यांनी त्यांच्या परिचितांना, नातेवाईकांना याबद्दल सांगून, त्याची मौखिक प्रसिद्धी अधिक केली. जेव्हा एखादी व्यक्ती पाचजणांचे जेवण बनवते, तेव्हा ती मोठी गोष्ट वाटत नाही. पण जेव्हा अजून एक हजार ९९९ जण त्याचवेळेस तशी कृती करतात, तेव्हा त्या कृतीने मोठा फरक पडतो.ʼ

image


प्रत्येक व्यक्तीला आपल्या शेजाराबद्दल कायम उत्सुकता असते, असे त्या सांगतात. त्यामुळे या मोहिमेचे नाव शेजारसंबंधीने ठेवण्यात आले. या मोहिमेमागील कल्पना अशी होती की, प्रत्येक दात्याचे योगदान हे त्याच्या घराजवळील परिसरात व्हायला हवे, ज्यामुळे या मोहिमेचा प्रभाव दिसून येईल. असे असले तरी, फिरत्या समुदायाचे नियोजन करणे, हे तुलनेने सोपे होते. ʻतार्किकदृष्ट्या आम्हाला परिसराशी निगडित असा उपक्रम राबवायचा होता. त्यापैकी पहिले पाऊल होते ते परिसरातील लोक त्यांच्यातर्फे कशाप्रकारचे आणि किती योगदान देऊ इच्छितात. त्यानंतर परिसराजवळ वितरण केंद्र उभारणे, जेथे लोक त्यांच्या घरात शिजवलेले अन्न आणून जमा करतीलʼ, असे त्या सांगतात. या मोहिमेतील पहिल्या दिवशी चार हजार ४५४ जणांचे अन्न वितरीत करण्यात आले. हा आकडा कायम राहिल्याने लोकांचा त्यांच्यातील चांगुलपणावर आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याच्या कृतीवर विश्वास बसला होता. आमच्या या मोहिमेत आम्ही एका दिवशी १९ हजार ४४० लोकांना अन्न पुरवले होते. अवघ्या ११ दिवसांत एफवायएनने जवळपास १ लाख २२ हजार ९३७ लोकांना तृप्त केले होते.

image


एफवायएनच्या यशाचे श्रेय त्या त्यांच्या स्वयंसेवकांच्या फळीला देतात. त्या सांगतात, ʻशिजवलेले अन्न गोळा करण्यासाठी लोक त्यांच्या घराची दारे उघडतात. मात्र आमचे स्वयंसेवकच त्यांचा वेळ आणि मेहनत खर्च करुन छावण्या, गरीब वस्त्या आणि परिसरांचा शोध घेतात. त्या ठिकाणी आम्ही गरिब लोकांना या जेवणाचे वितरण करतो. काही स्वयंसेवक तर खरोखर या अन्नाची गरज असलेल्या लोकांचा मोठ्या मेहनतीने शोध घेतात. अनेकांनी या मोहिमेत वेळ, पैसा, प्रयत्न, मेहनत यांसारख्या अनेक माध्यमांतून आपले योगदान देऊ केले आहे. शहरातील काही हजारो लोकांनी या मोहिमेत योगदान दिल्याने अल्पावधीतच या मोहिमेने अगडबंब स्वरुप धारण केले.ʼ या मोहिमेत अनेक तार्किक आखणी कराव्या लागल्या ज्यात वितरण, वाहतूक यांचा समावेश असतो. एफवायएन या मोहिमेत अनेकांनी आर्थिक योगदानदेखील देऊ केले आहे. एफवायएन मोहिमेद्वारे एखादा उपक्रम राबवण्यासाठी या पैशाचा वापर केला जातो.

image


एफवायएन ही एखाद्या संस्थेप्रमाणे कार्यरत नाही. अजुनही अनेक संस्था याचप्रकारचे कार्य त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने करतात. ʻद राऊंड टेबल, लेडिज सर्कल, सेना विहार लेडिज ग्रुप, बीएनआय तसेच अनेक रेस्तरॉं गरिबांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेतʼ, असे महिता सांगतात. त्या सांगतात, ʻआमच्या या मार्गात अनेक लहानमोठ्या अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करण्यात एफवायएन यशस्वी झाली. या मोहिमेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे की, भूक म्हणजे काय असते. एफवायएनच्या यशावरुन हे सिद्ध होते की, समाजात कितीतरी लोक आहेत, ज्यांना लोकांना मदत करायची आहे, समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचे आहे.ʼ ʻआमच्या समोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे आम्ही ही मोहिम दीर्घकाळ आणि सातत्याने कशी सुरू ठेऊ शकतो?, या मोहिमेची गती कशाप्रकारे कायम राखता येऊ शकते?, भविष्यकाळात आम्ही या मोहिमेत अजून काय बदल करणार आहोत?ʼ, असे प्रश्न समोर असल्याचे महिता सांगतात. त्यांना अपेक्षा आहे की, ʻही मोहिम कायम अविरतपणे सुरू राहायला हवी. भविष्यकाळात मागणीप्रमाणे पुरवठा व्हायला हवा तसेच दीर्घकाळ या उपक्रमात सातत्य रहायला हवे.ʼ

image


आपल्या स्वयंसेवकांबद्दल भरभरुन बोलताना महिता सांगतात की, ʻआमच्याकडे या उपक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा गट आहे. या उपक्रमात योगदान देण्यासाठी ते हिरिरिने पुढे येतात. जेवण शिजवणे, गरजूंचा शोध घेणे तसेच त्यांच्यापर्यंत ते अन्न पोहोचवणे, यांसारखी कामे ते मोठ्या आवडीने करतात. आमच्या या उपक्रमात असे पालकदेखील आहेत, जे त्यांच्या मुलांनी अशीच समाजसेवेची कामे करावी, यासाठी आग्रही असतात. आमच्या या उपक्रमातील सर्वात लहान स्वयंसेवकाचे वय अडीच वर्षे एवढे आहे.ʼ आमच्याकडे घरकाम करणारी बाई, आचारी, वाहन चालक तसेच अन्नाचे वाटप करण्यासाठी ऑटो रिक्षाचालकदेखील आहेत. मात्र या उपक्रमातील सर्वात सुंदर भाग म्हणजे गरजूंचे समाधान झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया, असे महिता सांगतात. त्यापैकी अनेकजण हे कायम उपेक्षित असतात. त्यांच्याकडे आपण लक्ष दिले, त्यांच्यासोबत काही वेळ घालवला तर त्यांना चांगले वाटते. मी सर्व स्वयंसेवकांच्या वतीने सांगू इच्छिते की, या उपक्रमात आम्हाला जीवनाचे सार समजले. विश्वास, मानवता या मूल्यांचे महत्व समजले. आमच्या अडचणींच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता या उपक्रमाद्वारे आमच्यात निर्माण झाली. एफवायएनमुळे एक गोष्ट तर प्रकर्षाने अधोरेखित झाली ती म्हणजे, इच्छा असेल तेथे मार्ग नक्कीच निघतो, असे महिता सांगतात.

image


लेखक - स्निग्धा सिन्हा

अनुवाद - रंजिता परब