वुडॉन.... लाकडी फ्रेम्सचं ग्लॅमर

वुडॉन.... लाकडी फ्रेम्सचं ग्लॅमर

Monday April 11, 2016,

4 min Read

विशीतले दोन तरुण... आकीफ मिर्झा आणि राशिद शेख... लहानपणापासूनचे मित्र... ते स्वत:ला चड्डीबड्डी मित्र म्हणतात.... नेरुळच्या एसआयईएस महाविद्यालयातून ग्रॅज्युएट झाल्यावर करायचं काय असा सर्वसाधारणपणे सर्वांना पडतो तसा प्रश्व या दोघांनाही पडला होता. आकीफला मॉडेलिंगची आवड आहे. ते क्षेत्र त्याला खुणावत होतं. तर राशिदचं पक्कं असं काही ठरलं नव्हतं. या वयात सर्वांच्या घरात असतो तसा तगादा यांच्यामागेही लागला होता, नोकरी करण्याचा. पण नोकरी करायची नाही यावर हे दोघंही ठाम होते. इतके की घरातल्यांना त्यांनी हे थेट सांगितलं. नोकरी नाही करणार तर मग काय करणार हा घरच्यांचा प्रश्न उभा होताच. आकीफचं मॉडेलिंग बेभरवश्याचं क्षेत्र आणि राशिदचं पक्कं काही नसलं तरी छोटामोठा व्यवसाय करायचं असं त्यानं ठरवलं. ही कल्पना आकीफलाही आवडली. मग व्यवसाय नक्की कुठला करायचा यावर अनेक रात्री जागून गेल्या. कल्पनांचा पूर आला आणि तो ओसरलाही. ई-कॉमर्समध्ये काहीतरी करायचं असं त्यांनी ठरवलं. आणि एक दिवस अचानक युरेका-युरेका असं ओरडत त्यांनी आपला नवा व्यवसाय पक्का केला. सनग्लासेस म्हणजे गॉगल्सच्या लाकडी आकर्षक फ्रेम्सचा हा व्यवसाय. रेबनसारखी एकमेव कंपनी भारतात अश्याप्रकारच्या फ्रेम्स विकते. मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असल्यानं सनग्लासेस आणि गॉगल्सला किती मागणी आहे याची कल्पना आकीफला होती. वुडॉन असं ब्रान्डचं नाव ठरलं. 

image


वुडॉन ब्रान्डला प्रत्यक्षात आणण्यापुर्वी या दोघांनी चांगला रिसर्च केला. २०१८ पर्यंत १४८५६ दशलक्ष डॉलर एवढं सनग्लासेसचं भारतातलं मार्केट असेल. हे मार्केट वर्षांला २७ टक्क्यांनी वाढतंय. २००७ मध्ये सनग्लासेसच्या मार्केटमध्ये १२४७ दशलक्ष डॉलरची उलाढाल झाली. हा आकड़ा फक्त भारतातला आहे. “ मॉडेलिंग क्षेत्रात असल्यानं मला गॉगल्सचा शौक होता. माझ्याकडे चांगलं कलेक्शनही आहे. पण मार्केट म्हणून मी जेव्हा याचा अभ्यास करायला लागलो तेव्हा माझी बोटं तोंडात गेली. खरोखरच शौक बडी चीज है. हे मार्केट एवढं मोठं असेल याची कल्पना आम्हाला नव्हती. आम्ही आमचा अभ्यास सुरु ठेवला.” आकीफ सांगत होता. 

image


सनग्लासेस इंडस्ट्रीजचा अभ्यास करताना आकीफ आणि राशिदला अनेक गोष्टी समजत होत्या. या क्षेत्रात पाऊल ठेवताना आपल्याला आपली अशी स्वत:ची खासियत असली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. त्यामुळं या मार्केटमध्ये कमतरता नक्की कश्यात आहे. याचा शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांना असं लक्षात आलं की लाकडी फ्रेम्सला चांगली मागणी आहे. फक्त भारतातून नव्हे तर जगभरात त्यांची मागणी वाढतेय. पण भारतात रेबनसारखा एखादा ब्रान्डच भारतात लाकडी फ्रेम्स असलेले गॉगल्स पुरवतोय. पण तो खूप महाग आहे. “ आमच्या प्राथमिक रिसर्चमधून एक नक्की झालं होतं की सनग्लासेसचा व्यवसाय करायचा. त्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करायचा पण आणखी रिसर्च केल्यानंतर आपल्या उत्पादनाचं वैशिष्ट्य म्हणून लाकडी फ्रेम जर ठेवली तर या सनग्लासेसच्या व्यवसायात आपली छाप पडेल असं त्यांना वाटलं. म्हणून वुडॉन हा एक्सुसिव्ह वुडन फ्रेम सनग्लासेस ब्रान्ड आम्ही चार महिन्यापूर्वी बाजारात आणला. त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय.” राशिद शेख सांगत होता. 

image


वुडॉनची सुरुवात झाली आता गरज होती त्याला प्रसिध्दी मिळवून देण्याची. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. आपलं प्रोडक्ट इतरांपेक्षा नक्की चांगलं कसं दिसेल यावर भर देण्यात आला. याला पॅकेजिंगचा आधारही घेण्यात आला. चीनमधून खास वुडॉनचे कवर मागवण्यात आले. ते इतके आकर्षक होते की पाहता क्षणी लोक त्याच्या प्रेमात पडतील. जिथे रेबनसारख्या ब्रान्डच्या लाकडी फ्रेमची सुरुवातच सहा तेसात हजारांपासून होते. तिथं १५०० रुपयांपासून ते २७०० रुपयांच्या रेंजमध्ये त्याच दर्जाचे सनग्लासेस देण्याचा धडाका वुडॉननं लावला आहे. ऑर्डरप्रमाणे सनग्लासेस बनवून देण्यात वुडॉनचा हातखंडा आहे. यामुळं कॉर्पोरेट आणि वैयक्तिक ग्राहकांमध्ये अगदी महिन्याभराच्या कालावधीत वुडॉन चांगलाच प्रसिध्द झालाय. गेल्या महिन्याभरात त्यांनी वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये जाऊन ५०० हून अधिक सनग्लासेस विकले आहेत. दिवसेंदिवस ऑडर्स वाढत आहेत.  

image


राशिद आणि आकीफ हे नव्या दमाचे बिजनेसमन आहेत. लाकडी फ्रेम बनवण्याच्या व्यवसायात निसर्गाचं नुकसान होतं याची त्यांना कल्पना आहे. यामुळे या व्यवसायाला सामाजिक बांधिलकीच्या रुपात पुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यातूनच गेट वन गीव वन ही संकल्पना उदयाला आलीय. वुडॉनकडून एक सनग्लास घेतल्यास त्याबदल्यात ग्राहकांच्या नावानं मध्यप्रदेशात एक रोपटं लावलं जातं. ते नक्की कश्याचं आहे. ते कुठे लावलं गेलंय. त्याची निगा कशी राखली जातेय. याची माहिती ग्राहकांना देण्यात येते. यासाठी फक्त ८५ रुपये आकारले जातात. ते ही वुडॉनच्या बिलात. त्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. यामुळे जे निसर्गातून घेतोय ते निसर्गाला परत देण्याची ही भावना या दोन तरुणांनी जपली आहे. 

राशिद आणि आकीफला वुडॉनच्या पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. “सध्या आम्हाला जिथे आम्ही आमचे प्रोडक्ट घेऊन जातोय. तिथं चांगला प्रतिसाद मिळतोय. इ-कॉमर्स बेवसाईट आणि एपच्या माध्यमातून आमच्या प्रोडक्टची माहिती लोकांना मिळतेय. पण आता मोठ्या ब्रान्डच्या दुकानातून आमचे प्रोडक्ट विकण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. म्हणजे जी लोक सनग्लासेस किंवा चष्मा खरेदी करायला जातात. त्याचं आमच्या प्रोडक्टकडे लक्ष जाईल. यातून वुडॉन मोठा ब्रान्ड होण्यास मदत होईल. आता विचार करा रेबनच्या बाजूला वुडॉन ज्या दिवशी येईल त्या दिवशी आमचे हे प्रयत्न सफल होती. आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या वर्ष दोन वर्षात आमचं वुडॉन जागतिक मार्केट ही काबीज करेल.” राशिद आत्मविश्वासनं सांगत होता.  

image