ʻपल्प स्ट्रॅटेजी कम्युनिकेशनʼच्या अंबिका यांचा प्रेरणादायी प्रवास

ʻपल्प स्ट्रॅटेजी कम्युनिकेशनʼच्या अंबिका यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday December 05, 2015,

3 min Read

वडील सैन्यात कार्यरत असल्याने अंबिका शर्मा यांना दर दोन वर्षांनी वेगळ्या ठिकाणी स्तलांतरित व्हायला लागायचे. त्यामुळे दर दोन वर्षांनी एक नवे ठिकाण, नवी माणसे आणि नवा मित्रपरिवार, यात त्यांचे बालपण गेले. लहानपणीच त्यांनी देशभर प्रवास केला, अनेक डोंगरदऱ्यांचा तसेच धबधब्यांचा आनंद लुटला. सातत्याने नवनवे छंद जोपासण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंबिका यांना खेळाची देखील आवड होती. खेळ हे त्यांच्यासाठी अनिवार्य होते. सुट्टीच्या दिवसांत तर साहसी राफ्टींग आणि ट्रेकिंग करणे, हे तर निश्चितच होते. अशा या जीवनशैलीमुळे अंबिका यांचे जीवन कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्यास अनुकूल असे होत होते. एका वर्षी उन्हाळ्यात तर सुतारकाम आणि रंगकाम या विषयात त्यांना काम करावे लागले. उन्हाळी सुट्टीतील या कामाने त्यांना बारावीनंतर कम्युनिकेशन आणि स्ट्रॅटेजिच्या (संपर्क आणि रणनिती) क्षेत्राकडे वळवले. पहिल्याच दिवशी मला कल्पना आली होती की, मला याच क्षेत्रात कारकीर्द घडवायची आहे, असे अंबिका सांगतात. त्यानंतर अंबिका यांनी ʻपल्प स्ट्रॅटेजी कम्युनिकेशनʼची सुरुवात केली.

image


तंत्रज्ञानाने सक्षम अशी अनुभवात्मक, डिजिटल आणि इंटरएक्टीव्ह विपणन असलेली पल्प स्ट्रॅटेजी कम्युनिकेशन ही एक पूर्णकालीन सेवा पुरवणारी कंपनी आहे. ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून अखंड सेवा पुरविणे, या मूलमंत्रातच ʻपल्प स्ट्रॅटेजी कम्युनिकेशनʼचे यश दडलेले आहे. सदर कंपनी एकत्रित उपायांचे व्यापक पर्याय उपलब्ध करुन देते. त्यात रणनिती, कल्पकता, कंझ्युमर इनसाईड, एन्गेजमेंट डिझाईन आणि एखाद्या ब्रॅंडला अपेक्षित असा निकाल देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येतो. अंबिका सांगतात की, ʻदुसऱ्या एखाद्या व्यवसायाप्रमाणे आम्हीदेखील अनेक आव्हानांचा सामना केला. आमची स्पर्धा ही आमच्या क्षेत्रातील प्रत्येक माध्यमांशी तथा संस्थांशी होती.ʼ उद्योजक म्हणून आतापर्यंतचा प्रवास हा रोमांचक असल्याचे अंबिका सांगतात. त्या म्हणतात, ʻया प्रवासातील प्रत्येक मिनिटाला मी काहीतरी नवे शिकत होते. त्यामुळे कल्पक स्वातंत्र्य (क्रिएटीव्ह फ्रिडम), रणनितीसंदर्भातील योजना (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) आणि तंत्रज्ञान यांचा एक अनोखा संगम तयार झाला.ʼ तीन वर्ष पूर्ण केलेल्या या कंपनीने आतापर्यंत ५०हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत. त्यात प्रतिष्ठित अशा MAA Globe पुरस्काराचादेखील समावेश आहे. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत १६८ टक्के अधिक महसूल गोळा केला. ʻमी सध्या ज्या परिस्थितीत आहे, तसेच राहणे मला आवडते. प्रत्येक दिवस हा नवा असतो आणि आपण बऱ्याच काही नव्या गोष्टी सुरू करू शकतो, अशी आशा त्यात असते. प्रत्येक वेळेस एखादे अभियान किंवा कामाचा एक भाग ग्राहकाच्या एवढ्या पसंतीस उतरतो की, त्यानंतर आपल्याला त्या कामाचे आंतरीक समाधान मिळते. चांगले काम हे सर्वात मोठी प्रेरणा आहे.ʼ, असे अंबिका सांगतात.

image


अंबिका यांच्या मते, उद्योजकता ही एक मानसिक अवस्था आहे. त्याचा स्त्री-पुरुष असण्याशी काहीएक संबंध नाही. मात्र महिला उद्योजकांचे प्रमाण फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अल्प असल्याचे त्या सांगतात. ʻउद्योजक होणे म्हणजे काटेरी मुकुट परिधान केल्यासारखे आहे. शुन्यातून व्यवसाय उभा करण्यासाठी एखाद्या नव्या उद्योजकाला वेळ आणि त्यासोबतच अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आत्मविश्वास आणि मनोबल हे नव्या उद्योजकाच्या उदयात महत्वाची भूमिका बजावतात. अनेक अभ्यासातूनदेखील हे पुढे आले आहे की, महिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाची वाढ ही हळूहळू, स्थिर आणि समाजाचा अधिक फायदा करणारी असते.ʼ, असे अंबिका सांगतात.

अंबिका यांना दुचाकी चालवण्याची आवड आहे. आतापर्यंत त्यांनी Suzuki GSX–R1000 आणि Harley Davidson Road King या दोन गाड्या चालवल्या असून, दर आठवड्याच्या अंती त्या किमान १०० किमीपेक्षा अधिक प्रवास दुचाकीवरुन करतात. ʻदर दोन महिन्यातून एकदा मी ८०० ते १००० किमीचा प्रवास दुचाकीवरुन करते. यंदाच्या जानेवारी महिन्यात मी माझ्या Harley गाडीवरुन दिल्लीपासून ते कन्याकुमारीपर्य़ंतचा अंदाजे २८०० किमी प्रवास पार पाडला. दुचाकी चालवण्यात मला विशेष आनंद मिळतो, मला मोकळे वाटते. माझ्या व्यावसायिक वाढीसंदर्भातील सर्वोत्तम कल्पना मला दुचाकी चालवतानाच सुचल्या आहेतʼ, असे अंबिका सांगतात.

लेखक - जय वर्धन

अनुवाद - रंजिता परब