मानवी क्रांतीचा आरंभ करण्याची गरज – विशाल सिक्का, सीईओ, इन्फोसिस

मानवी क्रांतीचा आरंभ करण्याची गरज – विशाल सिक्का, सीईओ, इन्फोसिस

Thursday January 07, 2016,

4 min Read

“डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन आमच्या प्रत्येक ग्राहकाच्या व्यवसायाला नवा आकार देत आहे. या संधीचा फायदा उठविण्यासाठी आणि निरंतर शिक्षण व उद्देशपूर्ण काम या आमच्या संस्कृतीसह विकास साध्य करण्यासाठी हीच तत्वे आमच्या व्यवसायाला लागू करणे हेच आमचे धोरण आहे.”

वार्षिक उलाढालीमध्ये 4.5 टक्क्यांची वाढ आणि एकूण नफ्यात 7.3 टक्के वाढ दर्शविणाऱ्या इन्फोसिसच्या तिमाही निकालाची घोषणा करणाऱ्या डॉ विशाल सिक्का यांना त्यांचा आणि त्यांच्या कंपनीचा प्रवास योग्य दिशेने सुरु असल्याची खात्री आहे.

२०१४ मध्ये जेव्हा इन्फोसिसचे कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली, तेव्हा त्यांनी आयबीएमला नवी ओळख मिळवून देणाऱ्या लू गर्स्टनरप्रमाणे काम करावे अशी कंपनीला अपेक्षा होती. विशेष करुन नारायण मूर्ती आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये स्टीव्ह जॉब्सप्रमाणे कमाल करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे त्यानंतर आलेल्या सिक्का यांना कंपनीच्या अपेक्षांवर खरे उतरणे कठीण होते. १०० दिवसांमध्ये त्यांनी आयटी क्षेत्रातील वेगवेगळ्या पैलूंवर नजर टाकली. कंपनीतील सर्वजण नाविन्यपूर्ण मानवी क्रांतीचा भाग व्हावे असे त्यांना वाटते, जी निश्चितपणे काळाची गरज आहे.

image


सीईबीआयटी- इण्डियाच्या मेडन एडिशनशी बोलताना इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी सॉफ्टवेअर आणि सर्विस इण्डस्ट्रीच्या भविष्याविषयीचे आपले विचार मांडले.

आपल्या भोवतालचे जग सॉफ्टवेअर आणि आयटीने व्यापले आहे. ‘बीईंग डिजीटल’ या पुस्तकात लेखक निकोलस नेग्रोपॉण्टे यांनी जगाचा मूलभूत कण कशाप्रकारे अणूवरुन बिट्समध्ये परावर्तीत झाला त्याबद्दल भाष्य केले आहे. हे परिवर्तंन सर्व क्षेत्रात झाले आहे. हा बदल अपरिवर्तनीय असून तो प्रचंड वेगाने विकसित होत असल्याबाबतही या पुस्तकात लेखकाने चर्चा केली आहे. याबाबत सिक्का यांना विचारले असता ते म्हणाले, “सध्या संवादाचा संपूर्ण भार माणसांच्या खांद्यावर आहे. हे बदलेल. कमीत कमी संदेशवहन आणि जास्तीत जास्त प्रत्यक्ष संवाद अशा स्वरुपाच्या मल्टी मॉडेल इन्टरफेसच्या माध्यमातून बोलणे, दाखविणे आणि पहाणे या तिन्ही क्रिया एकत्र व्हायला पाहिजेत. ज्याप्रमाणे बीट माहितीचा आण्विक घटक आहे त्याप्रमाणे पिक्सेल (पिक्चर आणि एलिमेण्ट) ही ग्राफीक्सची आण्विक पातळी आहे (जे एकापेक्षा जास्त बीटद्वारे प्रस्तुत केले जाते). बीटला रंग, आकार किंवा वजन नसते आणि त्याचा वेग प्रकाशाच्या वेगाएवढा असतो.”

सॉफ्टवेअर आणि आयटीचे प्रभुत्व असलेले नवे जग अखेरीस लोकांना सक्षम बनविते आणि त्यांची निर्णयक्षमता वाढविण्यासाठी आणि हुशारीने वागण्यासाठी जबाबदार ठरते.

image


एसएपीचे माजी सीटीओ सिक्का यांनी आयटी जगताला दोन भागामध्ये विभागले आहे. पहिला भाग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगाला गती आणि नवे स्वरुप प्राप्त करुन देण्यासाठी उत्तम संधी प्राप्त करुन देणारा आहे. तर दुसरा भाग म्हणजे मुख्यतः कमी पगारात मिळणाऱ्या, सामान्य ठिकाणच्या कामगारांना नोकरी दिल्यामुळे आणि त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण न दिल्यामुळे इण्डस्ट्रीच्या अधोगतीकडे होणाऱ्या वाटचालीचे निराशाजनक सत्य आहे.

क्लाइंटबरोबर काम केल्याने काम अधिक चांगल्या रितीने होऊ शकते; कामगारांचे पणन आणि कर्मचारी वृद्धी चांगली नाही असे सिक्का यांना वाटते. ते सांगतात, “नाविन्यपूर्णता, रचनात्मक विचार आणि नवीन चपळ पद्धतींचा अवलंब करुन आपण चांगले स्ट्रॅटेजिक पार्टनर होऊ शकतो आणि समस्यांचे निराकरण करुन दाखवू शकतो. खूप काही प्राप्त करण्यासाठी आपण कमीतकमी साधनसामुग्रीमध्ये जास्तीत जास्त काम करायला पाहिजे. स्वस्तातील उपाय देणारा नाही तर एक उदाहरण स्थापित करुन पुढे जाणारा भारत भविष्यात जगाला अपेक्षित आहे.”

इन्फोसिसमध्ये नवे काय?

  1. भागीदारी – आयटी क्षेत्रात काही मूलभूत बदल घडत आहेत. पायाभूत सुविधेतील लवचिकतेच्या नवीन मर्यादा आणि नवीन क्षमतांसह आपण नवीन प्रकारच्या प्रणाली तयार करु शकतो. या विचार प्रक्रियेसह काम सुरु करण्यासाठी बाजारातील अग्रगण्य अशा हिताची, ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि हुआवे या कंपन्यांबरोबर इन्फोसिसने भागीदारी केली आहे.
  2. इन्फोसिस इन्फोर्मेशन प्लॅटफॉर्म – आपण अशा जगात रहातो जिथे सॉफ्टवेअर हा जास्तीत जास्त लोकांच्या जीवनातला अविभाज्य भाग बनला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. इन्फोसिसने अनेक कनेक्टर्स, अल्गोरिदम्स आणि विज्युअलायझेशन पर्यायांच्या माध्यमातून कंपन्यांची गरज भागविणारा एक ओपन सोअर्स प्लॅटफॉर्म उभारला आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर ४० क्लायंट्स आणि डझनाने प्रोजेक्टस आहेत.
  3. ऍप्स – सिक्कांच्या मते, बेस्ट प्लेस सोल्युशन मॉडेल लवकरच ऑनशोअर-ऑफशोअर आयटी मॉडेलची जागा घेईल. आजपर्यंत अस्तित्वात नसलेले असे प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक इण्डस्ट्रीसाठी आवश्यक असलेल्या ऍप्सचे संपूर्ण कलेक्शन लवकरच जगासमोर येईल.
image


इन्फोसिस स्वतःला आणि आयटी व संपूर्ण सर्विस सेक्टरला बळकटी प्राप्त करुन देण्यासाठी नवीन वातावरणीय, सूचक आणि कृतीशील क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने पुढे जात आहे हे स्पष्ट आहे.

बहुसंख्य लोक आधी पहातात आणि मग विश्वास ठेवतात. उद्योजक मात्र आधी विश्वास ठेवतात मग पहातात. सिक्का यांना वाटते की खूप काळापासून आपण एकाच मानसिकतेने काम करत आहोत. ते म्हणतात, आपण केवळ नम्रपणे हुकुमाचे पालन करतो, जेव्हा की आपण चांगले काय करता येईल याबाबत बिनधास्तपणे सूचना करायला पाहिजे आणि तसे करण्यासाठी संधीच्या शोधात राहिले पाहिजे.

ते चार वर्षांचे होते तेव्हा भारतात नुकतीच हरित क्रांती होत होती. त्या आठवणी ताज्या करत सिक्का सांगतात की एम एस स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हरित क्रांतीने आपल्या देशाला केवळ स्वावलंबी बनविले नाही तर उत्पादन क्षमता वाढवून आपल्याला जास्तीत जास्त अन्नपदार्थांची जगभर निर्यात करणाऱ्या निर्यातदारांपैकी मुख्य निर्यातदार बनण्याची क्षमता प्राप्त करुन दिली. आता अशाच प्रकारच्या क्रांतीची गरज आहे, मात्र यावेळी नाविन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे, असं सांगत सिक्का म्हणतात, “आपण एका मानवी क्रांतीचा आरंभ करणे आवश्यक आहे. एक अशी क्रांती जिथे आपल्या वास्तवाची जागा कुठल्याही ड्रोनने (किंवा इतर कुठल्या गॅजेटने) घेतलेली नसावी तर अधिक चांगले काम करण्यासाठी त्याला तंत्रज्ञानाची जोड लाभलेली असावी.”


लेखक : अलोक सोनी

अनुवाद : अनुज्ञा निकम

Share on
close