नृत्यदिग्दर्शनामध्ये माझ्यातला परफॉर्मर आणि डान्स टिचर नेहमीच वरचढ ठरतो - फुलवा खामकर

0

“नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम सुरु केलं तेव्हापासून मनात स्वतःची डान्स अॅकॅडमी सुरु करावी असं वाटत होतं. पण हा विचार प्रत्यक्षात कसे उतरवायचा हा प्रश्नच होता. म्हणतात ना जेव्हा मार्ग मिळत नसतो तेव्हा योग्य वेळेची वाट बघावी, माझ्याबाबतीत असंच झालं. २००० साली माझा अपघात झाला ज्यामुळे तब्बल चार पाच महिने मला घरातच विश्रांती घ्यावी लागणार होती, अपघातामुळे घरात पडून पडून मलाही कंटाळा आला होता.

मग विचार आला की वेळ मिळालाय तर आपल्या या डान्स अॅकॅडमीच्या विचाराला प्रत्यक्ष रुप देऊयात मी माझ्या डान्स अॅकॅडमीचा अभ्यासक्रम ठरवायला सुरुवात केली आणि बघता बघात फुलवाज् स्कुल ऑफ डान्स अँड जिम्नॅस्टीक प्रत्यक्षात साकारायला लागले.” मराठीतली आघाडीची नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरच्या या डान्स स्कूलला यावर्षी १५ वर्ष पूर्ण होतायत यानिमित्त फुलवाने या डान्स स्कूलचा प्रवास आमच्यासोबत शेअर केला.

कत्थक विशारद आणि जिमनॅस्टीकचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेली फुलवा तिच्या वैविध्यपूर्ण नृत्य कौशल्यामुळे आज ओळखली जाते. नेहमीच काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न ती नृत्यदिग्दर्शिका म्हणून करत असते. तिचं हे डान्स स्कूलही अशाच नाविन्याचा शोध घेणारे आहे. फुलवा सांगते “माझ्या या डान्स स्कूलमध्ये कॉन्टेम्पररी, हिप हॉप, सेमी क्लासिकल आणि लोकनृत्याचे धडे गिरवले जातात. पण या सगळ्याचा मूळ पाया हा जिम्नॅस्टीक ठेवण्यात आलाय. मी स्वतः नियमितपणे जिम्नॅस्टीकचा सराव करत आलेय कारण डान्स करताना शरीराचा फिटनेस सगळ्यात महत्वाचा. तुम्ही शरीराने जाड असा किंवा बारीक याचा फरक पडत नाही तुम्ही फिट असणं महत्वाचे, तुमच्या शरीरात लवचिकता हवी जी जिमनॅस्टीक, स्ट्रेचिंग, जंम्पिंगमुळे येते.

मी माझ्या या डान्स स्कूलमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला याच पद्धतीने प्रशिक्षित करते. माझा विद्यार्थी हा प्रशिक्षित कत्थक डान्सर नसेल पण मुजरा करताना त्याच्यात आवश्यक असणारी नजाकत तुम्हाला नक्की पहायला मिळेल. शेवटी तुम्ही कुठलीही कला शिका ती वरवर शिकत असाल तर त्याचा तुम्हाला दूरवर फायदा मिळणार नाही. त्यामुळे कला तंत्रशुद्धपद्धतीने शिकणं महत्वाचं असतं. मी हाच फंडा अवलंबत आलीये.”

महिन्याला दोन ते तीन सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शन करायचं, मनोरंजन क्षेत्रातले प्रोजेक्टस आणि सोबत डान्स स्कूलची जबाबदारी या सगळ्या गोष्टी फुलवा एकहाती मॅनेज करतेय. अर्थात यात तिला तिच्या कुटुंबाची आणि खास करुन नवऱ्याची भरघोस साथ आहे. फुलवाची मुलगी आत्माही आता तिच्या या मोठ्या कुटुंबाचा एक भाग बनतेय.

“ अनेकदा माझ्या या डान्सस्कूलमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक सुरुवातीला माझ्याकडे सेलिब्रिटी कोरिओग्राफर म्हणून बघत असतात पण या डान्स स्कूलमधला माझा वावर आणि सहभाग पाहिल्यावर ते माझ्यातला शिक्षक आणि कलेबद्दलची तळमळ समजतात. मी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना आवर्जुन सांगते की माझ्यामुळे तुमचा पाल्य एखाद्या डान्स रिअॅलिटी शोचा किंवा सिनेमाच्या डान्स टीमचा भाग बनेलच असा जर तुमचा विचार असेल तर तो पहिल्यांदा काढून टाका. पण मी तुमच्या पाल्याला अशा स्पर्धांसाठी तयार करण्याची हमी देते.”

फुलवा स्वतः बुगी वूगी, डान्स इंडिया डान्स सारख्या डान्स टॅलेन्ट शोचा भाग राहिलीये. पण हे टप्पे तिने स्वतःच्या हिमतीवर गाठले, आपल्या विद्यार्थ्यांनीही याच मार्गाने जावे असे तिला वाटते.

अनेकदा सिनेमांच्या कामामुळे फुलवाला डान्स स्कूलमध्ये प्रत्यक्ष हजर रहाता येत नाही अशावेळेला ती फोनवरुन तिचे विद्यार्थी आणि डान्स टिचर्सच्या संपर्कात असते, त्यांनी स्वतःचा एक व्हॉटसअप ग्रुप बनवलाय, यातनं तिला विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंगबद्दल माहिती मिळत रहाते. इतकंच नाहीतर शाळेत ज्याप्रमाणे पालकांच्या मिटिंग्ज घेतल्या जातात तशाच मिटिंग्ज फुलवा तिच्या या डान्स स्कूलमधल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत घेते. महिन्याला दीड ते पाऊणे दोन मिनिटांचं गाणं आणि एक वेगळी डान्स स्टाईल हे सर्वसाधारण वेळापत्रक या डान्स स्कूलमध्ये अवलंबलं जातं.

या क्षेत्रातली वाढती स्पर्धा आणि आव्हानं पहाता फुलवाने नुकताच एक नवा प्रयोग डान्स स्कुलमध्ये सुरु केलाय. ज्यानूसार तिने या स्कूलमधल्या निवडक विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवलाय, या ग्रुपला फुलवा स्वतः अॅडव्हान्स ट्रेनिंग देतेय. शेवटी वाढ ही प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे, हे ओळखूनच फुलवा तिच्या या डान्सस्कूलमध्ये नवनवीन प्रयोग करतेय.

फुलवा सांगते, “एक परफॉर्मर म्हणून माझ्याकडून प्रेक्षकांच्या असलेल्या अपेक्षा मला समजतात, याबरोबरच या क्षेत्रात वेगाने घडणारे बदलही मी जाणते पण याहीपेक्षा कामातनं मिळणारा आनंद मला सर्वात महत्वाचा वाटतो. आज मी माझ्या या जबाबदाऱ्या निभावताना प्रत्येक काम एन्जॉय करते म्हणूनच इतकी वर्ष सातत्याने मी या गोष्टी करु शकतेय, शेवटी कुठलीही कला ही ती सादर करणाऱ्या कलाकाराच्या आनंदाचे प्रतिक असते हे विसरुन कसे चालेल”.

Related Stories

Stories by Bhagyashree Vanjari