आव्हांनाचा पाठलाग करून यश मिळवणा-या जिद्दी पोलीस अधिकारी डॉ रश्मी करंदीकर!

0

‘मुलगी शिकली प्रगती झाली,’ असे घोषवाक्य आपण अनेकदा वाहनांवर लिहिलेले वाचतो, पण ते जितक्या सहजतेने लिहिले जाते किंवा वाचले जाते तितक्या सहजतेने प्रत्येक मुलीच्या जीवनात शिकणे काही येत नसते. खरेतर आजच्या एकविसाव्या शतकातील मुली म्हणजे कोणत्याही बाबतीत पुरूषांपेक्षा काकणभर सरस ठरल्या असताना जागतिक महिला दिना निमित्ताने चिंतन करताना आपण कधीतरी हा विचार सुध्दा केला पाहिजे की, प्रत्येक मुलीने शिकावे यासाठी लोकजागृती आज सुध्दा करावी लागत आहे. समाजाच्या मनात मुलगी म्हणजे समस्या, जोखीम, अडचण, परक्याचे धन, अशा रूढीवादी विचारांचा पगडा आजही कायम आहे. मुलीला सुरक्षित आयुष्य मिळावे यासाठी देखील किंवा मुलीच्या जातीने कसे वागावे यावर देखील आजही समाजात ब-याच हळव्या, जुन्या विचारांचा पगडा दिसून येतो. हे सारे विवेचन करण्याचे कारण हेच की, मुलगी म्हणजे काही वेगळे असते या समजाला ज्यांनी खोटे ठरविले, आव्हानांचा पाठलाग करून त्यांना हरविले आणि त्यांच्यावर स्वार होवून इतरांना प्रेरणा दिली अशा एका महिला पोलीस अधिका-याची ही कहाणी आहे.

मंत्रालयातील सुखाची नोकरी सोडून, दम्याचा त्रास असताना, रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग समजल्या जाण-या पोलिस दलात त्या यशस्वीपणे काम करत आहेत. शिवाय कुटुंब आणि करिअर अशी दोन्ही आव्हाने पेलत आहेत, त्या आहेत रश्मी करंदीकर ठाणे आयुक्तालयात पोलीस उपायुक्त या पदावर सध्या त्या कार्यरत आहेत.

युवर स्टोरीच्या वाचकांसाठी जागतिक महिला दिना निमित्त आम्ही रश्मी करंदीकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या खाकी वर्दीच्या गणवेशातील स्त्री अधिकारी होण्याच्या तसेच रोज नविन आव्हाने लिलया पेलण्याच्या कौशल्याबाबत जाणून घेतले.


एका मध्यमवर्गीय कुटूंबात जन्म झालेल्या रश्मी यांना त्यांच्या घरात आजी, वडील आणि आई यांच्याकडून शिक्षणाचा वारसा मिळाला होता, घरात शिक्षणाचे वातावरण असताना केवळ वयाच्या आठव्या –दहाव्या वर्षीपासून रश्मी यांनी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न मनात बाळगले, त्या वयात ज्यावेळी कलेक्टर म्हणजे काय असते ते सुध्दा निटसे समजत नव्हते. मात्र त्याच्या आजीची देखील यात त्याना प्रेरणा होती, त्यांनी मोठी अधिकारी व्हावे यासाठी आजीचा नेहमी सांगावा आणि पाठिंबा होता. त्याबाबत सांगताना रश्मी म्हणाल्या की, “ माझी प्रेरणा माझी आजी होती, आजीमुळे मी इथे आले. खरंतर मला प्रशासकीय सेवेतच जायचं होतं, पण मी पोलीस प्रशासनात आले. मी जेव्हा सहावीत होते तेव्हाच मी आजीला सांगितलं होतं मला कलेक्टर व्हायचं म्हणून. तेव्हा मला कलेक्टर शब्दाचा अर्थही कळत नव्हता. माझी आजी, १९२७ च्या काळात शिक्षिकेची नोकरी करत होती, ज्यावेळेला स्त्रियांना शिक्षणाला बंदी होती. त्यावेळी ती शिकली, शिकून तिने नोकरी केली. पाच मुलांचे तिने त्यावेळी संगोपन केले. हे सारं माझ्यासाठी प्रेरणादायी होतं. माझी आई सुद्धा शिक्षिका होती. माझे आजोबा पण मुख्याध्यापक होते. आजी सुद्धा मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाली. आईचे सुध्दा अचानक निधन झाले तेव्हा उपमुख्याध्यापक पदावर होती. घरात सर्व शिक्षणाचच वातावरण होतं. त्यामुळे अभ्यास करण मला अवघड गेलं नाही.”

या सगळ्यांमुळे त्यांच्या लक्षात आलं की, स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे किती आवश्यक आहे. मुंबईत माझगावला राहणाऱ्या रश्मी यांनी दादरच्या ‘आय.ई.एस’ शाळेतून मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले. माटुंग्याच्या ‘रुईया’ महाविद्यालयात विज्ञान शाखेचा अभ्यास केला. बी.एस्सी. स्टॅटिस्टिक या विषयात त्यांनी पदवी मिळवली. याच पदवीच्या जोरावर त्यांना मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून चांगल्या पगाराची आरामदायी सरकारी नोकरी मिळवली.


मात्र आजीने दिलेल्या प्रेरणा मनात कुठेतरी साद घालत होत्या त्यामुळे मोठे अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेवून त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. नोकरी करून स्पर्धा परीक्षा देणे खूप कठीण होते. त्यातच त्यांच्या आईची प्रकृती खूप गंभीर होती त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यामुळे अभ्यासाला खूप कमी वेळ मिळायचा. असें असताना या परीक्षेत महिलांमध्ये त्यानी पहिला क्रमांक पटकावला.

हीच ती वेळ होती ज्यावेळी मंत्रालयातली सुरक्षित नोकरी सोडायची होती. त्या सांगतात की, “सर्व सुविधा होत्या, वेळाही मर्यादित स्वरूपाच्या होत्या. महिलांच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित अशी ती नोकरी होती. मी नीला सत्यनारायण यांच्याबरोबर काम करत होते. त्यामुळे ही नोकरी सोडून पोलिस प्रशासनात अधिकारी पदावर काम करावे यासाठी त्यांच्या आईला योग्य वाटले नाही,”.

मात्र त्यांनी विरोध केला नाही कारण परीक्षेत रश्मी यांनी अव्वलस्थान पटकावले होते. रश्मी यांच्या आईला त्यांच्या या निर्णयाबाबत असहमतीचे कारणही स्वाभाविकच होतं, कारण त्यांना दम्याचा त्रास होता. शारीरिक पातळीवर त्यांना खूप संघर्ष करावा लागणार होता. पोलिस दलात शाररिक सुदृढ असणे आवश्यक असते मात्र दम्याच्या त्रासामुळे त्यांना हे शक्य होणार नाही म्हणून आपलं मुल सुरक्षित जागी असावे असे प्रत्येक आईला वाटते तसेच त्यांच्या आईला वाटत होते.


पण ज्यावेळी एक स्त्री प्रगती करते त्यावेळी तिला साथ घरातल्या पुरूषांची असावी लागते, मंत्रालयातली नोकरी सोडून पोलीस खात्यात येण्याच्या निर्णयात त्यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांनी देखील आग्रही सहभाग घेतला होता त्यामुळे त्याच्या पाठिंब्यावर त्या पोलिस दलात रूजू झाल्या. २००४ ते २००७ या प्रशिक्षणाच्या कठीण काळातही पतीकडून संपूर्ण आधार असल्यामुळे अडचणींना सामोरे जाताना कधी एकटे वाटले नाही. पोलीस खात्यातली पहिली नियुक्ती भिवंडीत झाली आणि कार्यरत होताच पहिल्या महिन्यातच भिवंडीत दंगल झाली. दोन कॉन्स्टेबल मारले गेले. पोलिसांवर रोष काढला जात होता. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत भीतिदायक क्षण होता. कारण त्या कामावर असताना पती घरी एकटेच व घराखालच्या चौक्या जाळल्या जात होत्या. त्या बद्दल सांगताना रश्मी म्हणाल्या की, “मी घरी फोन करून माझ्या नावाच्या पाटीवर पांढरा कागद लावायला सांगितला.”

आपण समाजात संरक्षण करत फिरताना आपल्या परिवाराचे संरक्षण होत असेल ना या चिंतेचा अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला.

पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात रुजू झाल्यावर काय अनुभव घेतले, यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “इथे एकदा या अधिकारी पदावर काम करण्यास सुरुवात केल्यावर तुम्ही पुरुष असा किवा स्त्री तुम्हाला तुमची भूमिका चोख बजवावी लागते. स्त्री पुरुष हा भेद नसतो. सुदैवाने मला माझ्या वरिष्ठांकडून कोणताच त्रास झाला नाही किवा मी एक स्त्री आहे हा दृष्टीकोन ठेवून कोणी माझ्याशी वागलं नाही. यासाठी मी माझ्या विभागाची आभारी आहे.”

त्या म्हणाल्या की, ‘या क्षेत्रात काम करताना वेळेची मर्यादा पाळता येत नाही कधी कधी सलग २४ तास तर कधी ४८ तास देखील काम करावे लागते. कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते. काही अडचण आल्यास सलग काम करावं लागतं.’

एकीकडे आव्हानात्मक करिअर आणि दुसरीकडे कुटुंब हा ताळमेळ कसा साधला याबद्दल सांगताना त्या म्हणतात की, “कुटुंब आणि नोकरी दोघांचं व्यवस्थापन करणं म्हणजे तारेवरची कसरत, हे करत असताना खूप त्रास होतो. घराकडे खूप दुर्लक्ष होतं. घरच्यांना वेळ देता येत नाही. २००७ मध्ये माझे पती हॉस्पिटलमध्ये अॅडमीट असताना मला सुट्टी मिळाली नव्हती. त्यावेळी मला दिवसा ड्यूटी करून रात्री हॉस्पिटलची ड्यूटी करावी लागली. कारण अशा वेळी तरी घरच्यांची अपेक्षा असते कि मी त्यांच्याबरोबर असावे. लग्नानंतर प्रथापरंपरेप्रमाणे नवदाम्पत्याने शिमग्याची पूजा करायची असते. पण आम्हाला ते जमलं नाही, आता लग्नाच्या बारा वर्षानंतर आम्ही ती पूजा करायला गावी जाणार आहोत.” त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या की, “पहिल्यांदाच मी गावी जाणार आहे. माझ्या सासूबाई खूप साध्या आणि छान आहे. मी खूप नशीबवान आहे. त्यांनी मला कायमच पाठींबा दिला आहे. माझ्या सासऱ्यांना माझा फार अभिमान आहे. अर्थात माझ्या नवऱ्याचा मला पूर्ण पाठींबा आहे.”

रश्मी म्हणतात की, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना घराचं घरपण जपणं खूप गरजेचं असतं, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. सिरीयल मध्ये दाखवतात त्याप्रमाणे सासू-सूनेच नातं नसतं कि सासू सुनेचा छळ करते आहे. एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे काहीजणींना वाटत असतं आपण काहीतरी वेगळे आहोत. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला वाटतं कि आपल्या नवऱ्यावर आपला १०० टक्के अधिकार असावा. पण तशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण ज्या आईने त्याला जन्म देऊन मोठं केलं असतं तिचाही तिच्या मुलावर तेवढाच अधिकार असतो. प्रत्येक मुलीने क्षणभर त्याच्या आईच्या भूमिकेत जाऊन विचार करावा. आणि त्यांना समजून घ्यावं. घरातली मोठी माणसं आधारवड असतात, त्यांना जपलं पाहिजे. त्यांच्यावर कामांचं ओझं लादता कामा नये. जसं सुनेने समजून घेतलं तर सासूनेसुद्धा समजून घेतलं पाहिजे. तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे. घराचं घरपण टिकवून ठेवण्यासाठी सामंजस्याची भूमिका महत्वाची आहे. शुल्लक गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही.

पुरुषी वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात काम करत असताना इथे एक गोष्ट मला जाणवली पुरुष हे एखादी गोष्ट फार काळ मनात धरून ठेवत नाही. नाहीतर बायका तीच ती गोष्ट उगाळत बसतात. हे मला जाणवते असे त्या म्हणाल्या. आमच्या क्षेत्रात रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते, त्यामुळे या सर्व गोष्टी शुक्कल वाटतात.

या क्षेत्रातील समाधानाची बाब

सातत्याने नवनवीन आव्हानं स्वीकारत राहिल्याने आणि काम करत राहिल्याने तुमच्या बुद्धीला किवा मेंदूला गंज चढत नाही. जेव्हा केव्हा महिला आपल्या अडचणी घेऊन माझ्याकडे येतात आणि मोठ्या विश्वासाने मला सर्व काही सांगतात तेव्हा त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यात खूप आनंद मिळतो. त्यातच खरे समाधान वाटते.

या सा-या आव्हानातून त्या आपल्या छंदासाठी वेळही देतात. रश्मी यांना पुस्तकं वाचायला, सिनेमे पाहायला खूप आवडतात. ‘जागतिकीकरणाचा शहरी स्त्रियांवर होणारा परिणाम’ या विषयावर त्यांनी पीएच.डी. सुद्धा केले आहे. त्यांना स्वयपाक करायला सुद्धा आवडते. छंद जोपासायला फारसा वेळ मिळत नसल्याचेही त्या सांगतात. सुखाची नोकरी असताना ती सोडून आव्हानांच्या दुनियेत रमलेल्या आणि रोज यशस्वीपणे काम करणा-या या जिद्दी महिला पोलिस अधिका-याला युवर स्टोरी मराठीचा सॅल्यूट!