ʻआय वेयर माय स्टाईलʼ मणि अग्रवालची फॅशनमध्ये गरुडभरारी

0

आर्थिक क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी असलेल्या डेलोएट एंड टचमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करणारी मणि अग्रवाल नावाची तरुणी. त्या एवढ्या चांगल्या पद्धतीने काम सांभाळत होत्या की कंपनीने त्यांना आपल्यासोबत काम करतानाच अमेरिकेत अकाऊंटन्ट क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली. मात्र एकदा स्वतःचे काम सुरु करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यानंतर त्यांना नोकरी, पगार, पदोन्नती यांसारख्या गोष्टी कस्पटाप्रमाणे वाटू लागल्या. मणि यांच्यासमोर याबाबतीतील एक जिवंत उदाहरण म्हणजे त्यांच्या वडिलांचा उद्योग. शुन्यापासून सुरुवात करुन त्यांच्या वडिलांनी एक यशस्वी डेकोरेशन एक्सपोर्टचा उद्योग उभारला, ज्यात २५० कामगार काम करतात. आपल्या डोळ्यासमोर असलेले वडिलांचे हे यशस्वी उदाहरण मणि यांना कायम प्रेरणा देत आहे. एकेदिवशी स्वतःच मालक होण्याचे स्वप्न तिने पाहिले.

मणि यांनी आपले शिक्षण वाणिज्य शाखेतून पूर्ण केले होते. मात्र त्यांना कायम फॅशनचे आकर्षण होते. विशेष म्हणजे फॅशनबद्दल आपल्याला असलेल्या आवडीची तिला पूर्ण कल्पना होती. मणिंना हे माहित होते की, त्यांना डिझायनर व्हायचे नाही. तर त्यांना फॅशनच्या व्यवसायामध्ये रस आहे. अशाप्रकारे मार्च २०१२ मध्ये ʻआय वेयर माय स्टाईलʼचा जन्म झाला. पाश्चात्य पोशाखाबद्दलचा हा एक असा ब्रॅंड आहे, जो अतिशय वाजवी किंमतीमध्ये लोकांना डिझायनर कपडे उपलब्ध करुन देतो. या व्यवसायाच्या सुरुवातीला नोकरदार स्त्रिया आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले. नागरिकांना फॅशनच्या जवळ आणणे, हे या ब्रॅंडचे उद्दिष्ट्य होते. आम्ही येथे तुम्हाला मणि यांच्या आय़ुष्यातील असेच पैलू उलगडून दाखवणार आहोत, जे आम्हाला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजले.

युअर स्टोरी : तुमच्या बालपणाबद्दल आणि शिक्षणबद्दल सांगा

मणि अग्रवाल : मी एक पदवीधर पब्लिक अकाऊंटन्ट आहे आणि मी अमेरिकेतून पदवी मिळवलेली आहे. दिल्ली विद्यापीठातील जीसस एंड मेरी महाविद्यालयातून मी वाणिज्य शाखेतील पदवी घेतली आहे. माझे शालेय शिक्षण दिल्ली येथील बाराखंबास्थित मॉडर्न शाळेतून पूर्ण झाले आहे. माझ्या शिक्षणाचा मला माझ्या कामात थेट कोणताच फायदा झालेला नाही. कारण मी अमेरिकेतील जीएएपी (जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिंसिपल्स) येथे शिक्षण घेतले आहे. जे भारतात कोठेही लागू होत नाही. मात्र मला माझा व्यवसाय सुरू केल्यानंतर जवळपास तीन-साडेतीन वर्षातील अनुभवाचा एवढा फायदा झाला आहे, जेवढा पुस्तकी ज्ञानातून नक्कीच झाला नसता. संघटितरित्या काम करणे, प्रोफेशनलिझम आणि वेळेचे महत्व सारख्या गोष्टींची किंमत पुस्तकात वाचून समजत नाही. या सर्व गोष्टी अनुभवातून चांगल्या पद्धतीने समजतात. याच अनुभवाच्या जोरावर मी माझा व्यवसाय चालवत आहे.

युअर स्टोरी : ʻआय वेयर माय स्टाईलʼसोबतचा प्रवास कसा होता

मणि अग्रवाल : मी सुरुवातीपासूनच कोणत्याही फायद्याचा विचार न करता या कामाला सुरुवात केली होती. पहिल्या महिन्यात मी ६०,००० रुपयांपासून सुरू केलेल्या या व्यवसायात आज महिन्याकाठी लाखोंची उलाढाल होते. आम्ही आता दर महिन्याला ७००-८०० ऑर्डर्स पूर्ण करतो आणि आतापर्य़ंत आम्ही १०,००० पेक्षा जास्त ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. याच्या मार्केटिंगसाठी आम्ही फक्त २०,००० रुपये खर्च केले असतील. आम्ही ग्राहकांची मागणी, त्यांची गरज ओळखून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ʻस्टाईलटॅग.कॉमʼने २०१२ साली आमच्या संकेतस्थळाला बेस्ट सेलिंग ब्रॅंडचा दर्जा दिला आहे. एवढेच नाही तर २०१३ साली एका दिवसात सर्वात जास्त व्यवसाय करणाऱ्या १० ई-कॉमर्स संकेतस्थळांमध्ये आमचे संकेतस्थळ अव्वल राहिले आहे.

युअर स्टोरी : तुमच्या ब्रॅंडचे वैशिष्ट्य काय आहे?

मणि अग्रवाल : आमच्या ब्रॅंडचे कपडे दुसऱ्या ब्रॅंडपेक्षा वेगळे आहेत. संपूर्ण कलेक्शन वेगळ्या पद्धतीत तयार करण्यात येते. यासाठी आम्ही ग्राहकांचा सल्लादेखील विचारात घेतो. आमची कलेक्शन परदेशात तयार होतात आणि आम्ही अशा डिझाईन्स तयार करतो, ज्या डिझाईन्स देशात दुसरा कोणताच ब्रॅंड तयार करत नाही. याशिवाय आमच्या डिझाईन्सच्या किंमतीदेखील वाजवी असतात. (सरासरी एका कपड्याची किंमत १०००-२५०० रुपयांदरम्यान असते.) ज्यामुळे लोक सर्वाधिक आकर्षित होतात. दुसरी गोष्ट म्हणजे, आम्ही क्वालिटीवर सर्वाधिक ध्यान देतो, ज्यामुळे फक्त २ टक्के ग्राहक असे आहेत, जे आमच्या प्रोडक्टला नाकारतात.

युअर स्टोरी : तुम्ही तुमच्या ब्रॅंडचे कपडे आणि बाजारात विक्रीस असलेल्या कपड्यांमध्ये सुवर्णमध्य कसा साधता?

मणि अग्रवाल : ʻआय वेयर माय स्टाईलʼ पहिल्या दिवसापासून एक ब्रॅंड आहे. आम्ही फेसबूकच्या माध्यमातून कपडे विकण्यास सुरुवात केली. मात्र लोकांच्या चर्चेमुळे आमची लोकप्रियता वाढू लागली आणि आमच्या ब्रॅंडच्या विक्रीत वाढ झाली. त्यानंतर आम्ही कार्यक्षेत्र अधिक वाढवले. व्यवसाय सुरू केल्यानंतर आम्ही बाजारातदेखील काम करण्यास सुरुवात केली. एका वर्षानंतर जेव्हा आमचा ब्रॅंड काहीप्रमाणात लोकप्रिय झाला. तेव्हा आम्ही आमचे संकेतस्थळ ʻwww.IWearMyStyle.inʼ सुरू केले. आज फेसबूक या संकेतस्थळावर आमचे ३१,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि यासाठी आम्ही खुप कमी पैसे खर्च केले आहेत. सुरुवातीला आम्ही २० पेक्षा जास्त ई-कॉमर्स मार्केटप्लेससोबत काम करण्यास सुरुवात केली. मात्र बऱ्याच जणांनी भरपूर स्पर्धा असल्याने आणि फंड कमी असल्याने काम बंद केले. सध्या आम्ही चार ते पाच संकेतस्थळांसोबत काम करत आहोत. जे फक्त चांगला व्यवसायच करत नाहीत तर कारभारातदेखील स्थिर आहेत.

युअर स्टोरी : भविष्यात तुमच्या काय योजना आहेत?

मणि अग्रवाल : ई-कॉमर्स उद्योगात चढ-उतार होत असूनदेखील आम्ही यावर्षी आमचा व्यवसाय दुप्पटीने वाढवण्याची आशा करत आहोत. आमचे प्रय़त्न आहेत की, काही निवडक मार्केटप्लेससोबत जोडून आपल्या व्यवसायाला पुढे न्यायचे. फ्लिपकार्ट आणि मिंत्रा यांसारख्या संकेतस्थळासोबत जोडून आम्ही ग्राहक केंद्रीत रणनीती आखणार आहोत. स्टॉक वाढवण्यासाठी आम्ही मोठी गुंतवणूक करण्याचीदेखील योजना करत आहोत. सध्या स्पर्धेत वाढ झाली असल्याने घरपोच डिलिव्हरी करण्याची वेळ १०-१५ दिवसांवरुन २४ ते ४८ तास एवढी झाली आहे. सर्वात शेवटी आम्ही ऑफलाईन व्यवसायात नशीब आजमवण्याचा प्रय़त्न करणार आहोत. देशभरातील विविध दुकांनांच्या मालकांशी संपर्क साधून त्यांच्या दुकानात आमचे डिझायनर कपडे विक्रीस ठेवण्याची कल्पना आहे.

Related Stories

Stories by Ranjita Parab