चंद्रपूर येथे कोळशापासून युरिया बनविण्याचा प्रकल्प उभारणार 

·राज्याला कमी दरात युरिया मिळणार  .स्टोन टेक एनर्जी प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार· सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

0

कोळशापासून युरिया बनविण्याचा सुमारे साडेसहा हजार कोटी गुंतवणूक असलेला देशातील पहिला प्रकल्प चंद्रपूर येथे उभारण्यात येणार आहे. यामुळे या भागात रोजगारनिर्मिती होऊन राज्याला कमी दरात युरिया उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी स्टोन टेक एनर्जी प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी स्टोन टेक एनर्जी प्रा. लि.चे चेअरमन रिचर्ड हेरॉल्ड स्टोन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प चंद्रपूर जिल्हा व परिसरातील विकासाला मोठी चालना देईल. येथे मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात युरियाची कमतरता आहे. या प्रकल्पामुळे राज्याची युरियाची मागणी पूर्ण होणार असून तो कमी दरात उपलब्ध होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले की, सध्या आपल्या देशात गॅसपासून युरिया बनविला जातो, आता कोळशापासून युरिया बनविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून ही योजना राबवली जाणार आहे. गॅसपेक्षा कोळशाच्या माध्यमातून तयार होणा-या युरियाचा उत्पादन खर्चही तुलनेत कमी आहे. यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान देण्याची तयारी स्टोन टेकने दर्शवली आहे. कोळशापासून युरिया बनविण्याचा देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. आपल्याकडे मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग या प्रकल्पासाठी केला जाईल. या प्रकल्पाचा चंद्रपूरप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. या प्रकल्पातून युरियाची निर्मिती सुरु झाल्यानंतर चीनकडून युरिया आयात करण्याची गरज भासणार नाही.