'होम्सफाय' – घरखरेदीचा अनुभव अधिक सुखकारक करणारे व्यासपीठ

'होम्सफाय' – घरखरेदीचा अनुभव अधिक सुखकारक करणारे व्यासपीठ

Monday December 21, 2015,

5 min Read

आपले स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न तर प्रत्येकाचेच असते. पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम... खास करुन महानगरांमध्ये तर विचारुच नका. अशा ठिकाणी स्वतःचेच काय, पण भाड्याचे घर घेणेही अतिशय कठीण होऊन बसले आहे. अर्थात यामागे जागेची कमतरता हे एक प्रमुख कारण आहे. त्याशिवाय सोयीचा परिसर, रास्त दर आणि आवश्यक त्या सेवा-सुविधा, या आणि अशा अनेक गोष्टींचा विचारा करावा लागत असल्याने, घरखरेदी हे एक दिव्यच होऊन बसले आहे. पण लोकांची नेमकी हीच गरज लक्षात घेत, नविन घर शोधण्याच्या कामी मदत करणाऱ्या अनेक कंपन्याही आज बाजारात उपलब्ध होत आहेत. 99एकर्स (99acres), मॅजिकब्रिक्स (Magicbricks), हाऊसिंग(Housing) आणि कॉमनफ्लोअर (Commonfloor) या त्यापैकीच महत्वाच्या काही कंपन्या. सुदैवाने असे अनेक पर्याय आज उपलब्ध झाल्याने, आपले आयुष्य कितीतरी सहज झाले आहे.

अब्जावधींची उलाढाल असलेल्या या रिअल इस्टेटच्या क्षेत्रात, विकासक आणि ब्रोकर्सकडून केवळ विपणनावरच केला जात असलेला खर्च सुमारे एक अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड आहे. हेच कारण आहे की, कॉमनफ्लोअर आणि हाऊसिंगसारख्या कंपन्या १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक निधी उभारण्यात यशस्वी ठरल्या आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात आज ग्रॅबहाऊस (Grabhouse), रिअल्टीकंपास (RealtyCompass) आणि घरफाईंडर (GharFinder) यांसारख्या अनेक स्टार्टअप्स आहेत, ज्या घरखरेदी करणाऱ्यांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

image


पण तरीही रिअल इस्टेटच्या बाजारपेठेतील समस्या मात्र दूर होण्याचे नावच घेताना दिसत नाहीत.

ग्राहकांच्या समस्या – आज ग्राहकापुढे बऱ्याच समस्या आहेत. आपले स्वप्नातील घर मिळविण्यासाठी त्याला असंख्य मध्यस्थांशी संपर्क साधावा लागतो, कागदपत्रांसाठी विविध कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागतो, फर्निचर आणि नुतनीकरणाचे पर्याय निवडावे लागतात, मुव्हर्स ऍन्ड पॅकर्सबरोबर घासाघीस करावी लागते आणि अशाच आणखी कितीतरी अडचणींचा सामना करावा लागतो. परिणाम काय तर भावनिक, शारिरीक आणि आर्थिक थकवा... मुख्य म्हणजे यामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक असल्याने, तुम्हाला या समस्यांपासून पळता तर येत नाहीच, उलट त्याचा अधिक जोरदारपणे सामना करावा लागतो.

विकासक आणि ब्रोकर्सच्या समस्या – त्यांना त्यांच्या मालमत्ता लिस्ट करण्यासाठी अर्थात अधिकृत घरविक्री दलालांसमवेत तयार करण्यात येणाऱ्या मालमत्ता यादीवर बराच पैसा खर्च करावा लागतो आणि तो देखील प्रत्यक्ष परिणामाची कोणतीही खात्री नसताना.. शेकडो फोन कॉल्स, संभाव्य ग्राहकांबरोबरच्या बैठका आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कामगार नेमण्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च होतो. तरीही ते ग्राहकांच्या सर्वच प्रश्नांचे निरसन करण्यास असमर्थ असतात.

एक ग्राहक म्हणून, आपण काही नेहमी मालमत्तांचे व्यवहार करत नाही, खरे म्हणजे अशी वेळ आयुष्यात एकदाच कधीतरी येते. त्यामुळे आपल्याला अशी एक जागा हवी असते, जिचे रुपांतर आपण थोड्याच काळात आपल्या स्वप्नातील घरामध्ये करु शकू आणि जे खरोखर आपल्या प्रोफाईल आणि बजेटमध्ये बसणारे असेल.

नेमक्या अशाच परिस्थितीत, एक मालमत्ता सेवा व्यासपीठ या भूमिकेत होम्सफाय (Homesfy) काम करते. जागेसंबंधीच्या सर्व समस्यांवर सर्वांगीण उपाय देण्याचे होम्सफायचे लक्ष्य आहे. म्हणूनच होम्सफाय म्हणजे ग्राहक आणि सेवा पुरवठादारांमधील, तंत्रज्ञान आणि सेवा पुरविणारा एक दुवाच म्हणावा लागेल.

होम्सफाय ग्राहकांना योग्य घरे आणि विक्रेते शोधण्याच्या कामी तर मदत करतेच, त्याचबरोबर पॅकींग आणि शिफ्टींगमध्ये, घरातील सुधारणांसाठी, आणि कायदेशीर कामासाठीही मदतगार ठरते. त्याशिवाय हरकाम्यांचा शोध, लोकॅलिटी टीप्स आणि इतर सेवा शोधण्यासारख्या कामांमध्येही होम्सफाय उपयुक्त ठरते.

त्याशिवाय कंपनीचा असाही दावा आहे की, ते ब्रोकर्सना योग्य ती माहिती पुरवून मदत करतात, जेणेकरुन ते ग्राहकांचे संपूर्ण समाधान होईल, अशा पद्धतीने सौदा पूर्ण करु शकतात. तसेच एकदा लिस्ट झालेली मालमत्ता पुन्हा लिस्ट होणार नाही याचीही काळजी घेतात.

“ मुंबईमध्ये घर शोधताना, मी देखील अनेक अडचणींचा सामना केला आहे आणि त्याचबरोबर आमच्या स्वतःच्या ग्राहकांचे अनुभव आणि अपेक्षांमधूनच आम्हाला ही दृष्टी मिळाली आहे. थेट संवाद, व्यक्तीगत अभ्यास, ब्रोकर्सचे सर्वेक्षण आणि सखोल संशोधन यामाध्यमातून आमची टीम समस्यांची एक सविस्तर यादी तयार करते,” होम्सफायचे संस्थापक आशिष कुकरेजा सांगतात.

जागेचा शोध हा सहजसोपा आणि त्याचबरोबर सामान्यांना परवडणारा असा करण्याचे आशिष यांचे लक्ष्य आहे. जागेचा शोध घेताना त्यांना स्वतःला आलेल्या अनुभवांतूनच, जागेचा शोध प्रोफाईलवर आधारीत ठेवण्याची सोय देऊ करण्याचे त्यांना सुचले. आशिष यांनी हैदराबादच्या आयबीएसमधून एमबीए केले आहे. आशिष यांनी आजपर्यंत नवनवीन व्यवसायांची सुरुवात, व्यवसाय विकास आणि उत्पादन धोरणांच्या कामात नेतृत्व केले आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नवीन व्यवसाय वाढविण्याचा त्यांना अनुभव आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, कोटक आणि युनिकॉन मध्ये इक्विटी बुकींग आणि प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंटमध्ये त्यांनी महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.

मुकेश मिश्रा हे कंपनीचे सहसंस्थापक आहेत. त्यांच्या या क्षेत्रातील ज्ञानाच्या मदतीने ते कंपनीचा सेल्स विभाग सांभाळतात आणि त्याचबरोबर भागीदारांशी योग्य संपर्क राखण्याचीही त्यांच्यावर जबाबदारी आहे. भारतातील प्रमुख शहरांमधील ऑर्गनाईस्ड प्रोपर्टी सर्च मार्केटमध्ये एक प्रबळ खेळाडू बनण्याच्या दिशेन त्यांचे काम सुरु आहे. या कंपनीचे एक सहसंस्थापक या नात्याने कमी खर्चात व्यवसायाची प्रगती करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही अतिशय उत्तम उपाय दिले आहेत. मुकेश हे एक प्रमाणित रिअल इस्टेट सल्लागार आहेत. त्यांना असलेली प्रवासाची आवड विविध ठिकाणच्या मालमत्तांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना निश्चितच उपयुक्त ठरत असते.

त्या दोघांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, बाजारपेठेत लोकांच्या गरजा या कधीच कमी होत नाहीत आणि त्यामुळे जेथे इतर लिस्टींग पोर्टल्सचे काम थांबते, तेथूनच सुरुवात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यातूनच त्यांना हे देखील जाणविले की, प्रोपर्टी सर्च प्लॅटफॉर्मपासून पुढे जात, अडचणी दूर करणाऱ्या आणि निसंशयपणे बजेटमध्ये बसेल अशा एका व्यासपीठाची निर्मिती करण्याची गरज आहे, ज्याद्वारे ते ग्राहकांचा नव्या घरात जाण्याचा अनुभव अधिक चांगला करु शकतील.

मुकेश सांगतात, “ पहिल्या सहा महिन्यांमध्ये आम्ही अक्षरशः आमच्या ग्राहकांना घेऊन विविध ठिकाणी फिरत होतो आणि जागेचा शोध घेण्यासाठी फुकट सेवा देऊ करत होतो. काही वेळा तर माझी ओळख वाहनचालक अशी करुन देण्यात आली होती. सातव्या महिन्यापासून ते तेराव्या महिन्यापर्यंत आम्हाला असाधारण सेल्स दिसले, आम्ही तब्बल ११० सौदे पूर्ण केले. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणारे आणि त्यांच्या गरजांना नाही न म्हणण्याचे आमचे धोरण आम्हाला दुबईपर्यंत घेऊन गेले, जेथे आम्ही एका वृद्ध जोडप्यासाठी व्यवहार पूर्ण केला.”

अवघ्या पंधरा लाख रुपयांच्या सौद्यापासून कंपनीला सुरुवात झाली होती आणि आजच्या दिवशी पंधरा कोटींची कमाई करणारा सौदा पूर्ण करण्यापर्यंत आम्ही येऊन पोहचलो आहोत.

कंपनीच्या स्थापनेपासून आम्ही ७५ दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक जीएमव्ही (ग्रॉस मर्चंडाईस व्हॉल्युम) मध्ये मिळविले आहेत आणि एंजल गुंतवणूकदारांच्या माध्यमातून – मेरेसिस एडवायझर्स आणि अलुर - दोन टप्प्यांत एक कोटीचा निधी मिळाला आहे.

सध्या ते मुंबई आणि बंगळुरूमध्येच सेवा पुरवत असून पुणे, हैदराबाद आणि चैनईमध्ये आगामी एकदोन वर्षांत विस्तार करण्याची त्यांची इच्छा आहे. या विस्तारानंतर कंपनी जीएमव्हीमध्ये १०० दशलक्ष पार करेल, ज्यामध्ये १००० हून अधिक अपार्टमेंटस् आणि ५०० सक्रीय भागीदारांचा समावेश असेल.

आशिष सांगतात, “ हे खूपच सहज वाटत असले, तरी यासाठी करावी लागणारी प्रक्रिया खूपच कठीण आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसलेले, सुस्पष्ट असे व्यासपीठ उभारायचे होते. कारण आमच्या सर्व भागधारकांना सहजसोप्या पद्धतीने उपाय देणे गरजेचे होते.”

जागेच्या शोधाचा वेळ कमी करणे, हे होम्सफायचे लक्ष्य आहे. यासाठी त्यांनी शंभर चेकपोईंटस् देऊ केले असून, त्यामधून सर्वोत्तम जागा निवडता तर येऊ शकेलच, पण त्याचबरोबर ग्राहकाला एकूणच घरखरेदीचा उत्तम अनुभवही मिळेल.

लेखक – प्रदीप गोयल

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन