आता अंध व्यक्तीसुद्धा करू शकतील ‘फोटोग्राफी’

0

“सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा बाळगली जात नाही. त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही किवा सपशेल नाकारले जाते. असा ठाम समजच झाला आहे की, एखाद्या व्यक्तीला पाय नाही तर तो धावणार कसा ? किवा एखादा बहिरा आहे म्हणून त्याला गाणे कसे ऐकता येईल ? शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असले म्हणून ती व्यक्ती काहीच करू शकणार नाही हा समजच मुळात चुकीचा आहे आणि तो मला पूर्णतः खोडून काढायचा आहे, आपण आपला दृष्टीकोन बदलायला हवा.” हे वाक्य कोणा थोर विद्वानाचे नाही तर २३ वर्षीय आदित्य असेरकर या तरुण अभियंत्याचे आहे, ज्याने दृष्टीहिनांसाठी ‘ब्लुम’ नावाचा प्रोटोटाईप कॅमेरा तयार केला आहे. आदित्यच्या या कॅमेरयाच्या सहाय्याने आता दृष्टिहीन व्यक्तीदेखील फोटो काढू शकणार आहेत... विश्वास नाही बसत ना ? पण हे खरं आहे. हा कॅमेरा कशा पद्धतीने हाताळला जातो ? दृष्टिहीन व्यक्ती फोटो कसे काय काढू शकते ? हे सर्व जाणून घेण्यासाठी आम्ही आदित्यशी संवाद साधला.

मुळचा मुंबईचा असलेला आदित्य असेरकर याने नुकतेच प्रोडक्शन इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि अहमदाबाद इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनमध्ये मास्टर पदवीसाठी तो दाखल झाला आहे. दृष्टिहीन व्यक्तींसाठी कॅमेरा बनवावा ही कल्पना कशी सुचली त्याबाबत आदित्य सांगतो की, “सर्वसामान्यांप्रमाणेच कर्णबधीरांना संगीत कसे ऐकता येईल याबाबतच्या प्रयोगासाठी मी काम करत होतो. हे करत असतानाच कल्पना सुचली की दृष्टीहिनांसाठीही एक कॅमेरा बनवला जाऊ शकतो ! त्यानंतर मी संशोधन करून कॅमेरा तयार केला. हा कॅमेरा इमेज प्रोसेसिंग तंत्रावर आधारीत आहे, आणि वापरकर्त्याला संवेदनशिलतेने काय पाहिले त्याची माहिती देतो. ही माहिती कोणत्याही मुख्य भाषेत देता येते जी वापरकर्ता समजतो.”

“कुठलीही गोष्ट  बघताना अनेक प्रकारच्या गोष्टीचे ज्ञान नकळत आपल्याला होत असते. जग समजून घेण्याचे ते एक महत्वाचे माध्यम आहे. कलेच्या अविष्कारात सर्वांना सारखीच संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी सभोवतालचे वातावरण तशा प्रकारे ज्ञान वृध्दी आणि कौशल्यांना प्रोत्साहन देणारे असायला हवे. तंत्रज्ञान आज अशा उंचीवर गेले आहे ज्यात कुणीही शारिरीक कमजोरीमुळे मागे राहणार नाही” आदित्य सांगतो. जगण्याचा जेवढा हक्क आपल्यासारख्या डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टिहिनांनासुद्धा आहे, हे लक्षात घेऊन एका लक्षणीय शोधाने दृष्टीहिन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश देण्याची हमी भरली आहे आदित्य असेरकर याने.


दृष्टीदोष असल्याने भोवतालच्या जगात वावरणे त्याला किंवा तिला अवघड होऊन जाते. याचा खुद अनुभव आदित्यने घेतला. त्याने दृष्टिहीन असल्याप्रमाणे अनुकरण केले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याने हेही जाणून घेतले की दृष्टीदोष असणाऱ्या व्यक्तींना निसर्गत: चिकित्सक वृत्तीचे वरदान असते ज्यातून ते भोवतालच्या गोष्टी जाणून घेतात.

हा कॅमेरा प्रामुख्याने दृष्टीदोष असलेल्या व्यक्तिंसाठी विकसित करण्यात आला आहे. जन्मताच अंध नसलेल्या मात्र नंतर दृष्टी गमावलेल्या व्यक्ती ज्यांना किमान रंगांचे ज्ञान आहे अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून हा कॅमेरा तयार करण्यात आला. तशा पद्धतीचे संशोधन करण्यात आले. जन्मत:च दृष्टिहीन व्यक्तीही हा कॅमेरा वापरू शकतात. कारण जरी रंगांचे ज्ञान नसले तरी कानावर सातत्याने पडत असलेल्या चर्चेतून अशा प्रकारचे ज्ञान या व्यक्ती आत्मसात करत असतात, त्यांची आकलनशक्ती तीव्र असते. नुसते दृष्टीहीनच नाहीतर इतर डोळस व्यक्तीदेखील हा कॅमेरा वापरण्यास उत्सुक असल्याचे आदित्य सांगतो.

कॅमेराचे संपूर्ण कार्य इंटरनेटद्वारे प्रोसेस होते. जे काही इंटरनेटला माहित आहे तेवढं सगळच्या सगळं कॅमेराला माहिती आहे. वापरकर्ता कॅमेराला त्याला हव्या त्या गोष्टीसाठी कार्यरत करतो आणि कॅमेरा स्वयंचलित पध्दतीने नेमक्या गोष्टी टिपतो. कॅमेरा फ्रेम मधील गोष्टींची माहिती देखील देतो. उदाहरणार्थ फ्रेम मधील व्यक्तीने चष्मा घातला असेल, ती व्यक्ती दु:खी, आनंदी आहे की संभ्रमात आहे. कॅमेरा सांगतो की माणसाने पांढरा शर्ट घातलेला आहे, त्याची दाढी वाढलेली आहे, जो तुमच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. झाड आहे का इमारत आहे. लोकेशन कोणते आहे. कॅमेरा फ्रेम मधल्या इतर गोष्टीदेखील पाहतो आणि त्यांची रचना कशी असावी याची सूचना करतो. जसे की, ‘लाल रंगाची प्लास्टिक खुर्ची उजव्या बाजुला आहे.’ एवढ्या विस्ताराने हा कॅमेरा समोरील व्यक्तीची माहिती तुम्हाला देतो आणि त्यानंतर फोटो क्लिक केला जातो. आदित्य याने अनेक दृष्टीहिनव्यक्तींसोबत या कॅमेराच्या निर्मितीच्या वेळी अनेक प्रयोग केले आहेत आणि नव्याने अनेक बदल देखील केले आहेत.

या कॅमेरामध्ये दोन प्रकारच्या युएसबी पोर्ट काम करतात त्यामुळे फोटोंच्या ३डी प्रिंट काढता येतात जेणेकरून त्यांना स्पर्श करून जाणून घेता येईल की फोटो कशा पद्धतीने काढला आहे, ज्याला एम्बोस्मेंट अर्थात नक्षीकाम म्हणतात. उदारणार्थ जर समुद्रकिनाऱ्याचा फोटो काढला असेल तर त्यामध्ये खालच्या बाजूला थोडे दगड असतील तर ते खरखरीत प्रिंट होऊन येतील आणि पाणी मऊ प्रिंट होऊन येईल ज्यामुळे फोटोग्राफरला फक्त स्पर्शाने त्याने काढलेला फोटो पाहता येईल. फ्रेम मध्ये येणा-या गोष्टींची हुबेहुब माहिती देणा-या या कॅमेरामुळे लोकांना छायाचित्रणाच्या चांगल्या तत्वांनुसार छायाचित्रण करता येते. जसे की ‘रुल्स ऑफ थर्डस्’ अर्थात मार्गदर्शक नियमावली, पॉझिटिव्ह किवा निगेटिव्ह स्पेस, लिडिंग लाईन इत्यादी. एचडी एम आय तंत्रावर आधारीत हा कॅमेरा काम करतो आणि सामान्य लोकांनाही यातील छायाचित्र पाहता येतात.

या कॅमेरयाच्या माध्यमातून दृष्टीहीन व्यक्तींना त्यांच्या सभोवताल होणा-या घटना आणि घडामोडी अनुभवता येतात ज्यात त्यांना रुची असेल. आदित्य याने यासाठी पेटंट घेण्याचा प्रयत्न सुरु केला असून कॅमेरात भविष्यात आणखी सुधारणा करण्याचाही त्याचा विचार आहे. यामध्ये आणखी विस्तार करता येईल आणि हे संशोधन पुढे घेऊन जाता येईल. आदित्य सांगतो.

बुद्धीच्या, जिद्दीच्या बळावर दृष्टिहीन व्यक्तीही डोळस व्यक्तीसारखं काम करू शकतात, हाच आत्मविश्‍वास अन्य दृष्टिहीनांमध्ये निर्माण करण्याचा आदित्य प्रयत्न करीत आहे. आदित्यच्या या भविष्यातील वाटचालीसाठी त्याला युवर स्टोरीच्या शुभेच्छा !

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

जीवनात सर्वांना पुढे गेलेले पाहू इच्छिते ‘शालिनी’; एक कल्पना बदलेल गरजूंचे आयुष्य!

१०वी उत्तीर्ण मेकॅनिकने बनविली पाण्यावर चालणारी कार, ‘मेक इन इंडिया’साठी नाकारले विदेशी प्रस्ताव ...

अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे