मुलीच्या साथीनं वडिलांनी निर्माण केला १०० कोटींचा ब्रँड

मुलीच्या साथीनं वडिलांनी निर्माण केला १०० कोटींचा ब्रँड

Monday January 04, 2016,

3 min Read

भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या परिधानांबद्दल ललित किशोर यांच्यासारखे जाणकार अगदी मोजके आहेत. नाईकी आणि लोट्टोसारखे आंतरराष्ट्रीय क्रीडा लाईफस्टाईल ब्रँड्स देशात प्रस्थापित करण्यासोबतच त्यांना या उद्योग क्षेत्रातला २५ वर्षांचा अनुभव आहे. भारतात नाईकीसाठीचा परवानाधारक म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. तिथपासून ते नाईके ग्रुपचे मुख्य वित्त अधिकारी आणि उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचले. लोट्टोच्या मास्टर फ्रँचाईझी अर्थात् विशेष परवाना असलेल्या स्पोर्ट्स लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालकही आहेत.


image


२०११ मध्ये ललित आणि त्यांची दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन नुकतीच बाहेर पडलेली मुलगी आयुषी किशोर या दोघांच्या संकल्पेनतून ग्लोबलाईट साकारलं.

भारतात क्रीडाक्षेत्रातल्या फूटवेअर अर्थात् पादत्राणांचे स्थानिक ब्रँड्स नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेस अगदी थोड्या लोकांना परवडणारे उच्च दर्जाचे मोजके आंतरराष्ट्रीय ब्रँड्स उपलब्ध होते किंवा मग स्थानिक कारखाने आणि खासगी लेबल्स उपलब्ध होते. योग्य ठिकाणी आवाक्यात असणारे अगदी थोडेसे ब्रँड्स उपलब्ध होते, असं आरुषी सांगतात.

या मध्यम किंमतीच्या स्पोर्ट्स लाईफस्टाईल ब्रँड्सच्या बाजारात भरपूर वाव असल्याचं या पिता-पुत्रीच्या जोडीनं ओळखलं आणि त्यातूनच ग्लोबलाईट रिटेलची निर्मिती झाली. अगदी उत्पादनापासून ते किरकोळ विक्रीपर्यंत १०० टक्के एकात्मिक काम करणारी गोल्बलाईट ही भारतातील एकमेव ब्रँड कंपनी आहे. त्यामुळेच त्यांच्या उत्पादनांच्या किंमती या ४९९ ते ९९९ रुपयांपर्यंत म्हणजेच अन्य उत्पादनांपेक्षा खूप कमी आहेत. सध्या कंपनी पादत्राणांच्या साधारणपणे ७००० जोड्या दररोज ऑनलाईन विकते.

सध्या वेबसाईट, ऐप, टीव्ही चॅनल आणि बाजारातून ग्लोबलाईटची ७० टक्के विक्री होते. ग्लोबलाईटची सुरुवात झाली त्यावेळेस जवळपास ६० टक्के व्यवसाय हा पारंपरिक बाजारातूनच येत होता. आता सध्या आमची ७० टक्के विक्री ऑनलाईन होते आणि २० टक्के विक्री ही अन्य आधुनिक होलसेल बाजार आणि साखळी दुकानांमधून होते, असं आयुषी सांगातात.

भारतात दूरचित्रवाणीवरील जाहीराती खूप मोठी भूमिका बजावतात आणि सध्याचा हा बाजार जवळपास ५००० कोटींचा आहे. यामध्ये अगदी थोडे स्पर्धक आहेत. ग्लोबलाईटसाठी हीच किरकोळ विक्री महत्त्वाची आहे, असंही आयुषी सांगतात.गेल्या तीन वर्षांत ग्लोबलाईटनं १०० कोटींपेक्षाही जास्त विक्री केली आहे आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत त्यात ६० कोटींची भर टाकण्याचं ध्येय त्यांनी निश्चित केलं आहे.


image


रोज वापरायचे शूज ते स्पोर्ट्स शूज तसंच स्निकर्स, लोफर्स, क्लॉग्ज, स्लिपर्स आणि सँडल्सपासून सर्व प्रकारची उत्पादनं उपलब्ध असणारी ग्लोबलाईट ही एकमेव कंपनी आहे.सध्या आमच्याकडे हजेरीपटावर ५०० लोक आहेत आणि जागतिक ट्रेंड्स आणि डिझाईन्सवरच संपूर्णपणे काम करणारी संशोधन आणि विकास टीम चीनमध्ये कार्यरत आहे. यामुळे भारतीय डिझाईन टीमशी समन्वय साधणं आणि उत्पादनांचं व्यावसायिकीकरण करणं सोपं जातं, अशी माहिती आयुषी देतात.

भारत ही ब्रँडसाठी अत्यंत संवेदनशील बाजारपेठ असल्यानं इथं ब्रँड निर्माण करणं अत्यंत आव्हानात्मक आहे. प्रथम आणि दुय्यम दर्जाच्या महानगरांमधली ठराविक ब्रँड्सशी प्रामाणिक असलेली मानसिकता बदलणं सुरुवातीला अत्यंत अवघड गेलं. पण आम्ही देत असलेल्या किंमतीमुळे आम्हाला या बाजारपेठेत शिरकाव करणं सोप गेलं. पहिल्यांदाच या बाजारपेठेत शिरकाव केलेल्या स्पर्धकाचा फायदाही आम्हाला मिळाला, असं आयुषी सांगतात.

स्थानिक कंपन्या साधारणपणे चौकट पाळण्याचाच प्रयत्न करतात. पण स्वत:चं उत्पादन, संशोधन आणि विकास टीम, विक्रीसाठी थेट साधनं यामुळे ग्लोबलाईट या क्षेत्रात स्वत:चं भक्कम स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. आता वेबसाईट, ऐप आणि टीव्हीसारख्या माध्यमांतून भविष्यात थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा ग्लोबलाईटचा मानस आहे आणि त्यादृष्टीनंच त्यांची वाटचाल सुरु आहे.

वेबसाईट -http://www.globalitesport.com

लेखक- जय वर्धन

अनुवाद- सचिन जोशी