इन्फॉरमेशन सिक्युरीटी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अपुर्वा

इन्फॉरमेशन सिक्युरीटी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अपुर्वा

Friday December 04, 2015,

6 min Read

देशाची राजधानी दिल्ली येथे सहाव्या इयत्तेत शिकत असताना, अपुर्वा गिरी यांना भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना डॉ. कलाम यांनी त्यांना विचारले की, तुम्हाला मोठे होऊन काय बनायचे आहे. तेव्हा अपुर्वा यांनी आपल्याला वकील बनायचे असल्याचे कलाम यांना सांगितले कारण त्यांना वाद घालण्याची आवड होती. यावर कलाम यांनी आपल्याला जे आवडते तेच आपण करावे, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कलाम यांचे हे म्हणणे अपुर्वा यांच्या मनात खोलवर रुजले. ʻमला वाटते की, कलाम यांच्या याच सल्ल्यामुळे मी हे कार्यक्षेत्र निवडले, ज्यात सध्या मी कार्य़रत आहेʼ, असे अपुर्वा सांगतात. अपुर्वा सध्या सुरक्षा विश्लेषक म्हणून आयविज सिक्युरीटी (Iviz Security) या कंपनीत कामाला आहेत. या क्षेत्रात त्या गेल्या एक ते दीड वर्षांपासून कार्य़रत आहेत. याशिवाय त्या एक नीतीमत्ता धारक हॅकर असून, इन्फोसेक गर्ल्स, या संस्थेच्या पडद्यामागील कलाकार आहेत. ही संस्था महिलांची असून, महिलांकरिता काम करते. माहिती सुरक्षेबद्दल अपुर्वा अधिक सजग असून, श्रुती कामथ नामक एका हॅकरसोबत त्यांनी या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अपुर्वा या अनेक सुरक्षा संस्थांमध्येदेखील सहभागी आहेत. आई-वडिलांपासून प्रभावित झालेल्या अपुर्वा यांना त्यांच्याकडूनच ही प्रेरणा मिळाली, असे त्या सांगतात. अपुर्वा या वाचनप्रेमी असून, ही सवय त्यांना त्यांच्या वडिलांमुळे लागली आहे. अपुर्वा आणि त्यांच्या वडिलांचे घरात एक मोठे पुस्तकांचे कपाट आहे. त्या सांगतात, ʻशक्य होतील तेवढ्या विषयांवरील जास्तीत जास्त पुस्तके मला वाचायची आहेत.ʼ त्यांना काल्पनिक कथा वाचण्याची आवड आहे. मात्र सध्या त्या जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल वाचन करत आहेत. अपुर्वा यांच्या कार्यक्षेत्राबद्दल जाणून घेण्यासाठी तसेच अधिकाधिक महिलांना माहिती सुरक्षेच्या (इन्फॉरमेशन सिक्युरीटी) क्षेत्रात रोवण्यासाठी अपुर्वा यांच्या प्रयत्नाबद्दल आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले.

image


अपुर्वा या मूळच्या बंगळूरू येथील आहेत. कामानिमित्त वडिलांची बदली होत असल्याने, अपुर्वा यांचे कुटुंब दर तीन वर्षांनी विविध राज्यात स्थलांतरीत होत असे. त्यामुळे त्यांनी त्यांचे बालपण एका विशिष्ट राज्यात व्यतित न करता, देशभर व्यतित केले आहे. दिल्ली आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. विविध राज्यात स्थलांतरीत होत असल्याने त्यांचा मित्रपरिवार वाढत होता. परिणामी अपुर्वा यांना विविध भाषांचे ज्ञान होत गेले. अपुर्वा या इंग्रजी, हिंदी, तेलगु आणि कन्नडा या भाषा अस्खलितपणे बोलतात. तसेच त्यांना तामिळ या भाषेचेदेखील अल्पप्रमाणात ज्ञान आहे. सातव्या इयत्तेत शिकत असताना अपुर्वा पुन्हा बंगळूरू येथे स्थलांतरीत झाल्या. महाविद्यालयीन दिवसांपर्यंत अपुर्वा या खेळ आणि अन्य उपक्रमांमध्येदेखील सक्रिय होत्या. शाळेत असताना त्यांनी बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले होते. ʻमाझ्या शाळेत मुलं आणि मुलींकरिता बॉक्सिंग हा खेळ अनिवार्य़ होता. मी चार वर्ष बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच मी वीणावादनदेखील शिकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही कारणास्तव ते शक्य झाले नाही. सध्या मला वीणावादनातील फार काही आठवत नाही. मात्र जेव्हा मी पुन्हा ते शिकण्याचा प्रयत्न करेन, तेव्हा जिथे थांबली होती तिथुनच पुन्हा सुरुवात करेन, अशी आशा आहेʼ, असे अपुर्वा सांगतात. अपुर्वा यांनी त्यांचा विद्यापीठपूर्व अभ्यासक्रम (प्री-युनिव्हर्सिटी कोर्स) ज्योती निवास महाविद्यालयातून पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी माहिती विज्ञान (इन्फॉरमेशन सायन्स) शाखेतून घेतली असून, एमवीजे अभियांत्रिकी महाविद्यालयातून संबंधित शिक्षण पूर्ण केले आहे. बीईच्या अखेरच्या सत्रात असताना, अपुर्वा यांना त्यांच्या एका चांगल्या मैत्रिणीने नीतीमत्तापूर्वक हॅकिंगच्या प्रशिक्षणाची माहिती दिली. नीतीमत्तापूर्वक हॅकिंग (Ethical hacking) म्हणजे दुर्भावनेतून किंवा गुन्हेगारी हेतू न बाळगता, केवळ एखाद्या कंपनीच्या सुरक्षेसाठी किंवा तपासणीसाठी करण्यात येणारे हॅकिंग. या प्रशिक्षणाबद्दल जाणून घेण्यासाठी अपुर्वा उतावीळ झाल्या होत्या. त्यांनी तत्काळ त्या प्रशिक्षणासंबंधी माहिती काढली आणि प्रशिक्षण घेण्यासाठी त्या संस्थेत अपुर्वा दाखल झाल्या.

image


महाविद्यालयातील व्यग्र दिनचर्येमुळे अपुर्वा यांना हे प्रशिक्षण अर्ध्यावर थांबवावे लागले होते. मात्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ते प्रशिक्षणदेखील पूर्ण केले. अपुर्वा सांगतात की, "प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आयविज या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यांनी मला नियुक्तदेखील केले. त्या दिवसापासून आतापर्य़ंत मी कधीच मागे वळून पाहिले नाही." इन्फोसेक गर्ल्स या संस्थेबद्दल बोलताना त्या सांगतात की, "नव्याने सुरुवात करणाऱ्यांप्रमाणे आमची संस्थादेखील अगोदरच्या प्रस्थापित संस्थांमुळे काही काळ गोंधळली होती. अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा पुरविण्यावर आमचा विश्वास होता. त्यामुळे अपुर्वा यांनी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. सुखद वातावरणात आम्ही खास महिलांकरिता कार्यशाळा घेतली. आम्ही अधिकाधिक महिलांना आमच्या संस्थेकडे आकर्षित करू शकतो. मात्र फार कमी महिला तेव्हा उपस्थित असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही सर्व प्रकारचे उपक्रम राबवतो. त्यात कार्य़शाळा, चर्चासत्र, प्रात्यक्षिक सत्र, आव्हाने यांचा समावेश असतो. आमच्या या उपक्रमांना अनेकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. काहींनी तर आम्हाला पुन्हा असेच उपक्रम राबवण्याचा सल्ला दिलाʼ, असे अपुर्वा सांगतात. भारतात फक्त महिलांकरिता माहिती सुरक्षा क्षेत्रात राबविण्यात येणारी ही पहिलीच कार्यशाळा असल्याचे त्या सांगतात. ʻतंत्रज्ञानात सध्या असलेल्या महिलांच्या प्रमाणाच्या तुलनेत इन्फोसेक गर्ल्समध्ये महिलांचे प्रमाण अधिक अल्प आहे. त्यामुळे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यांना केंद्रीत करुन अधिकाधिक कार्यशाळा राबवित आहोत. प्रत्येक कार्य़शाळेत किंवा उपक्रमात आम्ही एकतरी नवा चेहरा पाहतोच. इन्फोसेकच्या तज्ज्ञांची मागणी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे सर्वाधिक योगदान असावे, असे आम्हाला वाटतेʼ, असे अपुर्वा सांगतात. अपुर्वा यांची पहिली कार्यशाळा ʻCOcOn २०१४ʼ केरळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतरचा त्यांचा पुढील उपक्रम बंगळूरू येथे हॅसग्रीक कंपनीच्या साथीने राबविण्यात आला होता. ʻNullcon कंपनीचे आमच्याकडे लक्ष गेले होते आणि त्यांनी कंपनीच्या बंगळूरु येथील कार्य़ालयात जागतिक महिला दिनानिमित्त संवाद साधण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले होते.ʼ, असे अपुर्वा सांगतात.

image


या क्षेत्रातील आव्हानाबद्दल बोलताना अपुर्वा सांगतात की, ʻजेव्हा मी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा माझ्या हे लक्षात आले की, मी जिथे काम करतेय तेथील लोकांना माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. त्यावेळेच मला जाणीव झाली की, मला अजुन बरेच काही शिकायचे आहे. त्यामुळे मी त्यासंदर्भात अधिकाधिक वाचन करण्यास सुरुवात केली. मी माझा कामाप्रति असलेला दृष्टीकोनदेखील बदलला. अजुनही मला असेच वाटते की, मला बरेच शिकायचे आहे. माझ्या क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींबद्दल माहिती असणे, हा माझ्या कामाचाच एक भाग असल्याचे मला वाटतेʼ, असे त्या सांगतात. अपुर्वा यांच्या मते, तंत्रज्ञानाविषयक बैठकांमध्ये महिला त्यांची मते ठोसपणे मांडत नाहीत किंवा अनेक कारणांमुळे त्या या बैठकांमध्ये सक्रीय सहभागी होत नाहीत. याबद्दल स्वतःचा अनुभव सांगताना अपुर्वा म्हणतात की, ʻपुरुष हे त्यांच्या मोठ्या आवाजामुळे चर्चेमध्ये वर्चस्व गाजवायला बघतात. अनेक पुरुष तर इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची खिल्लीदेखील उडवतात. कधीकधी महिलांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांची अहंकारी वागणूक खटकते. तर अनेक पुरुष चर्चेदरम्यान असभ्य भाषा वापरतात, त्यामुळे महिलांना तेथे अवघडल्यासारखे होते. अनेक पुरुषांना तर महिला या तांत्रिक कामे करण्यास योग्य नसल्याचे वाटते. अशा अनेक प्रकरणांमध्ये कार्य़ालयीन धोरणे महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे महिलांना समानतेची भावना वाटते.ʼ, असे त्या सांगतात.

ʻसध्याच्या युगात महिलांना समान हक्क मिळाल्याने प्रोत्साहन मिळत आहे. आम्हाला कल्पना आहे की, एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीची सुरुवात मार्गदर्शकाशिवाय होणे, हे किती कठीण आहे. त्यामुळेच आम्ही येथे मार्गदर्शन पुरवण्याचे काम करतो. मला ज्या मार्गदर्शकांची साथ मिळाली, त्यांची मी कायम कृतज्ञ आहे. मीदेखील आजपर्य़ंत अनेकांना मदत केली आहे आणि यापुढे देखील करत राहिनʼ, असे अपुर्वा सांगतात. अपुर्वा यांच्या मते, या क्षेत्रात महिलांचे वाढलेले प्रमाण लवकरच दिसेल आणि ते तसेच वाढत राहिल, अशी त्यांची आशा आहे. त्या सांगतात की, ʻमी व्यक्तिगत अशा दोन महिलांना ओळखते ज्यांनी स्वतःचे वेगळे टूल्स तयार केले आहेत. अनामिक सिंग आणि हर्षल जामदाडे. त्यापैकी अनामिकाचे टूल Wi-Hawk हे एक ओपन सोर्स टूल असून, डिफॉल्ट एडमिन पासवर्डशी संलग्न असलेल्या वायफाय राऊटरच्या आयपी एड्रेसचे ते ऑडिटींग करते. तर हर्षल यांनी XMLChor नावाचे टूल तयार केले असून, ते XPATH Injection करिता तयार करण्यात आले आहे. या दोघींचेही काम प्रेरणादायी आहे. माझ्या मते, महिला या अनेक भव्यदिव्य गोष्टी करण्यास समर्थ असतात. फक्त त्यांनी त्यांची कारकिर्द घडविताना मनात कोणताही संकोच बाळगू नये.ʼ


लेखक - तन्वी दुबे

अनुवाद - रंजिता परब