अमीरा शाहः कथा यशोशिखरावरील तरुण उद्योगिनीची

0

१९८० साली जेंव्हा डॉक्टर सुशील शाह यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले, तेंव्हा त्यांना भारतातील आरोग्यसेवा व्यवस्थेतील अपुरेपणाची - खास करुन ज्याप्रकारे वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात होत्या - प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्या रुग्णांवर मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच उपचार करण्याचा निर्धार त्यांचा होता. त्यामुळे ते फेलोशीपवर अमेरिकेला जाऊन त्यांनी तेथील पद्धती आणि प्रक्रियांचा बारकाईने अभ्यास केला आणि भारतात परत येऊन सुरुवात केली ती ‘डॉ. सुशील शाह’ज लॅबरोटरी’ ला... त्यांच्या गॅरेजमधूनच त्यावेळी या लॅबरोटरीला सुरुवात झाली तर त्यांचे स्वयंपाकघर हेच त्यांचे क्लिनिक होते.

“ आज आपण थायरॉईड चाचण्या, फर्टीलिटी चाचण्या आणि विविध हार्मोनल चाचण्यांबद्दल बोलतो. पण ८० च्या दशकांत या चाचण्या भारतात उपलब्धच नव्हत्या. या चाचण्या येथे सुरु करणारे ते पहिलेच होते. त्यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली आणि अशा सेवांवर लक्ष केंद्रीत केले ज्या देण्यासाठीचे आवश्यक कौशल्य इतरकांकडे नव्हते,” त्यांची कन्या अमीरा शाह अभिमानाने सांगतात.

वडिलांनी सुरु केलेल्या या एकमेव लॅबरोटरीचे परिवर्तन दोन हजार कोटी रुपयांच्या कंपनीत करणाऱ्या पस्तीस वर्षीय अमीरा आज जागतिक पॅथॉलॉजी साम्राज्याच्या शिखरावर आहेत. आज त्यांच्याकडे पहाताना या गोष्टीवर विश्वासही बसणार नाही की अवघ्या काही वर्षांपूर्वी अमीरा अशी एक एकवीस वर्षीय अननुभवी तरूणी होती जी भविष्याबाबत गोंधळून गेली होती.

तेंव्हापासून ते आजपर्यंतचा प्रवास होता तरी कसा?

“ मी न्यूयॉर्कमध्ये गोल्डमन सॅक्सबरोबर काम करत होते. कुणालाही हेवा वाटावा असे ते पद होते आणि ते मला मिळाल्याबद्दल माझ्या मित्रांना माझा हेवा वाटतही असे. पण मला मात्र त्यात मुळीच आनंद मिळत नव्हता. न्यूयॉर्क मध्ये रहाणे मला प्रचंड आवडत होते, पण आर्थिक सेवा क्षेत्र काही माझ्यासाठी नव्हते. माझी पैसे कमविण्याची मोठी महत्वाकांक्षाही कधीच नव्हती,” त्या सांगतात. अशा परिस्थितीत त्यांनी एक असंभवनीय गोष्ट केली, ती म्हणजे नोकरी सोडली. “ त्यानंतर फक्त पाच लोक असलेल्या एका स्टार्टअपबरोबर मी काम सुरु केले. जरी तो अनुभव सर्वोत्तम नसला, तरी त्यातून मी लवकरच एक गोष्ट शिकले, ते म्हणजे मला छोट्या कंपनीबरोबर, लहान टीमबरोबर काम करणे आवडते आणि इतर कशापेक्षाही जास्त दररोज प्रभाव पाडण्याची क्षमता मला आकर्षित करते. जर मी तेथे नसले, तर माझी उणीव प्रकर्षाने जाणवेल, ही भावनाच मला प्रचंड आवडते,” त्या सांगतात.


आपल्या आयुष्याबरोबर आपल्याला काहीतरी अर्थपूर्ण करायचे आहे, हे अमीरा यांना माहित होते, पण त्या सांगतात, “ जेंव्हा तुम्ही २१ वर्षांच्या असता आणि अशा गोष्टी बोलता, तेंव्हा तुम्हाला कोणीच गांभीर्याने घेत नाही.” कामाचे स्वरुप आणि अमेरिकेत त्यामुळे होणारा परिणाम, याबाबत समाधानी नसल्यामुळे, त्या अखेर सल्ल्यासाठी त्यांच्या वडिलांकडे वळल्या. त्यावेळी त्यांना वडिलांनी विचारले की तुला केवळ एक्झिक्युटीव्ह व्हायचे आहे की उद्योजक… “ या दोन्हीमध्ये काय फरक आहे,” त्यांनी विचारणा केली.

एक्झिक्युटीव्ह की उद्योजक

“ पहिला पर्याय स्वीकारल्यास, तुला उत्तम कारकिर्द, प्रतिष्ठा आणि पैसा मिळेल. जर तुला तेच करायचे असेल, तर तू अमेरिकेतच रहायला हवेस कारण तेथेच तुला सर्वोत्तम संधी आहेत. पण जर का तुला काही प्रभाव पाडायचा असेल, जर तुला त्या कंपनीच्या केंद्रस्थानी रहाण्याची इच्छा असेल अर्थात जेथे तुझे काम हे महत्वपूर्ण असेल, तर मात्र तू उद्योजकच बनायला हवेस. आणि ते साध्य करण्यासाठी तुला भारतात परतावे लागेल,” अमीरा यांना त्यांच्या वडीलांनी त्यांना हा सल्ला दिला. त्यांनी दुसऱ्या पर्यायाची निवड केली आणि २००१ मध्ये त्या भारतात परतल्या.

“ त्यावेळी तो निर्णय वादग्रस्तच ठरला होता. त्यावेळी भारताला आताप्रमाणे काही ‘इंडीया शायनिंग’ मानले जात नव्हते. उद्योजकता अस्तित्वात नव्हती. सुरुवातीला तरी तो सांस्कृतिक धक्काच होता. मी त्यापूर्वी भारतात कधीच काम केले नव्हते. वडीलांची लॅबरोटरी सोल प्रोपायटरशीपवर चालू होती. माझे वडील आणि त्यांचा उजवा हात असलेला एक कर्मचारी असे दोघेच मिळून सर्व निर्णय घेत असत. सर्व काही केंद्रीत होते. त्यावेळी संगणक, ईमेल्स, या व्यवस्था नव्हत्या. केवळ एकमेव व्यक्तीच सगळे निर्णय घेत असे. मात्र अशाने तुमची वाढ होऊ शकत नाही, असे मला वाटत होते. तेथे कोणतीही व्यवस्था नव्हती आणि सर्व काही खूपच अनियंत्रित होते,” त्या सांगतात.

दक्षिण मुंबईमध्ये १५०० चौरस फुटांच्या जागेत डॉ. सुशील शाह’ज लॅबरोटरी जोरात सुरु होती आणि पंचवीस वर्षांच्या आपल्या कार्यकाळाने त्यांनी चांगली प्रतिष्ठा आणि ग्राहकवर्गही मिळविला होता. “ पण ती केवळ एकमेव संस्था होती. दक्षिण मुंबईच्या पलीकडे कोणालाही त्याबाबत माहीती नव्हती. आपल्या लॅबरोटरीजचे जाळे भारतभर पसरविण्याचे माझ्या वडिलांचे स्वप्न होते, पण ते कसे साध्य करायचे याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नव्हती,” अमीरा सांगतात.

सुधारणा

अमीरा यांनी थेटपणे या परिस्थितीचा सामना केला. “ माझे सर्वात पहिले लक्ष होते ते सोल प्रोपायटरशीपचे परिवर्तन एका कंपनीत करण्याचे. आम्ही नवीन गुणवत्तेला वाव दिला, नवीन विभागांची निर्मिती केली, डिजिटलाईस्ड कम्युनिकेशन यंत्रणा सुरु केली आणि एसओपीज तयार केल्या. खरं तर हे सगळे माझ्यासाठी अगदी नवीन होते. मी नुकतीच बिझनेस स्कूलमधून बाहेर पडले होते, जेथे सामान्यपणे तुम्हाला मोठ्या कंपन्यांबाबत, कॅश फ्लो स्टेटमेंट बनविण्याबाबत आणि एक्सेलवरील फॉर्म्युला आणि कॅलक्युलेशनबाबत शिकविले जाते. पण प्रत्यक्ष लोकांचा समावेश असलेल्या आणि रोज उद्भवणाऱ्या समस्या कशा हाताळायच्या ते मात्र शिकविले जात नाही. त्याचबरोबर यंत्रणा कशी उभी करायची, एक छोटी कंपनी असताना आणि खूप पगार देण्याची क्षमता नसतानाही गुणवत्तेला कसे आकर्षित करुन घ्यायचे, हेदेखील मी शिकले नव्हते. त्यावेळी मी पूर्णपणे माझ्या हुशारीवर आणि पुढे जात रहाण्याच्या अंतःप्रेरणेवर अंवलंबून होते,” त्या सांगतात.


सुरुवातीलाच असे भरमसाट बदल करण्यासाठी त्यांना त्यांच्या वडीलांची मान्यता मिळाली नव्हती. अमीरा सांगतात, “ माझे वडील अशा लोकांपैकी नाहीत, ज्यांनी मला पहिल्याच दिवशी सर्वाधिकार दिले असते. मी अक्षरशः कस्टमर केअर काऊंटरपासून सुरुवात केली, जेथे मला रुग्णांना तोंड द्यावे लागत असे आणि रोजच्या समस्यांचा सामना करावा लागत असे. त्याचवेळी मी हे वाढविण्याचा विचारही करतच होते. माझ्या मते तो सर्वोत्तम निर्णय होता, कारण मी ‘टॉप टू बॉटम’ अर्थात वरुन खाली न येता ‘बॉटम टू टॉप’ दृष्टीकोनातून विचार करत होते. प्रत्यक्ष समस्यांची मला चांगली माहिती होती आणि त्यामुळेच काय करायची गरज आहे, याचीही. हे सुमारे दोन वर्षे सुरु राहीले.”

प्रगती पथावर

दोन वर्षांनंतर मात्र कंपनीच्या वाढीबाबत गंभीर होण्याचा निर्णय अमीरा यांनी घेतला. “ ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी दक्षिण मुंबईमध्ये पंचवीस वर्षांच्या काळात पॅथॉलॉजीमध्ये जशी प्रतिष्ठा मिळविली होती, तशीच प्रतिष्ठा इतर शहरांमध्ये आणखीही लॅबरोटरीजनी मिळविली असणार, असा विचार आम्ही केला. सुरुवातीला आम्ही आमचे नाव डॉ. सुशील शाह’ज लॅबरोटरीवरुन बदलून मोट्रोपोलिस (Metropolis) असे केले, कारण आता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याही स्पर्धेत येत होत्या. स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेल्या लॅबरोटरीजबरोबर करार करुन आम्हाला त्यांना मेट्रोपोलिसच्या एकाच छत्रीखाली आणायचे होते,” त्या सांगतात.

२००४ मध्ये मेट्रोपोलिसने पहिली भागीदारी केली. “ आमच्या निकषांमध्ये योग्य पद्धतीने बसतील असे चैनईचे पॅथॉलॉजिस्ट डॉ श्रीनिवासन यांची आम्हाला माहिती मिळाली. आमच्याबरोबर येण्यामागचे फायदे आम्ही त्यांच्यासमोर मांडले. आज, आमच्या अशा पंचवीस भागीदाऱ्या आहेत,” त्या सांगतात.

२००६ साली आयसीआयसीआय वेंचर्सच्या द्वारे मेट्रोपोलिसने फर्स्ट राऊंड फंडींग उभारले. तर २०१० मध्ये अमेरिकी इक्विटी फर्म वारबर्ग पिनकसने आयसीआयसीआयचा भाग खरेदी केला आणि मेट्रोपोलिसमध्ये मोठी गुंतवणूक केली. “ आम्हाला पैशाची गरज असण्यामागे एकमेव कारण होते ते म्हणजे आम्हाला इतर कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे होते, ज्यासाठी आम्ही कर्ज उभारु शकत नव्हतो,” २००६च्या भांडवल उभारणीबाबत बोलताना अमीरा सांगतात. “ आम्ही कोणत्याही मोठ्या औद्योगिक घराण्यातील नव्हतो, की ज्यामुळे आमच्याकडे गुंतवणूकीसाठी खूप पैसे असतील. सहाजिकच वाढीच्या प्रमाणानुसारच हे करणे शक्य होते. आजच्या स्टार्ट अप्स किंवा ई कॉमर्स कंपन्या, ज्यांचा महसूल दोन कोटी रुपयांचा असतो आणि जे प्रतिमहिना १०० कोटी खर्च करतात, असे ते नव्हते. आमच्याकडे असलेल्या पैशातूनच आम्ही खर्च करु शकत होतो,” त्या सांगतात. नुकतेच मेट्रोपोलिसने वारबर्ग पिनकसचे शेअर्स खरेदी केले आणि सध्या ते बाह्य गुंतवणूकदारांच्या शोधात नाहीत.

मेट्रोपोलिसच्या अभुतपूर्व वाढीचा पाया मात्र २००६ च्या आणि त्यांच्या बाह्य गुंतवणूकीच्या कितीतरी आधीच घातला गेला होता. “ २००२ मध्ये, ती केवळ एका लॅबसह सात कोटी महसुलाची कंपनी होती. तेथे सुमारे चाळीस ते पन्नास कर्मचारी होते. तेरा वर्षांच्या काळात आम्ही एका लॅबपासून ८०० केंद्रांपर्यंत येऊन पोहचलो आहोत आणि सात देशांमध्ये १२५ लॅबरोटरीज आहेत. आमचे मुल्यांकन २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि आमचा वार्षिक महसूल ५०० कोटी रुपये एवढा आहे,” अमीरा अभिमानाने सांगतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचा निर्णय केवळ एका संधीतून आम्ही घेतला. “ तेंव्हा आम्ही पूर्ण भारतभरही नव्हतो, तर फक्त मुंबई, चैनई आणि केरळमध्ये होतो. त्यावेळी आम्हाला भागीदारीची एक संधी आली, ज्याद्वारे आम्ही श्रीलंकेत प्रवेश करु शकू असे आम्हाला वाटले. भारतातील बाजारपेठ खूपच स्पर्धात्मक असल्याचे आणि दरनिश्चिती ही अनिश्चित असेल, हे आम्हाला माहित होते. तुलनात्मकरीत्या श्रीलंकेतील बाजारपेठ सोपी वाटत होती ( त्याचबरोबर श्रीलंका त्यांच्या वैद्यकीय गरजा सिंगापूरकडे आऊटसोअर्स करते). अशाप्रकारे आम्ही २००५ मध्ये श्रीलंकेत गेलो. तो धोरणात्मक निर्णय मुळीच नव्हता, पण तो चांगलाच यशस्वी ठरला. मध्य आशियात आणखी एक संधी २००६ मध्ये आली आणि आम्ही ती पकडली. तर २००७ मध्ये आफ्रीकेतही असेच घडले,” त्या सांगतात.

हेही वाचा

मुलीच्या साथीनं वडिलांनी निर्माण केला १०० कोटींचा ब्रँड


मेट्रोपोलिससाठी काम करताना कामाच्या विविध संस्कृतींशी जुळवून घेण्यात अमीरा यांना खूप आनंद मिळतो. “ या सर्व प्रकारच्या बाजारपेठा वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. श्रीलंका ही आरामशीर जागा आहे. तेथे अनेक सार्वजनिक सुट्ट्या असतात पण भारताप्रमाणेच तेथे श्रेणी आहेत. मध्य आशियातील बाजारपेठ जगभरात ते दर्शवत असलेल्या प्रतिमेवर लक्ष केंद्रीत करते. तसेच कॉर्पोरेट वातावरणात काम करण्याकडे त्यांचा कल असतो. दक्षिण आफ्रीकेतील प्रत्येक देश वेगळा आहे. त्यांच्या व्यवसायाबाबत ते खूपच व्यावसायिक आहेत. याबाबतीत ते आपल्या देशापेक्षा वेगळे आहेत. तसेच भारतात तुम्ही कामाचे तास वाढवू शकता पण तेथे मात्र ९ ते ५ या वेळेचे कडक पालन केले जाते,” अमीरा सांगतात.

“कामाची एक सातत्यपूर्ण पद्धत असणे हे जगभरात पसरलेल्या आमच्यासारख्या कंपनीसाठी महत्वाचे आहे. केनिया आणि भारतात बसलेल्या मेट्रोपोलिसच्या कर्मचाऱ्यांचे नीतीशास्त्र आणि दृष्टीकोन हे सारख्याच मूल्यांवर आधारीत असले पाहिजेत. ही मूल्ये म्हणजे एकाग्रता, प्रामाणिकपणा, दयाभाव आणि आपण जे काही करत आहोत त्यासाठी जबाबदारीची जाणीव,” अमीरा सांगतात.

एकीकडे उत्तुंग यश मिळत असतानाच मेट्रोपोलिसने काही तेवढ्याच निराशाजनक अपयशांचाही सामना केला आहे. “ आमच्या बहुतेक भागिदाऱ्या यशस्वी ठरल्या आहेत. मात्र त्यापैकी काही अयशस्वीही झाल्या आहेत. त्यावेळी ती भागीदारी तातडीने करणे हे आमच्यासाठी अधिक गरजेचे असल्याने जास्त विचार न करता त्या केल्या गेल्या,” अमीरा सांगतात. त्यामुळे आज काही गोष्टी वेगळ्या प्रकाराने करायला हव्या होत्या, असे त्यांना वाटते.

“ आरोग्यसेवा क्षेत्राकडे पारंपारिकरितीने बहुतेकदा पुरषी वर्चस्वाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाते. एक तरुण स्त्री असूनही लोक माझ्याकडे गांभीर्याने बघतील हे पहाणे, हा एक मोठाच अडथळा होता. त्याचबरोबर वैद्यकीय पार्श्वभूमी नसतानाही या क्षेत्रात उद्योजक बनण्याची इच्छा असल्यानेही मी काहीशी मागे पडत होते. मागे वळून पहाताना मी जर कोणती एक गोष्ट वेगळ्याप्रकारे केली असती तर ती म्हणजे केवळ संधीच्याच मागे न लागता अधिक धोरणात्मक राहीले असते. भागीदारी आणि संधींच्या माध्यमातून उद्योग उभारण्यामागे फायदा असतो. जेंव्हा संधी येतात, तेंव्हा त्या पटकन येतात. पण त्या तेवढ्याच पटकन जातातही. संस्थात्मक वाढ अधिक मोलाची असते. मला वाटते मी त्यावर अधिक लक्ष द्यायला हवे होते,” अमीरा सांगतात.

पुरुषांच्या क्षेत्रात महिलेचा ठसा

एक तरुण स्त्री बॉस म्हणून काम करताना अमीरा यांना अनेकदा लिंगभेदाचा सामना करावा लागला. त्यांना केवळ सेक्रेटरी समजण्यापासून ते कनिष्ठ पुरुष कर्मचाऱ्यांकडून सातत्याने कमी लेखले जाण्यापर्यंत, त्यांना अनेकदा हा त्रास सहन करावा लागला. पण, एका शहाण्या महिलेने म्हटल्याप्रमाणे, जिंकता येतील, अशाच लढायांवर त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले. “ कामाच्या ठिकाणी महिलांना लिंगभेदाशी द्यावा लागणारा लढा आणि एका महिला उद्योजकाला द्यावा लागणारा लढा हा वेगळा असतो. एका महिला उद्योजकासाठी - कारण तुम्ही एक संस्था आणि संस्कृती उभारत असता- परिस्थिती अगदी वेगळी असते. जेंव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रॅंड उभारत असता, तेंव्हा तुम्हाला तुमची कथा बाहेर जाऊन विकावी लागते. सर्वाधिक लिंगभेदाचा सामना तेंव्हाच करावा लागतो,” त्या सांगतात.

अमीरा पुढे सांगतात, “ माझा अनुभव असा आहे, की बहुतेकांना त्यांच्यासमोर एक महिला बरोबरीने बसली आहे हे पाहूनच अस्वस्थ वाटते. हा त्यांचा दोष नाही. त्यांनी महिलांना नेहमी केवळ दोनच रुपात पाहिलेले असते – आई किंवा पत्नी – पण कामाच्या ठिकाणी पाहिलेले नसते. त्यामुळे स्वतःच्या बरोबरीने महिलेकडे त्यांना पहाताच येत नाही. त्यांना महिलांना संरक्षण देण्याचा किंवा त्यांच्या गरजा पुऱ्या करण्याचाच अनुभव असतो.”

अमिरा यांच्या मते समस्येकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याची दखल घेणे आवश्यक असते. “ पण दखल घेणे याचा अर्थ अशा वागण्याला क्षमा करणे असा नाही. माझे कामच माझ्यावतीने बोलेल. महिलांनी त्यांच्या ताकदीवर लक्ष केंद्रीत करुन ही परिस्थिती निष्फळ केली पाहिजे,” त्या सल्ला देतात.

भविष्यातील योजना

आपल्या कंपनीच्या भविष्याबाबत अमीरा खूपच उत्साही आहेत. “ गेल्या दोन तीन वर्षांपासून मेट्रोपोलिस खर्चाच्या टप्प्यावर होते, जेंव्हा आम्ही आमचे लोक, पायाभूत सुविधा, वितरण, नेटवर्क आणि सेल्समध्ये गुंतवणूक करत होतो. आता मात्र आम्ही केलेल्या या कामाचे फळ मिळण्याबाबत मी आशावादी आहे. हे जवळच्या भविष्यासाठी आहे,” त्या सांगतात.

“ तर आणखी लांबचा विचार करता, ग्राहक बदलत आहे. त्यांची मानसिकता बदलत आहे. मला या उद्योगात अधिक व्यावसायिकता आणायची आहे तसेच भविष्याचा विचार करुन यामध्ये नाविन्य आणायचे आहे आणि बिझनेस मॉडेलमध्ये मोठा बदल करायचा आहे. मला मेट्रोपोलिस आणखी देशांत न्यायचे आहे आणि जगभरातील उदयन्मुख बाजारपेठांमध्ये लॅब्सचे प्रत्यक्ष जाळे उभारयचे आहे. हे माझे स्वप्न आहे,” त्या सांगतात.

अमीरा आठवड्यातून तीन वेळा टेनिस खेळतात तर दोनदा व्यायाम करतात. त्यांना एसी कार्यालयात बसून रहायला मुळीच आवडत नाही आणि संधी मिळताच त्या बाहेर पडतात. “ मला सेलिंग, कॅंपिंग आणि ट्रेकींगची प्रचंड आवड आहे. मला वेळ मिळाला की मी शारीरीक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त उपक्रमात स्वतःला गुंतवून घेते आणि माझ्या प्रिय व्यक्तींबरोबर वेळ घालवते,” त्या सांगतात. आजपर्यंत त्यांना मिळालेला सर्वोत्तम सल्ला कोणता असे विचारताच त्या सांगतात, “ फेल बेटर’.

मोलाचा सल्ला

गेल्या चौदा वर्षांतील चढउतारांमुळे अमीरा यांच्याकडे देण्यासाठी एक चांगला सल्ला आहे. “ तुम्हाला तुमच्या कक्षा रुंदावत ठेवाव्या लागतात. आहे त्याच परिस्थितीत आरामात रहाणे हा मानवी स्वभाव आहे. आपल्याला सर्वाधिक नावडणारी गोष्ट असते ती म्हणजे अनिश्चितता... त्याची आपल्याला भीती वाटते. पण शेवटी तुम्ही त्याच परिस्थितीत पोहचता. तुम्ही तुमची सीमा जेवढी वाढवाल, तेवढा तुम्हाला स्वतःचा शोध लागेल आणि तुमच्यात काय करण्याची क्षमता आहे, हेदेखील समजेल,” त्य़ा सांगतात.

यशस्वी महिला उद्यमिंच्या कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

दार्जिलिंगचा पायथा ते केनिया, एकोम माणिकला सापडलेली स्टार्टअपची अनोखी कल्पना !

देशवासियांना स्वस्तात पाणी देणा-या ‘पी.लक्ष्मी राव यांच्या संघर्षपूर्ण यशाची अनोखी कहाणी !

आणखी काही प्रेरणादायी यशोगाथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

लेखक – राखी चक्रवर्ती

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन