‘3 इडियट्स’चे फुंसुख वांगड़ू या प्रत्यक्ष आयुष्यातील ख-याखु-या हिरोस मिळाला ‘रोलेक्स अॅवाॅर्ड फॉर एंटरप्राइज २०१६’

0


‘३ इडियट्स’ या चित्रपटातील फुंसुख वांगड़ू हे पात्र आपणा सर्वांनाच परिचित आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल कि हे पात्र काल्पनिक नाही, तर लद्दाख मध्ये वास्तव्यास असलेले इंजिनियर सोनम वांगचुक यांच्या कडून प्रेरणा घेऊन साकारण्यात आलेले खरेखुरे पात्र आहे. 3 इडियट्स मध्ये आमीर खान यांनी फुंसुख वांगड़ू यांच्या खऱ्या जीवनाची व्यक्तिरेखा प्रत्यक्षात साकारली आहे. वांगचुक यांना नुकतेच ‘रोलेक्स अॅवाॅर्ड फॉर एंटरप्राइज २०१६’ सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना लॉस एंजलिस येथे प्रदान करण्यात आला. जागतिक स्तरावर अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार जगभरातल्या एकूण १४० जणांना देण्यात आला.

वांगचुक हे अशा मुलांसाठी काम करत आहे जे शिक्षणात गतिशील असून त्यांना परिस्थिती अभावी पुढील शिक्षण घेणे शक्य होत नाही. किवा गरीब परिस्थितीमुळे अपेक्षित क्षेत्रात जाणे शक्य होत नाही. अशा मुलांना शिक्षणासाठी मदत करून त्यांची स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचे काम वांगचुक करत आहे. शिक्षण तसेच पर्यावरण क्षेत्रात ते काम करत आहे. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी या कामाला पूर्णपणे वाहून घेतले आहे. त्यांनी यासाठी एजुकेशनल अॅन्ड कल्चरल मूवमेंट ऑफ लद्दाख (SECMOL) या नावाची संघटना तयार केली आहे.

लहानपणी वांगचुक सात वर्षांपर्यंत आपल्या आईबरोबर लद्दाख येथील एका दुर्गम गावात राहायचे. येथे राहून त्यांनी अनेक स्थानिक भाषा आत्मसात केल्या. जेव्हा त्यांनी लद्दाख येथे शिक्षण विषयक कार्य सुरु केले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुलांना प्रश्नांची उत्तरं माहिती असतात मात्र त्यांचा सर्वात मोठा अडसर म्हणजे भाषा आहे. त्यानंतर त्यांनी स्थानिक भाषेत तेथील मुलांना शिकवायला सुरुवात केली.

जम्मू-कश्मीर सरकार बरोबर लद्दाखच्या शाळेतील अभ्यासक्रमाला त्यांनी स्थानिक भाषेत तयार करण्याचे कार्य हाती घेतले. १९९४मध्ये त्यांनी शाळेतून काढून टाकण्यात आलेल्या १००० तरुणांची संघटना तयार केली आणि त्यांच्या मदतीने एक अशी शाळा काढली जी विद्यार्थामार्फतच चालवली जाते. या शाळेत पूर्णपणे सौर उर्जेचा वापर केला जातो. वांगचुक यांना वाटते की शालेय अभ्यासक्रम बदलणे आवश्यक आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पुस्तकी अभ्यासक्रमापेक्षा प्रात्यक्षिकांचा अवलंब जास्त हिताचा आहे. या सर्व बाबी प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रोलेक्स पुरस्कार यापूर्वी अरुण कृष्णमूर्ति यांना मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या एनजीओ मार्फत पर्यावरणासाठी काम केले. तलाव वाचवण्यासाठी त्यांनी पुरेपूर योगदान दिले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोनम वांगचुक अनेक अडचणींवर मात करत लोकहितासाठी आणि शिक्षणक्षेत्रात काम करत आहे. आधुनिक शिक्षण पद्धती तयार करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे आणि काही अंशी त्यांच्या या कार्याला यशही मिळाले आहे.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया