‘एबीसी ऑफ ब्रॉडकास्ट न्यूज’ प्रसार माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त

‘एबीसी ऑफ ब्रॉडकास्ट न्यूज’  प्रसार माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त

Thursday March 23, 2017,

2 min Read

मुंबई दूरदर्शनचे सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी लिहिलेले ‘एबीसी ऑफ ब्रॉडकास्ट न्यूज’ हे पुस्तक इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना तसेच देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालये यांमधील जनसंवाद शाखेच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे उपयुक्त ठरेल असा विश्वास राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केला. प्रसारण पत्रकारितेतील मूलभूत तत्वे व तंत्र शास्त्रीय पद्धतीने समजावून देणार्‍या या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.


image


गेल्या २० वर्षांच्या काळात माध्यम क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले असून आज विविध विषयांना समर्पित ५०० हून अधिक दूरचित्रवाणी वाहिन्या निर्माण झाल्या आहेत; त्यात अनेक वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. याच काळात इंटरनेट तंत्रज्ञान आले, मोबाईल फोन, स्मार्ट फोन, सोशल मिडीया, व्हाटसअॅप सारख्या प्रणाली आल्या. त्यामुळे प्रसार माध्यम व वृत्त प्रसारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले. या पार्श्वभूमीवर माध्यम क्षेत्रात प्रशिक्षित माध्यम प्रतिनिधींची विशेष गरज निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. प्रसार माध्यमांनी समाजातील उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, अशीही अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी दूरदर्शनद्वारे निर्मित सपना साखरे या सोलापूर जिल्ह्यातील लहान मुलीच्या जीवनावर आधारित ‘सपना’ या लघुपटाचे राज्यपालांच्या उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आले. 

एका विचित्र अपघातात वडील जायबंदी झाल्यापासून पंधरा वर्षाची सपना साखरे कीर्तन व भजन करून आपल्या वडिलांच्या आजारपणाचा खर्च करीत आहे, तसेच आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहे. त्याशिवाय कीर्तनाच्या माध्यमातून मुलींना जगू द्या असा संदेश देत आहे. या तिच्या कामाबद्दल राज्यपालांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी तिचा सत्कार करण्यात आला होता. सपनाच्या जीवनावर दूरदर्शनने लघुपट तयार केला असून विजय भिंगार्डे यांनी तो दिग्दर्शित केला आहे. त्यातून बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संदेश देण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांसह सर्व उपस्थितांनी सपनाला कौतुकाची थाप दिली. (महान्युज)