ध्येयसमोर ठेवून काम करा : मुख्यमंत्र्यांनी जागविली तरुणांची उमेद !

ध्येयसमोर ठेवून काम करा : मुख्यमंत्र्यांनी जागविली तरुणांची उमेद !

Tuesday April 04, 2017,

4 min Read

युवाशक्तीच देशाचा सर्वोत्तम विकास करु शकते. देशाला महासत्ता बनविण्यासाठी उद्दात्त हेतूने प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने परिवर्तन दूत बना, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या ग्रामीण विकास फेलोशिपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशदा येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

देशाच्या विकास प्रक्रियेत एक मुलभूत काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे, या संधीचे सोने करा, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत विविध सरकारी योजना आहेत. तरीही स्वातंत्र्यानंतर आजही गरिबी मागासलेपण, रोगराई अशी विषमता का आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधताना एका ध्येयाने काम केले पाहिजे. विविध योजनांचे एकत्रीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही, असे लक्षात आले, म्हणूनच वेगवेगळ्या जलसंधारणाच्या 14 योजनांचे एकत्र आणून जलयुक्त शिवार अभियान सुरु केले. परिणामी या अभियानाच्या माध्यमातून मोठे यश मिळत आहे.


image


शासकीय यंत्रणा मोठी ताकद आहे. त्याच पध्दतीने खाजगी क्षेत्राचे गुणवत्ता, तंत्रज्ञान याचे मोठे महत्व आहे. यांच्या एकत्रीकरणातून ग्राम विकास फेलोशिपच्या माध्यमातून परिवर्तन दूत गावात विश्वास निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, यामधून गावांत निश्चितच परिवर्तन होईल. भविष्यात हळूहळू होणारे परिवर्तन पाहून लोक आपल्या गावासाठी वेगाने काम करतील. सर्वांना सोबत घेवून आम्ही परिवर्तन करु, ही भावना ठेवून काम करा. देश बदलायचा आहे, देशाला महासत्ता करायचा आहे. या उद्दात्त ध्येयाने प्रेरित होऊन परिवर्तन करा. परिवर्तन केल्याशिवाय परत जाणार नाही असे ठाम ठरवा, असे ते यावेळी म्हणाले.

देशाच्या विकासात, परिवर्तनात मी काय केले याचे उत्तर आपण दिले तर आपण राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन सर्वोत्तम काम करु शकू, सगळे मिळून गावे बदलू, परिवर्तन करु एक नवं राज्य देशासमोर उभं करु, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.


image


महात्माां गांधी म्हणायचे देश बदलायचा असेल तर गावे बदलली पाहिजेत, असे सांगून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुढे म्हणाले, गाव बदलण्यासाठी माणूस बदलला पाहिजे. हे काम युवक करु शकतील. विकासाच्या दृष्टीने मागे पडलेली गावे पुढे आणण्यासाठी हा आजचा महत्वाचा कार्यक्रम आहे. हे युवक गावांमधल्या विषमतेच्या दऱ्या कमी करतील. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलून देशासमोर चांगलं उदाहरण निर्माण करतील. वेळ लागेल पण हरकत नाही, पाच वर्षानंतर निश्चित यश मिळेल. यातून देशाला दिशा मिळेल. दिल्ली बदलून देश बदलणार नाही. प्रथम गल्ली बदलली पाहिजे, ते काम तुम्ही हातात घेतले आहे, त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा, असेही ते म्हणाले.

ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, जलयुक्त शिवार अभियानाने देशाला दिशा दिली. या योजनेला महाराष्ट्राने जन्म दिला. ही योजना देश स्वीकारतोय. ग्रामविकास फेलाशिपच्या माध्यमातून कार्पोरेट आणि शासकीय यंत्रणा यांना एकत्र करुन खूप मोठे उदहारण देशासमोर ठेवले आहे. मजबूत पाया असल्याशिवाय इमारत उभी राहत नाही. त्याचप्रमाणे सक्षम ग्रामविकास होणार नाही, तोपर्यंत देश मजबूत होणार नाही. ग्रामीण विकास हा देशाचा मजबूत पाया आहे. गावांच्या नियोजनबध्द विकासासाठी विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत.

शासन, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकत्रिकरणातून ग्राम विकास करण्याचे ध्येय या कार्यक्रमातून ठेवण्यात आले आहे. विकासाची मुळे ग्रामीण भागात रुजल्याशिवाय महासत्तेची फळे चाखता येणार नाहीत. इमारत, पूल पडले तर ते पुन्हा बांधता येतात. परंतु ग्रामीण भागातील माणूस पडला तर बांधता येणार नाही. त्यासाठी ग्रामविकास दूत निश्चितपणे गावा गावात जाऊन माणसे बांधतील म्हणजेच ग्रामविकास करतील.


image


मुख्यमंत्र्यांनी जागविली तरुणांची उमेद . . . !

या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरंपच व ' परिवर्तन दूतांची ' उपस्थिती होती. दिवसभर चर्चा व आपापल्या अनुभवांचे कथन झाल्यानंतर मुख्य भाषणाच्या पूर्वी निवडक" परिवर्तन दूतांशी" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.

तरुणाईच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या माध्यमातून आपल्याला एक हजार गावांपर्यंत पोहोचायचे आहे. या गावांमध्ये शासनाच्या योजना नाहीत, असे नाही. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत विधायक अशा योजना आहेत, परंतु त्या नीटपणाने पोहोचल्या नसाव्यात अथवा राबविल्या नसतील. आता आपले " परिवर्तन दूत " म्हणजेच तुम्ही गावात जाणार आहात.

गावात जाताना कुठलीही शंका येऊ देऊ नका. ध्येय ठेवून काम करा. गावातील समस्या एकमेकांत गुंतलेली आहे. गरिबी, आरोग्य, कोरडवाहू शेती अशा अडचणी आहेत. त्या एकमेकांशी निगडीत आहेत. त्या नीट समजावून घ्या. लोकांमध्ये विश्वास निर्माण करा. त्यांच्याशी समरस व्हा . . त्यांचे प्रश्न समजून घ्या. अन् मग ध्येय ठेवून काम करा.

एक तरुण म्हणाला , " काही महिला सरपंचाचे पती दैनंदिन कामात फार लुडबुड करतात. त्यांना पुढे येऊ देत नाहीत. " यावर मुख्यमंत्री म्हणाले, महिलांमध्ये कामाची तडफ आहे. त्यांच्या कामाची पद्धत पाहून थक्क व्हाल. एखादा अनुभव असू शकतो. पण निराश होऊ नका . सर्वप्रथम त्या भागाची परिस्थिती समजावून घ्या. नेतृत्त्वाला चारित्र्याची जोड असेल तर अजिबात अडचण येणार नाही. तुम्हाला नेतृत्व करावयाचे आहे.

समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांनी ध्येयाने प्रेरित होऊन काम केले. आपणही ध्येयसमोर ठेवून काम करा, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी तरुणांना दिल्याने त्यांची उमेद निश्चितच वाढली हे मात्र खरे.. !