योगाच्या मातृभूमीतच आंतरराष्ट्रीय ओळख देण्याचा ‘योग अलायंस इंटरनँशनलच्या अक्षर यांचा प्रयत्न!

योगाच्या मातृभूमीतच आंतरराष्ट्रीय ओळख देण्याचा ‘योग अलायंस इंटरनँशनलच्या अक्षर यांचा प्रयत्न!

Sunday November 22, 2015,

4 min Read

“सतरा अब्ज डॉलर्स” ते आपल्या आवाजातील अविश्र्वासाचा भाव लपवण्याचा प्रयत्न करत सांगतात. “ अमेरिकेत योगाचा व्यवसाय आजघडीला इतका मोठा आहे.” आणि ही रक्कम खरोखर पटवून देण्यासाठी ते बाजुला असलेली लेखणी उचलून कागदाच्या तुकड्यावर “१७” अंक लिहून दाखवतात.

image


योगाला त्याच्या मातृभूमीत गतवैभव मिळवून देण्यासाठी अक्षर यांनी प्रयत्न केले. ते भारतवर्षाच्या सुदैवाने योगाचे शिक्षण देणा-या योग्यांना “योग अलायंस इंटरनँशनल”च्या मंचावर घेवून गेले, आणि त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अक्षर मानतात की योग भारताचा प्राचीन ठेवा आहे, आणि आम्ही त्यावर लक्ष देत नाही. अमेरिकेने योगाला व्यापार म्हणून जगासमोर सादर केल्यावरच आम्हाला आमच्या या सांस्कृतिक ठेव्याबद्दल जाग आली.

“ अखेर एखादी आई आपले अपत्य दुस-यांकडे का सांभाळण्यास देईल?” अक्षर विचारतात. “ आतापर्यंत भारतात योग शिकण्यासाठी आम्ही अमेरिकेतून येणा-या योग शिक्षकांवर निर्भर होतो, पण हे ज्ञान तर मुळचे याच देशातील आहे, मग आमच्या देशातील योग शिकवणा-यांना इतर कुणा देशाच्या प्रमाणपत्रांची गरजच काय?” असेही ते विचारतात.

आमच्या देशातील योग शिक्षकांची स्थिती पाहून प्राचीन हिमालयी योगसंस्कृतीच्या या ध्वजवाहकाची चिंता रास्त वाटते. सध्या भारतात योगाचे शिक्षण देणा-या शिक्षकांचा एक मोठा वर्ग अमेरिकेत बसलेल्या योग्यांव्दारे प्रमाणित आहे. आपल्याच देशातील या प्राचीन परंपरेला तिच्याच जन्मभूमीवर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करत त्यांनी “योग अलायंस इंटरनँशनल” ची स्थापना केली, आणि ते आता तीला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांच्या या कार्याला मोठ्या प्रमाणात यशही येताना दिसत आहे आणि रशिया, चीन, युरोपशिवाय अमेरिकेतील काही योग संस्था त्यांच्या संस्थेशी संलग्न झाल्या आहेत. हेच अक्षर यांचे यश आहे की भारतातून एक जागतिक योग संस्था चालवली जात आहे ज्याचे ते आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आहेत. त्याशिवाय ते योगाला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच बंगळूरू मध्ये एका योग संमेलनाचे आयोजन करत आहेत.

खांद्यावर रुळणारे केस आणि दाढी यात उजळणारा चेहरा, आणि कमरेला धोतर असा वेश असणारे अक्षर प्रथमतर अमरकथामधील वर्णन केलेल्या एखाद्या संतासारखे दिसतात. बंगळूरूच्या सर्वात यशस्वी योग संस्थेचे संस्थापक आणि मालक अक्षर एखाद्या आयआयएमच्या पदवीधराप्रमाणेच व्यापाराबाबत चर्चा करतात. हेबल मध्ये पावर योगा केंद्रात योगमुद्रेत पद्मासनात बसलेल्या तीस वर्षांच्या या योगचिकित्सकाला खूप मोठा मान-सन्मान दिला जातो.

सध्या अक्षर आपल्या पावर योगा केंद्राच्या विस्ताराच्या दिशेने दिवस-रात्र एक करत आहेत, आणि कुर्ग मध्ये नवीन केंद्र सुरु करण्याच्या तयारीत आहेत. हे ठिकाण त्यांच्या म्हणण्यानुसार योगाच्या अनुयायींसाठी एका धर्मस्थळाप्रमाणे असेल. “या केंद्रात योग शिकणा-यांना कमांडोप्रमाणे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. या शिवाय हे जगातील एकमेव योगप्रशिक्षण केंद्र असेल जिथे योगाशी संबंधित सर्व प्रकारचे ज्ञान सहज मिळू शकेल.” या शिवाय त्यांना भारताचे योगकेंद्र म्हैसूर येथेही लवकरच एक नवी संस्था सुरु करायची आहे.

image


योगाच्या मुद्रांबाबत सांगताना अक्षर म्हणतात की, त्यांच्याकडे सध्या योगाबाबत तीन विदेशी जाणकार, त्यातील एक ईराण आणि दोघे पँरिस येथील आहेत, जे प्रशिक्षण घेत आहेत. सकाळच्या सत्रात विविध योगासने केली जातात. “ दिवसाच्या सत्रात प्रशिक्षणार्थींना त्या ऋषींचे स्मरण करण्यास सांगितले जाते, ज्यांच्या नावाने विविध योगासनांचे नामकरण केले आहे.”

प्रत्येक सत्राच्या शेवटी विद्यार्थी त्यांना दंडवत घालतात तेंव्हा लक्षात येते की कशाप्रकारे येथे भारतीय परंपरा आणि आध्यात्मिकता यांचे पाठ दिले जातात. इथल्या प्रत्येक वर्गाची सुरूवात ‘ॐ’च्या उच्चाराने आणि सूर्यनमस्काराने केली जाते.

अक्षर जगन्नाथ परंपरेचे अनुयायी आहेत, आणि पूरी येथील जगन्नाथ मंदिरात सूर्यदेवतेची पुजा करतात. हिमालयात जन्माला आलेले अक्षर स्वत:ला जन्मत: योगी मानतात. “ योग्यांचे दोन प्रकार असतात, एक जे योगाच्या अभ्यासाच्या माध्यामातून योगी बनतात आणि दुसरे जे जन्मत:च योगी आहेत. जर तुमचा जन्म हिमालयातला असेल तर नक्कीच तुम्ही योगी आहात” ते सांगतात.

अक्षर यांनी काळाची गरज ओळखून योग पध्दतीत काही बदल केले आहेत. या ठिकाणी वजन कमी करण्यासाठी येणा-यांची मोठी यादी त्याचेच निदर्शक म्हणावे लागेल. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लागेलेले त्यांचे फलक पंधरा दिवसात तीन किलो वजन कमी करण्याचे वचन देत असल्याने लोक आकर्षित होतात.

“ पारंपारीक पध्दतीने योग परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग आहे, ज्यात वेळ, काळ आणि स्थान यानुसार बदल केला जाऊ शकतो. हेच कारण आहे की आम्ही योगाच्या मूळ स्वरुपाला धक्का न लागू देता लोकांना शिकवतो आहोत. जसे १९व्या शतकात केल्या जाणा-या अभ्यासाला आता पारंपारीक मानले जाते तसेच भविष्यात या नव्या बदलांचा परंपरा म्हणून स्वीकार केला जाईल.”

अक्षर पावर योगाच्या बहुतेक वर्गात वजन कमी करण्यासाठी आलेल्यांची गर्दी असते. “लठ्ठपणाची समस्या आमच्या देशात वेगाने पसरत आहे, आम्ही अमेरिकेच्या मार्गावर आहोत. आम्ही इथे येणा-या सर्वांना कठोर परिश्रम करायला लावून वजन कमी करून घेतो, त्यानंतर त्यांना वास्तविक योग ‘आसन’ दाखवली जातात. त्यामुळे वाढलेले वजन योगसाधनेच्या आड येत नाही.” या शिवाय अक्षर जगभरातील योगाच्या भविष्यातील शिक्षकांचे प्रशिक्षणही घेतात. त्यांना पूर्ण विश्वास आहे की, भविष्यात भारत जगाचा योग गुरू बनून आपले गतवैभव परत मिळवेल.

लेखक : अरथी मेनन

अनुवाद : किशोर आपटे.