भारतातील २० उदयोन्मुख कंपन्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी ब्रिटनच्या कंपनीचा ‘IE20’ उपक्रम

भारतातील २० उदयोन्मुख कंपन्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी ब्रिटनच्या कंपनीचा ‘IE20’ उपक्रम

Saturday November 28, 2015,

2 min Read

लंडन अँड पार्टनर्स या गुंतवणूक कंपनीचे प्रतिनिधी सध्या भारतातील सर्वात वेगानं विकास करणाऱ्या आणि जागतिक पातळीवर येऊ शकतात अशा २० कंपन्यांच्या शोधात आहेत. या कंपनीनं ग्लोबल इंडिया एमर्जिंग २० (IE20) या उपक्रमांतर्गत ही मोहीम उघडली आहे. या उपक्रमाला बीडीओ इंडिया, न्यूलँड चेज, युके ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट अँड ब्रिटीश एअरवेज यांनी पाठिंबा दिलाय.

दोन हजार आंतरराष्ट्रीय उद्योगांना जागतिक पातळीवर विस्तार करण्यासाठी लंडन अँड पार्टनर्स कंपनीनं आतापर्यंत मदत केली आहे. इंडिया एमर्जिंग २० या उपक्रमातून भारतातील या २० कंपन्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचा हेतू असल्याचं लंडन अँड पार्टनर्सचे भारतातील उपाध्यक्ष आणि प्रमुख प्रतिनिधी गौतम सेहगल यांनी सांगितलंय.


image


आज भारतातील अनेक कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण IE20 उपक्रमातून फक्त २० सक्षम कंपन्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या उपक्रमातील विजेत्यांकडे जागतिक प्रसारमाध्यमं आणि व्यापार क्षेत्राचं लक्ष वेधलं जाणार आहे. यातून त्यांना जागतिक पातळीवर भागीदारी,करार आणि इतर संधीही उपलब्ध होणार आहेत. विजेत्यांना लंडनला घेऊन जाण्यात येणार असून ज्येष्ठ उद्योजक आणि निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळणार आहे. तसंच पुरस्कार सोहळ्यातूनही जागतिक गुंतवणूकदार, सल्लागार, कर्मचारी आणि ग्राहकांशी संबंध स्थापन करण्याची संधी विजेत्या कंपन्यांना मिळणार आहे.

वेगाने विकास करत असलेल्या देशांपैकी भारत हा लंडनसह युकेसाठी महत्त्वाचा भागीदार असल्याचं लंडन अँड पार्टनर्स कंपनीचे सीईओ गॉर्डन इन्स सांगतात. वाढतं तंत्रज्ञान क्षेत्र, अतिकुशल मनुष्यबळ यामुळे लंडनसाठी थेट परकीय गुंतवणुकीकरीता भारत ही जगातील दुसरी मोठी बाजारपेठ असल्याचंही ते सांगतात.

भारतीय कंपन्यांना यात नामांकन मिळवण्यासाठी कंपनीतर्फे काही अटी घालण्यात आल्या आहेत.

१. सहभागी होणारी कंपनी २००० साली किंवा त्यानंतर भारतात स्थापन झालेली असावी, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याबाबत कंपनी महत्त्वाकांक्षी असावी.

२. माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, निर्मिती, लाईफ सायन्स किंवा अर्थ आणि व्यावसायिक सेवा (प्रामुख्याने ज्ञानाधारीत कंपन्या) या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या यात सहभागी होऊ शकतात.

या उपक्रमाची नॉलेज पार्टनर असलेल्या व्हॅल्यूनोट्स कंपनीनं अत्यंत कडक अशी मुल्यांकन पद्धत तयार केली आहे. सहभागी झालेल्या कंपन्यांना या तिहेरी मुल्यांकन पद्धतीमधून जावं लागणार आहे. पण कंपनीचा व्यवसाय आणि उद्योगांमधील वैविध्य याचा विचार करुन ही मुल्यांकन प्रक्रिया लवचिक ठेवण्यात आल्याचं गौतम सांगतात. सर्व कंपन्यांसाठी दर्जात्मक पद्धत सारखी असली तरी व्यावसायिक वातावरण, उत्पादन आणि सेवा यांचा विचार करुन मुल्यांकनाचे निकष आणि प्रभावाचे मुद्दे भिन्न आहेत.

जागतिक पातळीवर टिकण्याची क्षमता, नाविन्य आणि वेगळेपणा तसंच प्रत्यक्ष कामगिरी या तीन निकषांवर गुण दिले जाणार आहेत. युरोपीय बाजारपेठेत लंडनला मिळणारा सहजप्रवेश आणि भरपूर कुशल मनुष्यबळ यामुळे भारतीय कंपन्या या शहराकडे आकर्षित होतात असं गॉर्डन सांगतात. त्यामुळेच भारतीय कंपन्यांना लंडनमध्ये स्थिर होण्यासाठी मदत करण्याची तयारी लंडन अँड पार्टनर्स कंपनीनं दाखवली आहे. तर या IE20 उपक्रमातील विजेत्या कंपन्यांचा खास पुरस्कार सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये आजोजित केला जाणार आहे.

वेबसाईट : www.indiaemerging20.com


लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद- सचिन जोशी