बाबासाहेबांच्या विचारांना सर्वदूर पोचवणारा भिमकंदील...

0

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. देशातच नव्हे तर जगभरात या महामानवाला श्रध्दांजली अर्पण केली जातेय. कुठे भीमगीतांचा कार्यक्रम आहे. तर कुठे बाबासाहेंबांवरच्या पोवाड्यांचा कार्यक्रम. तर कुठे बाबासाहेंबांवरच नाटक. कुठे चित्रकला स्पर्धा तर मुंबई विद्यापिठात नेतृत्व या विषयावरची २४ तासांची सिनेमा मॅरॅथॉन. असं सर्वकाही भिममय वातावरण झालेलं असतानाच शिवडीतल्या एका गृहिणींनं बाबासाहेंबांचे विचार घरोघर पोचवण्याचा अनोखा ध्यास घेतलाय. मिनल संदीप गांगुर्डे यांनी भिमकंदील बनवलेत. या भिमकंदीलांना चांगली मागणी आहे.

“जगभरात बाबासाहेंबांची जयंती एक उत्सव म्हणून साजरा होत असताना आपणही काहीतरी करायला हवं या भावनेतून मी कंदील करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही हे भिमकंदील लाँच केलं. बाबासाहेंबांची जयंती म्हणजे आमच्यासाठी दिवाळीच आहे. या महामानवानं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. म्हणून बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकानं त्यांच्या विचारांचं प्रतिक म्हणून हे कंदील स्वत:च्या घराबाहेर लावावं ही अपेक्षा होती. या कल्पनेला सर्वांनीच उचलून धरलं आणि त्यातून या भिमकंदीलांना चांगला प्रतिसाद मिळाला.” मिनल गांगुर्डे सांगत होत्या. 

कंदील कसं बनवायचं यापासून सुरुवात होती. त्याचं प्रशिक्षण मिनल यांनी घेतलं. अगोदर काही मोजके कंदील बनवण्यात आले. ते ओळखीच्या लोकांना दाखवल्यानंतर त्यांना अधिकाधिक कंदीलांसाठी विचारणा झाली. आकाशकंदीलच पण निळ्यारंगाचं. चारही बाजूंनी बाबासाहेंबाचं चित्रं असलेलं, त्यांचा संदेश असणारं. त्यांचा गौरव करणारं हे कंदील लोकांना आवडलं. जयंतीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असतो तिथं जाऊनही प्रदर्शनाच्या मार्फत त्यांनी आपल्या या भिमकंदीलांचा प्रचार केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. मागणी वाढतेय म्हटल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात कंदीलाची निर्मिती करायचं ठरवलं. त्यानुसार आधी ऑर्डर घेऊन या कंदीलांची निर्मिती करण्यात आली. त्यानं रोजगार निर्मिंती झाली. गेल्या वर्षी मिनल यांनी बनवलेले हजारहून जास्त भिमकंदील विकले गेले होते. यंदा ही संख्या दुपट्टीनं वाढण्याची शक्यता आहे. 

“ हा माझ्यादृष्टीनं स्वयंरोजगार आहे. आम्ही या भिमकंदीलाच्या माध्यमातून बेरोजगार हातांना काम दिलंय. अगदी घरी बसून हे काम करता येतं. यामुळे आसपासच्या महिलांना रोजगार मिळाला. ही सर्व कृपा बाबासाहेबांची. हे कंदील विकून जे पैसे आम्हाला मिळतात, त्याचा वापर विविध सामाजिक कार्यासाठी केला जातो. म्हणजे बाबासाहेबांच्या नावानं बनवलेल्या कंदीलांचा वापर त्यांच्या बांधवांसाठीच होतोय. हे विशेष” मिनल यांनी स्पष्ट केलं. सध्या मिनल गांगुर्डे याचं शिवडीतलं घर कंदीलाच्या साहित्यानं भरुन गेलंय. इथं दिवसभर कंदील बनवण्याचं काम सुरु असतं. जसजसे कंदील तयार होतात. ते ज्या ठिकाणी ऑर्डर आहेत तिथं पोचवले जातात. यासाठी त्यांनी स्वत:ची डिलीवरी यंत्रणाही सुरु केलीय. 

यंदाही या कंदीलाच्या प्रचारासाठी त्यांनी मुंबई पालथी घातली. कंदील बनवण्यासाठी राबणारे हात आता दुप्पट झालेत. त्यासाठी त्यांनी अऩेक महिलांना प्रशिक्षणही दिलं. शिवडी, वडाळा, माहिम, घाटकोपर विक्रोळी आणि माटूंगा लेबरकँम्प सारख्या भिमवस्त्या या भिमकंदीलांच्या निळाईनं उजळून निघाल्यात. पुढच्या वर्षी फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात भिमकंदीलांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पसरवण्याचा मिनल यांचा मनसुबा आहे.    

Related Stories

Stories by Narendra Bandabe