कर्णबधीर कलाकारांना मिळतंय व्यावसायिक व्यासपीठ

एका २३ वर्षीय युवतीची कल्पना

कर्णबधीर कलाकारांना मिळतंय व्यावसायिक व्यासपीठ

Wednesday August 12, 2015,

5 min Read

शब्दविरहित संवादाने गजबजलेलं एक घर, त्यात तीन भावंडांपैकी दोघे कर्णबधीर. मात्र तरीही एखाद्या सामान्य कुटुंबात असावा तसा व्यवस्थित संवाद या तिघांमध्ये चाललेला कारण या तिघांमध्ये सगळ्यात लहान असलेल्या स्मृतीने हस्तसंवादाची भाषा शिकून आपल्या दोन्ही कर्णबधीर मोठ्या भावांना जणू आवाजच मिळवून दिलेला. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी स्मृती नागपाल "अतुल्यकला" या कर्णबधीर कलाकारांना व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या संस्थेची संस्थापक आणि CEO बनली आहे. स्मृती आपल्या लहानपणाबद्दल सांगताना म्हणते, "मी १० वर्षांनी मोठ्या अशा दोन कर्णबधीर भावांसोबत वाढले. त्यांच्यासोबत बोलण्याचा केवळ एकच मार्ग होता हस्तसंवादाची भाषा शिकणे, जी आता जणू माझी मातृभाषा बनली आहे. ही भाषा अवगत करणे माझ्यासाठी फार महत्वाचे होते, कारण माझ्या कुटुंबात माझे पालक आणि भावांमधला दुवा मी होते". भारतात जिथे दर दहा हजार माणसांमागे बारा कर्णबधीर व्यक्ती आहेत. (Gallaudet Encyclopedia, vol.2 p.81.) तिथे त्यांना योग्य ते शिक्षण देण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसणे ही खेदाची बाब आहे. अशा व्यक्ती केवळ दोनच प्रकारे संवाद साधू शकतात लिहून अथवा हातवारे करून. मात्र याचे योग्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कमी आहेत. स्मृतीने ही आपल्या भावंडांना या समस्यांमधून जाताना पाहिले आणि म्हणूनच वयाच्या सोळाव्या वर्षापासून स्मृती National Association of Deaf (NAD) मध्ये सेवक म्हणून जाऊ लागली. समाजाचे ऋण चुकवण्याचा हा तिने निवडलेला मार्ग होता. त्यानंतर जेव्हा तिने Bachelor of Business Administration साठी प्रवेश घेतला तेव्हाच तिला दूरदर्शनकडून निवड चाचणीसाठी बोलावण्यात आले. त्यांना हस्तसंवादाने वृत्त निवेदन करणारी व्यक्ती हवी होती आणि यासाठी स्मृतीची निवड झाली. या तिच्या कामाने अनेक संधी उभ्या केल्या आणि या विषयाची व्याप्ती तिला कळून आली, तसेच तिला स्वतःतील क्षमतेचीही जाणीव करून दिली.

स्मृती आणि हस्तसंवाद

स्मृती आणि हस्तसंवाद


पदवीनंतर घडलेल्या एका प्रसंगाने तिच्या विचारांना चालना दिली. स्मृती सांगते ‌की, " मी एका वरिष्ठ कर्णबधीर कलाकाराला भेटले ज्याने कलेचा पदविकेपर्यंत अभ्यास पूर्ण केला होता आणि दुर्दैवाने तो एका NGO मध्ये साधारण कारकुनी करत होता. त्याचे कौशल्य वाया जात होते. मी घरी येऊन विचार करू लागले, या विषयावर थोडा अभ्यास केल्यानंतर कर्णबधीर कलाकारांसाठी काही करण्याचा माझा विचार पक्का होत गेला. त्यानंतर माझा मित्र हर्षितसोबत अतुल्यकला सुरु करायचे ठरले. तो NGO मध्ये भेटलेला कालाकारही आमच्या या मोहिमेत सहभागी झाला. "अतुल्यकला ही नफा कमावणारी सामाजिक संस्था आहे जी कर्णबधीरांना मोठे होण्याची, शिकण्याची, स्वतःचे अस्तित्व शोधण्याची संधी देते आणि एका सन्माननीय जीवनाचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवते. कर्णबधीर कलाकारांनी बनवलेल्या कलाकृतींची नेट च्या माध्यमातून तसेच खुल्या बाजारात विक्री करून ती आपला नफा कमावते. मात्र इथे अन्य NGO पेक्षा आपले वेगळेपण मोठ्या अभिमानाने मांडताना स्मृती म्हणते, "या कलाकारांचे नाव सहसा लोकांसमोर येत नाही मात्र आम्ही त्यांना ही संधी देतो की त्यांनी आपल्या नावानिशी आपली कलाकृती लोकांसमोर मांडावी. आम्हाला नाही वाटत की आमच्या ब्रांडच्या नावाने हे कलाकार ओळखले जावेत, उलट आमचा ब्रांड या कलाकारांच्या नावाने ओळखला जावा अशी आमची इच्छा आहे. यासाठीच त्यांनी बनवलेल्या प्रत्येक वस्तूवर त्यांची सही असते. आम्हाला वाटत की त्यांनी स्वतः काही बनवले आहे याची जाणीव त्यांना व्हावी."

अतुल्यकला  आणि समाजाची बांधिलकी

अतुल्यकला आणि समाजाची बांधिलकी


अतुल्यकलेच्या अन्य उपक्रमांबद्दल स्मृती सांगते, "आम्ही काही महत्वाच्या भागीदारी करता ही प्रयत्न करत आहोत. आता आम्ही एका प्रसिद्ध संगीतकारासोबत कर्णबधीरांकरिता पहिले गाणे लिहिण्यासंदर्भात भागीदारी करीत आहोत आणि असेच रेखांकनासाठी ही करणार आहोत. आम्ही काही प्रसिद्ध कलाकारांसोबत कर्णबधीरांच्या विकासासाठी काम करत आहोत आणि येणाऱ्या काही महिन्यात एकत्रितपणे या कलाकृती प्रसिद्धही होतील." अतूल्याकलेला आपले काम केवळ कर्णबधीर कलाकारांपुरतेच मर्यादित ठेवायचे नाही तर सर्व कर्णबधीरांपर्यंत पोहोचायचे आहे. याबाबत स्मृती म्हणते, "आम्ही हस्तसंवाद भाषेबद्दल जागृती वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहोत, आमचा विश्वास आहे की बदलाची सुरवात नव्या पिढीपासून व्हायला हवी आणि म्हणूनच आम्ही विद्यापीठांमध्ये अनेक वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या आहेत. आम्ही हस्तसंवाद भाषेची तोंडओळख करून देणाऱ्या एका पुस्तिकेवरही काम करत आहोत." स्मृती ने आपले आतापर्यंतचे आयुष्य कर्णबधीरांसोबत घालवले असले तरी आता त्यांच्यासोबत काम करताना तिला बरच काही नवही शिकायला मिळतंय. याबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना ती म्हणते, "मी बऱ्याच आधीपासून त्यांना ओळखते मात्र मी त्यांच्यासोबत कधी काम केले नव्हते. ते माझे मित्र होते आणि अशा व्यक्ती ज्यांच्यासोबत मी मोकळा वेळ घालवत असे. आता मात्र माझा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, माझी भूमिका बदलली आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला जाणवते की त्यांच्याकडे अमर्याद क्षमता आहे, मात्र त्यांना स्वतः बद्दल विश्वास वाटत नाही कारण अपंगांकडे बघण्याचा समाजाचा प्रचलीत दृष्टीकोन. लोकांनी हे समजून घ्यायला हवे की ते कोणी नगण्य नाहीत, ते याच जगाचा अविभाज्य भाग आहेत." यावर अजुन पुढे बोलताना स्मृती म्हणते, "आता मी आधीपेक्षा अधिक संयमीत असते आणि कमी वैतागते. अखेरीस त्यांना कोणीतरी तर हवच आहे ही दरी भरून काढण्यासाठी." अतुल्यकला हा १० महिन्यांआधी सुरु झालेला अगदी नवाच उपक्रम आहे, मात्र तरीही त्याच्या भविष्याबद्दल कल्पना अगदी स्पष्ट आहेत. या विषयी स्मृती म्हणते, "आम्हाला वाटते की अतुल्यकला ही एक अशी सामाजिक संस्था बनावी जिथे पूर्णपणे कर्णबधीरांनीच बनवलेल्या वस्तू विकल्या जातील आणि हे योग्य प्रकारे होण्यासाठी आम्हाला एक चांगला ब्रांड बनवायचा आहे. आणि निश्चितच हा केवळ ब्रांड नसेल तर तो कलाकारांचा ब्रांड असेल. आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आम्हाला हे भावनिक आंदोलन सुरु ठेवायचे आहे. आम्ही सध्याच्या कलाकारांसोबत कर्णबधीर कलाकारांना उभे करण्यासाठी धडपडतो आहोत. या माणसांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला झाल्याची भावना यापुढे असणार नाही." स्मृतीच्या या कामाची चांगली दखल घेतली जात असतानाच तिला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे निवेदन हस्त संवाद भाषेत करण्याची संधी मिळाली. मागील ६४ वर्षांच्या काळातील हे पहिलेच या प्रकारचे प्रसारण होते. नवा बदल घडवू इच्छिणाऱ्या पिढीकरिता स्मृती नागपाल म्हणते, "स्वतःच्या स्वप्नांना कधीच बाजूला सारू नका. मी स्वप्नाळू आहे, आपल्या वयाच्या पिढीसाठी हे गरजेच आहे की स्वप्न पहावीत आणि आपल्या मनाची साद ऐकावी. ही एकमात्र अशी गोष्ट आहे जी आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. समाजाचे ऋण चुकवणे आपले कर्तव्य आहे, हा आनंद इतका मोठा असेल की तुम्ही कल्पना करू शकणार नाही... आणि हे करण्यासाठी तुम्हाला कोणी सामाजिक नेता असण्याची गरज नाही, तुम्ही केवळ काही लहान लहान गोष्टी लोकांसाठी, समाजासाठी रोज करत रहा."