सर्जनशीलता आणि व्यवहार साथ-साथ -निर्माती पूनम शेंडे

0

निर्माती म्हणून पहिला सिनेमा करायचं ठरवलं आणि मॅटर सिनेमाचा एक वेगळाच मॅटर समोर आला. जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, संतोष जुवेकर यांच्या मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा सत्तर टक्के पूर्ण झाला आणि त्यानंतर त्याची निर्मिती अपुऱ्या पैशांमुळे बंद केली गेली, अशावेळी पुढे काय करायचे सिनेमा कसा पूर्ण करायचा याची चर्चाचर्वणं सुरु असतानाच सारथी एन्टरटेनमेन्ट त्यांच्या मदतीला धावून आलं. मातीमध्ये अडकलेल्या मॅटरच्या रथाला खऱ्याअर्थाने सारथी बनून पूनम शेंडेने पुढे नेले.

मॅटर सिनेमाची थांबलेली निर्मिती पूनमने पूर्ण केली, सिनेमा प्रदर्शितही केला. यानंतर स्वामी पब्लिक लिमिटेड या सिनेमाचीही निर्मिती तिने केली. आणि आता जाऊं द्या ना बाळासाहेब हा एक राजकीय विडंबनात्मक विषय असलेला सिनेमा ती घेऊन येतेय. यात निर्माती म्हणून ती एकटी नाहीये तर मराठी तसेच हिंदीतले आघाडीचे संगीतकार अजय अतुलही या सिनेमातनं निर्माते म्हणून पहिल्यांदाच समोर येतायत. या सिनेमाच्या निमित्ताने पूनम आणि तिचं सारथी एन्टरटेनमेन्ट सिनेनिर्मितीमध्ये हॅटट्रीक करतंय.

“मी एका सर्वसामान्य घरातनं आलीये, पण निलेशशी लग्नानंतर शेंडेंच्या बिझनेस फॅमिलीमध्ये माझा प्रवेश झाला. सारथी ग्रुप हे आमच्या शेंडे कुटुंबाचंच. मी आल्यानंतर सारथी एन्टरटेनमेन्ट लॉन्च केलं गेलं. मी बीई इन्स्ट्रुमेंटेशन केलंय पण मला आधीपासून काहीतरी क्रिएटीव्ह करायचं होतं, आज मी सारथी एन्टरटेनमेन्ट हे प्रॉडक्शन हाऊसचं काम पहाते.

या शोबिझमध्ये मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा महिला निर्माती तीही तरुण, कुठलाही अनुभव नसलेली म्हणून काहींनी व्यवसायिक फायदा घ्यायचा प्रयत्न केला. पण मी सर्वांना पुरुन उरले कारण जेव्हा सिनेमा निर्मितीत उतरायचं ठरवलं तेव्हाच पक्क केलं होतं की वन टाईम प्रॉड्युसर नाही बनायचं तर या क्षेत्रात उत्तमोत्तम सिनेमा बनवायचा प्रयत्न करायचा.”

पूनमच्या सुरुवातीच्या दोनही सिनेमांना प्रेक्षकांनी तिकीट खिडकीवर सुमार प्रतिसादच दिला. पण पूनम याकडेही खुप सकारात्मक दृष्टीने पहाते. “माझी दुसरी निर्मिती स्वामी पब्लिक लिमिटेड हा खूप वेगळा आणि बोल्ड विषयाचा सिनेमा होता, खरंतर मराठीत असा विषय तोपर्यंत कोणी आणला नव्हता आम्ही आणला, त्याचं नीट प्रमोशन केलं आणि प्रदर्शितही केला, मला वाटतं निर्माती म्हणून मी माझं काम तेव्हाही नीट करायचा प्रयत्न करत होते पण शेवटी मी या क्षेत्रात नवीन होते आणि चुका करत करतच माणूस शिकतो मीही शिकतेय

मॅटर आणि स्वामी पब्लिक लिमिटेड या दोनही सिनेमांकडे मी एक शिकण्याचा अनुभव म्हणून बघते, मी जेव्हा मॅटर सिनेमाची निर्माती बनले तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढलं. अर्ध्यापेक्षा जास्त बनलेल्या सिनेमाची निर्माती बनण्यात काय मोठं आहे आणि ते पण आपल्या पहिल्यावहील्या निर्मितीमध्ये. काहींनी तर मी मॅटरनंतर दुसऱ्या सिनेमाची निर्मिती करेन का याबद्दलही साशंकता व्यक्त केली होती. पण स्वामी पब्लिक लिमिटेड या माझ्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा झाली आणि या चर्चांना फुलस्टॉप मिळाला.

निर्माती म्हणून माझ्या पहिल्या दोनही सिनेमातनं नफा कमवण्याची मी कधीच अपेक्षा केली नव्हती आणि जिथे अपेक्षाच नव्हती तिथे अपेक्षाभंग कसला.”

एक निर्माती बरोबरच पूनम एक कुशल इंटिरिअर डिझायनरही आहे, नुकताच तिने संगीतकार अजय अतुल यांचा मुंबईतला म्युझिक स्टुडिओ रिन्युएट केला. सध्या ती अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या घराची सजावट करतेय. “मला इंटिरिअर डिझायनिंग आणि सिनेनिर्मिती या दोनही गोष्टी समान वाटतात.

इंटिरिअरमध्ये आम्हाला ग्राहकांच्या मागणीनूसार आणि त्यांच्या बजेटनूसार घर सजवायचं असतं तर सिनेमानिर्मितीमध्ये आम्हाला प्रेक्षकांच्या पसंतीनुसार आणि आपल्या क्षमतेनुसार काम करायचं असतं दोन्ही मध्ये क्रिएटीव्हिटी आणि बजेट याचा विचार करावा लागतो पण अंतिम प्रॉडक्ट मात्र हिट असावं लागतं.”

पूनम सध्या तिच्या करिअरच्या हँप्पी मोडमध्ये आहे, अर्थात मराठी मनोरंजन क्षेत्रात अजूनही प्रोफेशनलिझमची कमतरता असल्याचं तिला वाटतं. आपल्या प्रत्येक निर्मितीतनं ती हा प्रोफेशनलिझम जपायचा प्रयत्न करतेय आणि तिच्या सहकलावंतांनीही तो जपावा यासाठी ती आग्रही आहे.

Related Stories

Stories by Bhagyashree Vanjari