नऊ वर्षांपासून एक डॉक्टर सुट्टी न घेता करतायेत सातत्याने काम!

साडेसात हजारपेक्षा जास्त शवविच्छेदने केली, एकुलत्या मुलाच्या लग्नातही सेवा दिल्यांनतरच झाले सामील

0

अपघातामध्ये आपल्या निकटवर्तीयांना गमावल्याच्या दु:खाने पीडित कुटूंबाच्या दु:खाला आपलेच दु:ख समजून एक डॉक्टर आपल्या कर्तव्यात असा लागला की, त्याने स्वत:ची देखील पर्वा केली नाही. म्हणतात ना की जर तुम्ही आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने करत असाल तर यापेक्षा जास्त चांगली समाजसेवा कोणतीच असू शकत नाही. याच वाक्याला जगण्याचा मूलमंत्र म्हणून स्वीकारत एक सरकारी डॉक्टर आपल्या कामाला अशा प्रकारे रुप देतो की, त्या मार्गावर त्याच्या कामात व्यत्यय म्हणून कोणताचा रविवार किंवा सुट्टीचा दिवस आला नाही. इतके की आपल्या एकुलत्या मुलाच्या लग्नातही ते सेवा पूर्ण करुन मगच पोहोचले.

डॉ. भरत वाजपेयी यांना इंदोरच्या जिल्हा रुग्णालयात बदली मिळाली जेथे त्यांना फॉरेन्सिक औषध प्रभारी या पदावर नियुक्ती मिळाली. कार्यभार घेतल्यानंतर डॉंक्टरांची नजर शवविच्छेदनगृहाबाहेर रडत बसलेल्या काही मृतांच्या नातेवाईकांवर पडली. माहिती घेतली असता त्या़ना समजले की त्या घरातील कुलदिपक एका दुर्घटनेत विझला आहे. त्याचे प्रेत मिळावे म्हणून त्याचा परिवार आसवे गाळत बसला होता. डॉ वाजपेयी यांनी पदभार घेतल्यानंतर स्टाफने छोटीशी मेजवानी ठेवली होती पण त्या मेजवानीला न जाता डॉ वाजपेयी शवविच्छेदनगृहात घुसले. वेळ न घालवता शवविच्छेदन पूर्ण करून प्रेत कुटूंबियांच्या ताब्यात दिले. त्याच दिवशी लागोपाठ तीन शव विच्छेदने केली. त्या दिवसापासूनच मग शवविच्छेदनगृहच डॉंक्टरांचे दुसरे घर बनले. जिल्हा रुग्णालयात पदभार घेतला त्यानंतरही डॉ वाजपेयी रुग्णालयात आपल्या कामात गुंतले. हळुहळू काळ लोटला आणि आता साडे नऊ वर्षे झाली डॉ सु्ट्टी न घेता आपले काम करत आहेत. त्या मध्ये कोणतेही प्रलोभन किंवा घरची अडचण त्यांनी मध्ये येऊ दिली नाही. नऊ वर्षात सुट्टी न घेता डॉक्टर वाजपेयी यांनी साडेसात हजार शवविच्छेदने केली आहेत. सुट्टी न घेता सतत काम करत राहणे यासाठी त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही दोन वेळा २०११ आणि २०१३मध्ये नोंदवण्यात आले आहे. याच वर्षी २६जानेवारी रोजी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या कर्तव्यपरायणतेचा सन्मान म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सत्कार केला.

५६ वर्षांचे डॉक्टर वाजपेयी यांची पहिली नियुक्ती नोव्हेंबर १९९१मध्ये उज्जैनच्या नागरी रुग्णालयात झाली. १९९२मध्ये उज्जैन मध्ये झालेल्या सिंहस्थ (कुंभ) मध्ये त्यांनी १८-१८ तास रुग्णसेवा केली आहे. त्याचबरोबर सिंहस्थामध्ये रोगराई पसरू नये यासाठी देखील नजर ठेऊन होते. सिंहस्थ संपल्यानंतर त्यांच्या या योगदानासाठी समाजसेवी आणि प्रशासनातूनही त्यांचे कौतुक झाले. १९९७मध्ये एमवाय रुग्णालयात त्यांची बदली झाली. जेथे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी चांगली सेवा दिली. तेथेच त्यांना शव विच्छेदने देखील करायची असत. येथे देखील डॉक्टर वाजपेयी रोज ३-५ शवविच्छेदने करत राहिले. या दरम्यान जेंव्हा एमवाय रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम वाढले तेंव्हा सरकारने तत्काळ जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू करण्याचे आदेश दिले. अश्यावेळी डॉ वाजपेयी यांना योग्य व्यक्ती म्हणून जबाबदारी देण्यात आली. इंदोरच्या जिल्हा रुग्णालयात २००६मध्ये शवविच्छेदन करण्यास सुरुवात झाली आणि त्याच दिवशी डॉ वाजपेयी यांची बदली करून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. डॉ. वाजपेयी म्हणतात, “ जवळचे नातेवाईक गेल्यानंतर त्या परिवारावर आधीच संकट आलेले असते. अश्यावेळी त्यांना शवविच्छेदनासाठी वाट पहावी लागणे अमानवीय आहे. परमेश्वराने काहीतरी विचार करून मला या पेशात पाठवले आहे आणि ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जोवर निवृत्त होणार नाही, तोवर येथे येणा-या त्रस्त लोकांना आणखी त्रास होऊ नये असा माझा प्रयत्न राहिल. मृत शरीरातून  जास्तीत जास्त सत्य बाहेर काढून ते न्यायालयासमोर ठेऊ शकेन ज्यातून  पीडित परिवाराला न्याय मिळू शकेल.”

२२नोव्हेंबर २०१५ रोजी डॉक्टरांचे एकुलते सुपूत्र अपूर्व यांचे लग्न होते. तरीही रोजच्या प्रमाणेच डॉ वाजपेयी रुग्णालयात आपली सेवा देण्यासाठी पोहोचले. घरी वरात निघण्याची वेळ झाली होती, त्यावेळी वरिष्ठांच्या आदेशानेच ते घरी परत गेले होते. पण त्याचे मन कर्तव्य सोडून जाण्यात नव्हते. त्यापूर्वी कधीच त्यांनी असे केले नव्हते. घरी पोहोचले तर वरात सजली होती आणि मुलगा घोडीवर बसला सुध्दा होता. अचानक रुग्णालयातून दूरध्वनी आला की दोन शवविच्छेदनासाठी आली आहेत. डॉ वाजपेयी वरात सोडून रुग्णालयात गेले. विशेष म्हणजे अश्या प्रकारे कार्यक्रम अर्ध्यात सोडून जाण्यावर त्यांच्या पत्नी किंवा कुटूंबियानी रागावण्याऐवजी आनंदाने त्यांना जाण्यास परवानगी दिली! जेंव्हा मुलाचे लग्न लागत होते तेंव्हा डॉ वाजपेयी रुग्णालयात शवविच्छेदनात गुंतले होते. आपले काम संपवून सायंकाळी ते मुलाच्या लग्नसोहळ्यात सहभागी झाले. 

आपल्या कामावरील निष्ठेने डॉ वाजपेयी केवळ विभागात किंवा रुग्णालयात प्रसिध्द लोकप्रिय झाले असे नाही तर ज्यांना त्यांच्या बद्दल त्यांच्या कामाबद्दल समजले त्या सा-यांनीच त्यांचे कौतूक केले आणि प्रतिष्ठा दिली. रुग्णालयात काम करणारे समाजसवेक रामबहादूर वर्मा यांचे म्हणणे आहे की, “ माझ्या हयातीत रुग्णालयात असा डॉक्टर नाही पाहिला ज्यांनी आपल्या कर्तव्यासाठी स्वत:चाही विचार केला नाही. अनेकदा डॉ वाजपेयी अन्नपाणी न घेता ध्येयाने पछाडल्यासारखे कामात दंग असतात. शवविच्छेदनाच्या कामासंदर्भात त्यांना न्यायालयातही हजर रहावे लागते, पण तेथून परत आले की, पुन्हा आपल्या कामाला लागतात.”

लेखक : सचिन शर्मा 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.