घरी सिनेमा पहायचा आनंद देणारी हिरोटॉकीज डॉटकॉम

0

सिनेमा पहायला जाणं हा नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो, व्ही.एस.प्रदीप यांना हे खूप लवकर जाणवलं. ऑनलाईन माध्यमातून तामिळ सिनेमा परवडेल अशा दरात घराघरांमध्ये कायदेशीरपणे पोहोचवण्याचं स्वप्नं त्यांनी पाहिलं. हा सिनेमा उच्च दर्जाचा आणि विना अडथळा पाहता येणं हे त्यांचं ध्येय होतं.

प्रदीप हैद्राबादच्या प्रतिष्ठित इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए करत होते. त्यावेळेस ते एकदा सिनेमागृहात थुपक्की हा तामिळ सिनेमा पहायला गेले होते. सिनेमा थिएटरमध्ये लागून केवळ एक आठवडा झाला होता आणि वीकएंड होता. त्यामुळे त्यांना घरी अत्यंत सुमार दर्जाचा पायरेटेड सिनेमा पहायला लागला. त्यानंतर त्यांनी ऑनलाईनचा कायदेशीर पर्याय काय असू शकतो यावर विचार करायला सुरुवात केली.यातूनच हिरोटॉकीज डॉटकॉमचा जन्म झाला.

प्रदीप यांच्याकडे मार्केटसाठी असलेली दूरदृष्टी होती. त्यांचे अनेक नातेवाईक भारताबाहेर परदेशात राहतात. त्यामुळेच हिरोटॉकीज हे नाव त्यांना सुचलं. टॉकीज याचा अर्थ आपल्या देशात अगदी सिनेमा पाहण्यासाठीचे पारंपरिक थिएटर्स. टॉकीज म्हटलं की अगदी जुन्या काळच्या पारंपरिक थिएटर्सची आठवण होते.


एकदा नेमकं काय करायचं ते ठरल्यानंतर मग ते चित्रपटसृष्टीशी संबंधित कार्यक्षेत्रांचा शोध घ्यायला लागलो, असं संस्थापक सांगतात. व्यवसाय नेमकेपणानं सांगू शकेल अशा नावांसाठी त्यांनी अनेक कलात्मक नावांचा शोध घेतला आणि हिरोटॉकीज डॉटकॉम हे नाव निश्चित झालं. हे नाव परदेशात राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी अगदी योग्य होतं.

१० जुलै २०१४ रोजी या स्टार्टअपचं दिग्दर्शक के.बालचंद्र आणि थानू यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अरीमानांबी हा पहिला ऑनलाईन सिनेमा दाखवण्यात आला. ‘आम्ही १०८० पी एचडी आणि ५.१ या आवाजामध्ये कायदेशीरपणे तमिळ चित्रपट दाखवतो’, असं या हिरोटॉकीज डॉटकॉमच्या होमपेजवर आवर्जून दाखवण्यात येतं.

सुरुवातीला प्रत्येक सिनेमासाठी पैसे अशी योजना होती. पण ती फायदेशीर ठरली नाही. त्यामुळे त्यानंतर त्यांनी सदस्यत्वाची योजना सुरु केली. याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आर्थिकदृष्ट्याही ती फायदेशीर ठरली.

मात्र दुर्दैवानं आपल्या देशातल्या सिनेमाप्रेमींसाठी ही सेवा अजून उपलब्ध नाही. फक्त परदेशात राहणारेच याचे सदस्य होऊ शकतात. अन्य देशांमध्ये रिलीज न झालेले सिनेमे हे सदस्य प्रत्येक महिना ७.९९ किंवा वर्षभरासाठी ७७.९९ अमेरिकन डॉलर्सची वर्गणी भरून पाहू शकतात. या वर्गणीनं त्यांना सिनेमाच्या लायब्ररीसाठी अमर्यादित सदस्यत्व मिळतं.


सदस्यत्वाची योजना सुरु झाल्यानंतर फक्त चारच महिन्यांमध्ये हिरोटॉकीजचे जवळपास साडेचार हजार ग्राहक झाले. अगदी अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडासारख्या मोठ्या देशांपासून इराक,चिली आणि नायजेरियापर्यंत जवळपास ३६०० छोट्या मोठ्या देशांमध्ये हिरोटॉकीजचं जाळं पसरलं आहे. तामिळ सिनेमामध्ये डिजीटल क्रांती घडवण्यात आघाडीवर आहोत,याचा अभिमान आहे, असं प्रदीप यांनी सांगितलं.

रिलीज झाल्यानंतर तीन ते चार आठवड्यांत हिरो टॉकीजच्या होमपेजवर नवीन सिनेमा टाकला जातो. तामिळ सिनेमांची सर्वांत मोठी लायब्ररी करण्याचं त्यांचं ध्येय आहे. आतापर्यंत त्यांच्या वेबसाईटवर २२० पेक्षाही जास्त सिनेमे अपलोड करण्यात आले आहेत. नवीन सिनेमे थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवून सिनेमा वितरणाची दरी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय, असं प्रदीप यांनी स्पष्ट केलं.

पायरटेड साईट्स हे सर्वांत मोठं आव्हान संस्थापकांसमोर आहे. प्रेक्षकांना चित्रपट कायदेशीर साईट्सवरून पहायला लावण्यासाठी प्रवृत्त करणं महत्त्वाचं आहे असं प्रदीप मानतात, त्यांच्या उच्च दर्जामुळे हिरोटॉकीज आपलं अस्तित्व टिकवून आहे. ज्यांनी हिरोटॉकीजचा उच्च दर्जा अनुभवला आहे ते प्रेक्षक त्यानंतर अन्य सुमार दर्जाच्या पायरेटेड साईट्सकडे वळतच नाहीत असं प्रदीप सांगतात.

हिरोटॉकीजची टीम आपल्या भविष्यातील अनेक योजनांसाठी सज्ज आहे. एकीकडे ग्राहकसंख्या वाढवत असतानाच दुसरीकडे भारतासह परदेशातील गुंतवणूकदारही गुंतवणुकीसाठी विशेष रस घेत आहेत. याबाबतची चर्चा सुरु आहे.

तामिळ सिनेमा ही फक्त पहिली पायरी आहे. अन्य दाक्षिणात्य भाषांमधील सिनेमांद्वारे परदेशातील जवळपास तीस लाख भारतीय कुटुंबांपर्यंत पोहोचणं हे त्यांचं लक्ष्य आहे.

प्रदीप यांनी अन्य उद्योजकांना सल्ला दिलाय- तुम्ही तुमचं उत्पादन लगेचच सुरु करा आणि अंदाज बांधायला शिका. पारंपरिक उद्योगाला ऑनलाईन व्यासपीठ मिळवून देण्यात, सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात हिरोटॉकीज डॉटकॉम यशस्वी ठरली आहे. तुमच्याकडेही अशीच एखादी भन्नाट कल्पना आहे? तर मग लगेचच कामाला लागा...जगभर जा ...आणि डॉटकॉमच्या मदतीनं मोठे व्हा!


लेखक- तौसिफ आलम

अनुवाद – सचिन जोशी