कथा एका ‘योगा गर्ल’ची

कथा एका ‘योगा गर्ल’ची

Monday March 14, 2016,

6 min Read

वय वर्ष बावीस.... चित्रपटसृष्टीसारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात रात्रंदिवस आणि वेळीअवेळी करावे लागणारे काम, सेटवरील तेलकट-तळकट खाणे, व्यायामाचा संपूर्ण अभाव, त्यात भर म्हणजे सिगरेट- दारुचे सेवन.... आणि हे कमी म्हणून की काय एका अतिशय अपमानास्पद नात्यात अडकून पडलेले असणे... आयुष्य जणू काही एका दुष्टचक्रातच अडकून गेलेले.... अशा अंधःकारमय आयुष्यात एखादा आशेचा किरण दिसू शकतो, अशी कल्पनाही कदाचित विभ्रम वाटू शकते. पण ही अशक्यप्राय गोष्ट स्वतःच्या जिद्दीने खरी करुन दाखविली दिक्षा लालवानी यांनी....

जाणून घेऊ या, आजच्या तरुणाईला खऱ्या अर्थाने प्रेरणा देणाऱ्या या जिद्दी तरुणीची कहाणी...

वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी दिक्षा यांना नैराश्य, चिंता आणि अपुरेपणाने घरलेले होते. त्यातच एकाबाजूला त्यांना समाजाच्या अपेक्षांनी गुदमरुन टाकले होते, तर दुसरीकडे आपल्याला आयुष्याकडून नेमके काय पाहिजे, याचीही त्यांना काहीच कल्पना नव्हती. आयुष्यातील एका अतिशय अवघड वळणावर त्या उभ्या होत्या. मात्र यावेळी खचून न जाता त्यांनी स्वतःच्या अस्तित्वावर, निवडींवर प्रश्न उपस्थित केले आणि शेवटी अशी एक बिकट वाट निवडली, ज्याबाबत इतरांना मुळीच विश्वास वाटत नव्हता...

image


दिक्षा तेंव्हा बॉलीवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होत्या. या व्यवसायात त्यांना ग्लॅमर, प्रसिद्ध, पैसा आणि सेलिब्रिटी बनण्याची मोठी संधी होती. ‘ संपत्ती निर्माण करण्यासाठी आयुष्यातील विशीतील वर्षे महत्वाची असतात,’ हा एक सर्वसाधारण नियम आहे. त्यामध्ये बसणारे वाटेल, असेच हे आयुष्य होते. पण त्यांना मात्र या सगळ्याचा तिटकारा वाटत होता आणि त्यातील साचलेपणाने एक प्रकारे त्यांच्या आत्म्याचाच नाश होत होता.

त्यावेळी त्यांचे दैनंदिन आयुष्य हे अतिशय धावपळीचे, ताणतणावांनी भरलेले होते. दिवसातील अठरा तास काम, तणावावर मात करण्यासाठी सतत धूम्रपान, सेटवरील तेलकट-तळकट आणि आरोग्याला हानिकारक खाद्यपदार्थांचे सेवन आणि दिवसभराच्या अतिकामाने आलेल्या थकव्यामुळे रात्री स्वयंपाक करण्याचीही ताकदच न उरणे आणि शेवटी बाहेरुन मागवून खाणे, हे त्यावेळी त्यांचे आयुष्य होते. त्यातच त्या एका अतिशय अपमानास्पद आणि तापदायक नात्यात अडकून पडल्या होत्या. सहाजिकच त्यांच्या आईवडिलांना त्यांची प्रचंड काळजी वाटू लागली होती.

पण आज वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी योग शिक्षिका असलेल्या दिक्षा यांचे दैनंदिन आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. त्या सकाळी लवकर उठतात - त्यांच्या वर्गांच्या वेळेनुसार साधारण ६.३० ते ८ च्या मध्ये... त्यानंतर त्या नियमितपणे प्राणायम आणि नौली (श्वसन) करतात, आरोग्यदायी नाष्टा करतात, त्यांचे सकाळचे वर्ग घेतात, त्यावेळी श्वसनाचे व्यायाम किंवा काही आसने पुन्हा करतात किंवा मंत्रांचा जप करतात, तर दुपारी त्या आराम करतात किंवा त्यांची घरगुती कामं पूर्ण करतात किंवा निवांतपणे संगीताचा आनंद घेतात. संध्याकाळच्या वर्गांपूर्वी त्या ध्यान करतात आणि घरी परत येताना ताजी भाजी घेऊन येतात. रात्री नऊ पर्यंत जेवण करुन, साधारणपणे अकरा वाजेपर्यंत त्या झोपून जातात.

पण हे काही सहज साध्य नव्हते... यामागे आहे ती मोठी जिद्द आणि साधना... तीन वर्षे चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर, दिक्षा यांना कुठल्या तरी प्रकारच्या अध्यात्मिक साधनेची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. त्यांनी कामातून मोठी रजा घेतली आणि शिवानंद योग आश्रमाचा रस्ता धरला. त्या ठिकाणी त्यांनी एक महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला. यानंतर त्यांचे आयुष्यच बदलले आणि खऱ्या अर्थाने ती एक नवी सुरुवात ठरली... ही सुरुवात होती एका योगीच्या प्रवासाची....

त्यांनी हठ आणि अय्यंगार शैलीचे प्रशिक्षण घेतले. सरावाप्रती संपूर्ण समर्पण आणि बांधिलकी ठेवून, त्या दररोज अधिकाधिक ताकदवान आणि अधिक चांगल्या बनत गेल्या. पण त्यांना रोजच्या जगण्यासाठीही काहीतरी करणेही आवश्यक होते. त्यावेळच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता, मुंबईचा पर्याय त्यांच्यासमोर खुला नव्हताच. त्यामुळे मग दिक्षा यांनी गोव्याची निवड केली. ही एक अशी जागा होती, जेथे योगाच्या क्षेत्रातील संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या आणि त्याचबरोबर परवडणाऱ्या जीवनशैलीचा पर्यायही होता. नेमकी त्याचवेळी अंजुना येथील योगा मॅजिक इको रिट्रीटला एक शिक्षण-कम- सहाय्यक व्यवस्थापकाची गरज होती. या पदासाठी दिक्षा यांची निवड झाली. याठिकाणी त्या आणखी काही शैलीही शिकल्या, उदाहरणार्थ विन्यासा प्लो आणि यिन योगा. त्यांच्या सरावामध्येही त्यांनी यांचा समावेश केला. त्यानंतर त्यांनी अश्वेम बीचवर स्वतःच्या वर्गांना सुरुवात केली, जेथे लोक त्यांच्याकडून शिक्षण घेण्यासाठी एकत्र येत.

गोवा खूपच सुंदर आहे, पण तेथील त्यांचे आयुष्य क्षणभंगूर ठरले. कारण हंगाम नसतानाच्या काळात येथील आयुष्य खूपच कठीण ठरु शकते. खास करुन जेंव्हा तुमच्याकडे प्रवास करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात किंवा वेळ घालविण्यासाठी साथीदार नसतो, तेंव्हा खूपच एकटेपणा येतो. त्यामुळेच एक-दोन महिन्यातच त्या त्यांच्या कायमच्या घरी, मुंबईला परतल्या.

दिक्षा लालवानी गेली नऊ वर्षे योगाभ्यास करत आहेत, ज्यापैकी चार वर्षे त्यांनी पूर्ण वेळ शिक्षिका म्हणून काम केले आहे. जरी त्या ओशो, रामना महर्षी, जे कृष्णमूर्ती आणि एकहार्ट टोल यांचे साहित्य वाचत असल्या, तरी त्यांच्या मते त्यांचा स्वतःचा सराव आणि अभ्यासच त्यांचा सर्वात मोठा गुरु ठरला आहे. दिक्षा या वर्षातून एकदा न चुकता त्यांच्या आश्रमाला भेट देतात आणि त्यांच्या आसनांच्या सरावात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात.

आज शहरांमधील वेगवान आयुष्यात सतत स्पर्धेला सामोरे जावे लागते आणि या स्पर्धेत तुम्ही कोठपर्यंत जाऊन पोहचता, यावरच तुमचे यश मोजले जाते. पण दिशा यांनी स्वतःचे नियम बनविले आहेत. त्या दिवसातून फक्त सहा तासच काम करतात आणि इतर वेळ त्यांच्या आवडत्या उपक्रमांसाठी देण्याचा नियम काटेकोरपणे पाळतात. काम आणि आयुष्य यात योग्य ते संतुलन साधण्यासाठी त्यांनी हा स्वतःचा मार्ग तयार केला आहे आणि त्यासाठी समाजाच्या मान्यतेची गरज त्यांना मुळीच वाटत नाही.

image


कोणतेही मोठे व्यवसायिक लक्ष्य निश्चित करण्यापेक्षाही, दिक्षा यांचे एकमेव स्वप्न आहे ते उच्च ज्ञानाचे खुल्या मनाने स्वागत करणे आणि ते इतरांबरोबर वाटून घेण्याचे... तसेच आपल्या या शिकविण्याच्या कामातून खूप मोठा व्यवसाय उभारण्याचाही त्यांचा कोणताच हेतू नसून, लोकांवर मोठ्या प्रमाणात उपचार करण्याचीच त्यांची तीव्र इच्छा आहे. ज्या पद्धतीने त्या योगाकडे पहातात, त्यावरुनच हे उघड आहे. दिक्षा यांच्या मते योगा शिक्षकाने केवळ स्प्लिट किंवा फॅन्सी हॅंडस्टॅंडवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षाही दया आणि प्रेमावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. तुमची ही उर्जा लोकांपर्यंत पोहचते आणि ते परत येतात, कारण त्यांना प्रेम जाणवते.

जर एखाद्या व्यक्तीची जीवनशैली खूप व्यस्त असेल, पण त्यांना योगा करण्याची इच्छा असेल तर? त्यावर दिक्षा सुचवितात, “ जरी तुम्ही दिवसा खूपच व्यस्त असलात, तरी रात्री झोपण्यापूर्वी तरी तुमच्याकडे निश्चितच पाच मिनिटांचा वेळ असतो. झोपण्यापूर्वी ध्यान करा. मी स्वतः त्याचे अनेक सकारात्मक परिणाम अनुभवले आहेत. यामुळे तुमचे मन शांत रहातेच, पण त्याचबरोबर चांगली झोप येते आणि पुढचा दिवस चांगला जाण्यातही याचा मोठा हातभार लागू शकतो.”

आणि जर एखाद्याला योग शिक्षक बनायचे असेल तर? “ जर तुम्हाला योग करण्यातून आनंद मिळत असेल आणि शिकविण्यातूनही आनंद मिळत असेल, तर तुम्ही शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण घ्या आणि तुमचे मित्र आणि कुटुंबियांना शिकविण्यास सुरुवात करा. अशाच पद्धतीने तुम्ही सुरुवात करु शकता आणि हळहळू तुम्हाला योग्य मार्ग मिळेल,” दिक्षा सांगतात.

आपण करत असलेल्या कामातून आणि निवडलेल्या जीवनशैलीतून तुमच्यातील अंहकार किंवा मीपणा जाऊ दिला पाहिजे, असा सल्ला दिक्षा देतात. “ आयुष्यात साध्या साध्या आनंदाचा शोध घेणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट ठरली आहे. साधेपणाने चमकणाऱ्या व्यक्तीकडे सगळेच आकर्षित होतात,” त्या पुढे सांगतात.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

महात्माजींच्या संकल्पनेतून सुरू झाले आहेत निसर्गोपचार, उरळीकांचनच्या निसर्गोपचार ग्रामसुधार आश्रमाने दिली स्वदेशी उपचार पध्दतींना प्रतिष्ठा !

पोलिओग्रस्त युवकाची ‘तेजस्वी’ कहाणी, योगाने जिंकले हरणारे आयुष्य!

बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर भारतीय पारंपरिक उपचार पध्दतीचा रामबाण इलाज...’क्युअरजॉय’

लेखक – निपा आशाराम

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

    Share on
    close