मैत्रिणीला मदत करता-करता निभ्रांत शाहना सुचली ‘थेमिस’

0

कंपन्यांना त्यांच्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून कंपन्यांचे इतर व्याप सांभाळण्यासाठीच ‘थेमिस’ची मुहूर्तमेढ करण्यात आलेली होती. ‘थेमिस’ची ही सेवा कंपन्यांसाठी यंत्रणा आणि प्रक्रिया अशा दोन्ही आघाड्यांवर कमालीची परिणामकारक ठरणारी. अकाउंटिंग, टॅक्सेशन, आरओसी, एचआर आणि सेक्रेटरीअल पातळीवर करावयाची सगळीच कामे थेमिस एकहाती पार पाडत असल्याने कंपन्यांना यंत्रणा आणि प्रक्रिया या दोन मुख्य गोष्टींमध्ये आपला संपूर्ण जीव ओतणे साहजिकच सहज शक्य झाले. नाहीतर अर्धा जीव या कामांत आणि अर्धा जीव कागदपत्रांच्या पूर्ततांमध्ये, असेच चालले असते. ‘थेमिस’च्या कार्याची उपयुक्तता सगळ्यांच्याच लक्षात येत गेली आणि ‘थेमिस’चा व्यापही वाढत गेला. आता शंभरांहून अधिक क्लायंट ‘थेमिस’कडे आहेत. ई-कॉमर्स, उत्पादन, शिक्षण, अन्नप्रक्रिया, आरोग्य, किरकोळ विक्री अगदी कुठल्याही क्षेत्राचे वावडे ‘थेमिस’ला नाही. सगळ्याच क्षेत्रांतील उद्योजक-व्यावसायिकांसाठी ‘थेमिस’ ही कंपनी म्हणजे वरदान ठरलेली आहे.

‘केलॉग स्कुल ऑफ बिझनेस’चे पदवीधर असलेले निभ्रांत शाह यांनी ‘थेमिस’ची स्थापना केली. भारतात परतण्यापूर्वी निभ्रांत यांनी एक गुंतवणूकदार बँकर म्हणून अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये व्यवसाय केलेला होता. भारतात निभ्रांत यांनी एक शैक्षणिक क्षेत्राशी निगडित कंपनी सुरू केली. पुढे ती एका ‘पीई फंड’ला विकण्यात आली आणि यानंतर निभ्रांत यांनी ‘थेमिस’ सुरू केली. सध्या भारतातील ८ महानगरांतून थेमिसच्या कार्याच्या पाउलखुणा आपल्याला ठळक उमटलेल्या दिसतील. एकेकाळचे सीईओ, बँकर्स, एचआर (मनुष्यबळ) व्यावसायिक अशा अनुभवांनी समृद्ध असलेल्या ४० सहकाऱ्यांचा चमू आज या कंपनीत आहे.

मर्चंट ऑफ ‘थेमिस’ निभ्रांत शाह!

निभ्रांत यांना सुचलेल्या अभिनव कल्पनेवरच ‘थेमिस’चा आजचा डोलारा उभा आहे. ‘कल्पना कांकणभर जरी, परी ब्रह्मांडाचा भेद करी’ या उक्तीचा प्रत्यय म्हणजे ‘थेमिस’चे आजचे यश आहे. थेमिसची कल्पना सुचण्यामागे एक रंजक अनुभव आहे. रंजक प्रसंग आहे. निभ्रांत शिक्षण क्षेत्राशी निगडित कंपनी चालवत असताना त्यांची त्यावेळची एक मैत्रिण फॅशन इंडस्ट्रीशी संलग्न होती. तिला तिचे अकाउंट पाहणारे आणि करभरणा वगैरे पाहणारे कुणीतरी हवे होते. निभ्रांत यांनीच मग ही जबाबदारी स्वीकारली. पुढे या मैत्रिणीने सांगितले, की तिच्या आणखी काही मित्रांनाही अशीच गरज आहे. याच क्षणाला निभ्रांत यांनी स्वत:साठी हा व्यवसाय ठरवून घेतला आणि ‘थेमिस’ला प्रारंभ झाला. ‘थेमिस’ची टॅगलाइनही ठरली. थेमिसचे हे ब्रीदवाक्य कमालीचे परिणामकारक ठरले. ‘लिव्ह द बोअरिंग पार्ट टू अस!’ ‘सगळी रटाळ कामे आमच्यावर सोपवा’ ‘थेमिस’ची ही आयडिया क्लिक झाली. कामे मिळू लागली. ‘थेमिस’कडे सुरवातीला वैयक्तिक स्वरूपाची कामे येत गेली आणि नंतर मोठ्या आस्थापनाही येऊ लागल्या.

आपल्या जुन्या मैत्रिणीच्या स्मृती चाळवताना निभ्रांत म्हणतात, ‘‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, ही उक्ती माझ्याबाबतीत बऱ्याचअंशी लागू पडलेली आहे.’’

चांगल्या सहकाऱ्यांचा शोध घेणे, त्या सगळ्यांना या रुजुवातीत रुजवणे, पैशाचे परिणामकारक व्यवस्थापन करणे ही सगळी प्रारंभिक आव्हाने ‘थेमिस’ने मोठ्या कौशल्याने पार केली. आपले ‘सेवा’ हे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विपणनावर एक छदाम खर्च न करता स्वत:करिता ग्राहक मिळवणे, हे आता सर्वांत मोठे आव्हान होते. निभ्रांत यांना आपल्या कल्पनेवर विश्वास ठेवणे क्रमप्राप्त होते, किंबहुना हा विश्वास श्रद्धेप्रत पोहोचवावा लागणार होता.

अनेक प्रतिष्ठाने ‘थेमिस’ला ‘अकाउंटिंग’, ‘मनुष्यबळ’ तसेच ‘सेक्रेटरिअल’ कामे स्वतंत्रपणे द्यायला उत्सुक होती, पण ‘थेमिस’ला हे असे नको होते. ही सगळी कामे एकाच छताखाली, हेच तर ‘थेमिस’च्या व्यावसायिक कल्पनेचे मूळ होते. मुळात ‘थेमिस’ ही अशा स्वरूपाच्या सर्व सेवा देणारी एकमेव कंपनी होती. स्पर्धेचा प्रश्नच नव्हता. मग फक्त ‘अकाउंटिंग’चे काम घेऊन येणारा क्लायंट आपल्या ‘प्रमोटर’ला इतर उर्वरित कामेही ‘थेमिस’ला मिळावीत म्हणून आग्रह धरू लागला. अशाप्रकारे ‘थेमिस’चे नाव जिथे झिरपायला हवे तिथे झिरपत गेले. ‘थेमिस’ याचवेळी अनेक गुंतवणूकदार कंपन्यांसाठी थेट कामे करू लागलेली होती. ‘ॲजल ग्रुप’, ‘पीई फंडस्’ आणि ‘व्हीसी फंडस्’ अशा नावाजलेल्या गुंतवणूकदार कंपन्या त्यांच्या निवेश यादीतील कंपन्यांनी ‘थेमिस’समवेत काम करावे म्हणून आग्रह धरत असत, जेणेकरून त्यांची खाती आणि पूर्तता आदींचे तंतोतंत, अचुक ताळमेळ बसावेत. एक ठराविक पद्धत विकसित व्हावी. व्यवसायाचे जाळे असे घट्ट विणले जाऊ लागले.

‘तुमच्या प्रगतीत आमची प्रगती’ हे धोरण आपल्या क्लायंटस्‌साठी ‘थेमिस’ने ठरवून टाकले. आपल्या धोरणाबरहुकूम कुठल्याही कंपनीसाठी ‘थेमिस’ सुरवातीला अगदी किमान मासिक शुल्क आकारते. काही उदाहरणांतून तर हे शुल्क इतके कमी होते, की आपल्या सुरवातीच्या काळात ‘थेमिस’ने घर विकून काशी केली, असे मानण्यास कुणाची हरकत नसावी. पुढे जसजसा क्लायंट कंपनीचा व्यवसाय स्थिरावत गेला तसतसे ‘थेमिस’ने आपले शुल्क वाढवले. ग्राहक कंपनीच्या गरजेबरहुकूम ‘थेमिस’ काही विशिष्ट प्रोजेक्टवरही स्वतंत्रपणे काम करते.

दोन वर्षांच्या काळामध्ये ‘थेमिस’ने शंभरावर क्लायंटस्‌ मिळवले. ‘स्टार्टअप’ सदरात मोडणाऱ्या कंपन्यांसाठी तर ‘थेमिस’ ही जादूची छडीच ठरली. ‘स्टार्टअप’साठी सातत्याने ‘थेमिस’ थेट उत्पादन प्रक्रिया आणि यंत्रणावगळता पडद्यामागच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आलेली कंपनी आहे. अनेक मोठ्या आणि प्रस्थापित कंपन्यांसाठीही अर्थातच ‘थेमिस’ काम करते आहे.

प्रत्येक ‘स्टार्टअप’साठी बाजार आणि वातावरण नवखे असते. अशात ‘आम्ही आहोत ना’ या भावनात्मक भूमिकेतून ‘थेमिस’ त्याला आपल्या सहकार्याचा हात देते. ‘थेमिस’ सगळ्याच ‘बॅक एंड’ जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेते म्हटल्यावर नव्या उद्योजक-व्यावसायिकाला आपल्या मुख्य उद्दिष्टावर भर द्यायला संपूर्ण वेळ मिळतो आणि त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो. नव्या कळीची कळी खुलते आणि तिचे फुल झाल्याशिवाय राहात नाही. ‘तुमच्या प्रगतीत आमची प्रगती’ हे ‘थेमिस’चे क्लायंटस्‌बद्दलचे धोरण अशाप्रकारे जणू यशाचे तोरण ठरते!

गुंतवूणकदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीचा संपूर्ण पडताळा ‘थेमिस’च्या सहाय्याने उपलब्ध होतो. ‘थेमिस’चे ध्येय लक्षावधी नव्या कंपन्या उभ्या राहण्यात आपले योगदान देण्याचे आहे. ‘थेमिस’ची पुढली वाटचाल पाहणे खचितच रंजक ठरेल. ती अर्थातच अजून दिसायची आहे!


लेखक : निखिल मंदालिका

अनुवाद : चंद्रकांत यादव

Related Stories

Stories by Team YS Marathi