गमतीदार नकलांपासून शैक्षणिक उपक्रमापर्यंत

गमतीदार नकलांपासून शैक्षणिक उपक्रमापर्यंत

Friday November 20, 2015,

5 min Read

गेल्या वर्षी हिवाळ्यात जेव्हा निखिल कुळकर्णी, किरण आणि किशोर पाटील ही तीन चुलत भावंडे टाईमपास कऱण्याबाबत विचार करत असताना तिघांपैकी एकाच्या मनात अचानक एक विचार आला. तो विचार होता नकला करण्याचा, गम्मत जम्मत करण्याचा. त्यांनी विचार केला की एक गमतीशीर व्हिडिओ बनवावा आणि तो मित्रांना पाठवावा. परंतु त्यांना असे करता येईल असे कोणते व्यासपीठ उपलब्ध असलेले आढळले नाही.

काहीसे अस्वस्थ, काहीसे उत्साही असलेल्या आणि फुल टाईम नोकरी करणा-या या तरूण इंजिनिअर्सनी वैकल्पिक प्रकल्पाच्या रूपात एक डबिंग व्यासपीठ तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांना कल्पनाही नव्हती, की ते एक शैक्षणिक स्टार्टअप तयार करत आहेत.

थोडेसे मागे जाऊ या

समाजाशी जोडला गेलेला हा प्रकल्प निखिल यांच्यासाठी पहिला प्रकल्प नव्हता. ते आपल्या पहिल्या उपक्रमाच्या माध्यमातून सतत बातम्यांमध्ये चर्चेत राहिले होते. LEBTOP (Learning English By Talking On Phone), एक असे व्यासपीठ, जे टेलिफोन कॉल्सद्वारे एकमेकांना इंग्रजी शिकणे आणि शिकवण्याची संधी उपयोगकर्त्याला उपलब्ध करून देते. आता हा प्रकल्प सुरू राहिलेला नाही, परंतु LEBTOP वर ऑगस्ट, २०१३ आणि जुलै, २०१४ या कालावधीत वीस हजारांहून अधिक कॉल्स आणि तीन हजार पाचशेहून अधिक यूनिक कॉलर्स आल्याची नोंद झालेली आहे.

याच दरम्यान, उद्योजकतेच्या ओढीने झपाटल्यानंतर निखिल यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातली आपली पूर्णवेळ नोकरी सोडली. यासाठी त्यांनी थोडी तयारी सुद्धा केली होती. ते अगदी कमी खर्चात देश भ्रमंतीसाठी निघाले. दरम्यानच्या काळात त्यांनी सर्वकाही केलेय म्हणजे ते विविध आश्रमात राहिले, काठमांडूमध्ये विपश्यना ध्यानधारणा कोर्स करून ते जगापासून अलिप्तही राहिले, ऑरोविल (पाँडेचरी) मध्ये त्यांनी तीन आठवडे स्वयंसेवकाचे काम केले. मनाप्रमाणे सर्वकाही केल्यानंतर देखील त्यांना कशाची तरी कमतरता जाणवत होती, काही तरी हरवल्यासारखे झालेले होते.

ते सांगतात, “ मी तीन वर्षे नोकरी केली, दरम्यानच्या काळात मी दोन गोष्टींबाबत विचार करत असे. एक म्हणजे नव्या गोष्टी सुरू करणे आणि दुसरी म्हणजे फिरणे. म्हणून माझे फिरुन झाल्यानंतर केवळ एकच गोष्ट उरली आणि ती म्हणजे काहीतरी नवीन आणि चांगले सुरू करणे. विविध विचारांनी भरलेल्या नोटपॅडला मी साफ केले आणि माझ्या चुलतभावांना भेटण्यासाठी मी बंगळुरूला पोहोचलो.”

‘डुबरू’चा जन्म

जेव्हा हे तिघे चुलतभाऊ भेटले तेव्हा आपण काहीतरी मजेशीर करावे हाच त्यांचा मुख्य अजेंडा होता. निखिल यांनी ज्या ज्या कल्पानांबाबत चर्चा केली त्या सर्व कल्पना नोटपॅडमध्ये जाऊन संपून गेल्या. तर या सर्व नकला, गमतीजमती (स्पूफ्स) ऑनलाईनसाठी डब व्हिडिओ बनवण्यावर जाऊन थांबले.

निखिल म्हणतात, “ माझे मित्र ‘व्हॉईस ओव्हर’ आणि बॅड लिप-रीड क्रिकेटर्सबाबत जाणत होते. हे अतिशय गमतीचे असायचे आणि आम्ही त्याची भरपूर मजा घेत असू. त्यावेळी मला व्हिडिओ मिक्सिंग करणे आणि यूजर व्हिडिओ बनवण्याची कल्पना सूचली.”

पुढच्याच सहा महिन्यांमध्ये या लोकांनी व्हिडिओ आणि ऑडिओ सिंकिंग व्यासपीठ असलेले ‘डुबरू’ हे टूल तयार केले. परंतु, या उत्पादनाला विविध भाषेत वाचता येईल अशा मजकूराच्या रूपात तयार करावे, तसेच त्याचा अनुवाद करावा अशी कल्पना नंतर सूचली.


image


हे व्यासपीठ काम कसे करते ?

निखिल यांनी माहिती देताना सांगितले, “ पारंपारिकदृष्ट्या डबिंग म्हणजे एक थकवणारी प्रक्रिया आहे. तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करावा लागतो, तो इंपोर्ट करावा लागतो आणि तो सेव्ह तसेच शेअर करण्याअगोदर त्यासाठी ‘व्हॉईस ओव्हर’ करावा लागतो. आम्ही या प्रक्रियेला ऑनलाईन बनवून अतिशय सोपे बनवले. ‘डुबरू’ हे जगातील पहिले वेब आधारित व्हिडिओ डबिंग टूल आणि व्यासपीठ आहे हे सत्य आहे.

एखाद्या व्हिडिओला सिलेक्ट करण्यासाठी वापरकर्त्याला एक तर ‘एआरएल’चा उपयोग करून व्हिडिओ अॅड करावा लागतो, किंवा मग पूर्वी पासून वेबसाईटवर उपलब्ध असलेला व्हिडिओ अॅड करू शकतो. व्हाईस ओव्हर( पार्श्व आवाज) जोडण्यासाठी ‘डुबरू’ या टूलला क्लिक करावे लागते. या टूल ला क्लिक करण्याबरोबर रेकॉर्डिंग सुरू होते. त्यानंतर लगेच मायक्रोफोनमधून आवाज आणि व्हिडिओ सिंक होऊ लागतात.

ते सांगतात, “ एकदा का रेकॉर्डिंग पूर्ण झाले, की मग व्हिडिओ तुमच्या आवाजासह डबिंग इफेक्टसह प्ले होतो. जसे तुम्ही आवाज बंद करून टीव्ही पाहत असता आणि ईअरफोन ऑन असतो तसेच काहीसे हे असते.”

सध्या या व्यासपीठावर ४० हून अधिक डब केलेले व्हिडिओ आहेत.

खरा ‘युरेका’चा क्षण

निखिल पुढे म्हणतात, “ भारतात शिक्षणाला अधिक चांगले बनवण्यासाठी आपण योगदान दिले पाहिजे याचा मी नेहमीच विचार करत होतो. ‘डुबरू’चा आपण कोठे वापर करावा याबाबत मी विचार करत होतो. तेव्हा अचानक मला जाणवले की इंग्रजी ही भारतीयांची मातृभाषा नाही, परंतु, असे असले तरी उच्च गुणवत्ता असलेला मजकूर केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे.”

केवळ चांगली इंग्रजी येत नाही या कारणामुळे एखादा विद्यार्थी एखादा विषय समजून घेण्यात किंवा महत्त्वाच्या वा रंजक गोष्टी समजून घेण्यात का मागे राहतो याचे त्यांना आश्चर्य वाटत असे. ‘डुबरू’ हे अंतर नक्कीच मिटवून टाकेल हे त्यांच्या लवकरच लक्षात आले.

या उपक्रमात शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल अशा क्षमतेचा निर्णय करणारे निखिल म्हणतात, “ खान अकादमी सारख्या मजकूर तयार करणारांनी खूपच उच्च दर्जाचा शैक्षणिक मजकूर तयार केला आहे. आणि हा मजकूर विकसनशील देशांमधील गरीब मुलांपर्यंत पोहोचत आहे. परंतु, त्या विद्यार्थ्यांसाठी देखील मजकुराची भाषा आणि याचे उच्चारण अशा विषयांना समजून घेण्यात अडचणी जाणवत आहेत. ‘डुबरू’ या परिस्थितीला संतुलित करण्याच्या कामात चपखल बसतो.”

त्यांनी आपला चुलत भाऊ किरण यांना गेल्या महिन्यात आपल्या पूर्णवेळ नोकरीतून काही दिवसांची सुटी काढण्यासाठी तयार केले. तेव्हा पासून हे तिघे देशभरात ऑनलाईन शैक्षणिक मजकूर उपलब्ध करणारांना सहकार्य करण्याचे काम करत आहेत.

बाजाराच्या शिखरावर

भारतीय शिक्षणाबाबत प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, भारतातील सहा लाख गावांमध्ये शाळेत जाणारे सुमारे २०० मिलियन विद्यार्थी राहतात. द्विभाषीय शैक्षणिक कार्यक्रमाचे अनेक फायदे आहेत. तरी देखील स्थानिक भाषांमधील शैक्षणिक स्त्रोतांची मदत घेणे हे एक मोठे आव्हान असल्याचे सिद्ध होऊ शकते.

निखिल म्हणतात, “ या संख्या पाहता माझ्या लक्षात आले की कमीत कमी सरकार द्वारे अधिकृत २२ भाषांमध्ये मजकूर उपलब्ध करावे लागणार आहेत. हे वाटते तसे छोटे काम नसले तरी हे काम आम्ही करायला तयार आहोत.”

भविष्याकडे नजर

त्यांनी ‘डुबरू’चा एक व्हिडिओ शेअरिंग कम्युनिटीच्या रूपात वापर करता येईल अशी योजना तयार केली. या योजनेद्वारे वापरकर्ते मजकूर तयार करू शकतात, तर इतर लोक तो मजकूर डब करू शकतात.

लवकरच गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याची योजना बनवणारे निखिल सांगतात, “ कुणीही कोणत्याही भाषेत व्हिडिओ ऑनलाईन डब करू शकते. मोठ्या संख्येने डब करण्यात आलेल्या चांगल्या गुणवत्तेच्या शैक्षणिक मजकुराची आम्ही लायब्ररी बनवू शकतो. शिवाय लायब्ररीद्वारे ग्रामीण भागांमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांना ऑनलाईन येऊन फायदा उचलण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. प्रत्येकाने जर स्थानिक भाषांमध्ये मजकूर डब करण्यात मदत केली, तर भारत साक्षर बनून जाईल.”

स्वामी विवेकानंद यांच्या अनेक विचारांना आठवत ते म्हणतात, “ लोकांना त्यांच्याच भाषेत विचार शिकवले गेले पाहिजेत. सामान्य लोकांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत शिक्षित करा, त्यांच्या समोर विचार, कल्पना ठेवा, मग त्यांना माहिती मिळू लागेल.”


लेखक: अपर्णा घोष

अनुवाद: सुनील तांबे