२४-२५ वर्षांचे पाच युवक, २५ दिवसांचे संशोधन, २५ दिवसांचे कामकाज आणि पुढील पाच वर्षात २५० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे लक्ष्य

1

सन २०१५ ची ही गोष्ट आहे. मे महिना होता. कडकडीत ऊन आणि गर्मी यामुळे चेन्नईचे लोक त्रस्त होते. त्या दिवसात कल्याण कार्तिक सदाशिवुनी चेन्नई मध्ये सुलेखा डॉट कॉम साठी काम करत होते. एक दिवस भर उन्हात ते आपल्या कारमधून ऑफिसला जायला निघाले. थोड्या दूरवर गेल्यावर त्यांच्या कारचे काहीतरी बिघडले आणि कार बंद पडली. कारच्या इंजिनने काम करणे बंद केले होते. कल्याण यांना कळत नव्हते की, कार अचानक खराब व्हायचे कारण काय असेल. तिरुवंमियुर परिसरात कार बंद पडली होती. कल्याण यांना ऑफिसला जाणे गरजेचे होते. त्यांनी त्या परिसरात मेकॅनिकचा शोध घ्यायला सुरुवात केली. बरीच पायपीट केल्यानंतर त्यांना एक मेकॅनिक भेटला. आणि मग कार सुस्थितीत करण्याचे काम सुरु झाले. कार ठीक करण्यासाठी काही अवजारांची आवश्यकता होती, जे त्या मेकॅनिककडे उपलब्ध नव्हते. कल्याण आणि मेकॅनिक दोघेही ती अवजार खरेदी करण्यासाठी निघाले. ज्या ज्या दुकानांत ते गेले तेथे अवजारे तर उपलब्ध होती, मात्र त्यांना खरेदी करण्यासाठी कल्याणकडे रोख रक्कम नव्हती. त्यांच्या खिशात केवळ बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्डच होते. आणि दुकानदारांकडे क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वाइप करायची मशीन नव्हती. पैसे काढण्यासाठी ते एका जवळच्याच एटीएममध्ये गेले, परंतु मशीन खराब झाली होती. ते दुसऱ्या एका एटीएम सेंटरमध्ये गेले, मात्र तिथे कॅश उपलब्ध नव्हती. कल्याण यांना आश्चर्य वाटले की त्यादिवशी तिरुवंमियुर परिसरात बरेचशे एटीएम मशीन बंद अवस्थेत होते. काहींमध्ये पैसेच नव्हते तर काहींमध्ये इतर अडचणी होत्या. रणरणत्या उन्हात पैसे काढण्यासाठी आणि कारची अवजारं खरेदी करण्यासाठी कल्याण यांना भटकंती करावी लागली होती. त्यांची अवस्था फारच वाईट झाली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मित्रांची मदत घ्यायचे ठरवले आणि एका मित्राला फोनवरून संपर्क साधला. त्याच्या मित्राने मदत करण्याचे ठरवले आणि काही वेळातच तो कल्याण यांच्या जवळ रोख रक्कम घेऊन पोचला. मित्राकडून रोख रक्कम मिळाल्यानंतरच कल्याण कारसाठी लागणारी अवजारं खरेदी करू शकले आणि बंद पडलेली कार सुरु झाली. कल्याण जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा फार उशीर झाला होता. त्यांचे मन अस्वस्थ होते, कामात लक्ष लागत नव्हते. दिवसभराची झालेली फरपट त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होती. बंद अवस्थेतील एटीएम मशीन आणि त्यांच्याकडे उपलब्ध नसलेली रोख रक्कम यामुळे त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. दिवसभराचा विचार करून ते फारच अस्वस्थ झाले होते. यापूर्वीसुद्धा त्यांना असाच सामना करावा लागला होता. मित्र जर वेळेवर आला नसता तर काय झाले असते हा विचार कल्याण मनोमन करत होते.

'क्लिक एंड पे' ची टीम
'क्लिक एंड पे' ची टीम

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डशी संबंधित कल्याण यांची आणखी एक अडचण होती. कल्याण आपल्या खिशात कधीच रोख रक्कम ठेवत नव्हते. असली तरी फार थोडीशी असायची, मात्र त्यांच्या खिशात नेहमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड नक्की असायचे. अनेकदा बाहेर सामान खरेदी करण्यासाठी कल्याण या कार्डचाच वापर करतात, मात्र अनेकदा दुकानदारांकडे क्रेडिट कार्ड किवा डेबिट कार्ड अॅक्सेस मशीनच उपलब्ध नसते. आणि बरेच दुकानदार रोख रक्कम घेऊनच व्यवहार करतात. यामुळे कल्याण यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. कल्याण यांनी जेव्हा आपल्या मित्रांना ही वस्तुस्थिती कथन केली तेव्हा प्रत्येकाने तेही अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करत असल्याचे सांगितले. मित्रांच्या समवेत गप्पा मारत असतांना कल्याण यांच्या मनात एक कल्पना आली. त्यांनी ठरवले की, लोकांना रोख रक्कम देण्याची समस्या सोडवण्यासाठी काम करायचे. हीच कल्पना मनात ठेवून अनेक प्रयोग त्यांच्या मनात येऊ लागले. कल्याण यांनी त्यांचे बालपणीचे मित्र आणि शाळेचे वर्गमित्र नागेंद्र बाबू विन्नुकोल्लू यांना आपल्या या कल्पनेबद्दल सांगितले. कल्याण आणि नागेन्द्र बाबू यांचे विचार एकमेकांना पटायचे. नागेन्द्र बाबू यांनी ग्राहकांच्या या समस्येचे समाधान करण्यासाठी त्यांच्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल अशी कल्याण यांना हमी दिली. कल्याण यांनी त्यांच्या या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे लहान भाऊ साई संदीप यांनी सुद्धा त्यांच्या या स्टार्टअपमध्ये काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यांचे आणखी दोन मित्र चंद्रशेखर रेड्डी बोरा आणि दिनेश कुमार रेड्डी यांना सुद्धा या स्टार्टअपची कल्पना एवढी आवडली की, त्यांनी या कामामध्ये स्वतः ला झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली. 

अशाप्रकारे पांच मित्रांची टीम तयार झाली. कल्याण, साई संदीप, नागेन्द्र बाबू, चंद्रशेखर आणि दिनेश यांनी मिळून एक नवीन प्रवास सुरु केला. पाच जणांनी मिळून पहिले बाजारपेठेचा अभ्यास केला. संशोधन आणि सर्वेक्षण केले. ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. अनेकांशी संपर्क साधून चर्चा केली. उद्दिष्ट एकच होते, ग्राहक आणि दुकानदार/व्यापाऱ्यांना दोघांच्याही समस्या सविस्तर जाणून घेणे.

सर्वेक्षण करण्यासाठी हे पाचही तरुण मित्रांनी टीयर1, टीयर2 आणि टीयर3 शहरांची निवड केली. विशेषत: आंध्रप्रदेश आणि तेलंगाना राज्यांची त्याने निवड केली. याचे कारण म्हणजे पाचही जण तेलुगु भाषिक होते. पाचही मित्रांनी आंध्रप्रदेश आणि तेलंगनाच्या हैदराबाद, विजयवाड़ा, गुंटूर, वाइजैक, वरंगल, निजामबाद, करीमनगर, आदिलाबाद या शहरात सर्वेक्षण केले. या सर्व शहरांमध्ये रोख रकमेचा अधिकाधिक व्यवहार केला जातो.

नागेन्द्र बाबू , कल्याण कार्तिक आणि साई संदीप
नागेन्द्र बाबू , कल्याण कार्तिक आणि साई संदीप

स्टार्टअप टीमच्या सदस्यांनी यापूर्वी बेंगलुरु, चेन्नई आणि दुसऱ्या शहरात काम केले होते. आणि सर्वच रोख रक्कमेच्या व्यवहाराशी चांगलेच परिचित होते. त्यामुळे पाचही जणांनी या समस्येवर नुसती मातच केली नाही तर त्यातून एक यशस्वी बिज़नेस मॉडल तयार करण्यास सज्ज झाले.

केलेल्या सर्वेक्षणामध्ये एक गोष्ट सिद्ध झाली की ग्राहक आणि व्यापारीवर्ग दोघेही रोख रकमेच्या व्यवहारामुळे त्रस्त होते, त्यांना काहीतरी पर्याय हवा होता. कितीतरी ग्राहक अशेही होते ज्यांना ही गोष्ट समजत नव्हती की स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या युगात अनेक व्यापारी आपल्या दुकानात क्रेडीट किवा डेबिट कार्डचा वापर करण्याचा विचार का करत नव्हते. माल खरेदी करताना रोख रकमेचा आग्रह असल्याकारणाने ग्राहक आणि व्यापारी यांमधले संबंध खराब झाले होते. चिल्लर पैश्यांची अडचण होतीच. चिल्लर नसल्यास बहुतांश दुकानदार चॉकलेट सारख्या छोट्या वस्तू ग्राहकांच्या हातात देऊन टाकतात. ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून हेच निष्पन्न झाले की, दोघेही या समस्येचे समाधान शोधत होते.

या पाचही मित्रांचे शोधकार्य जेव्हा पूर्ण झाले तेव्हा त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान पुढे येऊन ठाकले होते. हे आव्हान होते तंत्रज्ञानाचा वापर करून अॅप तयार करायचे, ज्यामुळे ग्राहक आणि व्यापारी जोडले जातील आणि रोख रकमेच्या समस्येचे निराकरण करणे शक्य होईल. यासाठी अॅप विकसित करण्याचे कार्य सुरु झाले. आणि काही दिवसातच अपेक्षित अॅप तयार झाले. तयार अॅपच्या चाचण्या घेण्यात आल्या. काही प्रयोगही केलेत. प्रयोग करताना ज्या काही अडचणी आल्यात त्यांना दूर करत पूर्णतः सुरक्षित आणि वापरण्यास सोपे अॅप तयार झाले. आता हे अॅप बाजारात आणण्याची तयारी सुरु झाली.

या अॅपचे नामकरण करण्यासाठी खूप डोके खाजवावे लागले. सर्वाना सहजपणे उच्चारता येईल आणि लक्षात राहील अशा नावाचा शोध सुरु होता. यावर अनेक चर्चा-बैठका झाल्यात आणि शेवटी ‘क्लिक एंड पे’ हे नाव निश्चित करण्यात आले.‘क्लिक एंड पे’ च्या माध्यमातून असा संदेश द्यायचा प्रयत्न करण्यात आला की एक क्लिक करा आणि तुमचे पेमेंट करा. आणि अशा प्रकारे या पाच मित्रांनी मिळून ‘क्लिक एंड पे’ हे अॅप विकसित केले.

कल्याण कार्तिक 
कल्याण कार्तिक 

या पाच जणांनी मिळून 'सोऑफिस ग्लोबल टेक्नोलॉजीज़ प्राइवेट लिमिटेड' या नावाची कंपनी सुरु केली. आणि आपल्या कामाला सुरुवात केली. या अॅपची विशेष बाब म्हणजे या अॅपला कोणत्याही स्मार्टफोन वरून डाउनलोड केल्यानंतर ऑनलाइन किवा ऑफलाइन स्टोअर, रेस्टाॅरेंट आणि दुसऱ्या ठिकाणी पैसे भरणे सहज शक्य होते. यामुळे ग्राहकांना पैसे, क्रेडिट किवा डेबिट कार्ड जवळ बाळगण्यापासून सुटका होते. हे अॅप वापरण्यास अतिशय सोपे आणि सुरक्षितदेखील आहे. याच कारणामुळे अल्पावधीतच 'क्लिक एंड पे’ चे दोन हजारापेक्षा जास्त मर्चेंट /व्यापारी/ दुकानदार वापरकर्ते झाले. ‘क्लिक एंड पे’ अॅपचे डिझाईन तयार करताना ग्राहकांबरोबर दुकानदारांचाही फायदा होईल आणि त्यांना वापरण्यास सोपे जाईल या बाबींकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. ‘क्लिक एंड पे’ अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जे दुकानदार ऑनलाईन उपस्थित नाहीत ते सुद्धा या अॅपचा उपयोग करू शकतात.

नागेन्द्र बाबू 
नागेन्द्र बाबू 

हे पाच मित्र दावा करतात की, या अॅपच्या वापरामुळे दुकानदारांना जास्तीत जास्त ग्राहक मिळू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांनी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंची माहिती दुकानदारांना मिळते. एवढेच नाहीतर कोणत्या ग्राहकाने, कोणत्या वेळी कोणते समान खरेदी केले याचा सविस्तर तपशील दुकानदाराकडे राहतो. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांची सर्वात जास्त पसंती कुठल्या गोष्टीला आहे हेही यातून दुकानदाराला कळते. त्यानुसार त्या त्या वस्तू उपलब्ध करून व्यवसाय वृद्धिगत व्हायला मदत होते. या अॅपमध्ये 'कस्टमर रिलेशनशिप मैनेजमेंट टूल' ही सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या 'टूल' च्या माध्यमातून दुकानदारांना आपल्या ग्राहकांसोबत आपले संबंध दृढ करण्यास आवश्यक माहिती पुरवली जाते.

ग्राहकांच्या सुविधा आणि त्यांच्या फायदयाचे बोलायचे झाल्यास ‘क्लिक एंड पे’ हे केवळ पैश्यांचा व्यवहार करायचेच एक साधन नाही तर यातून आणखी काही ऑफर्स किवा विविध प्रकारच्या कॅम्पेन संदर्भात माहिती मिळते. या पाचही मित्रांना हे माहिती आहे की, जास्तीत जास्त भारतीय व्यवहार करताना रोख रकमेचाच वापर करतात. आणि जे कोणी क्रेडिट किवा डेबिट कार्डचा वापर करतात त्यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण अनेक दुकानदारांकडे स्वाइप मशीनच उपलब्ध नसते. तर काही दुकानदार कार्ड पेमेंटसाठी तयार होत नाही. तसेच अनेक ग्राहकांकडे क्रेडिट किवा डेबिट कार्ड उपलब्ध नसतात. अशा वेळी ‘क्यूआर कोड’ रोख किवा कार्ड च्या तुलनेत जास्त फायद्याचं ठरू शकतं आणि याच तंत्राचा वापर ‘क्लिक एंड पे’ करतो. 'क्यूआर कोड' च्या व्यतिरिक्त व्हाट्सएप, एसएमएस, ई-मेल, वाउचर या माध्यमातून रक्कम अदा करण्याची सुविधा ग्राहकांना 'क्लिक एंड पे' या अॅप च्या माध्यमातून दिली गेली आहे. 'क्लिक एंड पे' यांची टीम ग्राहकांच्या सुविधेसाठी 'यूनिफाइड पेमेंट इंटरफ़ेस' च्या मदतीने पेमेंटच्या अन्य सुविधादेखील उपलब्ध करण्याच्या योजना तयार केल्या आहे.

साई संदीप  
साई संदीप  

कंपनीचे संस्थापक अर्थात या पाचही जणांसमोर एक आव्हान आहे ते म्हणजे जास्तीत जास्त व्यावसायिक तसेच ग्राहकांपर्यंत हे अॅप पोहोचावे. त्यांनी त्याचा वापर करावा. आणि त्यांना या अॅपच्या वापराची सवय व्हावी. याबरोबरच या तंत्रज्ञानाला जास्तीत जास्त दुकानं आणि हॉटेल्सपर्यंत पोहोचवण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे. या अॅपचा संपूर्ण देशभर विस्तार करणे गरजेचे आहे त्यासाठी प्रचार, प्रसार करावा लागणार असल्याचे हे मित्र सांगतात. इतर शहरांमध्ये या अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक मनुष्यबळ तसेच मोठ्या निधीची आवश्यकता आहे. जे आज या पाचही मित्रांकडे उपलब्ध नाही. मात्र हे सर्वचजण गुंतवणूकदारांच्या शोधात आहे.


या पाचही संस्थापकांना खात्री आहे की, त्याचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यास जास्त संधी आहे. देशातील छोट्यामोठ्या शहरात अनेक ग्राहक आणि दुकानदार असे आहेत की ज्यांना ‘क्लिक एंड पे’ सारख्या मोबाइल अॅप्लीकेशनची गरज आहे. या पाच मित्रांना हे ठाऊक आहे की, भारतात रिटेल आणि ऑफलाइनचा बाजार जवळपास ६० हजार रुपये कोटी आहे. म्हणजेच जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बाजार आहे. म्हणजेच इथे विस्तारास भरपूर वाव आहे. ही बाब लक्षात ठेवून पाचही मित्र बाजारात लक्ष ठेवून आहे. संशोधन कार्य करत आहे. फक्त हैदराबाद शहरापुरतेच बोलायचे झाल्यास या ठिकाणी ४० हजार विभिन्न स्टोअर्स आहेत. मुंबई, बेंगळूरु, पुणे या ठिकाणच्या मोठ्या बाजारपेठेत व्यवसायाच्या संधी अधिक आहे त्यासाठी हे पाचही जण त्यांचा स्टार्टअप यशस्वी करण्यास प्रयत्नशील आहे.

सध्या या वर्षाअखेरपर्यंत दक्षिण भारतात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची या पाचही जणांची योजना आहे. याबरोबरच उत्तर भारतातील राज्यात त्यांना आपला विस्तार करावयाचा आहे. यावर्षी २०१६च्या अखेरीस यांचे १ लाख ग्राहकांपर्यंत पोहोचायचे लक्ष आहे. तसेच ४० हजार दुकानदार आणि व्यापाऱ्यांपर्यंत त्यांना पोहोचायचे आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे कल्याण, साई संदीप, नागेन्द्र बाबू, चंद्रशेखर आणि दिनेश यांच्या टीमला स्वतःला डिजिटल इंडिया कार्यक्रमात मोठ्या खेळाडूच्या रुपात पाहायचे आहे. हेच कारण आहे की पुढील पाच वर्षात त्यांची योजना देशभरात तसेच जगातल्या इतर भागातही विस्तारण्याचा त्यांचा मानस आहे.

महत्वपूर्ण बाब म्हणजे ‘क्लिक एंड पे’ एक अशी कंपनी आहे जिला २४-२५ वयवर्षे असलेल्या पाच तरुणांनी सुरु केली. 25 दिवस सर्वेक्षण केले आणि बाजरातील शक्यता तपासल्या. त्यानंतर २५ दिवसात हे अॅप तयार केले आणि बाजारात दाखल केले. अॅप बाजारात दाखल झाल्यानंतर पाच महिन्यात या मित्रांनी जे काही बघितले, अनुभवले, समजले त्याच्या आधारावर पुढच्या पाच वर्षात २५० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

या पाचही उत्साही तरुणांना त्याच्या या स्टार्टअपच्या कल्पनेवर इतका विश्वास होता की, त्यासाठी त्यांनी आपल्या तगड्या पगाराच्या नोकऱ्या सोडून दिल्या. आणि या स्टार्टअपला यशस्वी करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. या तरुणांचा आत्मविश्वास पाहून टी-हब ने त्यांना बळ देण्याचे ठरवले आहे. टी-हब स्टार्टअप कंपन्यांसाठी इन्क्यूबेटरचे काम करतो. टी-हब हे देशातले सर्वात मोठे औद्योगिक इन्क्यूबेटर मानले जात आहे. हे हैदराबादच्या आंतरराष्ट्रीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान (आईआईआईटी) या परिसरात कार्यरत आहे. टी-हबच्या व्यासपीठावर कुठल्याही स्टार्टअपचे संस्थापक त्याच्या व्यावसायिक कल्पना आणि त्याचा विस्तार गुंतवणूकदारांसमोर माडू शकतील. टी-हब मुळे कल्याण, साई संदीप, नागेन्द्र बाबू, चंद्रशेखर आणि दिनेश यांची स्वप्न साकारण्यास बळ मिळाले आणि त्यांनी स्टार्टअपच्या वेगळ्या आणि विशाल जगतात आपले पंख पसरण्यास सुरुवात केली. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

जितक्या वेळात मॅगी तयार होते त्यापेक्षा कमी वेळात किर्ती जैन गरजूंना कोणत्याही तारण आणि हमीदारांशिवाय कर्ज देतात

लहानपणी थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करणारे करुणाकर रेड्डी आज ७५ लाख लोकांना उपलब्ध करून देत आहे शुद्ध पिण्याचे पाणी

राजमोहन पिल्लई हे केवळ 'काजूचे राजाच' नाही तर खडतर आव्हानांचा सामना करणारे बुद्धिमान महाराजा सुद्धा आहेत

Dr Arvind Yadav is Managing Editor (Indian Languages) in YourStory. He is a prolific writer and television editor. He is an avid traveler and also a crusader for freedom of press. In last 19 years he has travelled across India and covered important political and social activities. From 1999 to 2014 he has covered all assembly and Parliamentary elections in South India. Apart from double Masters Degree he did his doctorate in Modern Hindi criticism. He is also armed with PG Diploma in Media Laws and Psychological Counseling . Dr Yadav has work experience from AajTak/Headlines Today, IBN 7 to TV9 news network. He was instrumental in establishing India’s first end to end HD news channel – Sakshi TV.

Related Stories

Stories by ARVIND YADAV