कुटुंबाने त्याग केला तरीही अपघातग्रस्त प्राण्यांची शुश्रुषा करत आहे नाशिकचे गौरव क्षत्रिय

1

रस्त्यावर अनेक अपघात होतात माणसांचे आणि प्राण्यांचेदेखील.. माणसाचे काय होते हे सारेच जाणतात.. मात्र मुक्या प्राण्यांचे काय होत असेल याबाबत कोणालाही काही घेणदेणं नसतं. शेवटी भटकी जनावरंच ना ती... कोणाला वेळ आहे... माणसाने माणसासाठी वेळ काढला तरी खूप काही मिळवले अशी आजची परिस्थिती आहे....त्यात जनावरांचं काय घेऊन बसलात....रिकामटेकडयांचे उद्योग शेवटी.... असे सहजपणे बोलले जाते....असो... रस्ता ओलांडताना अपघातात किवा अन्य काही कारणामुळे एखादं जनावर जखमी झालं तर ते ओरडतं, विव्हळत, आपल्या जखमेवर कोणीतरी फुंकर घालावी असंच त्या मुक्यालाही वाटत असतं, वेदना होत असतात ना त्याला. जनावर असलं म्हणून काय झालं टोचलं की त्यालाही दुखतच ना, नाही का ? हे मुके मग रस्त्यावरच आपला प्राण सोडतात. या मुक्यांच्या मदतीसाठी धावून त्यांची सेवाशुश्रुषा करण्याचा वसा घेतला आहे गौरव दत्तात्रय क्षत्रिय या तरुणाने. गेल्या आठ वर्षांपासून गौरव हा जखमी अवस्थेतील जनावरांना घेऊन जाऊन त्यावर उपचार करत आहे. त्यासाठी त्याने अॅनिमल वेल्फेअर अॅण्ड अँटी हॅरॅशमेंट सोसायटी (आवास) या संस्थेची स्थापना केली. ही संस्था नोंदणीकृत आहे. हे काम करत असताना त्याच्या कुटुंबाने त्याची साथ सोडली. त्याची पत्नीही त्याला सोडून गेली, मात्र गौरवने घेतलेला वसा टाकला नाही.

“ प्राण्यांकडे कोणी लक्ष देत नाही रस्त्यात खूप अपघात होतात, त्यांनाही जगण्याचा हक्क आहे असे संविधानातही नमूद केलेले आहे. त्यांच्यासाठी काहीतरी ठोस असे काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून हे काम करण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि काम सुरु केले. काम हळूहळू वाढत गेले, अनेकांचे सहकार्य लाभत आहे. लोकांच्या सहकार्यातूनच मला प्रेरणा मिळते आणि मी अधिक जोमाने काम करतो,” गौरव सांगतो.

 गौरवने दहावी पर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर तो छोटीमोठी कामे करू लागला. गौरवचे पितृछत्र लवकरच हरपले. नाशिक येथील पांडवलेणेनजीक पाथर्डी गावात एका ४०x४० च्या शेडमध्ये हे काम सुरु आहे. गौरवच्या एका मित्राने त्याची खाली असलेली जागा त्याला या कामासाठी दिली आहे. या ठिकाणी प्राण्यांच्या ऑपरेशनची सुविधादेखील करण्यात आली आहे. दररोज डॉक्टर या ठिकाणी हजेरी लावतात आणि जखमी प्राण्यांवर उपचार करतात.

नाशिक शहर परिसरात आणि सभोवताली अनेकजणांकडे गौरवचा मोबाईल क्रमांक आहे. एखाद्या ठिकाणी जखमी अवस्थेत एखादे जनावर आढळल्यास गौरवला बोलवण्यात येते. त्यानंतर  जखमी अवस्थेतील या जनावराला गौरव आपल्या शेडमध्ये घेऊन येतो आणि त्यावर औषधोपचार केले जातात. गौरवचा मोबाईल क्रमांक जस्ट डायल, फेसबुक यावरही उपलब्ध असल्याचे अनेकांना माहिती झाले आहे. या जनावरांना घेऊन येण्यासाठी अॅम्बूलन्सची आवश्यकता आहे. मात्र अद्याप त्याची सोय झालेली नाही. नाशिकमध्ये एकही अॅनिमल अॅम्बूलन्स नसल्याची खंत गौरव व्यक्त करतो. अॅम्बूलन्ससाठी त्याने स्थानिक राजकीय नेत्यांशी चर्चा केली, मात्र अद्याप मदतीचा हात पुढे सरसावला नाही. मात्र ही मदत त्याला लवकरच मिळेल अशी तो अपेक्षा बाळगत आहे.

“मी करत असलेलं हे काम कुटुंबियांना आवडत नाही. माझी पत्नी मला घटस्फोट देऊन निघून गेली. ही मुकी आणि जखमी जनावरं हतबल आहेत, त्यांच्याकडे बघून मला खूप वाईट वाटते, दया येते. ही निरपराधी, मुकी जनावरं माझ्या मुलांप्रमाणे आहे, त्यांना मी असंच कसं सोडून देऊ. आपण बोलते चालते धडधाकट माणसं. म्हणून मग मी पत्नीने दिलेला घटस्फोट मान्य केला.” 

हे सांगत असताना गौरव काहीसा भावूक  झाला. गौरवची आई त्याच्या बहिणीबरोबर अमेरिकेत जॉर्जिया येथे राहते. त्याची आई शिक्षिका होती तर वडील शिवणकाम करायचे.

“लहानपासूनच आमच्या घरात कुत्रे पाळले होते. मला त्यांच्याविषयी खूप प्रेम, आपुलकी वाटायची. मला रस्त्यात जेव्हा एखादा जखमी अवस्थेतील कुत्रा दिसायचा तेव्हा मी त्याला उचलून जनावरांच्या डॉक्टरकडे घेऊन जायचो. असे वारंवार घडू लागले. जनावरांचे डॉक्टर मला म्हणायचे हे काय रोजरोज तू हे काम करतोस. तेव्हाच मी ठरवले की आयुष्यात यांच्यासाठीच काम करायचे. पैसे काय सगळेच कमवतात. कोणी कितीही मोठा झाला तरी हे जग सोडून जाताना  कोणालाही काहीही बरोबर घेऊन जाता येत नाही, मग ज्यामधून आत्मिक समाधान मिळेल असे काहीतरी काम करावे असे वाटू लागले आणि गरजू जनावरांची सेवाशुश्रुषा करण्याचा मी निर्णय घेतला. मी जे काही कमवायचो ते सारे जनावरांसाठी खर्च करायचो म्हणून घरातले सर्वजण नाराज होते.” गौरव सांगतो. घरच्यांचं तुम्ही का नाही ऐकलं असे विचारले असता, गौरव म्हणतो, 

“तुम्हीच बघा ना या मुक्या जनावारांकडे, त्यांचे पाय तुटले आहे काही फारच गंभीर अवस्थेत आहे. असे असताना त्यांना रस्त्यावर कसं काय सोडून देऊ ? हे पण माझे कुटुंबातील सदस्यच नाही का?” त्याच्या या भावूक उत्तराने मन सुन्न व्हायला होते.

गौरवकडे सध्या दोन घोडे, एक मेउल, २ गायी, एक बैल ज्याला पोलिओ झाला आहे, या बैलाला गौरव गेल्या दोन वर्षांपासून सांभाळत आहे. मांजर आणि सहा कुत्रे आहे. आजपर्यंत ८६ पेक्षा अधिक जखमी कुत्र्यांवर इलाज करून ते बरे झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले असल्याचे गौरव सांगतो.

गौरवचे प्रेरणास्थान ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे आहेत. ते नाशिकमध्ये आल्यानंतर गौरव त्यांना भेटण्याची संधी सोडत नाही. हेमलकसा इथले डॉ प्रकाश आमटे यांचे कार्य गौरवला प्रेरित करते त्यांच्याबद्दल बोलताना गौरव त्याच्या शैलीमध्ये बोलतो, “ अरे वो तो मेरे भगवान है ”

मला गरजू जखमी अवस्थेतील प्राण्यांसाठीच काम करायचे आहे. त्यांना आसरा द्यायचा आहे. त्यासाठी मी नाशिक महानगरपालिकेला सरकारी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी एक अर्जही केला आहे. दिवसेंदिवस माझं कुटुंब वाढतच चाललं आहे. जागा अपुरी पडत आहे. एका अॅम्बूलन्सची नितांत गरज आहे. गौरव गोरक्षेचे सुद्धा काम करतो आहे. जखमी प्राण्यांच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा, ऑपरेशन करण्यासाठी त्याच्याकडे मशिनरी उपलब्ध आहे, जनावरांची बायपास सर्जरी मशीन देखील त्याच्याकडे उपलब्ध आहे. जी नाशिकमध्ये इतर कोणाकडेही उपलब्ध नाही. या मशिनरी कशा उपलब्ध झाल्या असा प्रश्न विचारला असता गौरव सांगतो की, “ही तर परमेश्वराची योजना आहे, माझ्या भरपूर शिक्षण झालेल्या मित्रांनी माझे फेसबुक पेज तयार केले आणि त्यामाध्यमातून या मशिनरी परदेशातून उपलब्ध झाल्या. मला फक्त कस्टम ड्यूटी भरावी लागली” गौरवच्या या कामात तिथले सेवानिवृत्त झालेले नागरिक भारती जाधव आणि हेमंत जाधव यांचे मोलाचे सहकार्य मिळते आहे. हे दोघे पतिपत्नी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे असल्याचे गौरव सांगतो.

गौरवच्या आवास या संस्थेने गेल्या उन्हाळ्यात नाशिक शहर परिसरात ठिकठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. जनावरांच्या प्रेमापोटी त्याने स्वत:ची सोन्याची अंगठी देखील गहाण ठेवली, त्याचा मित्र वैभव मोगलने बाइक घेण्यासाठी वर्षभरापासून जमा केलेली पुंजी या मुक्या जनावरांची तहान भागविण्यासाठी खर्च केली आणि शहरातील विविध चौकांमध्ये सिमेंटचे भांडे उपलब्ध करत प्राण्यांसाठी पाणपोई सुरू केली.

मदतीची गरज

शासनाच्या मदतीबरोबरच खासगी संस्था, पशू-पक्षी प्रेमी आणि स्वयंसेवी मदतगार संस्थांना मदतीसाठी ‘आवास’ने आवाहन केले आहे. आता कसाबसा खर्च भागतोय, पण अधिक खर्च असल्याने त्यासाठी खासगी स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळावी, अशी गौरवची अपेक्षा आहे. मदतीसाठी गौरव क्षत्रिय यांच्या ८३८००८००५४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

वेबसाईट : www.awaahs.org 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

पीडित हत्तींचे मधुर संगीताने मनोरंजन करणारा अवलीया संगीतकार

लॉजिंग-बोर्डींग कुत्र्यांसाठी

आपण खरोखर काळजी करतो काय ? माझी लाडकी पिल्लं !!!