आता प्लास्टिक पिशव्या जनावरांनी खाल्यास त्यांना अपाय होणार नाही

0

दिवसेंदिवस प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. भारतात दरदिवशी १५ हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. आपण माणसांनी कचर्‍यात प्लॅस्टिक टाकल्यामुळे प्राण्यांना किती हानी पोचते याचे गांभीर्य आपल्याला अजूनही नाही. फेब्रुवारी २०१४ केरळ मधल्या साबरीमाला वनक्षेत्रात हत्तीणीने प्लॅस्टिक खाल्यामुळे आपले प्राण गमावले. या हत्तीणीच्या पोटाच्या आतड्यात प्लॅस्टिक पिशव्या सापडल्या. या हत्तीणीने नुकतेच एका पिल्लाला जन्म दिला होता. आता मात्र या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यात आलाय. भारतीय वंशाच्या अश्वथ हेगडे या उद्योजकाने पाण्यात विरघळणाऱ्या ऑर्गनिक इको फ्रेंडली प्लास्टिक पिशव्या संशोधित केल्या आहे. या प्लास्टिक पिशव्या जनावरांनी खाल्ल्या तरी त्यांना बाधा पोहचणार नाही. या पिशव्या २४ तासांतच पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही सेंकदात विरघळतील असा दावा अश्वथ हेगडे यांनी केला आहे.

अश्वथ हेगडे हे मुळचे मंगलोरचे, मात्र सध्या ते कतारमध्ये वास्तव्यास आहे. त्याच्या ‘एन्वीग्रीन’ या कंपनीने बायोडिग्रेटेबल अशा प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या आहेत. ‘एन्वीग्रीन’ कंपनीने बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि वनस्पतीचे तेल वापरून या पिशव्या बनवल्या आहे. या पिशव्या किफायतशीर दरात भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.