जुन्या किंवा लहान कपड्यांना गरजूंपर्यंत पोहोचवितात ‘क्लॉथ बॉक्स फाउंडेशन’ 

0

बहुतांश लोक आपले जुन्या किंवा लहान झालेल्या कपड्यांना घरात काम करणा-या बाईला देतात, किंवा घरातील साफसफाईसाठी त्याचा वापर करतात किंवा या कपड्यांच्या बदल्यात मिळणारे सामान खरेदी करतात.. जसे भांडी वगैरे इत्यादी. मात्र कधी तुम्ही विचार केला आहे की, जे कपडे तुमच्या गरजेचे नाहीत, ते दुस-यांची गरज पूर्ण करू शकतात. अनेकदा तुमची देखील इच्छा असते की, जुन्या किंवा लहान कपड्यांचा योग्य वापर व्हावा, मात्र तुम्हाला हे माहित नसते की, या कपड्यांना कसे दिले जावे जेणेकरून ज्यांना याची जास्त गरज आहे, त्यांच्या पर्यंत हे पोहोचविता येईल. तुमच्या या समस्येला ‘क्लॉथ बॉक्स फाउंडेशन’ ने सहज सोपे केले आहे. जे केवळ गरजूंपर्यंत तुम्ही दिलेले कपडेच पोहोचवीत नाहीत तर, ज्या लोकांनी तुमचे कपडे घातले आहेत, त्याचे छायाचित्र ते फेसबुकमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवितात. 

वर्ष २०१४ मध्ये २३ वर्षाचे साजन अबरोल आणि त्यांचा मित्र नमन अहलूवालिया यांनी मिळून ‘क्लॉथ बॉक्स फाउंडेशनची स्थापना केली. साजन यांच्या मते, “जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा आम्हाला सांगितले जाते की कशाप्रकारे एक चांगली नोकरी किंवा व्यवसाय केला जाऊ शकतो. आम्हाला हे कधीच सांगितले जात नाही की, समाजासाठी आपली काय जबाबदारी असते आणि कशाप्रकारे आपल्याला त्यासाठी काम केले पाहिजे.” म्हणूनच जेव्हा साजन इंटर्नशिप करत होते तेव्हा त्यांनी पाहिले की, स्वयंसेवी संस्थे (एनजीओ) च्या कामात जितकी पारदर्शकता पाहिजे होती, तेवढी नाही. त्यांच्या मते, एका स्वयंसेवी संस्थेला देणगी देणारे आणि त्याला मिळवणा-या मध्ये मध्यस्थीची भूमिका त्यांना निभवायची होती, मात्र अधिकाधिक प्रकरणात असे पहायला मिळत नाही. तेव्हा या मित्रांनी निश्चय केला की, ते समाजसेवेचे काम करतील. साजन यांनी सोशल मिडिया कंपनीत इंटर्नशिप केली होती, म्हणून त्यांना फेसबुक आणि सोशल मिडीयाचा वापर कसा करावा, हे माहित होते. तेव्हा त्यांनी अशा एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला, ज्याचे सर्व काम सोशल मिडियामार्फत पारदर्शी पद्धतीने होऊ शकेल. सोबतच लोकांना हे देखील माहित पडावे की, त्यांचे दान कुठे आणि कोण वापरत आहे. 

साजन सांगतात की, कुठल्याही समाजात मनुष्याच्या तीन मुख्य गरजा असतात - त्यात अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा समावेश होतो. त्यांनी विचार केला की, अन्न आणि निवारा या दोन गोष्टी लोकांपर्यंत नाही पोहोचविले जाऊ शकत, त्यामुळे त्यांनी वस्त्र या मुख्य गरजेला गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. साजन आणि नमन यांनी स्वतः व्यतिरिक्त मित्र आणि नातेवाईकांकडून याची सुरुवात केली. हळू-हळू हे काम वाढत गेले. ज्यानंतर या दोन वर्षात आतापर्यंत १९ हजार कपडे लोकांपर्यंत पोहोचविले आहे. 

आपल्या काम करण्याच्या पद्धतीबाबत साजन सांगतात की, “कुणीही व्यक्ती फेसबुकवर मेसेज टाकून हे सांगू शकतात की, त्यांना आपले कपडे दान करायचे आहेत, त्यासाठी त्यांना सांगावे लागते की, ते कुठे राहतात. ज्यानंतर आमचे स्वयंसेवक त्या व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना सांगतात की, ते आपले जुने कपडे कुठे देऊ शकतात.” आम्ही ज्या व्यक्तीला कपडे देतो त्याला कपडे घालून त्याचे छायाचित्र काढतो आणि त्यांचे छायाचित्र सोशल मिडीयावर टाकतो. सोबतच त्या व्यक्तीचे नाव देखील टाकतो. जर कुणी आम्हाला १०० कपडे देत असेल तर, आम्ही १०० फोटो काढून त्याला पोस्ट करतो.” ‘क्लॉथ बॉक्स फाउंडेशन’ मार्फत वाटले जाणारे कपडे अधिकाधिक कामगार, कचरा वेचणारे लोक, रस्त्यावर राहणारे आणि अशाच गरजू लोकांपर्यंत दिले जातात. ‘क्लॉथ बॉक्स फाउंडेशन’ सध्या सर्वात अधिक दिल्ली आणि गुडगावमध्ये सक्रीय आहे. त्याव्यतिरिक्त देशातील दुस-या शहरात देखील त्यांचे स्वयंसेवक काम करत आहेत. 

आपल्या निधीबाबत साजन यांचे म्हणणे आहे की, या कामात अधिकाधिक पैसा मी आणि नमनने लावला आहे, त्या व्यतिरिक्त फेसबुक आणि सोशल मिडियाकडून देखील मदत मिळते आहे.  काही कंपन्या ज्या आम्हाला मदत करतात, त्यांच्या कर्मचा-यांना आपल्या सोबत कपडे वाटण्यासाठी घेऊन जातो, जेणेकरून ते लोक देखील दुस-यांना मदत करण्याचा आनंद घेऊ शकतील.”साजन आणि त्यांचा ग्रुप वेळोवेळी अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित करतो. जेणेकरून हे लोक अधिकाधिक जुने कडपे गोळा करून गरजूंपर्यंत पोहोचवतील. त्याव्यतिरिक्त ‘क्लॉथ बॉक्स फाउंडेशन’ने चेन्नई पूरग्रस्तांना आणि काश्मीर भूकंप  पिडीतांना देखील मदत केली होती. हे लोक शाळेत देखील कार्यक्रम करून मुलांना सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित करतात. 

साजन सांगतात की, एका दूरचित्रवाणी वरील कार्यक्रमात त्यांची कहाणी देखील दाखविण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांनी सादर केले होते. तेव्हा त्यांच्या स्वयंसेवी संस्थेचे काम देखील अमिताभ बच्चन यांना खूप पसंत आले आणि ते जेव्हा आपल्या कार्यक्रमासाठी गुडगावला आले, तेव्हा तर ते स्वत:सोबत एक पेटी भरून कडपे देखील घेऊन आले होते. त्या सर्व कपड्यांना अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या हाताने एक इमारतीत काम करणा-या कामगारांना देखील वाटले. सध्या ‘क्लॉथ बॉक्स फाउंडेशन’ जवळ ७५ लोकांचा एक गट आहे. आपल्या भविष्याच्या योजनांबाबत त्यांचे म्हणणे आहे की, ते लवकरात लवकर पूर्वेकडील राज्यापर्यंत आपल्या या कार्याला पोहोचवू इच्छित आहे, कारण तेथे गरिबीमुळे लोकांना कपड्याची गरज आहे. सोबतच हे निधीचा देखील शोध घेत आहे, जेणेकरून आपल्या कामाचा विस्तार त्यांना अजून मोठा करता येईल.

फेसबुक लिंक : www.fb.com/clothesboxfoundation

लेखक : गीता बिश्त

अनुवाद : किशोर आपटे