वय वर्ष १७ आणि १२ वर्षाची शानदार कारकीर्द, बालकवी डॉक्टर आदित्य जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

0

ज्या प्रकारे सूर्य अंधाराला भेदून निसर्गाला प्रकाशमय करतो त्याच प्रकारे ज्ञान रुपी सागर हा अज्ञानाच्या मृगजळात पाण्याच्या प्रवाहाचे काम करतो. या संसारात अशा अनेक थोर लोकांचा जन्म झाला ज्यांनी अनेकांना मार्ग दाखवून पुढे जाण्यासाठी प्रेरित केले आहे.

प्रतिभा आणि ज्ञानाला वयाचे बंधन नसते, तसेच अनुभवाने त्यांना पारखणे योग्य नाही. बऱ्याचवेळा लहान मुले आपल्याला मोठ्या गोष्टी शिकवून जातात ज्याकडे आपण दुर्लक्ष करीत असतो. यासाठी कोणत्याही प्रतिभेला वयाच्या तराजूत तोलणे चुकीचे ठरेल.


कोटा (राजस्थान) मधील असेच एक हरहुन्नरी बालकवी आहेत डॉक्टर आदित्य जैन ज्यांनी वयाच्या फक्त १० व्या वर्षी त्यांच्या प्रतिभेने भारतातच नाहीतर पूर्ण विश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. आज देशात तसेच परदेशात पण त्यांचे बरेच प्रशंसक आहेत. आदित्य आपल्या कवितेद्वारे समाजात चैतन्य आणि बदलावाच्या दिशेने प्रयत्नशील आहेत तसेच आपल्या लेखणीद्वारे हिंदीच्या प्रचाराचा प्रसार करीत आहेत.


आदित्य जैन यांचा जन्म १९९८ मध्ये झाला. जेव्हा ते फक्त ५ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी रतलाम मधील शिल्प उत्सावाच्या दरम्यान जवळजवळ १५ हजार लोकांच्या उपस्थितीत स्वतःद्वारे लिखित एक कविता पठन केली तेव्हापासून आतापर्यंत असंख्य कवितापठनाने त्यांच्या प्रशंसकांच्या संख्येत नित्य वाढ होत गेली.


आदित्य यांनी युअर स्टोरीला सांगितले की,

‘लहानपणी मी जेव्हा शाळेत बालगीत वाचतांना त्या गाण्याचे शब्द बदलून स्वतःची रचना तयार करून वर्गामध्ये ऐकवीत असे, आमच्या शिक्षकांनी याला हरकत घेऊन वडिलांकडे याची तक्रार केली, वडिलांनी प्राचार्यांना सांगितले की तो जे करीत आहे ते योग्य आहे. वडिलांच्या या आत्मविश्वासाने स्वतःच्या लिखित कविता मी गाऊ लागलो’.


आदित्य सांगतात की त्यांच्या कुटुंबाच्या सहयोगाने त्यांना नेहमी प्रोत्साहित केले. आतापर्यंत त्यांनी ६ पुस्तके लिहिली असून दोन पुस्तके लवकरच बाजारात प्रसारित होणार असून तो सगळा एक कविता संग्रह आहे.

बालकवी डॉक्टर आदित्य जैन यांच्या प्रतिमेला हेरून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तसेच दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तसेच गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ १५ पेक्षा अधिक वर्ल्ड रेकॉर्ड आदित्य यांच्या नावे ‘दुनिया के सबसे नन्हे कवी एवं साहित्यकार’ च्या रुपात नोंदवले गेले आहेत. ज्याच्या आधारे २०१४ मध्ये लंडनच्या वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीने डॉक्टर ची मानद उपाधी प्रदान केली आहे.


आदित्य यांना वाटते की आपल्या रचनात्मक बुद्धिमत्तेने आपल्या देशाला गौरवांकित करावे. आपल्या कवितेच्या माध्यमातून ते अनेक जनजागृतीचे कार्यक्रम चालवतात. जसे पाॅलीथीन मुक्त भारत, रक्तदान, जलसंरक्षण, पल्स पोलिओ इ. व सध्या ते बेटी बचाव अभियानाचे संचालन करीत आहेत. जिथे ते कवितापाठासाठी जातात तिथे ते कवितेच्या माध्यमाने लोकांना संदेश देतात. आदित्य मानतात की जर त्यांनी आपल्या कवितेद्वारे लोकांना जागृत करू शकले तर ते देशाच्या हिताचे ठरेल व त्यांच्या मेहनतीला फळ मिळेल.

आदित्य सांगतात की देश आपला गौरव आहे व प्रत्येक तरुणाला आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे. याशिवाय आदित्य यांना वाटते की आजकाल तरूण इंग्रजीचा ध्यास करू लागले आहेत परिणामी आपली मातृभाषा हिंदी मागे पडत आहे. आदित्य सांगतात की इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे पण त्याचबरोबर हिंदीचा मान वाढला पाहिजे म्हणून ते आपल्या कवितेद्वारे हिंदीचा प्रचार करून हिंदीची लोकप्रियता वाढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

आदित्य यांना ३०० पेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांनी २० पेक्षा अधिक राज्यात १२०० पेक्षा अधिक तसेच राष्ट्रपती भवन, राजभवन, मुख्यमंत्री निवासात वेगवेगळ्या प्रसंगी काव्यवाचन केले आहे. ते मुख्यता वीररसाचे कवी आहेत व देशाच्या समसामायिक मुद्द्यावर लेखन करतात.

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे