ऑफिस आवर्सच्या पलिकडचा निर्भेळ आनंद, राधिका कोवठा-राव यांची अनोखी कहाणी...

ऑफिस आवर्सच्या पलिकडचा निर्भेळ आनंद, राधिका कोवठा-राव यांची अनोखी कहाणी...

Sunday December 20, 2015,

7 min Read

तुम्हाला आयुष्यात खरंच काही प्रभाव पाडायचा असेल तर त्यासाठी कोणतंही अंतर मोठं नसतं मग ते अंतर १३,७८० किलोमीटरच का असेना!

राधिका कुणी कॉर्पोरेट क्षेत्रातलं मोठं नाव नाही किंवा त्या कुणी उद्यमीही नाहीत. त्यांनी आयुष्यात निवडलेले मार्ग पाहता, एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी त्या एक न उलगडलेलं कोडं वाटत राहतात.

एक आई नर्तिका, सायकलिस्ट, ब्लॉगर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक गोष्टी करण्यासाठी नेहमी पुढे असलेली महिला. ‘रॅड्स’ हे त्यांना मित्र परिवारानं दिलेलं टोपण नाव. त्या म्हणतात," मी अनेक गोष्टींना एकत्र आणते. म्हणजे मी काय करते याची थोडीशी ढोबळ कल्पना तुम्हाला येईल. खरंतर लोकांना वाटत की मला ए.डी.डी म्हणजेच अटेन्शन डेफिशियन्सी डिसऑर्डर आहे. कारण मी कोणत्याही एका वाटेवर चालू शकत नाही किंवा एक करियर निवडून त्यात समाधानी व्हावं, असा माझा स्वभाव नाही." हे सांगताना त्या हसत होत्या.

image


शालेय शिक्षणाव्यतिरिक्त मुलींना शिक्षण देणं असो किंवा ‘शिक्षणासाठी साडी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम असो या अशा वेगळ्या वाटा त्यांनी स्वत:च निवडल्या. सध्या त्या या साड्या गोळा करण्यात व्यस्त आहेत ज्या त्यांना भारतभर पाठवायच्या आहेत. आता हा सेतू त्यांना बांधायचाय त्यांच्या वर्जिनियातल्या शांटीली इथून ते पुरानं विस्कळीत झालेल्या चेन्नईपर्यंत. जेव्हा मित्रपरिवारांपैकी एकानं त्यांची मदतीसाठीच्या आवाहनाची पोस्ट सोशल मीडियावर पाहिली तेव्हा त्यांनी राधिकाला विचारलं की त्या चेन्नईमध्ये आहेत का ? तर त्यावर त्याचं उत्तर होत ," माझा आत्मा तिथे आहे " याचा अर्थ त्या जोमाने खरोखर मदतीसाठी इतक्या लांब अंतरावरून काम करीत आहेत .

" लोकांना हे समजावण खरंच कठीण असतं कारण त्यांना ही संकल्पनाच समजत नाही की मन आणि हृदय दोन्ही एका नव्या दिशेकडे आपोआप नकळत खेचलं जातं कारण नवनवीन गोष्टी शिकण मला खूप आवडतं आणि अनेक गोष्टी मला जमतात सुद्धा. म्हणून मग मला हे समजत नाही की, ९ ते ५ हे रहाटा सारखं काम मी का करावं? अनेक जण माझ्या या कल्पनेकडे सहानुभूतीनं बघतात, पण आता मला त्याची सवय झालीय ."

दिल की बात :

गेल्या काही वर्षात त्या शिक्षण क्षेत्र आणि शिक्षणासंबंधी अनेक उपक्रमांशी जोडल्या गेल्या. त्या त्यांच्या मुलांच्या शाळेत शालेय शिक्षणाव्यतिरिक्त असणाऱ्या अन्य उपक्रमांमध्ये स्वेच्छेनं भाग घेतात. ही एक सुरुवात होती जेंव्हा त्यांना जाणीव झाली की त्या प्रभावशाली काम करू शकतात.

" मला दोन मुली आहेत आणि मला असं वाटत की सगळीकडेच मुलींना शिक्षणाची आणि समानतेची संधी हवी आणि आपल्या सर्वांनी ही जबाबदारी उचलायला हवी, अगदी छोटीशी का होईना सुरुवात तर करायला हवी! आणि एकत्र काम करण्याचा परिणाम छोटासा पण प्रभावशाली ठरू शकतो हे मी पाहिलंय. मला शाळेत विविध कामांमध्ये सहभागी व्हायला आवडतं. शिक्षक तर खूपच छान आहेत आणि त्यांची शिक्षणाप्रती निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. इतकं की आपल्याला आपण नगण्य आहोत असं वाटू लागत".

image


लोकांना एखाद्या उपक्रमासाठी जो त्याच्याशी थेट निगडीत नसेल किंवा होणारा फायदा त्यांना थेट दृष्टीपथात नसेल तर अश्या उपक्रमांना लोकांना प्रेरित करणं कठीण जातं. पण मग राधिका यांनी यावर एक सहज सोपा मार्ग शोधून काढला . राधिका स्वत: त्या उपक्रमात अत्यंत आवडीने आणि पारदर्शक पद्धतीने सहभागी होतात. त्यांच्या मते, " तुमचा दृष्टीकोन , इतरांनाही पटावा, यासाठी त्या कामात स्वत:चा सहभाग मनापासून हवा, कारण, तुमचा चष्मा त्यांना दिलात तरच ते तुमच्या दृष्टीने तो उपक्रम पाहू शकतात आणि अनेकवेळा अनेक जण या विविध उपक्रमात हिरीरीने सहभागी होतात".

हे सगळं करत असताना राधिका यांना अनेकदा स्वत:बद्द्ल शंकाही आल्या. " अगदी काही वर्षांपूर्वीच मला जाणवलं की कदाचित माझा जन्मच यासाठी झालाय. निरुद्देश भटकत अनेकविध गोष्टी शिकणं आणि त्या-त्या क्षणाचा आनंद घेत राहणं, मदत करणं आणि मला जे येतं ते इतरांना शिकवणं. मला खूप आनंद होतो , जेव्हा मी काहीतरी नवी कलात्मक बनवते किंवा एखादी संधी निर्माण करते." राधिका न थांबता बोलत होत्या .

'शिक्षणासाठी साडी '

राधिका यांचा या वर्षीचा मुख्य उपक्रम होता," साडी …. शिक्षणासाठी '. ही संकल्पना " १०० साड्यांचा करार ' यावरून त्यांना सुचली. या करारांतर्गत सोशल मीडियाचा वापर करत महिलांना साडी नेसण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि प्रत्येक महिलेला प्रिय असणाऱ्या साडीमागची त्यांची कहाणी सांगायला प्रेरित करणं. राधिका यांनी याच उपक्रमात एक निराळं पान जोडायचं ठरवलं. ज्यामध्ये या उपक्रमाचा फायदा जिथे गरज आहे त्या विभागापर्यंत प्रत्यक्ष पोहोचू शकेल." त्यामुळे राधिका प्रत्येक साडी नेसल्यावर, काही पैसे बाजूला काढून ठेवतात म्हणजे मग वर्षाखेरीस त्यांच्याकडे दान करण्याइतपत निधी आपोआप जमा होतो आणि त्यासाठी त्यांना वेगळा खर्च करायची गरज भासत नाही. आता हा निधी मुलींच्या शिक्षणाकरिता खर्च करण्यात येणार आहे.

या उपक्रमातही त्यांना आडकाठी आलीच. राधिका म्हणतात," म्हणजे अनेकदा लोकांना वाटायचं की हा कोणता तरी प्रसिद्धीसाठी केलेला खेळ आहे. मी माझा बराचसा मित्र परिवार गमावला. माझं लिखाणातलं करियर ही काही अंशी गमावलं, पण त्याच वेळी या उपक्रमानं मला नवी नाती आणि नवीन संधी मिळवून दिल्या. म्हणून हा जो प्रवास आहे तो सुलभ होता असं नाही .

साडी, एक देशी परिधान

साडी आपल्याला भारताशी जोडते. आपल्याला एक समुदाय असल्याची जाणीव करवून देते. ती भारताची विशेष ओळख आहे. व्यक्तिमत्वाची ओळख करवून देणारं हे वस्त्र, आपल्या परंपरा जपत एखाद्या साडी नेसलेल्या महिलेला, ती देशी आहे , ही वेगळी ओळख करवून द्यावी लागत नाही.

भारतातल्या अनेक महिलांना आज साडी हा सोयीस्कर पर्याय वाटत नाही ,पण राधिका याचं मत वेगळं आहे. " आपल्या सर्वाना माहितेय की साडी हे एक खूप सुंदर असं परिधान आहे. अनेक पिढ्यांचं आणि समुदायाचं हे मत आहे. त्यामुळे तसं पाहाय़ला गेल तर मला या उपक्रमासाठी लोकांना तयार करण कठीण गेलं नाही. कारण प्रत्येक समुदाय, भाषा, राज्य, इतकंच काय तर अमेरिकेतल्या काही पिढ्यांमध्येसुद्धा साडी खूप प्रसिद्ध आहे.

स्वत:ची मजबूत घडण :

राधिका यांना त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यानं स्वावलंबी बनवलं आणि स्वतंत्र सुद्धा. आव्हानांचा सामना करताना त्यांना हे गुण उपयोगी पडले. " इथे आयुष्य म्हणजे स्वातंत्र्य, मोकळेपणा आणि विश्वासार्हता. आमच्यासारख्या स्थलांतरीतासाठी इथं राहणं म्हणजे अधिकाधिक सक्षम होत जाणं. इथे आपल्या यशासाठी किंवा आपल्या अपयशासाठी आपण स्वत: जबाबदार आहोत, याची जाणीव फार लवकर होते. ती यामुळे एकमेकांवर अवलंबून राहण्याची पद्धत नाममात्र आहे, जी आपल्या भारतात अजूनही टिकून आहे. घरी कामाला बाई नसणं किंवा आपल्या अडीअडचणीला संपूर्ण कुटुंबाची साथ मिळ्णं किंवा काही वेळा सारं काही त्यांच्यावर सोपून देवून निर्धास्त राहणं. आयुष्य खरंतर स्त्रियांसाठी इथं खूप खडतर आहे. घर किंवा कार्यालय या दोन्ही ठिकाणी महिलांना खूप कसरत करावी लागते . पण या सर्वांमुळे महिला या बहुउद्यमी आणि चांगल्या व्यवस्थापक बनू शकतात, ही जमेची बाब आहे."

राधिका चेन्नईमध्ये मोठ्या झाल्या. शंकरा नेत्रालय या संस्थेतून त्यांनी ओप्टोमॅट्रीचा कोर्से केला. पण तीन वेळा अमेरिकेचा विसा नाकारला गेल्याने भारतात त्यांनी अभ्यासक्रम सुरु ठेवला . १९९७ मध्ये त्यांच्या दोन मुलींसह त्या अमेरिकेत दाखल झाल्या. पण तत्पूर्वी तीन वर्ष त्या ब्रुसेल इथं राहत होत्या .

दोन मुलींचा सांभाळ करणं आणि मदतीला कुणीही नसणं यामुळे राधिका यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाला तिलांजली दिली आणि त्यांनी माहिती प्रणालीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं. " कुठेतरी आजही मला याचं वाईट वाटत की, माझ्या वडीलांचं मी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकले नाही, पण आता ही जाणीव मागे पडली आहे." त्या आपल्या निवडीविषयी सांगत होत्या.

राधिका या काही काळ डेटा एनॅलिस्ट म्हणून काम करत होत्या आणि जेव्हा तिसऱ्या वेळेला त्यांना मातृत्वाची चाहूल लागली, त्यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. या गोष्टीला आता नऊ वर्ष झाली. जेंव्हापासून त्यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली आणि याच माध्यमातून त्यांनी इतर महिलांशी संपर्क सुरु केला आणि त्यांच्याकडून विविध गोष्टी त्यांना शिकायला मिळाल्या. " मी साध्या साध्या बायकांशी मनमुराद उत्साहाने संवाद साधते आणि कितीतरी गोष्टी त्यांच्याकडून शिकते. " त्या सांगत होत्या .

image


चिकाटी:

२००९ साली त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्या आणि ज्यामुळे या प्रचंड वेगाला कुठेतरी खिळ बसली. त्यांना परत उभं राहण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. आयुष्यात पेलाव्या लागणाऱ्या एका कठीण आव्हानांपैकी हे सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं.

" यासाठी करावी लागणारी थेरपी खूप यातनामय होती आणि हिवाळा तर हाड गोठवणारा होता. "त्या आपल्या आठवणी सांगत होत्या. तीन महिने अन्य कोणावर तरी विसंबून रहावं लागणं आणि कुबड्यांच्या आधरे चालवं लागणं हे त्यांना पटण्यासारख नव्हतं. त्यांनी मग ही परिस्थिती बदलायचं ठरवलं. त्यांनी सायकलिंगचा पर्याय निवडला "

राधिका यांनी ‘वाबा’शी (वॉशिंग्टन एरिआ बायसायक्लिस्ट असोसिएशन) संपर्क साधला. काही महिन्यांच्या खडतर परिश्रमानंतर त्यांना हा उप्रकम जमू लागला .

" गेल्या वर्षी हिवाळ्यात जेंव्हा मी सायकलनं ५० मैलांचं अंतर कापलं, मला खूप आनंद झाला. मला स्वत:चाच अभिमान वाटला की १० मैल सुद्धा या गुडघेदुखीमुळे न चालू शकणाऱ्या मला हेच अंतर सायकलनं कापता आल." राधिका आपल्या आठवणीत रमल्या होत्या.

Age quod agis, ही एक लॅटिन म्हण आहे. ज्याचा अर्थ तुम्हाला जे येत, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, या वचनावर त्यांचा ठाम विश्वास आहे . मुलाखत संपवताना राधिका म्हणतात, " तुम्ही तुमच्या मार्गावर श्रध्देनं चालू लागलात की लोकांना तुमचा दृष्टीकोन दिसू लागतो. म्हणजे त्यांच्या मताने फारसा फरक पडतो असं नाही, पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जर ते फायदेशीर ठरत असेल तर मग तुमचा प्रवास हा अगदी आनंदात पार पडतो. "


मुळ लेखिका - तन्वी दुबे

अनुवाद - प्रेरणा भराडे

    Share on
    close