नृत्य संस्कृतीला सातासमुद्रापार पोहोचविण्यात हेमा मालिनी यांचे मोलाचे योगदान- मुख्यमंत्री 

सिनर्जी-अँड इंडो जॉर्जियन कार्यक्रम

0

खासदार तथा ज्येष्ठ अभिनेत्री, प्रसिद्ध नृत्यांगना श्रीमती हेमा मालिनी यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांनी भारतीय नृत्य संस्कृतीला सातासमुद्रापार पोहोचविण्यासाठी मौलिक योगदान दिले आहे. त्या देशाच्या ‘सांस्कृतिक ॲम्बेसॅडर’ आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.


सिनर्जी अँड इंडोजॉर्जियन डान्स फ्युजन कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री  फडणवीस आणि केंद्रीय रस्ते विकास आणि जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी, आमदार एकनाथ खडसे, श्रीमती अमृता फडणवीस, श्रीमती रश्मी ठाकरे, अभिनेते शाहरुख खान, गायक सुरेश वाडकर, रुपकुमार राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सिनर्जी फ़्युजन कार्यक्रम म्हणजे मुंबईकरांसाठी पर्वणी आहे. या कार्यक्रमास श्रीमती हेमा मालिनी आणि त्यांची ‘जयास्मृती’ ही संस्था देशाच्या विविध भागात पोहोचविणार आहे, याचा आनंद होतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

तर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी श्रीमती हेमामालिनी यांचे अभिनंदन केले. त्या उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना आहेत. नृत्यकलेत देश-विदेशातील कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नृत्य संस्कृतीला उत्तेजन देण्याचे काम त्या करीत असून या कार्यक्रमामधून भारतातील नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे, असेही  गडकरी यावेळी म्हणाले.

सिनर्जी अँड इंडो जॉर्जियन डान्स फ्युजन कार्यक्रमामध्ये भारतीय आणि जार्जियन कलाकार सहभागी झाले होते. आज भारतीय कलाकारांनी भरतनाट्यम, कथ्थक आणि पुंगचोलम नृत्यप्रकार सादर केले. जॉर्जियन कलाकारांनी नॅशनल बॅलेट- अ वॉरिअर नृत्य सादर केले.