‘माया’च्या जादूची कांडी : पुण्यातली गरीब प्रियांका शिक्षणासाठी इटलीला

‘माया’च्या जादूची कांडी : पुण्यातली
 गरीब प्रियांका शिक्षणासाठी इटलीला

Thursday October 22, 2015,

7 min Read

‘‘माझ्या आईला माझा अभिमान वाटतो. मुलीऐवजी मुलगा व्हायला हवा होता, काही झाले तरी म्हातारपणी मुलगाच उपयोगाला येतो, हा टोमणा ऐकतच आईचे आतापर्यंतचे आयुष्य गेले, पण आता माझी लेक मुलापेक्षाही सवाई आहे, हे ती ताठ मानेने चारचौघांना सांगू शकते…’’ सोळा वर्षांची प्रियांका ज्या ताकदीने सांगते त्या ताकदीसमोर सोळासहस्त्र हत्तींचे बळही फिके ठरावे. प्रियांका पुण्यातील एपीफनी इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. अल्पउत्पन्न गटातील वर्गासाठी खास ही शाळा आहे. आता ती पुढे शिकायला म्हणून जोसेफ मॅझिनीच्या इटलीत जाणार आहे. ‘ॲड्रियाटिक’ संस्थेच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये तिथे दोन वर्षे ती असेल.

प्रियांका सांगते, ‘‘इतिहास, तत्वज्ञान, हायर इंग्लिश, जीवशास्त्र, गणित आणि इटालियन भाषा हे विषय घेण्याचे मी ठरवले आहे.’’

तिचे आयुष्य सरळसोट नव्हतेच. खुप आव्हाने होती. पण प्रियांका मागे सरणाऱ्यांमधली नव्हतीच. वडील कारागृहात आहेत आणि आईसह ती एकटीच राहाते. गरीब वर्गात एकट्या आईचे जिणे जरा अधिकच अवघड असते.

प्रियांका म्हणते, ‘‘आईकडे पाहूनच मी अडचणींचा मुकाबला करायला शिकले. जन्मापासून ते आजपर्यंत तिने मला वडिलांची उणीव कधीही भासू दिली नाही. कुटुंबप्रमुख म्हणून वडील घरी नाहीयेत हेही तिने मला कधी जाणवू दिले नाही. दोन्ही भूमिका तिनेच पार पाडल्या. एकटी बघून कुणी वाईट इराद्याने तिला त्रास देण्याचा प्रयत्न जर केला तर ती तो हाणून पाडत असे. कुठल्याही आधाराशिवाय एकटीच झगडत असे. विपरित परिस्थितीत न डगमगता एकटीने कसा मुकाबला करायचा, याचे धडे तिनेच मला दिलेले आहेत. मी स्ट्राँग आहे आणि इटलीतच काय तर जगाच्या पाठीवर कुठेही मी ताठ मानेने जगू शकते.’’

image


‘कनेक्टिंग द डॉट्स- माया आणि प्रियांका’

‘टिच फॉर इंडिया’ने २०१३ मध्ये सर्वांगिण शिक्षणाच्या आवश्यकतेवर गांभिर्याने विचार केला आणि त्याची फलश्रुती म्हणून ‘माया’ जन्माला आली. ‘माया’ ही ‘टिच फॉर इंडिया’च्या विद्यार्थी आणि ‘ब्रॉडवे आर्टिस्टस्’च्या संयुक्त विद्यमाने तयार झालेली एक संगीत नाटिका आहे. राजकुमारी मायाची गोष्ट ब्रॉडवेच्या संगीतात नटलेली आहे. गोष्ट अशी, की मायाच्या राज्यात सर्वत्र अंधार पसरलेला असतो आणि तिला आदेश प्राप्त होतो, की तिने कुठेही जावे, वाट्टेल ते करावे आणि आपल्या राज्यासाठी प्रकाश परत आणावा. तेव्हा ती दक्षिण भारतीय राक्षसीण ‘कुट्टी’, बोलणारा मोर ‘इंडिगो’, चक्राप्रमाणे फिरणारे जादूचे भांडे आणि नऊ तोंड्या साप ‘स्का-को’ या पाच मित्रांसह दूर यात्रेला निघते. सर्व जण मिळून तीन मोठ्या अभिशापांतून जगाची मुक्तता करतात. प्रकाश परत आणतात. ‘माया’ या नाटिकेत प्रियांकाला संधी मिळाली आणि तिच्या पंखांत बळ भरले गेले… एका गगनभरारीसाठी!

ब्रॉडवे अभिनेता निक डाल्टनसह ‘माया’ या नाटिकेच्या संगीत दिग्दर्शिका असलेल्या सान्या भरूचा सांगतात, ‘‘अल्पउत्पन्न गटातील मुले ज्यांना संगीत नाटिकेसारख्या कला पाहण्याची, शिकण्याची आणि प्रदर्शित करण्याची संधी यापूर्वी कधीही मिळालेली नव्हती. आणि अशी संधी मिळताच या मुलांनी काय करून दाखवले, तेही जगाला दिसले. शिक्षण, मूल्य, मानसिकता, संधी आणि पोहोच हे सारे घटक एकत्रित सामावू शकतील, असे शिक्षण या मुलांना फक्त उपलब्ध होण्याची वेळ आणि… ही मुले बघा अगदी काहीही करून दाखवू शकतील. कथेतली राजकुमारी माया हिच्याप्रमाणेच या नाटिकेतील प्रियांकासारखी सर्व ३० मुले आता आत्मसंशोधनाच्या लांब यात्रेला निघतील आणि आपली मूल्ये तसेच आपल्यासाठी, आपण ज्या समाजातून आलो, त्या समाजासाठी चकाकणारा प्रकाशही शोधून काढतील.’’

प्रियांका ज्या शाळेत शिकते आहे, तिथे २००९ पासून ‘टिच फॉर इंडिया’चे सहकारी काही वर्गांचे सातत्याने निरीक्षण करत आलेले आहेत. प्रियांका त्यातल्या कुठल्याही वर्गात नव्हती. ‘स्का-का’चा रोल मग प्रियांकाला कसा मिळाला आणि तिच्या आयुष्याने अचानक हे वळण कसे घेतले?

image


…तर ‘टिच फॉर इंडिया’मधील एक सहकारी अहोना कृष्णा यांनी प्रियांकाला शाळेत अभिनय करताना पाहिलेले होते. अहोना यांनी शाळेला सूचवले, की प्रियांकाला ऑडिशनची परवानगी द्यायला हवी.

प्रियांका सांगते, ‘‘अहोनाताईंनी मला रात्री अकरा वाजता विचारले, की मी दुसऱ्या दिवशी त्यांच्यासह ऑडिशनला येऊ शकेन काय. माझी आई नेहमीच मला अभिनयासाठी प्रोत्साहन देई. आईला याने आनंदच होईल म्हणून मी अहोनाताईंना थेट होकार दिला. मला वाटले फक्त अभिनय क्षमताच तपासतील. पण पुढे कळले, की ‘माया’ काय भानगड आहे. फार वेळ त्यासाठी द्यावा लागेल.’’ (शाळा सुटल्यानंतर हा कार्यक्रम होतो.)

ऑडिशनसाठी आलेल्या ३२० मुलांमधून ३० मुले निवडली गेली. प्रियांकाही त्यात होती. प्रियांकाच्या आईला काही प्रश्न पडले. ‘माया’साठीच्या फिरस्तीतून मुलांना मोठी संधी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आल्यावर मग तिचा जीव भांड्यात पडला.

‘माया’चे परिणाम

सान्या अगदी सुरवातीपासून या सगळ्या कार्यकलापांमध्ये होत्या. सगळं काही बघत आलेल्या होत्या. सान्या म्हणतात, ‘‘खरंतर ‘माया’चा फोकस थेट अभ्यासावर वा शिक्षणावर नव्हता. एकीकृत विद्याध्ययनावर खरा फोकस होता. उदाहरणार्थ जर ‘माया’च्या माध्यमातून संगीत शिकवले जात असेल तर त्यासह इतर विषयांचे ज्ञानही दिले जातेच. नृत्य शिकवले जात असेल तर त्या माध्यमातून आपला इतिहास आणि आपल्या परंपराही शिकवल्या जातातच. एखादे गाणे जर अग्नीच्या संदर्भात असेल तर पात्र थेट वर्गात अग्नी घेऊनच येईल, जेणेकरून तो व सगळेच अग्नीला जवळून बघतील आणि तिचे स्वरूप समजून घेतील. ‘माया’चे विद्यार्थी भारतातल्या इतर ‘टिच फॉर इंडिया’च्या तुलनेत ८० टक्के चांगला ‘परफॉर्मन्स’ देत आहेत.

मुलांमध्ये परिवर्तन

इंग्रजीत मुलांना गती आलेली आहे. कुठल्या तरी कलेत ते पारंगत झालेले आहेत. मूल्य म्हणजे काय, मूल्यांचे जीवनातील स्थान काय याबाबत त्यांना चांगले आकलन होऊ लागलेले आहे. उदाहरण म्हणून सान्या ‘माया’च्या मोहित या विद्यार्थ्याचा दाखला देतात. सान्या म्हणतात, ‘‘अगदी किरकोळ गोष्टीने तो चिडायचा. मारामारीवर उतरायचा. त्याच्या गल्लीतही गुंड म्हणूनच तो ओळखला जात असे. ‘माया’च्या माध्यमातून कलेच्या जवळ आला तसा भानगडींपासून दूर झाला.’’

प्रियांकातील परिवर्तनासंदर्भात सान्या सांगतात, ‘‘पहिल्यांदा जेव्हा मी प्रियांकाला भेटले तेव्हा ती लाजाळू होती. आपले म्हणणे नेटकेपणाने मांडू शकत नव्हती. अर्थात ती एक जबाबदार मुलगी होती. शिकायला नेहमी तत्पर असे. गेल्या दोन वर्षांत मला जी काय ती कळली त्यानुसार सुरवातीला ती काही प्रमाणात स्वत:ला असुरक्षित समजणारी अशी होती. पण पुढे एक दयाळू, धाडसी आणि समंजस तरुणी असा बदल तिच्यात ‘माया’च्या माध्यमातून घडून आला. ‘माया’च्या माध्यमातून तिला विविध संस्कृतींची ओळख झाली. जगाची ओळख पटली. आणि प्रियांका हे आता एक स्वावलंबी, विश्वासार्ह, आनंदी तसेच विचारी असे व्यक्तिमत्व आहे. मला खरंच वाटते, की आता ती जग बदलू शकते.’’

त्रिकोणाच्या तीन बाजू

प्रियांकाचे शालेय शिक्षण, संगीतातल्या आणि परदेशातल्या शिक्षणाच्या संधी हे सगळं एकमेकांशी कशा पद्धतीने संलग्न आहे? ‘यूडब्ल्यूसी’च्या ‘प्रिंसिपल ऑफ इंडिया’ कँपसमध्ये ‘माया’नेच ‘माया’शी जुळलेल्या सर्व मुलींची गुणवत्ता पाहिली. ‘टीच फॉर इंडिया’ला निवेदन सादर केले, की या मुलींना एड्रियाटिकच्या कार्यक्रमांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. प्रियांकात सुरवातीला थोडा संकोच होता. समजवल्यानंतर मात्र ती निवड प्रक्रियेतून गेली आणि शेवटी यशस्वी झाली. पुढल्या फेरीसाठी पुन्हा अर्ज केला. देशभरातून १२० मुलांची यादी तयार झाली. प्रियांका अंतिम फेरीत धडकली आणि तिथेही यशस्वी ठरली.

शक्यतांना अंत नाही…

प्रियांका म्हणते, ‘‘मी स्वत:वर विश्वास ठेवायला शिकले आहे. आजही जेव्हा माझ्यासमोर बिकट प्रसंग उभा राहातो. माझा विश्वास हलू लागतो. तेव्हा मी विचार करते, की अनेक लोक असे आहेत, जे माझ्यावर माझ्यापेक्षा अधिक विश्वास टाकतात. ही गोष्ट मला त्या बिकट प्रसंगाला तोंड देण्याचे धैर्य देते. आपले वर्तुळ विस्तारायला मदत करते.’’

प्रियांकाचे मित्र तिच्या या यशावर काय म्हणतात, असे विचारले असता प्रियांका सांगते, ‘‘मित्र मला चिडवतात. ते म्हणतात आता मी त्यांना विसरून जाईन. पण त्यांना माझा अभिमानही वाटतो. त्यांना असे वाटते, की मी जगासमोर जसे त्यांचे प्रातिनिधित्व करते.’’

image


विशेष म्हणजे प्रियांकाची आई बारावीनंतर तिचे लग्न लावून देणार होती. प्रियांकाने कशीबशी आईची समजूत काढली. प्रियांका या आठवणीने खळखळून हसते आणि म्हणते, ‘‘खरंतर आईची समजूत काढण्यात मी अपयशीच ठरले. पण ‘माया’ने मला शिकवले, की तुम्ही जो काय विचार करता, तो बडबडीतून व्यक्त होण्यापेक्षा तुमच्या कृतीतून व्यक्त व्हायला हवा. ‘माया’ने दिलेल्या आधाराच्या बळावर मी आईला हे कृतीतून समजवू शकले, की विवाह हा एकच एक पर्याय नाहीये. कमी वयात लग्नाचे दुष्परिणाम स्वत: आईला भोगावे लागलेले आहेत. तरीही ती कमी वयात माझे लग्न लावून देऊ इच्छित होती. कारण तिला हे वाटत असे, की तिच्यानंतर माझी काळजी घेणारं कुणी नसेल. पण संधी मिळाल्यानंतर लेक काय करू शकते, हे बघितल्यावर तिचा विचारही बदलला. तिला विश्वास बसला, की मी स्वत: माझी काळजी घेऊ शकते.’’

प्रियांकाने भावी आयुष्यात नेमके काय करायचेय, ते अद्याप ठरवलेले नाही. पण तिला ठाऊक आहे, की तिला कुठल्या मार्गावर चालायचेय.

ती म्हणते, ‘‘आता मी फक्त माझ्या गरजांचाच तेवढा विचार करत नाही. समाजाला मी काय देऊ शकते, त्याचाही विचार करते. एवढेच नव्हे तर आता यावेळी मी काय करू शकते, त्याचाही विचार मनात चाललेलाच असतो. योग्य वेळेची वाट मी बघते, असेही नाही. प्रत्येक क्षण मी काही तरी करत असते. मला मानसोपचार-तज्ज्ञ व्हावे, असे सध्या वाटते. पण जसजसा काळ पुढे सरकेल. मी पुढे पाऊल टाकलेले असेल… तसे मला वाटते, की मी देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काहीतरी असे करावे, जेणेकरून त्यांची मुलेही आपल्या पायावर उभी राहू शकतील. स्वत:ची स्वप्ने पूर्ण करू शकतील.’’