अंबानी, सचीनसह बारा हजार सेलीब्रिटींना दूध विकणारा देशातील सर्वात मोठा गवळी ‘देवेंद्र शहा’!

अंबानी, सचीनसह बारा हजार सेलीब्रिटींना दूध विकणारा देशातील सर्वात मोठा गवळी ‘देवेंद्र शहा’!

Thursday April 13, 2017,

5 min Read

आपल्यापेक्षा हुशार, सुंदर आणि श्रीमंत आणि प्रसिध्द व्यक्तीबद्दल सर्वांनाच आकर्षण असते, गमतीने आपण त्यांचा हेवा करताना सुध्दा म्हणतो ना, . . . .’साला इसने कौनसी डेअरी का दुध पिया है, जनम के बाद, सबकुछ आबाद ही आबाद!’ गमतीचा भाग सोडा, पण खरंच प्रसिध्द, श्रीमंत आणि यशस्वी लोक कोणत्या डेअरीचे दुध पित असतील असा विचार करून पाहिला तर अंबानी, तेंडूलकर आणि बच्चन कुटूंबियाना रोज दूध पूरविणा-या भाग्यलक्ष्मी दूध डेअरीची माहिती मिळते. पुणे शहरापासून साठ किलोमीटर अंतरावर ही हायटेक डेअरी आहे. मंचर इथल्या या डेअरीचे नाव आहे ‘भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म’ आहे. पराग मिल्क फूडसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र शहा हे या उद्योगाचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्याशी ‘युवर स्टोरी मराठी’ने चर्चा करून माहिती घेतली असता या हायटेक प्रकल्पाबाबत खूप काही रंजक आणि प्रेरणादायी गोष्टी समजतात ज्यातून देशात आजही दूध व्यवसायाला किती मोठा वाव आणि प्रतिष्ठा आहे याचे ज्ञान होते.


image


देशातील अग्रगण्य खाजगी दूध उत्पादक डेअरीमध्ये शहा यांची गोवर्धन डेअरी असल्याचे आपणास कदचित ज्ञात असेल. या शिवाय भिमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे संचालक, राष्ट्रीय ग्रामिण विकास संस्था येथे सचीव अशा पदांवर शहा कार्य करतात. देशातील सर्वात मोठ्या गायीच्या गोठ्याचे ते संचालक ‘गवळी’ असल्याचे अभिमानाने सांगतात.

२१सप्टे १९६४ मध्ये जन्मलेले शहा वाणिज्य पदवीधर आहेत. १९८९ पर्यंत त्यानी अनेक व्यवसाय जसे की कपडा उद्योग, शेअर ट्रेडींग वगैरे करून पाहिले मात्र त्यांचे मन त्यात रमले नाही. १९९१मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दूध उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाटी नवे धोरण अमलात आणण्याची घोषणा केली आणि शहा यांच्या जीवनाला दिशा मिळाली. त्या मध्ये खाजगी क्षेत्रातील व्यक्तींना दूधाच्या व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते, शेतक-यांचे दूध खाजगी लोकांनी विकत घ्यावे आणि हा उद्योग करावा असे या धोरणात अभिप्रेत होते. मग १९९२ मध्ये त्यांनी ‘पराग मिल्क फूड’च्या कामाला सुरूवात केली. दहा कोटी रूपयांची गुंतवणूक त्यासाठी करण्यात आली त्यासाठी इतर व्यवसायातील रकमांसह स्थानिक सहकारी बँकेतून कर्ज घेण्यात आले. त्यानंतर शहा यांनी या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या या कामाबद्दल राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने देखील सन्मानीत केले आहे.

पराग मिल्क फूडस प्रा लि हा देशातील खाजगी दूध क्षेत्रातील महत्वाचा प्रकल्प आहे. अत्याधुनिक तंत्रासोबतच दुधाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता चांगल्या प्रतीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ येथे तयार केले जातात. महाराष्ट्रात मंचर आणि आंध्रप्रदेशात पालमनेर येथे त्यांच्या हायटेक डेअरी आहेत. जेथे विदेशी जातीच्या तीन हजार गायींचे अत्याधुनिक पध्दतीने संवर्धन केले जाते. ज्या गायींसाठी देशातील पहिले पार्लर देखील आहे. येथे दुध उत्पादन जरी गायी पासून केले जात असले तरी ते संपूर्णत: यांत्रिक आणि व्यावसायिक पध्दतीने केले जाते. जेथे दुधाच्या नैसर्गिक शुध्दतेचे पूर्णत: लक्ष पुरविले जाते आणि त्यावर प्रक्रिया करून त्याला ‘ गो’ आणि ‘गोवर्धन’ या ब्रँण्ड नावाने विक्री केले जाते. दुधा शिवाय दही, पनीर, तूप, लस्सी अशा वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती देखील येथे केली जाते.


image


या डेअरीचा रूबाब देखील तिच्या ग्राहकांसारखाच हायटेक असून येथील ‘प्राइड ऑफ काउ’चे दूध ८० रुपये लिटर आहे. हे दूध मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर सारख्या सेलेब्रिटींसह या डेअरीच्या बारा हजार ग्राहकांना पोहोचविले जाते. डेअरीत ३५०० गायी आणि त्यांची देखरेख करण्यासाठी ७५ कर्मचारी आहेत.

‘प्राइड ऑफ काउ’ प्रॉडक्टचे सुरूवातीला १७५ ग्राहक होते. मात्र, आज मुंबई आणि पु्‍ण्यातील ग्राहकांची संख्या १२ हजारांवर पोहोचली आहे. ‘ट्रेडिंगचे चांगले काम सोडून दूधाचा व्यवसाय सुरु केल्यामुळे लोक माझ्यावर हसतात. असे सांगून शहा म्हणाले की, देशातील सगळ्यात मोठा गवळी असल्याचा मला अभिमान आहे.

'आरओ'चे पाणी पितात गायी.

या डेअरीमध्ये गायीसाठी पसरवण्यात आलेले रबर मॅट दिवसातून तिनदा बदलण्यात येते. विशेष म्हणजे येथील गायी आरओचे पाणी पितात. त्यांच्यासाठी म्युझिक २४ तास सुरुच असते. गायींना सोयाबीन, अल्फा घास, हंगामी भाज्या, मक्का असा पौष्टिक खाऊ चारा म्हणून घातला जातो. गायींचे पोट साफ करण्‍यासाठी त्यांना हिमालय ब्रँडच्या आयुर्वेदिक औषधी दिल्या जातात. गायींना दिल्या जाणार्‍या खुराकमुळे दूधमधील फॅट नैसर्गिक पध्दतीने नियंत्रणामध्ये राहतात.


image


कॅनडातील न्युट्रीशियन एक्सपर्ट डॉ.फ्रँक दर तीन महिन्यांनी येथे येतात. हवामानाच्या हिशेबाने गायींचे आहार निर्धारित करतात. सध्या फार्ममध्ये एकावेळी ५४ लिटर दूध देण्यार्‍या गायी आहेत. दूधात यूरोपियन स्टँडर्डनुसार ७ ते ९ हजार लॅक्टेशन आहे. मात्र, कॅनेडियन लॅक्टेशन ९ ते ११ हजारवर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मचा आता पर्यटन टूरमध्ये समावेश झाला आहे. काही टूर ऑपरेटर मुंबई आणि पुण्याहून फार्मसाठी पॅकेज टूर आयोजित करतात. प्रत्येक वर्षी ७-८ हजार पर्यटक फार्म पाहाण्यासाठी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या उद्योगाबाबत बोलताना देवेंद्र शहा म्हणतात की, “ देशाच्या डेअरी उद्योगात आमचा वाटा एक टक्के असला तरी त्याच्या मुल्यवर्धित दुध उत्पादनात आम्ही अग्रेसर आहोत” ते म्हणाले की ज्यावेळी दूध कच-यात फेकून दिले जात होते अश्या काळात आम्ही सुरूवात केली, मात्र सहकारी दूध उद्योगाला मार्ग देण्याचा प्रयत्न त्यावेळी खाजगी उद्योगाने केला. २००८ नंतर त्यांच्या या उद्योगाने महत्वाची भूमिका या क्षेत्रात बजावली आहे. पश्चिम भारत आणि मध्य आशियामध्ये आमच्या उत्पादनांला मोठी मागणी आहे असे शहा म्हणाले.

शहा म्हणाले की, “प्राईड ऑफ काऊ हा ब्रण्ड निर्माण करण्यामागे ही भावना होती की ही देशातील सर्वात मोठी अत्याधुनिक डेअरी आहे जेथे मानवी हस्तक्षेपाशिवाय दूध काढण्यापासून ते पँकींग करण्यापर्यत काम केले जाते. त्यामुळे त्याचा उच्च दर्जा, ताजेपणा थेट ग्राहकांच्या हाती जाई पर्यंत टिकून राहतो.”

त्यामुळे अंबानी पासून बच्चन आणि तेंडूलकर कुटूंबियांपर्यंत सारे हजारो सेलिब्रिटी यांच्या दुधाचे ग्राहक आहेत. आणि अजूनही त्यांच्या दुधाला देश-विदेशातून वाढती मागणी आहे. त्यामुळे ७० दशलक्ष डॉलर्सच्या भारतीय दूध व्यवसायात अग्रणी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. जगभरात प्रतिव्यक्ती सातशे ग्रँम डेअरी उत्पादने प्रत्येक व्यक्तीने वापरावी असे मानक आहे भारतात मात्र ते अद्याप निम्मे देखील पूर्ण झाले नाही त्यामुळे या व्यवसायाला भविष्यात खूप मोठ्या वाढीच्या संधी आहेत. सध्या या उद्योगात आंध्र आणि महाराष्ट्र मिळून वीस लाख लिटर दररोज दूध वितरण केले जाते. तर ४० मे. टन चीज विकले जाते. त्यामुळे उत्तर आणि पूर्व भारतामध्ये आणखी दोन प्लांट उभे करण्याचे काम सुरू असल्याचे शहा यांनी शेवटी सांगितले.