कट्यार काळजात घुसलीचे यश हे उत्कृष्ट टिमवर्कचे उदाहरण - सुबोध भावे

0

तो उत्तम गात नसला तरी त्याला संगीताचा कान आहे, त्याचा आवाज सुरेल नसला तरी सुरांवर त्याचे प्रेम आहे, तो म्हणजे अभिनेता सुबोध भावे याच्यासोबत आता आणखी एक पद जोडले जातेय, नाही नाही हे संगीतातले पद नाही तर एक व्यवसायिक पद आहे. अभिनेत्याबरोबरच आता सुबोध एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातोय. दिग्दर्शक म्हणून त्याची पहिलीवहिली कलाकृती म्हणजे कट्यार काळजात घुसली हा सिनेमा सध्या यशाचे विविध टप्पे अनुभवतोय. आज हे यश अनुभवताना सुबोधला आनंदासोबत एका जबाबदारीचीही जाणीव आहे, कारण उत्तमोत्तम कलाकृती देत सुबोधने प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवल्यात. अशावेळी कुठलीही व्यक्ती नॉस्टेल्जिक होईल, सुबोधही होतो.

“तीन वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या सेटवर निर्माते नितिन फडतरे यांनी मला एक प्रश्न विचारला होता, की या सिनेमानंतर पुढे नवीन कायॽ आणि मी क्षणाचाही विलंब न करता कट्यार काळजात घुसली या सिनेमाबद्दल माझ्या मनात सुरु असलेले अत्यंत प्राथमिक स्तरावरचे विचार बोलून दाखवले. नितीनजींनी फक्त ते विचार ऐकून लगेच त्या सिनेमाच्या निर्मितीची तयारी दाखवली. म्हणतात ना एखादी गोष्ट घडण्यासाठी त्याची सुरुवात महत्वाची असते कट्यार..ची पायाभरणी इतक्या सहज झाली. आणि आज जेव्हा मी हा प्रवास पहातो तेव्हा नितीनजींसारखी किती तरी माणसे माझ्यासमोर उभी रहातात ज्यांच्याशिवाय कट्यार...वर सिनेमा हे माझे स्वप्न फक्त स्वप्नच राहीले असते.”

कट्यार...च्या माध्यमातनं सुबोध अभिनेत्याबरोबरच दिग्दर्शक बनला पण एखादी भुमिका बदलावी इतके हे सहज नव्हते. सुबोध याची एक आठवण सांगतो, “जेव्हा नितीनजींना मी कट्यार...चा विचार बोलून दाखवला तेव्हा खरेच मला सिनेमाच्या निर्मितीसाठी किती पैसे लागतात याची जाणीव नव्हती, त्यांनी बजेट विचारले आणि मी सहज एक कोटी रुपये बोललो, पण त्यानंतर मात्र ते बजेट वाढतच गेले,

बजेटचा हा वाढता फुगा सांभाळण्यासाठी आम्ही अजून दोन तीन निर्मात्यांना या प्रोजेक्टमध्ये सहभागी करुन घेतले होते पण काही कारणांमुळे त्यांनी माघार घेतली. नितीनजी मात्र यातही आमच्यासोबत उभे होते, यातच एके दिवशी सहनिर्माते म्हणून एस्सल व्हिजनने होकार दिला आणि मग पुढचा प्रवास हा तुम्ही सर्वांनीच पाहिलाय .”

शंकर महादेवन सारख्या महान गायकाने सुबोधच्या दिग्दर्शनाखाली अभिनयाची त्यांची नवी सुरुवात केली याबद्दल सुबोध त्यांचा ॠणी असल्याचे सांगतो. “पंडितजींच्या भूमिकेसाठी मला असा कलाकार हवा होता जो उत्तम गातो, शंकर महादेव यांची निवड याचमुळे करण्यात आली. ते गायक संगीतकार म्हणून किती ग्रेट आहेत हे मी कशाला सांगू, पण त्याही पलिकडे त्यांना मी जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा मला त्यांच्या डोळ्यात एका अभिनेत्याचे भाव दिसायचे जे खूप काही व्यक्त करण्यास आतुर होते शिवाय त्यांची वेळोवेळी इतरांना मदत करण्याची वृत्ती अख्खी सिनेसृष्टी जाणून आहे, त्यांच्यात मला माझे पंडित भानूशंकर शास्त्री मिळाले,

त्यांनीही या भुमिकेला पुरेपूर न्याय दिला, त्यासाठी मराठी भाषेवर, संवाद बोलण्यावर त्यांनी विशेष मेहनत घेतली मी जे जे त्यांना सांगितले ते त्यांनी प्रामाणिक आणि एकाग्रतेने केले, पडद्यावरचा त्यांचा अभिनय हा त्यांनी कट्यारसाठी घेतलेल्या या कष्टांचे फलित आहे अजून काही नाही.”

खूप कमी जणांना माहितीये की पन्नाशीचा काळ गाजवणारे हे नाटक सुबोधच्या पुढाकारानंतर पुनरुज्जीत झाले, यापूर्वी सुबोधने त्याचा मित्र आणि गायक राहूल देशपांडेसोबत कट्यार..चे अनेक प्रयोग केले होते, ज्याचे दिग्दर्शन सुबोधन केले आणि त्यानंतर हा सिनेमा.

पण सुबोध या सिनेमाला नाटकाचा रिमेक मानत नाही, त्याच्या मते “हा सिनेमा नाटकावरुन प्रेरित आहे, यातली कथा आणि पात्रं नाटकावरुन घेण्यात आली असली तरी सिनेमॅटीक लिबर्टीनुसार मी या सिनेमातल्या सर्व पात्रांना समान न्याय द्यायचा प्रयत्न केलाय म्हणजे कट्यार हा सिनेमा फक्त पंडितजी, सदाशिव आणि खाँसाहेबच याच पात्रांभोवती फिरताना दिसत नाही तर झरीन, उम, ही पात्रंही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका भूमिका बजावताना दिसतात.”

सिनेमा बनवणे हे टीमवर्क आहे आणि कट्यारचे यश हे अशाच उत्तम टीमवर्कचे उदाहरण असल्याची नम्र कबूली सुबोध यावेळी दिली.