केवळ प्रसिद्धीच्या मागे न लागता, कलेला केंद्रस्थानी ठेवा - शिबानी कश्यप

केवळ प्रसिद्धीच्या मागे न लागता, कलेला केंद्रस्थानी ठेवा - शिबानी कश्यप

Thursday January 07, 2016,

6 min Read

त्या स्वतःला एक मुक्त आत्मा, एक सुफी म्हणवून घेतात. त्या थेट मनातले बोलतात आणि स्वतःच्या अपयशाबद्दल बोलतानाही कोणतेही शब्दांचे खेळ न करता, त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न न करता, अगदी मोकळेपणाने बोलतात.. गायक कलाकार शिबानी कश्यप यांच्याबरोबर सुमारे तासभर झालेल्या या चर्चेत मला खास करुन जाणविला तो त्यांचा आत्मविश्वास.... स्वतःवरच्या या विश्वासाच्या बळावरच शिबानी एवढे वर्ष सातत्याने पुढेच जात राहिल्या आहेत.

आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिबानी यांनी केली ती एयर एफएमच्या जिंगलद्वारे आणि तेंव्हापासून आजपर्यंत त्यांचा संगीतमय प्रवास सुरुच आहे... जसजशी शिबानी यांची ही कथा उलगडू लागली, तसतशी त्यांचीच एक रचना खास करुन माझ्या कानात निनादत राहिली.

आय ऍम ए वुमन

आय ऍम ए गर्ल, धिस इज माय स्टोरी.....

शिबानी यांनी आपल्या कारकिर्दीला त्यावेळी सुरुवात केली, तेंव्हा पॉप संगीताने एक खास जॉनर अर्थात संगीताची शैली म्हणून भारतीय संगीत विश्वात प्रवेश केला होता. शिबानी त्या लाटेवर स्वार झाल्या आणि ‘सजना आ भी जा’ या त्यांच्या लोकप्रिय गाण्याने त्यांना यशाच्या शिखरावर पोहचवले.

image


एकीकडे काळानुसार या उद्योगात बदल घडत होते आणि बाजारपेठेतील मागणीनुसार रुपांतरही होत होते, मात्र शिबानी यादेखील काळाच्या बरोबरीने प्रवास करत होत्या. आत्मनिर्भरता आणि नवीन संधींचा शोध घेण्याचे कौशल्य या गुणांमुळे त्या एवढी वर्ष काम करत राहिल्या. “ मी आत्मनिर्भर आहे, मी माझी गाणी आणि माझे संगीत स्वतः तयार करते. मी लोकांनी मला फोन करण्याची वाट पहात नाही. ब्रॅंड उभारणीसाठी महत्वाचे असते ती एक व्यक्ती आणि एक कलाकार यांना एकमेकांपासून वेगळे करणे आणि त्या कलात्मक क्षमतांवर संस्कार करत रहाणे. शिकण्याची, वाढण्याची आणि विकसित होण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीवरच असते, जेणेकरुन इतरांना तुमची दखल घेणे भाग पडते,” त्या सांगतात.

आवड आणि इच्छा तुमच्यासाठी यशाचा मार्ग खुला करतात, यावर शिबानी यांचा ठाम विश्वास आहे. “ जर एखादी गोष्ट करण्याची तुमची प्रामाणिक इच्छा असेल, तर तुम्ही ते मिळवताच आणि हे होताना मी पाहिले आहे. त्यामुळे जर तुम्ही स्वप्न पाहिले, तर तुम्ही ते जगताही,” ३६ वर्षीय शिबानी सांगतात.

शिबानी यांच्यासाठी संगीत हे एक सामाजिक बदलाचे आणि परिणामकारक माध्यम आहे. एक असे माध्यम ज्याद्वारे त्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर व्यक्त होऊ शकतात. “ संगीत मला लोकांवर प्रभाव पाडण्याच्या कामी तर मदत करतेच पण त्याचबरोबर लोकांचे सबलीकरण करण्यातही मला संगीताची मोठी मदत होते आणि त्यादृष्टीने संगीताचा अर्थ माझ्यासाठी खूपच व्यापक आहे,” त्या विस्ताराने सांगतात. स्तनांचा कर्करोग, महिला सबलीकरण, दहशतवाद, दारु पिऊन गाडी चालविणे, यांसारख्या अनेक ज्वलंत विषयांवर त्यांनी आजपर्यंत आपल्या संगीताच्या माध्यमातून भाष्य केले आहे. मात्र त्या पुढे सांगतात, “कलाकारांना उपदेशकाच्या भूमिकेत बघायला लोकांना नेहमीच आवडते असे नाही. म्हणूनच मी माझा संदेश अगदी हलक्याफुलक्या तऱ्हेने लोकांपर्यंतच पोहचविते.”

शिबानी यांच्या मते प्रत्येक कलाकाराने आपल्या अंतर्मनात डोकावून पहाण्याची आणि स्वतःची आवड, कला आणि गुणवत्ता समजवून घेण्याची गरज असते. “ ‘सुफी संगीत’ या टॅगचा वापर आणि गैरवापर होतच राहिला आहे,” त्या सांगतात. त्यांच्या संगीताच्या शैलीबाबत विस्ताराने सांगताना त्या म्हणतात, की त्यांची गायन शैली ही लोकसंगीताची आहे तर संगीत हे रुहानी (प्रगाढ) आहे. त्यांच्या मते सुफी चा अर्थ आहे, “ एक असा एक मुक्तात्मा ज्याचा दैवी शक्तीवर विश्वास आहे आणि ज्याला या विश्वाशी एकरुप होण्याची इच्छा आहे.”

लाईव्ह परफॉर्मन्सची असलेली तीव्र आवडच शिबानी यांना सतत प्रेरणा देत रहाते. त्यांना प्रवासाची आवड असून देशभरात आणि जगभरात कार्यक्रम सादर करण्यात त्यांना प्रचंड आनंद मिळतो. गायनाहून नुकताच एक मोठा कार्यक्रम करुन परत आलेल्या शिबानी सांगतात, की सतत तंदुरुस्त रहाणे हे खूपच गरजेचे असते.

image


आपले आजही प्रशिक्षण सुरुच असल्याचे शिबानी आवर्जून सांगतात. दिल्ली स्कूल ऑफ म्युझिकमधून त्यांनी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर त्या पियानो वाजवायलाही शिकल्या असून गिटार तर त्या स्वतःहून शिकल्या आहेत. तर पंडीत पी आर वर्मा यांच्याकडून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत, ज्यांच्याबरोबर त्या आजही रियाज करतात.

लष्करी कुटुंबात जन्मलेल्या दिल्लीकर शिबानी यांनी दिल्लीच्याच लेडी श्रीराम महाविद्यालयातून साहित्य या विषयात पदवी घेतली. त्या ज्या सुरक्षित वातारवरणात वाढल्या त्या वातावरणातून बाहेर पडणे आणि स्वतंत्र बनणे हे त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान होते. “ मला माझ्या आयुष्याचा, संगीताचा शोध घ्यायचा होता आणि मुख्य म्हणजे मला व्यक्त होण्यासाठी स्वतःचे अवकाश हवे होते,” त्या सांगतात. त्यांनी जागा भाड्याने घेतली, गाडी विकत घेतली, गाडी चालवायला त्या शिकल्या आणि आपण कितीतरी गोष्टी स्वतंत्रपणे करु शकतो, हे त्यांना प्रकर्षाने जाणवले.

“ जसजसे तुम्ही मोठे होता, तसतशी आव्हानेही वाढत जातात,” शिबानी सांगतात. जेंव्हा एखादा कलाकार हा प्रेक्षकांसाठी नवा असतो, तेंव्हा अपेक्षा नसतात. मात्र यशाच्या एका पातळीवर पोहचल्यानंतर मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचवतात. तर टीकेबाबत बोलताना शिबानी सांगतात की केवळ एका फ्लॉपने तुम्ही त्या कलाकाराला पूर्णपणे खोडून काढू शकत नाही. जरी बहुतेकदा हिटसाठी कलाकारालाच जबाबदार धरले जात असले, तरी शिबानी यांच्या मते त्यासाठी इतरही गोष्टी कोरणीभूत असतातच. बऱ्याचदा चांगल्या कामाला त्याच्या योग्यतेनुसार स्वीकारले जातेच असेही नाही, कारण मार्केटींग, जाहिराती आणि इतर अनेक गोष्टीही रसिकांपर्यंत गाणे पोहचविण्याच्या कामी अतिशय महत्वाच्या असतात. आजपर्यंतच्या आपण गायलेल्या गाण्यांपैकी केवळ एक तृतीयांश गाणीच व्यावसायिकरित्या हिट ठरली असल्याचे शिबानी सांगतात. केहेले केहेले ही त्यांची अशीच एक अतिशय आवडती रचना.... त्यांच्या कार्यक्रमांमध्ये या गाण्याचे खूपच कौतुक होते. “ प्रेक्षकांना ते गाणे खूप आवडते आणि ते त्याचे कौतुकही करतात, मात्र त्याचबरोबर यापूर्वी आपण हे गाणे न ऐकल्याचे त्यांना आश्चर्यही वाटते. ही एक अशा रचनांपैकी एक रचना आहे, जी योग्य त्या मार्केटींगच्या अभावी प्रेक्षकांपर्यंत खऱ्या अर्थाने कधी पोहचलीच नाही,” त्या सांगतात.

image


यावेळी त्या एका गाण्याची आवर्जून आठवण सांगतात, जे एका चित्रपटात समाविष्ट करण्याचे ठरले होते, मात्र शेवटी ते चित्रपटातून वगळण्यात आले. त्यामुळे त्या अगदी तुटून गेल्या आणि उदास झाल्या, मात्र त्यांच्या कधीही न थकणाऱ्या स्वभावानेच त्यांना यातून बाहेरही काढले. “ मला माहित आहे की काही गोष्टी होतील तर काही होणार नाहीत. हेच आयुष्य आहे,” त्या सांगतात आणि पुढे हेदेखील म्हणतात की ग्लास अर्धा भरला आहे, हाच त्यांचा आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन असतो.

त्यांची आई, भाऊ आणि पती हे त्यांच्या आयुष्यातील तीन आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आईच्याच मार्गदर्शनाखाली त्या एक महत्वाकांक्षी व्यक्ती बनल्या आहेत. त्याबाबतची आठवण शिबानी सांगतात, “ एका संधीतूनच मला दुसरी संधी मिळेल हे तिनेच मला सांगितले होते.” तर त्यांचा भाऊ हा त्यांचा सर्वोत्तम टीकाकार आहे आणि त्यांच्या प्रामाणिक मतांमुळे आणि टीकेमुळे त्या सर्वोत्तम काम करु शकल्या आहेत. शिबानी सांगतात की त्यांचे अभिनेता पती राजीव रोडा यांनी त्यांना संगीताचे मूल्य जाणून घेण्यात मदत केली आहे. “ एखाद्या प्रकल्पाला चांगले मूल्य नसल्यास - मग ते वेळ किंवा पैशाच्या बाबत असले - त्याला नाही म्हणण्यास मी शिकले आहे,” त्या सांगतात.

बऱ्याचदा कलाकारांना व्यावसायिक गोष्टींची पुरेशी जाण नसते आणि त्यामुळे बऱ्याच जणांचे शोषणही होते. शिबानी यांच्या मते भारतामध्ये संगीत व्यवस्थापकांचा असलेला अभाव हे एक मोठे आव्हान आहे. सुरुवातीला जेंव्हा त्यांनी एका मोठ्या म्युझिक लेबलच्या खाली सुरुवात केली, त्यावेळी संगीत हेच त्यांचे प्राधान्य होते. “ तुमच्या संगीताची समज असलेला व्यवसाय विशेषज्ञ सापडविणे आज गरजेचे झाले आहे, जो तुमची शैली, ओळख आणि कला यांना पूरक अशा प्रकारे तुमच्या संगीताचा प्रसार करु शकेल,” त्या सल्ला देतात.

तरुण आणि उदयोन्मुख कलाकारांना शिबानी सांगतात, की तुमच्या कलेवर लक्ष केंद्रीत करा, ना की प्रसिद्ध होण्यावर. “ एक कलाकार म्हणून तुम्ही चमकले पाहिजे आणि हे केवळ प्रचंड सरावातूनच होऊ शकते. तुमच्यातील वेगळेपण आणि वैशिष्ट्य शोधून काढा आणि त्यावर लक्ष केंद्रीत करा, ना की इतर कलाकारांची नक्कल करण्यावर,” शिबानी सांगतात.

लेखक – तन्वी दुबे

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन