ज्यांनी मुष्टियुद्धाचे कधीच प्रशिक्षण घेतले नाही, ते आज आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देत आहेत ‘बॉक्सिंग’ चे धडे ...

0

महिला मुष्टीयोध्द्यांचे नाव येताच आपल्याला सर्वात पहिले नाव आठवते ते म्हणजे मेरी कोम ह्यांचे. देशाला अजून एक अशी मेरी कोम देण्याच्या प्रयत्नात आहेत, ग्वालियरचे मुष्टियोद्धा प्रशिक्षक तरनेश तपन. जे काम तर करतात मध्य प्रदेशच्या वीजमंडळात, मात्र प्रशिक्षण देतात, त्या मुलींना ज्या मुष्टीयुध्दात आपली कारकीर्द घडवू इच्छितात. आतापर्यंत जवळपास सत्तरपेक्षा अधिक राष्ट्रीय खेळाडू या देशाला देणारे तरनेश आवड म्हणून प्रशिक्षक झाले आणि त्यांनी कुठूनही मुष्टीयोद्धेचे प्रशिक्षण देखील घेतले नाही. तरनेश यांनी ‘युअर स्टोरी’ला सांगितले की, “मुष्टियुद्ध या खेळासोबत माझा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नव्हता, मी हॉकी खेळाडू होतो आणि ग्वालियर मध्ये दर्पण खेळ संस्थेच्या नावाने एका क्लबमध्ये खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करत होतो.”

तरनेश केवळ मुलींनाच नाही तर, मुलांना देखील मुष्टीयोद्धा बनण्याचे प्रशिक्षण द्यायचे. झाले असे की, तरनेश यांना मुष्टीयुद्धाचे प्रशिक्षण देण्याचा सल्ला त्यांच्या एका मित्राने दिला. ज्याने त्यांना सांगितले की, तुम्ही खूप मेहनती आहात, त्यासाठी मुष्टियुद्धासारख्या खेळाला तुमच्यासारख्या एका व्यक्तीची गरज आहे, जो या खेळातील विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देऊ शकेल. त्यावेळी ग्वालियरमध्ये मुष्टियुद्ध हा नवा खेळ होता, कारण यापूर्वी या खेळाबाबत कुणालाही या खेळाची अधिक माहिती नव्हती. त्यामुळे सुरुवातीला तरनेश यांना खूप अडचणी आल्या, त्यांना या खेळाशी संबंधित प्रशिक्षक देखील भेटले नाहीत. तेव्हा त्यांनी सैन्याच्या त्या जवानांना आपल्या सोबत सामील केले, जे या खेळात निपुण होते. ज्यांनी त्यांच्या क्लबमध्ये येणा-या मुलींना मुष्टीयुद्धाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, मात्र सैन्यातील जवान ज्या प्रकारचे कठीण प्रशिक्षण खेळाडूंना देत होते, त्याला बघून जे लोक हा खेळ खेळू इच्छित होते, ते यापासून लांब राहण्यातच स्वतःची भलाई समजत होते. मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण त्यांनी देण्यास सुरुवात केली, त्यासाठी त्यांनी मुष्टियुद्धाचे अनेक सामने पहिले आणि लोकांकडून या खेळाची माहिती घेण्यास सुरुवात केली. ज्यानंतर मुष्टीयुद्धासाठी खेळाडूंना तयार केले.

जेव्हा वर्ष२००२मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला मुष्टीयोद्धांचे पदार्पण झाले, तेव्हा येथील मुलींसाठी ही खूपच नविन बाब होती. तेव्हा तरनेश यांनी मुलींना मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण देण्याचा विचार केला, जेणेकरून त्याचा खूप फायदा होऊ शकेल. त्यानंतर त्यांनी मुलांसोबतच मुलींनाही प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीस त्यांच्याकडे १४ वर्षापासून १८ वर्षापर्यंतच्या १५-२० मुली मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत होत्या. जेव्हा पहिल्यांदा राज्यस्तरीय महिलांची मुष्टियुद्धाची स्पर्धा झाली, तेव्हा त्यात त्यांच्या संघाने देखील सहभाग घेतला. ज्यात त्यांचा संघ विजेता झाला. त्यानंतर पुढील दोन वर्षापर्यंत त्यांचा संघ हा खिताब आपल्या नावावर करत होता. त्या व्यतिरिक्त तरनेश यांच्याकडे प्रशिक्षण घेणा-या नेहा ठाकूर यांनी सलग तीन वर्षापर्यंत राज्यस्तरीय मुष्टियुद्धस्पर्धेसाठी सुवर्ण पदक पटकाविले. विशेष बाब ही होती की, नेहा या खेळात जितक्या चपळ होत्या, तितक्याच त्या शिक्षणात देखील हुशार होत्या. हेच कारण आहे की, यावर्षी नेहा यांनी यूपीएस परीक्षेत विसावे स्थान प्राप्त केले. तरनेश यांच्या मते, इतिहासात पहिल्यांदाच एखादा मुष्टियुद्धा खेळाडू आयएएस चे प्रशिक्षण घेत आहे.

हळू हळू तरनेश यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खूप नाव कमवायला लागले, ज्यानंतर महिला मुष्टियुद्धात ग्वालियर मोठी ताकद बनला. त्यानंतर तरनेश यांनी नव्या मुलांना मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी ग्वालियरच्या एका सरकारी शाळेतील काही मुलींना निवडले. त्यात अधिकाधिक मुली गरीब होत्या. त्याच मुलींमधून प्रीती सोनी, प्रियांका सोनी आणि निशा जातव अशा मुली होत्या, ज्यांनी खेळासाठी प्रत्येक वर्षी देण्यात येणारा मध्यप्रदेश सरकारचा एकलव्य पुरस्कार आपल्या नावे केला. या तिन्ही मुली खूपच गरीब घराण्यातील आणि कामगारांच्या मुली होत्या, ज्यांना मुष्टियुद्धाचे धडे तरनेश यांनी दिले होते. आज तरनेश १४ वर्षापासून २४ वर्षापर्यंतच्या जवळपास २० मुलींना मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण देत आहेत. विशेष बाब ही आहे की, ते मोफत मुलींना मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण देत असतात. प्रशिक्षणात येणारा खर्च क्लबचे सदस्यच उचलतात .

हा तरनेशच्या प्रशिक्षणाचाच परिणाम आहे की, आतापर्यंत त्यांच्या ७० पेक्षा अधिक महिला आणि पुरुष खेळाडूंनी विभिन्न राष्ट्रीय मुष्टीयोद्धा स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. तर २५ पेक्षा अधिक राष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. तरनेश यांच्याकडूनच प्रशिक्षण घेतलेली मुष्टीयोद्धा अंजली शर्मा हिने तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपली मजल मारली आहे. आज तरनेश आणि त्यांची सहयोगी प्रीती सोनी, ज्यांनी कधी तरनेश यांच्याकडूनच मुष्टियुद्धाचे प्रशिक्षण घेतले होते, हे दोघेही मिळून आता मुष्टियुद्धाच्या नव्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. तरनेश यांच्याकडून प्रशिक्षित झालेले १०० पेक्षा अधिक खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत आहेत, तसेच त्यांचे अधिकाधिक खेळाडू सैन्यात सामील आहेत.

इतके केल्यानंतर देखील तरनेश यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा संघासोबत दुस-या शहरात जाण्यासाठी तरनेश यांना कित्येक दिवस सरकारी कामकाजातून सुट्टी देखील घ्यावी लागत असे. आर्थिक तंगीमुळे खेळाडूंना बॉक्सिंग गोल्व्जस्च्या कमतरतेचा देखील सामना करावा लागत असे. असे असूनही, तरनेश यांचा विश्वास आणि जिद्द याला तडा गेला नाही. त्यांनी बिकट परिस्थितीत देखील प्रशिक्षण देणे सुरु ठेवले. तरनेश कठीण परिस्थितीमुळे थोडे निराश देखील होतात, मात्र हारत नाहीत. कारण, त्यांनी समस्यांचा सामना कसा करावा हे चांगल्या प्रकारे शिकले आहे. म्हणूनच तर ते म्हणतात की, “ सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मी स्वतःला या खेळासाठी पूर्णपणे समर्पित करेन.”

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे.